डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग ही माणसे, त्यांची ‘सर्च’ (सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ) ही संस्था, हे सगळे महाराष्ट्राच्या ओळखीचे आहे. वैद्यकशास्त्राचे उत्कृष्ट शिक्षण घेऊन ते ज्ञान आदिवासी भागात वापरणारे हे लोक. आपल्या हृद्रोगाचा वैयक्तिक अनुभव वापरून ‘माणसांनी निरामय कसे जगावे’ हे शिकवणारे अभय, झाडांशी स्त्रियांचे नाते आणि ग्रामीण स्त्रियांची स्वतःच्या शारीरिक व्यवहारांकडे पाहायची दृष्टी अशा दोन महत्त्वाच्या संकल्पनांच्या कर्त्या राणी, नुकतेच पन्नाशी उलटलेले हे लोक ‘कर्त्या’ सुधारकांपैकी महत्त्वाचे. त्यांचे काम आणि त्या कामाची इतर जागी ‘लागवड’ करण्याच्या शक्यता, यांच्याविषयी अनौपचारिक गप्पांमधून माहिती मिळवायचा प्रयत्न ‘आजचा सुधारक’ने केला–आपल्या नेहमीचा स्वभाव जरा बाजूला ठेवून! हे माहिती कमावणे ना धड मुलाखतीसारखे होते, ना धड गप्पा–चर्चा असे. दोन माणसे. दोघांनाही काम करणे आणि विचार करणे आवडते आणि जमते. सुटी माणसे, पण काही बाबतीत इतकी एकजीव झालेली की एकाची ज्ञानद्रिये आणि कर्मेद्रिये सहज दुसऱ्यालाही उपलब्ध असावी. एकाच्या ऊर्जेने दुसऱ्याची ऊर्जा बहुगुणित होण्याला ‘सिनर्जी’ (synergy) असा शब्द वापरतात, त्याचे हे उदाहरण. एका बाबतीतली माहिती, एका मुद्द्यांवरील मते जाणायला जावे, आणि प्रत्यक्षात गोल गोल फिरून भलतीकडेच पोचावे–आणि शेवटी जाणवावे की मूळ हेतूही साधलाच, असे वारंवार झाले. अनेकदा तर ‘तपास’ वगैरे सोडून फक्त मैत्री जमवावी, असाही मोह झाला. पण हे सारे आ.सु.च्या वाचकांपर्यंत पोचायला हवेच आहे, हेही ठामपणे जाणवत राहिले.
सर्चचे काम : स्त्रीरोग, बाळंतपण, नवजात बालकांची काळजी आणि न्यूमोनियावर उपचार करणाऱ्या आरोग्य-दायांचे प्रशिक्षण, हा एक भाग ह्या ‘आरोग्यदतां’ नी गडचिरोली जिल्ह्यातील बालमृत्यूंचे प्रमाण एक तृतीयांशावर आणले. प्रशिक्षण आणि नंतरची देखरेख यातून जाणवले की बालकांचे खरे घातक रोग पचनसंस्थेचे नसून श्वसनसंस्थेचे आहेत. आपल्या कामाच्या सततच्या आणि बारकाईच्या वैज्ञानिक वि लेषणातूनच हा ‘प्रस्थापित’ मताविरुद्धचा निष्कर्ष काढता आला.
आदिवासी भागात दास्त्वा प्रभाव फार. त्याचे दुष्परिणाम मात्र व्यसनी पुरुषांपेक्षा बायकामुलांना जास्त भोगावे लागतात, ही आपल्या समाजव्यवस्थेची देणगी. गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी घडवून आणण्यात ‘सर्च’ने पुढाकार घेतला. व्यसनमुक्ती केंद्र चालवणे, गावोगावी व्यसनमुक्ती शिबिरे भरवणे, वगैरे कामे ‘सर्च’ करते. इथेही कामाची परिणामकारकता, व्यसनमुक्तांची ‘घसरण’, हे सारे सातत्याने तपासले जात असते.
तरुण मुलामुलींना लैंगिक शिक्षण देणे, हे आणखी एक क्षेत्र. असे शिक्षण देण्यासाठी मानवी ‘संसाधने’ घडवणेही यात आले. शिक्षक आणि विद्यार्थी अशा दोघांनाही सारखे तपासत आपल्या पद्धती सुधारत राहणे, हा ‘सर्च’चा स्थायीभाव.
ह्या उपक्रमांच्या मानाने इस्पितळ चालवणे आणि त्याशेजारच्या गावांना आरोग्यसेवा पुरवणे, हा तसा ओळखीच्या वैद्यकसेवेचा प्रकार. पण इथेही इस्पितळाच्या रचनेपासून, स्थापत्यापासून ते निदान-इलाजापर्यंत सगळे कसोशीने ‘रोगीकेंद्री’ केलेले. इथे आजारी पडायलाही मजा येईल, असे भासवणारे!
‘सर्च’चा अर्थव्यवहार कसा सांभाळला जातो, हे तपासताना नावातील ‘रिसर्च’चे महत्त्व समजते. काही परिघावरच्या औषधांसाठी रोग्यांकडून पैसे घेतले जातात. व्यसन मुक्तीसाठी येणाऱ्यांकडूनही त्याचे मोल घेतले जाते. पण एकूण पाहता रोगी सर्व खर्चाचा जेमतेम दहा टक्के भाग पुरवतात. उरलेला नव्वद टक्के खर्च देशी-परदेशी ‘संशोधन-वृत्तीं’मधून, रीसर्च jट्समधून भागवला जातो. जर काटेकोर वैज्ञानिक संशोधनाची शिस्त पाळली नाही, तर ह्या ग्रॅट्स मिळणे अवघड जाईल. आपण करत असलेल्या कामातील कार्यकारणभाव नोंदणे, त्याचा सांख्यिकीय अभ्यास करून मगच निष्कर्ष काढणे, आणि त्यातून दूरगामी धोरणे ठरवणे—-ह्यातूनच ‘सर्च’चा खर्च चालतो. (इथेही पँट्सचे परदेशी स्रोतांवर अवलंबून असणे ‘सर्च’ला फारसे आवडत नाही—-पण पर्यायही नाहीत). ग्रामीण भागात कल्पकतेने वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या अनेक संस्था आहेत. पण त्यात संशोधनाचे, काटेकोर मूल्यमापनाचे स्थान गाभ्यात नेऊन ठेवणे, हे ‘सर्च’चे वैशिष्ट्य आहे.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुट्या रोग्याच्या इलाजाइतकेच किंबहुना जास्तच महत्त्व एकूण समूहाच्या आरोग्याला देणे, आणि ह्यासाठी रोग होऊच नयेत अशा जीवनपद्धतीचा प्रचार करणे. जीवनपद्धती बदलणे म्हणजेच समाजपरिवर्तन, आणि ह्यासाठी ‘सर्च’ गांधीजींची टप्प्याटप्प्याने, तुकड्यातुकड्याने सुधारणा करायची पद्धत वापरते. एकदम ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’, अशा सुधारणेचा आग्रह धरत नाही. ताबडतोब करता येईल ते करावे, आणि मग पुढचे पाऊल टाकावे, अशी ही पद्धत. आणि हे शक्य आहे. गावातल्या लोकांचे आरोग्य सध्या आहे त्यापेक्षा उद्या जास्त चांगले करता येते, परवा आणखी चांगले करता येते. गावातील माणसांचे शिक्षण-प्रशिक्षण करता आले, तर ते एक मोठेच संसाधन आपल्या प्रयत्नांसाठी उपलब्ध होते. आणि एकदा हे भांडवल वापरता आले की पुढचे बदल सोपे होतात. मोठाली संसाधने हातात येण्याची वाट न पाहता सुधारणा घडू लागते. ‘सर्च’च्या आजवरच्या अनुभवांनी अनेकवार अधोरेखित केलेली ही दृष्टी आहे. म्हणजे आपल्या कामाचा वैज्ञानिक अर्थ लावतालावताच ‘सर्च’ समाजवैज्ञानिक अर्थही तपासत आहे!
गुणाकार: हे काम, ह्या नमुन्याचे काम इतर जागीही करता येईल का? अशा तर्हेने ‘सर्च’ला ‘गुणायचे’ असेल, तर कोणती संसाधने हवी? ती उभारणारी, पुरवणारी अशी संस्था घडवता येईल का? ह्या आणि ह्यातून ‘फुटणाऱ्या’ प्र नांवर ‘सर्च’ने पुष्कळ विचार केला आहे. परिणामकारक असणारी, आणि त्याचवेळी प्रत्येक नव्या जागेचे वेगळे प्र न सोडवण्याइतकी लवचिक असलेली पद्धत आहे का? शासकीय पातळीवर काम करण्याचा बंग दांपत्याचा अनुभव चांगला नाही. त्यामुळे अशा विस्ताराची यंत्रणा सुचवायला ते तयार नाहीत. हा ‘बोलू–की–नको’ भाव म्हणजे ‘सर्च’ च्या वैज्ञानिक वृत्तीचा परिपाक आहे. उपलब्ध अनुभवातून ठाम निष्कर्ष निघत नाही, आणि अपुऱ्या माहितीवरून सल्ला द्यायला ‘सर्च’ तयार नाही.
पण काही अमुक करणे योग्य ठरेल–तमुक करणे टाळावे, अशा प्रकारचे निष्कर्ष काढता येतात—-जरी त्यातून काही एकछत्री उत्तर देणे अवघड असले, तरीही. एक म्हणजे ‘सर्च’कडे एक जिवंत, सक्रीय विद्यापीठ म्हणून पाहावे–नुसतेच ‘मॉडेल’ (आदर्श-प्रतिस्प) म्हणून पाहू नये. स्टीफन आर. कव्हे (Stephen R. Covey) या व्यवस्थापन-तज्ञाने परिणामकारक कामे करणाऱ्या माणसांचा अभ्यास केला. अशा माणसांमध्ये हमखास आढळणाऱ्या काही सवयी त्याने नोंदल्या. मग ह्या सवयी अंगी बाणवल्या तर परिणामकारकता वाढेल, हे सुचले. पुस्तके, भाषणे, कार्यशाळा, अशा वाटांनी कव्हे ह्या सवयींचे प्रशिक्षण देतो. पण एकच माणूस पुरे पडणार नाही, तर त्याने थेट विद्यार्थी न घडवता प्रशिक्षक घडवायचे ठरवले. असे प्रशिक्षण झालेल्यांना कव्हे प्रशिक्षक म्हणून काम करण्याबाबत प्रमाणपत्रे देतो. ह्यासाठी चाचण्या घेणे, मूल्यमापन करणे, हे कव्हेला जमले आहे. आरोग्याच्या क्षेत्रात ह्याला समांतर प्रयोग केला, तर ‘सर्च’ हे जितेजागते विद्यापीठ ठरेल—-तरुणांना मार्गदर्शक ठरेल. असा गुणाकार एखादेवेळी (बहुधा!) साध्या ‘अमुक जिल्ह्यातले सर्च’ या नमुन्यापेक्षा परिणामकारक होईल.
‘सर्च’ म्हणजे नुसतेच बंग दांपत्य नव्हे—-जरी बंगांना सुटे काढणे शक्य नसले तरी. नेतृत्व ते पुरवतात. त्यांच्याभोवती कार्यकर्ते, सहकारी यांचा एक गट आहे. आणि अखेर त्यांच्या संपर्कात येणारे सर्व लोक आहेत.
आजच ‘सर्च’ कार्यकर्ते घडवत आहे. त्यांना नेतृत्व देणारेही घडवता येतील. त्यांच्या पद्धती लोकांच्या सहभागाचा आग्रह धरणाऱ्या आहेत. तांत्रिक भाग शिकवून भागणार नाही, तर ह्या सहभागावरच्या आग्रहाची गरजही प्रशिक्षणा-तून ठसवावी लागेल. ह्याशिवाय अशी (‘ही’ नव्हे!) संस्था दुसरीकडे उभारता येणार नाही.
पण स्वयंसेवी संस्थांना नेहमीच एक ‘चैतन्य’ पुरवणारी व्यक्ती किंवा गट लागतो. काही अंशी तरी अशा संस्थांचे काम हे त्या व्यक्तींचे काम असते. त्यामुळे ‘सर्च’ने काम राणी-अभय ‘निरपेक्ष’ असू शकत नाही! प्रत्येकच कामात काही ‘उत्प्रेरक’ असतात, आणि त्यामुळे काम ही अशा उत्प्रेरकांची ‘कलाकृती’ असते. काही प्रमाणात हे गदिमांच्या कवितेतल्या काळवीटासारखे आहे—-तो तरुण काळवीटांना जगायचे तंत्र शिकवू शकतो—-पण आपला शिंगांचा बाज देऊ शकत नाही. आणि अशा प्रयत्नांमध्ये काय टाळायला हवे, यावरही ‘सर्च’चे ठाम, अनुभवसिद्ध मत आहे. एकाच संस्थेचा भौगोलिक व्याप वाढवणे गैर आहे, कारण त्याने काम झपाट्याने ‘विरळ’ होते. ह्या कामात कुठेही ‘सरकारीकरण’ व्हायला नको, नाहीतर ती औपचारिकता कामाला ‘गाडून’ टाकेल. अशा कामाचे व्यापरीकरण–बाजारीकरणही व्हायला नको, कारण ते मूळ हेतूंवरच घाव घालेल.
ह्या सगळ्याऐवजी काटेकोर संशोधन, आपल्या कामाचे वैज्ञानिक मूल्यमापन, यांचा प्रसार सर्वात प्रभावी ठरतो. हे हत्यार जितक्या दूरवर मारा करते, तितके दूर काहीही पोचत नाही. अविकसित देशांमधील-स्त्रियांमध्ये स्त्रीरोग हा महत्त्वाचा प्र न आहे हे, किंवा बालमृत्यूचा ‘गुन्हेगार’ न्युमोनियाला गावपातळीवरच नियंत्रित केले जाऊ शकते हे ‘सर्च’चे संशोधन आज जगन्मान्य झाले आहे. आणि यात इतर कशाहीपेक्षा माहिती–वि लेषण–निष्कर्ष ह्या पद्धतीचे श्रेय जास्त आहे. प्रत्येकच ‘नव्या सर्च’ला असे मोठे यश मिळेलच असे नाही. पण जर त्यांची पद्धत रेखीव आणि विचारी असेल, तर त्यांचे ज्ञान दूरवर परिणाम घडवेलच.
ज्ञान कमवायचे, ते प्रयोगांमधून, कामामधून आणि त्याच्या वि लेषणातून. आणि या ज्ञानाचा उपयोग करायचा तो समाजपरिवर्तन व्हावे, समाज जास्त चांगल्या अवस्थेत जावा, यासाठी. हे ‘सर्च’चे प्रयोजन आहे. जर ‘सर्च’चे ‘क्लोनिंग’ (cloning) करता आले, तर ह्या सुधारणेच्या प्रक्रियेना अधिकाधिक कर्ते मिळतील. पण मग ‘संशोधना’ची एक नवी पातळी गाठावी लागेल. सामाजिक संस्थांच्या ‘कलमांची’ रोपणी-लावणी कशी करावी, हा संशोधनाचा नवा विषय असेल.
[सर्च आणि बंग ह्यांच्यावर आधीच खूप लिहिले गेले आहे—-आता आणखी कशाला?’, असा एक प्रश्न आ.सु.ला विचारला गेला. इथे जरा गफलत झालेली दिसते. एखादे चांगले, परिणामकारक काम दुसरीकडे करता येईल का, हा नेहेमीच महत्त्वाचा प्रश्न असतो. आणि एका क्षेत्रातले काम वेगळ्या क्षेत्रात कोणत्या ख्यात करता येईल, हेही महत्त्वाचे असते. आरोग्यक्षेत्रातल्या कामाबद्दलचे अनुभव पाणी-जमीन व्यवस्थापनाच्या क्षेत्रातही उपयोगी ठरतातच. आणि यासाठी विचार-विवेकच उपयोगी पडतात, तपास, जास्त जास्त मूलभूत तपासच उपयोगी पडतो. इथे ‘सर्च’ची ओळख किंवा मूल्यमापन करण्याला दुय्यम मानून अशा प्रकारच्या कामासाठी आवश्यक वृत्तींना, तंत्रांना केंद्रस्थान दिले आहे. प्रश्न आहे, चांगल्या कामांना गुणायचे कसे, हा!]