उपयोगितावाद म्हणजे काय याविषयी आजचा सुधारक या मासिकात आजपर्यंत अनेक वेळा लिहून झाले असल्यामुळे त्याच्या टीकाकारांनी घेतलेल्या आक्षेपांचा विचारही अनेक वेळा केला गेला आहे. परंतु आज एक नव्या आक्षेपाचा विचार करायचा आहे. त्यामुळे त्याच्यावर घेतल्या गेलेल्या जुन्या आक्षेपांचा विचार त्रोटकस्याने केला तरी चालण्यासारखे आहे असे मी धस्न चालतो. उपयोगितावादावर गेल्या शंभरावर वर्षांत अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. पण त्यापैकी बरेच आक्षेप शाब्दिक आहेत, आणि अनेक गैरसमजावर आधारले आहेत. उदाहरणार्थ एक आक्षेप असा होता की जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख हे जे उपयोगितावादानुसार आपल्या कर्मांचे अंतिम उद्दिष्ट ते मुळात अशक्य आहे. कारण जास्तीत जास्त सुखाची कल्पना करण्याकरिता सुखांची बेरीज-वजाबाकी करावी लागणार. पण ती अशक्य आहे कारण सुख ही मेय गोष्ट नाही, आणि म्हणून सुखाची आणि दु:खाची अमुक मात्रा दुसऱ्या अमुक मात्रेमध्ये मिळविता येत नाही.
आता सुखदुःखांचे काटेकोर मोजमाप करणे अशक्य आहे हे मान्य केले पाहिजे. उदा. अ हे सुख ब या सुखाच्या दुप्पट आहे, किंवा क या सुखाच्या १/३ आहे, तसेच अ या सुखाची धनमात्रा–जेवढी तेवढीच ड या दुःखाची ऋणमात्रा आहे, आणि म्हणून अ मधून ड वजा केले तर बाकी शून्य उरते, असे म्हणणे अशक्य आहे. त्यामुळे आक्षेपकांचा मुद्दा सकृदर्शनी सयुक्तिक वाटतो. परंतु सुखदुःखांचे काटेकोर संख्यात्मक गणित जरी अशक्य असले, तरी सुखदुःखांच्या मात्रांची स्थूल तुलना करणे शक्य आहे हे मान्य केले पाहिजे. उदा. दोन सुखांपैकी एक दुसऱ्यापेक्षा अधिक तीव्र आहे, किंवा तिसरे एक सुख पहिल्यापेक्षा तीव्र तर दुसऱ्यापेक्षा मंद आहे हे आपण सांगू शकतो. उदा. आपला दात क्रमाक्रमाने अधिकाधिक दुखत गेला आणि औषध लावल्यावर ते दुःख क्रमाक्रमाने कमी होत गेले कदाचित शेवटी पूर्णपणे थांबले असा अनुभव सर्वांच्या परिचयाचा आहे. तसेच ही कमीअधिक तीव्रतेची अवधारणे (judgements) आपण फक्त एकाच जातीच्या दोन किंवा अधिक सुख-दुःखात करू शकतो असे नाही; कारण भिन्न जातीच्या सुखदुःखांचीही आपण तुलना करू शकतो. एखाद्या संध्याकाळी आपल्याला फिरायला जाऊन अधिक सुख होईल की सिनेमाला जाऊन, हे आपण ठरवू शकतो आणि ठरवितोही. सुखदुःखाच्या मात्रेची तुलना, त्यांची बेरीजवजाबाकी शक्य आहे हे अर्थशास्त्रातही गृहीत धरलेले असते. आपल्या मर्यादित उत्पन्नाचा विनियोग भिन्न भिन्न गोष्टींवर अशा प्रकारे करण्याची आपली धडपड असते की आपले समाधान महत्तम व्हावे, आणि धडपडीत आपण थोडे बहुत यशस्वी होतोही. अर्थशास्त्रातील हासमान उपयोगितेचा नियम (Law of Diminising Utility), तसेच समसीमान्त उपयोगितेची कल्पना (equimarginal utility), आपल्या गरजांची necessities, comforts आणि luxuries अशी विभागणी आणि आपण प्रथम necessities, नंतर comforts आणि शेवटी luxuries अशा क्रमाने आपण इच्छांची पूर्ती करतो ही गोष्ट—-या सर्व सुखदुःखांचे स्थूल गणित शक्य आहे हेच सिद्ध करतात. उपयोगितावादाला असे स्थूल गणितच अभिप्रेत आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.
उपयोगितावादावर घेतला जाणारा एक आक्षेप असा होता की आपण सर्व कर्मे सुखार्थ करतो असे जे उपयोगितावादाचे प्रधान तत्त्व ते खरे नाही. खरी गोष्ट अशी आहे की आपल्याला काही गोष्टी हव्या असतात, आणि त्या त्या आपल्याला मिळाल्या की आपल्याला सुख होते. पण परिणामस्वरूप असलेले सुख आपल्या कर्मांचे साध्य असते हे खरे नाही. उदा. भूक लागली की आपण जेवतो आणि भूक संपल्यामुळे आपल्याला सुख होते. पण ते सुख आपल्याला मिळावे म्हणून आपण जेवत नाही हे खरे दिसते, पण आपण सुखार्थ परिश्रम करतो असेही लोक म्हणतात. परंतु हा वाद बराचसा शाब्दिक आहे असे मला वाटते. कारण आपल्याला वेळोवेळी होणाऱ्या इच्छांची पूर्ती व्हावी म्हणून आपल्या सर्व कर्मांचे उद्दिष्ट इच्छा- पूर्ती असते असे म्हटल्याने हा वाद मिटविता येईल असे वाटते. परंतु इच्छापूर्तीने होणारे सुख हे इच्छा पूर्ण झाल्याचे गमक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. कारण पुष्कळदा आपण करीत असलेली धडपड यशस्वी होऊनही आपल्याला सुख झाले नाही असे होते. त्यामुळे इच्छापूर्तीचे सुख हे गमक असते ही गोष्ट उपयोगिता-वादात लक्षात घेतली आहे. म्हणून आपण इच्छापूर्तीकरिता कर्मे करतो असे म्हटले काय आणि इच्छापूर्तीचे सुख मिळावे म्हणून कर्मे करतो असे म्हटले काय, यांमध्ये वास्तविक भेद नाही असे आपल्या लक्षात येते.
एक तिसरा आक्षेप असा आहे की सुखगणितात, सुखासुखात फक्त मात्रात्मक भेद आहेत असे गृहीत धरले आहे. पण खुद्द मिलनेच सुखात गुणात्मक भेदही आहेत हे म्हटले आहे. पत्ते खेळण्याचे सुख आणि काव्यवाचनाचे सुख ही समान दर्जाची नाहीत हे उघड आहे. पण सुखासुखात गुणात्मक (उच्च कोटीची आणि निम्न कोटीची असे) भेद असले तरी ती सर्व सुखेच आहेत हे खोटे पडत नाही. सुखांत गुणात्मक भेद असतात असे म्हणणारे म्हणतात की उच्च कोटीचे सुख आणि निम्नकोटीचे सुख ही अतुल्य (incommensurable) असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख ठरविणे अशक्य होते. पण सुखगणितात सर्व सुखे सारख्याच किंमतीची आहेत असे । समजावयाचे आहे. माझे सुख उच्च कोटीचे असल्यामुळे त्याला अधिक किंमत दिली पाहिजे असे म्हणणे चूक आहे. ज्याने त्याने आपल्याला हवे त्या कोटीचे सुख मिळविण्याचा प्रयत्न करावा. पण इतरांच्या निम्न कोटीच्या सुखाची किंमत कमी मानू नये.
या संदर्भात पुढील काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. ‘सर्वेऽपि सुखिनः सन्तु’ किंवा ‘सर्वांसि सुख लाभावें’ अशासारखी शेकडो उदाहरणे वाङ्मयात विखुरलेली दाखविता येतील. त्यात सर्व कोटींची सुखे सुखेच आहेत या गोष्टीला पूर्ण संमति दिलेली दिसते.
हे झाले गेली शंभर-सवाशे वर्षांत घेतले गेलेले आक्षेप. त्यांना समर्पक उत्तरे देणे कठीण नाही हे वाचकांस मान्य होईल असे मानावयास हरकत नाही. पण गेल्या ५०-७५ वर्षांत एक नवीन आक्षेप पुढे आला आहे. तो शाब्दिक नाही. तो काय आहे ते सांगून त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. हा आक्षेप असा आहे की उपयोगितावाद अनेकदा एका किवा अनेक निरपवाद मनुष्यांवर अन्याय करण्याची भीति आहे, नव्हे तो सहजच अन्यायी ठरू शकतो. आपल्या कर्मांनी केवळ सुखोत्पत्ति करणे अशक्य असल्यामुळे, सुख आणि दुःख ही सामान्यपणे एकाच कर्मातून निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त सुख’ या शब्दबंधाचा अर्थ जास्तीत जास्त सुखाधिक्य (balance of pleasure over pain) असा घ्यावा लागतो. एका कर्मातून उद्भवणाऱ्या सुखातून त्यातून उद्भवणारे दुःख वजा केले की ते उरते जे सुखाधिक्य, त्यामुळे जास्तीत जास्त सुखाधिक्य निर्माण करताना बरेचसे दुःख निर्माण झाले तरी हरकत नाही असे मानण्याची प्रवृत्ति होते. त्यात असे संभवते की एखाद्या कर्मामुळे एका किंवा अनेक निरपराधी माणसांना बरेच दुःख होणार आहे, पण कर्माचे सुखाधिक्य मात्र जास्तीत जास्त आहे असे अनेकदा होऊ शकते. अशा वेळी उपयोगितावाद निरपराध व्यक्तीवर अन्याय करतो असे म्हणावे लागते. हे दूषण गंभीर आहे हे नाकारता येत नाही, असे प्रसंग उद्भवणे सहज शक्य आहे हे आपण मान्य केले पाहिजे. या अडचणीवर उपयोगितावादाजवळ काही उपाय आहे काय?
उपयोगितावाद अन्यायी असू शकतो या आक्षेपाचा विचार आपण Utilitaranism या आपल्या छोटेखानी ग्रंथात केला आहे असे जे. एस्. मिल म्हणतो. तो म्हणतो की न्यायाचे तत्त्व उपयोगितावाद नाकारतो या आक्षेपाला उपयोगितावादात उत्तर आहे. उपयोगितावादाचे उद्दिष्ट जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख आहे; नुसते जास्तीत जास्त सुख नाही. सुखात जितक्या अधिक व्यक्तींचा अंतर्भाव करता येईल तितका त्यात अपेक्षित आहे जमल्यास सर्वांचा त्यात सहभाग असावा, कारण ‘जास्तीत जास्त’ लोकांत सर्व लोक अंतर्भूत आहेत. शक्य झाले तर त्यांचा अंतर्भाव केल्यास उत्तम. त्यामुळे कोणा व्यक्तीवर अन्याय होण्याची भीति बाळगण्याचे कारण नाही. याखेरीज मिल असेही म्हणतो की बेंटमचे ‘each man is to count for one and no man for more than one’ हे वाक्य असे प्रतिपादिते की कोणत्याही माणसाचे सुख अन्य कोणाही मनुष्याच्या तेवढ्याच सुखाहून अधिक मानले जाता कामा नये. यात न्यायाला अपेक्षित असलेले समतेचे तत्त्व सामावले आहे असे मिल् म्हणतो.
पण टीकाकार म्हणतात की वरील बचाव पुरेसा नाही. न्यायाच्या तत्त्वाचे पूर्ण पालन उपयोगितावादात केले जात नाही. उदा. अशी कल्पना करा की क्ष या कर्माने उद्भवणाऱ्या संभाव्य सुखाची मात्रा क इतकी आहे; असेही समजा की य कर्मानेही क इतकेच सुख किंवा थोडे अधिक सुख निर्माण होते. पण य कर्मामुळे निर्माण होणाऱ्या सुखाधिक्यात एका निरपराध मनुष्याला मोठे दुःख होते, तर क्ष या कर्माच्या सुखाधिक्यात असे निरपराध मनुष्याचे अनर्हित (undeserved) दुःख नाही. आता या दोन कर्मांनी सारखेच सुखाधिक्य निर्माण झाले, किंवा य या कर्माने थोडे अधिकच सुखाधिक्य निर्माण झाले तरी त्यांपैकी क्ष हे कर्म युक्त कर्म आहे आणि या अयुक्त कर्म असे म्हणावे लागते. हे उदाहरण आणि त्या प्रकारच्या कोण-त्याही उदाहरणाला मिलचा बचाव लागू पडत नाही हे उघड आहे. म्हणून आता आणखी एखादा बचाव शक्य आहे काय याचा शोध घेतला पाहिजे. असा एक बचाव विल्यम फ्रँकेना या अमेरिकन तत्त्वज्ञाने सुचविला आहे. तो त्याच्या Ethics या छोटेखानी पुस्तकात आहे. तो संक्षेपाने मांडण्याचा प्रयत्न करतो. फ्रँकेना म्हणतात की उपयोगितावादाचा मूळ सिद्धान्त आपण सर्वदा जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख निर्माण करावे असा आहे. आता हा सिद्धान्त आपल्यावर बंधनकारक आहे हे उघड दिसते. म्हणजे उपयोगितावादाचे मूळ तत्त्व आपण नाकारू शकत नाही. पण त्याचबरोबर न्यायाचे तत्त्वही तितकेच बंधन कारक आहे हेही मान्य केले पाहिजे. बरे ही दोन तत्त्वे स्वतंत्र असून एक दुसऱ्या पासून निष्पन्न होते असे आपण म्हणू शकत नाही. म्हणजे हे दोन्ही नियम नीति-शास्त्राचे स्वतंत्र आणि अंतिम नियम आहेत हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही.
त्यामुळे असे संभवते की एखाद्या वेळी उपयोगितावादी दृष्टी आणि न्याय-वादी दृष्टी यांच्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो. उपयोगितावादी दृष्टीने महत्तम सुखाधिक्य निर्माण करणाऱ्या कर्माने एखाद्या निरपराध मनुष्यावर अन्याय होत असेल तर अशा वेळी काय करावे असा प्र न निर्माण होतो. त्याला फ्रँकेनाचे उत्तर असे आहे की डब्ल्यू. डी. रॉस या ब्रिटिश तत्त्वज्ञाने केलेला बंधनकारक नियमांतील भेद उपयोगी पडू शकेल. दोन नीतिशास्त्रीय नियमांत पुष्कळदा संघर्ष होत असतो. उदा. आपण दिलेली वचने पाळावीत हा नियम उघडच बंधनकारक दिसतो. पण अनेकदा एखाद्या मनुष्याचा प्राण वाचविण्याकरिता त्याला आपण अपवाद करतो, आणि त्या दोन सार्विक नियमांचा वर्तमान परिस्थितीत विचार करून कोणता नियम बलवत्तर आहे हे ठरवून दुसऱ्याचा त्याग करतो. यावरून रॉस सार्विक नियमांचे दोन प्रकार आहेत असे म्हणतात, आणि त्यांनी त्यांना अनुक्रमे आपातिक कर्तव्याचा (prima facie duty) आणि वास्तविक (actual) कर्तव्याचा नियम अशी नावे दिली आहेत. जे कर्म एखाद्या विशिष्ट परिस्थितीत केलेच पाहिजे ते आपले वास्तविक कर्तव्य, जीवनात प्रत्यही उद्भवणाऱ्या प्रसंगात आपण काय करावे याविषयी निरपवाद नियम नाहीत, आणि असूही शकत नाहीत हे रॉसला मान्य आहे. प्रत्येक नियमाला अपवाद संभवतात हा नियम वास्तविक कर्तव्याच्या सर्व नियमांना लागू आहे. परंतु आपातिक कर्तव्याचे निरपवाद नियम असू शकतील असे रॉस म्हणतो. अमुक कर्म आपातिक कर्तव्य आहे असे म्हणण्याचा अर्थ रॉस असा सांगतो की कोणत्याही स्पर्धक विधीच्या अभावी ते आपले वास्तविक कर्तव्य झाले असते. म्हणजे वास्तविक कर्तव्याचे निरप-वाद नियम जरी नसले तरी आपातिक कर्तव्याचे निरपवाद नियम असतात. म्हणजे ते सर्वदा बंधनकारक असतात. त्यांचा एखाद्या बलवत्तर नियमाखातर त्याला करावा लागला तरी त्यांचे बंधनकारकत्व नष्ट होत नाही. उदा. आपण दिलेले वचन पाळले पाहिजे हा आपातिक कर्तव्याचा सार्विक निरपवाद नियम आहे. तो पाळण्याचे बंधन आपल्यावर नेहमीच असते. पण दुसरा एखादा आपातिक कर्तव्याचा नियम बलवत्तर असल्यामुळे त्याला बाजूला सरावे लागेल.
आपातिक कर्तव्याच्या कल्पनेने उपयोगितावादावरील आक्षेपास बरेच समर्थक उत्तर मिळते हे मान्य केले पाहिजे. निरपवादपणे बंधनकारक नियम कसे असू शकतात हे तिने स्पष्ट होते. परंतु तरीही दोन आपातिक कर्तव्याच्या नियमांचा संघर्ष उपस्थित झाला असता मार्ग कसा काढायचा हे ठरविण्याकरिता एवढीच गोष्ट पुरेशी नाही. दोन आपातिक कर्तव्याचे नियम जर सारख्याच योग्यतेचे असतील तर त्यांपैकी आपण कोणता पाळायचा आणि कोणाचा त्याग करायचा ठरविण्याकरिता त्यांचा विचार करावा लागतो, हा विचार कसा करावयाचा यासंबंधी सार्विक नियम नाहीत. ते प्रत्येकाच्या तारतम्य बुद्धीवर सोडावे लागते.
याप्रमाणे उपयोगितेचा नियम आणि न्यायाचे तत्त्व हे दोन आपातिक कर्तव्याचे नियम मानावे लागते. त्या दोहोंमध्ये संघर्ष उत्पन्न झाला असता कोणता विशिष्ट प्रसंगी बलवत्तर असेल तो वास्तविक कर्तव्याचा नियम समजून त्याचे पालन करावे लागते. कधी उपयोगितेचा नियम बलवत्तर वाटेल तर कधी न्यायाचा नियम बलवत्तर वाटेल. हे ज्याने त्याने काळजीपूर्वक ठरवावे लागेल. सारासारविचार करून, तारतम्य वापरून ते ठरवावे लागेल.
ही तडजोड मान्य करण्यासारखी आहे असे वाटते. तिला विशेष म्हणजे उपयोगितेचा नियम आपातिक कर्तव्याचा निरपवाद नियम मानल्यामुळे उपयोगिता-वाद्यांना हा निवाडा मान्य होईल असे वाटते. आणि त्यात न्यायाच्या तत्त्वालाही पुरेशी मान्यता दिल्यामुळे त्याही तत्त्वाचा स्वीकार केला जातो. ह्यात तडजोड आहे; पण त्यावाचून गत्यंतर नाही अशी स्थिती आहे.
३/४, कर्मयोग अपार्टमेंट, सुशीला बलराज मार्ग, धंतोली, नागपूर — ४४० ०१२