@ सिलिकन व्हॅली, कॅलिफोर्निया
(सॅन फ्रान्सिस्कोपासून आग्नेयेकडे पसरलेला शहरी पट्टा म्हणजे सिलिकन व्हॅली. विसाव्या शतकाच्या शेवटी ही जगाची तंत्रवैज्ञानिक राजधानी होती.)
कॉनी टॉर्ट २५ वर्षांची अविवाहित माता आहे, चार मुलांची. ती एका कुबट वासाच्या, भेगाळलेल्या भिंतींच्या, खिडक्यांना घोंगड्या लटकवलेल्या खोलीसाठी महिना ४०० डॉलर्स देते. शेजारची ॲडोबी सिस्टिम्स इं. ही सॉफ्टवेअर कंपनी वर्षाला एक अब्ज डॉलर्सची कमाई करते. “सिलिकन व्हॅली? नाही ऐकलं हे नाव,” कॉनी म्हणाली. तिला महिना ५०० डॉलर्स अपंगत्व भत्ता मिळतो. “इथले सगळेच जण तंत्रवैज्ञानिक पेशात नाहीत. आम्ही खूपसे लोक पोरांना जेमतेम जगवतो.”
उच्चतंत्रज्ञानाने आणलेली सुबत्ता दशकभर सिलिकन व्हॅलीचे रूप बदलते आहे. पण ती गरिबांना टाळते आहे आणि मध्यमवर्गियांना दूर ढकलते आहे. गेल्या वर्षात इथे उत्पन्न झालेल्या दर पाच नोकऱ्यांमागे एकच नवे घर बांधले गेले आहे. सरासरी घरभाडी तीस टक्क्यांनी वाढली आहेत. लोक परगावी राहून, बरेच अंतर कापून इथे कामासाठी येतात, अगदी शिक्षक आणि पोलीसही.
इथल्या इंटेल कॉर्प, ह्यूलेट-पॅकार्ड, ॲपल कंप्यूटर्स वगैरे कंपन्या आपल्या वर्षाच्या उलाढाली अब्जावधी डॉलर्समध्ये मोजतात. “इथे कोणाला कशाचा तुडवडा भासतो, हेच लज्जास्पद आहे’, हे मत आहे गरिबांसाठी घरे बांधणाऱ्या ‘हॅबिटॅट फॉर ह्यूमॅनिटी’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संचालकाचे, मिलार्ड फुलरचे. तो म्हणतो, “जर इथली सारी बुद्धिमत्ता लोकांच्या गरजा पुरवण्यावर रोखली, तर ना बकाल घरं दिसतील, ना अन्नदान घेण्यासाठी रांगा लागतील, ना बेघर माणसं भेटतील.” परिस्थिती सुधारावी म्हणून सॅन होसे नगरपरिषदेने किमान वेतन वाढवून अमेरिकेतील सर्वांत जास्त दर ठेवला. ताशी दहा डॉलर्सजवळचा. लॅरी काँटेरास हा बत्तीस वर्षीय सफाईकामगार म्हणतो, “पैसे खूपच आहेत, …पण ह्या गावात ते जेमतेम पुरतात.” तो तीन मुले सांभाळतो. त्याच्या पगाराचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग एका नातलगाच्या घरातल्या खोलीच्या भाड्यात खर्ची पडतो.
‘सेकंड हार्वेस्ट फूड बँक’ दर महिन्यात एक लाख आठ हजार लोकांना जेवण पुरवते. आय.बी.एम.चा माजी मॅनेजर आज ‘बँके’चा कार्यकारी संचालक आहे. तो म्हणतो की अकराच (!) टक्के लोक बेघर आहेत. हे खूप तेज भाड्यांमुळे होतं आहे. “त्यांनी घरांवर प्रचंड खर्च करायला हवा आहे”, तो म्हणतो. चारातला एक जण उच्चतंत्रज्ञानक्षेत्रातला आहे. सरासरीने वर्षाला बहात्तर हजार डॉलर्सपेक्षा जास्त कमावतो. किमान वेतनधारक तर वर्षाला दहा हजार डॉलर्सच कमावतो. (हे वर्षाकाठीच्या हिशोबात रोजी तीनच तास काम मिळते, असे दाखवते.) कोणी म्हणतात की श्रीमंत कंपन्या आणि तंत्रज्ञांनी आपली संपत्ती इतरांमध्ये पसरून हा फरक कमी करता येईल. ह्यूलेट-पॅकार्डचे डेव्हिड आणि ल्यूसिल पॅकार्ड असे करतात. ते वर्षाकाठी चाळीस कोटी डॉलर्स सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय कामांसाठी दान करतात आणि त्यातही सिलिकॉन व्हॅलीतील लोकांना प्राधान्य देतात. पण हा अपवाद आहे. स्टॅनफर्ड विद्यापीठात विज्ञान तंत्रज्ञानाचा इतिहास शिकवणारा टिम लेन्वार म्हणतो, “उच्चतंत्रज्ञानाच्या जगातल्या लोकांकडून मदत मिळवणे कठीण आहे.” एक अभ्यास दाखवतो की वर्षानुवर्षे ‘करपूर्व नफ्या’चा एकच टक्का दान म्हणून दिला जात आहे.
‘सेक्रेड हार्ट कम्यूनिटी सर्व्हिस सेंटर’ कपडे, अन्न आणि औषधे वाटतो. त्यांचा मुलांची काळजी घेणारा विभागही गच्च भरलेला असतो, आणि संगणकांचे ‘वर्ग’ही भरलेले असतात. तेथला पॉल सॅव्हेज म्हणतो, “श्रीमंत लोक मदत करत नाहीत. ह्या गावात वर्षाला लाख, दोन लाख डॉलर्स कमावणारे आहेत… पण काही देत नाहीत, इतरांना.”
-मार्था मेंडोंझा, असोसिएटेड प्रेस, डिसेंबर १९९८
[आजकाल बरेच जण एक ‘थिअरी’ मांडतात, की समाजाचा एक वर्ग गर्भश्रीमंत झाला की आपोआप ती श्रीमंती गरीब लोकांपर्यंत ‘झिरपते’. ही ‘ट्रिक्ल-डाउन थिअरी’ किती चुकीची आहे ते दाखवणारे वरील वार्तापत्र ‘द मॅमथ बुक ऑफ हाऊ इट हॅपन्ड’ संपादक जोन. इ. ल्युईस, कॅरल अँड ग्राफ प्रकाशन, न्यू यॉर्क १९९८ ह्या संकलनातून घेतले आहे.]