शेतकऱ्यांना भेटायला मोटारीतून जाऊ नये, पायी गेले पाहिजे. आम्ही खेडेगावात इतके फिरलो की, आमचा अवधा वीस रुपये खर्च झाला. मराठे, ब्राह्मण वेगळे असले तरी लढाईचे वेळेस आम्ही एकशेपाच आहोत. आमचे बरोबर पथकात पोवाडे म्हणणारे व्हॉलंटियर्स होते. आम्ही पंधरावीस मंडळी झेंडा घेऊन प्रत्येक गावी जात होतो, गावात दूध मिळणे मुष्कील होई. खेड्यातील कुणब्याची भाषा आली पाहिजे. खेड्यात पुरुषवर्ग फारसा घरी नसतो. काही खेड्यात गेलो तो आमचे भोवती सर्व लुगडीच लुगडी दिसू लागली. आम्ही शेवटी येरवड्यास जाऊन आलो. तेथे जाताच राष्ट्रगीत म्हटले. तुरुंगाच्या दारात झेंडा उभा केला. कैद्यांच्या तांड्यासमोर ‘महात्मा गांधी की जय’ म्हणताच आतील दोन हजार कैदी गांधी की जय करू लागले. पुढे जाताना तमाशा सुरू होता. मी प्रथम तेथे गेलो. आम्ही गांधीचा निरोप तुम्हास सांगावयास आलो हे सांगताच सर्व मंडळी तमाशा सोडून आमचा निरोप ऐकण्यास येऊन उभी राहिली.
[१० एप्रिल ते १६ एप्रिल १९३० या काळात कर्मवीर वि. रा. शिंदे व इतरांनी पुण्याच्या पंचक्रोशीत पदयात्रा काढून मिठाच्या सत्याग्रहाचा प्रचार केला. त्याचे हे कर्मवीरांच्या शब्दातले वर्णन.]
(विसाव्या शतकातील महाराष्ट्र, खंड ४ था, या य. दि. फडकेच्या पुस्तकातून, पृ. क्र. २५४ ते २५५)