भ. पां. पाटणकर
३-४-२०८, काचीगुडा, हैदराबाद – ५०० ०२७
श्री. संपादक, आ. सु., यांस सप्रेम नमस्कार
आ. सु.चा सप्टेंबर २००० चा अंक बुद्धिवाद-विवेकवादाच्या अनेक अंगांना स्पर्श करून गेला आहे. पण विषय मोठा आहे आणि चर्चा त्रोटक आहे. अर्थात फार लांबलचक चर्चा कंटाळवाणी होते हेही खरे. पण त्रोटक चर्चेत अपूर्णताही पुष्कळ राहते.
प्रथम श्री. दप्तरीचेच विचार घेऊ. धर्म परिवर्तनीय आहे असे मानणे ही ऐतिहासिक पद्धत असल्याचे संपादकांनी म्हटले आहे. त्याने काय सूचित होते हे कळले नाही. ऐतिहासिक पद्धत याचा एवढाच अर्थ असायला पाहिजे की वेळोवेळी काय वस्तुस्थिती होती याची नोंद घेणे.