प्रस्तावना: एखाद्या माणसाच्या गुणधर्मांपैकी कोणते आनुवंशिक असतात आणि कोणते संगोपनामधून आणि संस्कारामधून घडतात, हा एक जुनाच प्र न आहे. स्वभाव विरुद्ध संस्कार (Nature versus Nurture) ह्या नावाने तो अनेकदा मांडला जातो. सुट्या माणसांच्या पातळीवर प्र न असा असतो —- “ह्या व्यक्तीचे कोणते गुण आईवडलांकडून आनुवंशिकतेने आलेले आहेत आणि कोणते पालनपोषणाच्या काळात संस्कार झाल्याने रुजले आहेत?’ पूर्ण मानवजातीच्या पातळीवरही आपण हा प्र न विचारू शकतो —- “कोणते गुण उत्क्रांतीतून घडलेले आहेत आणि कोणते सामाजिक संस्थांमुळे घडलेले आहेत?”
सुधारणा करू इच्छिणाऱ्यांच्या दृष्टीने हा प्र न महत्त्वाचा आहे. कोणत्या सुधारणा करणे सहजसाध्य आहे, कोणत्या सुधारणा कष्टसाध्य आहेत आणि कोणत्या अशक्य आहेत, असा हा प्र न. उदाहरण पाहा —- व्यसनांमुळे आणि कुपोषणामुळे उपजणारे रोग आणि विकार टाळता येतात. रोगांशी लढणारी शरीरातली व्यवस्था (Immune System) सबळ करणे कष्टसाध्य आणि अंशतःच साध्य आहे. माणसांना अमरत्व देणे अशक्य आहे. शरीराच्या पातळीवर अशी वर्गवारी वादग्रस्त ठरत नाही. मनाच्या ‘गुणांबाबत’ मात्र अशा विचारातून भांडणे उभी राहू शकतात.
सध्या जीवशास्त्रीय संशोधकांचा एक वर्ग ह्या प्र नाची उत्तरे शोधायला झटतो आहे. ‘ग्रे’चे शरीरशास्त्राचे पुस्तक ह्या पृथ्वीवरच्या सर्व माणसांना लागू पडते. त्या पुस्तकात शरीररचनेचे वर्णन आणि माणसामाणसांमध्ये संभाव्य असलेले फरक नोंदले आहेत. ‘ग्रे’च्या दर्जाचे मानसशास्त्राचे पुस्तक घडवणे, हा सध्याच्या संशोधनाचा एक हेतू आहे. निरपवादपणे माणसांमध्ये आढळणारे मानसिक गुण आणि संभाव्य वेगवेगळेपण, साम्यांना महत्त्व जास्त आणि विषमतेच्या प्रमाणाची नोंद, असा हा प्रयत्न आहे. ह्या संशोधनक्षेत्रासाठी वापरले जाणारे एक नाव आहे ‘उत्क्रांती-तून दिसणारे मानसशास्त्र’ (Evolutionary Psychology) किंवा लघुरूपात ‘उत्क्रांति मानसशास्त्र’. रॉबर्ट राईट (Robert Wright) ह्या लेखकाचे द मॉरल अॅनिमल” हे पुस्तक ह्या घडत असलेल्या शास्त्राची ओळख करून देते.
पुस्तक चार भागांत विभागलेले आहे. कामव्यवहार, परोपकार, सामाजिक स्थानाबाबतची वागणूक, आणि नीती आणि धर्म ह्यांच्या संदर्भात उत्क्रांतीने दिलेल्या’ विचारांच्या पद्धती, असे हे चार भाग. ह्या नव्या विचारांच्या पद्धतीची ‘चव’ थोडक्यात द्यावी म्हणून एक चार लेखांची माला, पूर्णपणे राईटवर आधारित, अशी देत आहोत. ई. ओ. विल्सनचे ‘ऑन ह्यूमन नेचर’ आणि इतरही काही पुस्तके ह्या विषयाची माहिती देतात. येथे मात्र प्रामुख्याने राईटच्या ‘नैतिक प्राण्या’चाच आधार घेतला आहे. ह्या विचारधारेचा पाया आहे उत्क्रांतीच्या तत्त्वात. नैसर्गिक निवडीतून पिढी दर पिढी सजीवांचे गुणधर्म कसे बदलत जातात, ह्याचे वर्णन राईटच्याच शब्दात पाहा —- “नैसर्गिक निवडीचे तत्त्व एवढेच सांगते —- जर एखाद्या जीवजातीतील व्यक्तींच्या आनुवंशिक गुणांमध्ये विविधता असेल, आणि जर अशा गुणांपैकी काही गुण इतर गुणांपेक्षा व्यक्तीच्या जगण्याला आणि प्रजोत्यादनाला जास्त मदत करणारे असतील, तर असे गुण त्या जीवजातीच्या व्यक्तींमध्ये विस्तृत प्रमाणात पसरतील. ह्याचा परिणाम असा होईल की त्या जीवजातीचा आनुवंशिक गुणांचा संच बदलेल —-
बस्स, इतकेच”.
नैसर्गिक निवडीने गुण बदलणे ही उत्क्रांती. ‘गुण’ अखेर जीन्सच्या रूपात असतात —- पण ह्याचा तपशील आपल्याला आत्ता तरी आवश्यक नाही. गुण आणि जीन्स, गुणसंच आणि जीनसंच, हे शब्द आपण सोईनुसार ‘सरमिसळ’ पणे वापरू शकतो, एवढेच लक्षात ठेवायचे. जरी उत्क्रांती सर्व सजीवांमध्ये घडत असते तरी आपण मुख्य भर माणसांवरच देऊ. माणसांमध्ये (आणि एकूण एक सजीव रचनांमध्ये) एक गुण तर असतोच, स्वतःची प्रजा वाढावी असा प्रयत्न करत राहण्याचा. ज्या जीवात हा गुण नसेल, त्याची प्रजा काही पिढ्यांतच संपुष्टात येईल. आणि प्रजा वाढवायचे प्रयत्न विचार करून, जाणीवपूर्वक केले जात नाहीत. ते मूलप्रवृत्तीसारखे, प्रतिक्षिप्त (reflex) क्रियांसारखे जाणिवेच्या ‘आत’ रुजलेले असतात. आपण खूप झपाट्याने घडणाऱ्या क्रियेसाठी ‘पापणी लवते न लवते तोच’, असा शब्दप्रयोग करतो. डोळ्यासारख्या नाजुक आणि महत्त्वाच्या ज्ञानेंद्रियांचे रक्षण करायला प्रतिक्षिप्त क्रियाच चांगली, जाणीवपूर्वक केलेल्या क्रिया फार ‘सुस्त’ असतात! आपली प्रजा वाढायचा प्रयत्न करायचा गुणही असा जाणिवेच्या कक्षेबाहेर जीन–गुणांच्या पातळीवर रुजलेला असतो. आपल्या मनोवृत्तींचा तो उत्क्रांतीतून निवडला गेलेला भाग आहे.
गुंतवणूक : उत्क्रांतीच्या चर्चेत एक वारंवार भेटणारी संकल्पना म्हणजे पितरांची अपत्यांमधली गुंतवणूक (Parental investment in Progeny). आईबाप इतर कशावर तरी ऊर्जा खर्च करण्याऐवजी आपल्या पिल्लांवर जी ऊर्जा खर्च करतात, ती त्यांची पिल्लांमधली गुंतवणूक. ह्या ऊर्जेचा हिशोब पिल्ले जन्मायच्या आधीच सुरू होतो. अंडबीजे आणि शुक्राणू घडायला ऊर्जा लागते. त्यांचे मीलन-फलन झाल्यावर गर्भ वाढायला ऊर्जा लागते. मूल जन्माला आल्यानंतर ते ‘स्वतःच्या पायांवर उभे’ होईपर्यंत आईवडीलच ऊर्जा पुरवतात. अशा साऱ्या ऊर्जेची बेरीज ही आईबापांची पोरांमधली गुंतवणूक. साध्या, सोप्या जीवांसाठी अशा गुंतवणुकीचा अगदी नेमका हिशोब करता येतो, आणि केला गेलेला आहे. (उदाहरणार्थ, झाडांची बियांमधील गुंतवणूक). माणसांच्या बाबतीत नेमका अंकबद्ध हिशोब मांडणे अवघड आहे, पण अशक्य नाही. (मागे ‘डिस्कव्हर’ ह्या विज्ञानविषयक मासिकाने ऊर्जा हे माध्यम वापरणारा ‘व्यापार’ सारखा काल्पनिक खेळही घडवला होता!)
आता आपण मानवजातीतल्या पिल्लांमध्ये आईच्या आणि बापाच्या गुंत-वणुकीचा विचार करू प्रथमच जाणवते की आईची गुंतवणूक बापाच्या गुंत-वणुकीच्या कैक पट जास्त असते! साधारण निरोगी पुरुष पौगंडावस्थेपासून जवळ पास नव्वदीच्या वयापर्यंत लैंगिक दृष्ट्या सक्रिय राहू शकतो. ह्या काळात त्याचे शरीर अब्जावधी शुक्राणू घडवते. प्रत्येक समागमाच्या वेळी काही लक्ष शुक्राणू ‘वापरले’ जातात, तरीही एखादा निरोगी माणूस सहजच काही हजार मुलांना जन्म देऊ शकतो —- तत्त्वतः तरी! ह्या उलट स्त्री मात्र आयुष्यभरात चारेकशेच अंडबीजे ‘वापरू शकते, आणि प्रत्यक्षात (तत्त्वतःसुद्धा) पंधरावीसच मुलांना जन्म देऊ शकते. म्हणजे प्रत्येक अंडबीज प्रत्येक शुक्राणूच्या (ऊर्जेच्या दृष्टीने) अनेक पट ‘महाग’ असते. अंडबीजाचे फलन झाले की बापाची गुंतवणूक संपली. आईला मात्र नऊ महिने गर्भ शरीरात वाढवावा लागतो. नंतरचा बराच काळ बाळाचे अन्नही स्वतःच्या शरीरामार्फत पुरवावे लागते. नंतरही बापाची मुलातली गुंतवणूक (असलीच तर!) परहस्ते केलेलीच असते. आईला मात्र पालनपोषणातून सुटका नसते.
एकूणच मूल होऊ द्यायचा निर्णय बापाला फारसा गुंतवत नाही, तर आईच्या आयुष्यात ती महत्त्वाची घटना असते. जाणीवपूर्वक वागणारी स्त्री मूल होऊ देण्याआधी पुरुषापेक्षा खूपच जास्त सावध असेल. पण ह्यावर उत्क्रांतीने प्रक्रिया कस्न जाणिवेची भूमिका जीन्समध्ये रुजवली आहे. स्त्रियांनी ‘स्त्रीसुलभ लज्जे’ने वागणे आणि पुरुषांनी मात्र ‘फिरती’ नजर इतर स्त्रियांकडे टाकत राहणे ह्यांचे स्पष्टीकरण आपण गुंतवणुकीच्या हिशोबातून देऊ शकतो. हे दोन्ही गुण उत्क्रांती-तूनच घडलेले आहेत! एकदोन ‘उपप्रमेये’ ही मांडता येतील —- दुर्बल, अनाकर्षक स्त्री आणि सक्षम, देखणा पुरुष ह्यांचा संबंध आला तर स्त्रीची ‘लज्जा’ आपोआप ‘मंदावेल’ (ह्याचे एक शोकात्म रूप ‘बिवेअर ऑफ पिटी’ ह्या प्रख्यात कादंबरीत दिसते).
पुरुष स्त्रियांकडून एकनिष्ठतेची अपेक्षा ठेवतात हेही नैसर्गिक आणि उत्क्रांतीतून आलेलेच आहे. स्त्री एकनिष्ठ नसेल तर ‘गरीब बिचाऱ्या’ पुरुषावर आणखी थोडी गुंतवणूक करण्याची जबाबदारी येऊन पडेल! ह्याच्या उलट स्त्री पुरुषाच्या ‘बाहेरख्याला’ बद्दल फार नाराज असणार नाही (खा, कुठे शेण खाता ते!) पण जर पुरुषाने घरात गुंतवणूक करायचे टाळले, तर स्त्री रागावेल. प्रत्यक्षात हे घडतानाही दिसते. वाढदिवस विसरणे, ‘गजरा’ आणायला विसरणे, अशा ‘निगुंतव-णुकीच्या’ उदाहरणांमुळे रागावणाऱ्या स्त्रियांच्या कथा प्रसिद्ध आहेतच.
पण तरीही स्त्रीसुलभ लज्जा विरुद्ध पुरुषांचा बाहेरख्याल, ही भानगड उत्क्रांतीतून घडली, ह्यावर सहज विश्वास ठेवू या नको. अशा ‘चतुर’ मांडण्या करत पुरुषांनी स्त्रियांना अनेकवार फसवले आहे —- न स्त्री स्वातंत्र्यमर्हति; शी फॉर गॉड इन हिम, ही फॉर गॉड हिमसेल्फ, वगैरे भूलथापा अजून तरी संपलेल्या नाहीत!
गुंतवणुकीच्या विषमतेतून जर पुरुषी आणि बायकी स्वभाव घडत असतील, तर हे माणूस सोडून इतर प्राण्यांमध्येही दिसायला हवे. तसे दिसते का, हा प्र न तपासायला हवा.
माणसाचे जवळचे नातलग म्हणजे कपि (Apes), आणि त्यातही चिंपांझी व गोरिला. गोरिलांची समाजरचना अशी असते की दर टोळीत एक प्रमुख नर, एकदोन दुय्यम नर आणि साताठ माद्या असतात. नव्या प्रजेपैकी सर्व माद्या टोळीतच राहतात, पण नरांना मात्र वयात यायच्या सुमाराला हाकलून दिले जाते. प्रमुख नराचा सर्व माद्यांवर लैंगिक अधिकार असतो. अधूनमधून दुय्यम नरांना पगार वाटावा तसा समागमाचा हक्क प्रमुख नर बहाल करतो, पण ह्यासाठी ‘नावडत्या’ माद्यांचीच नेमणूक होते. हाकलून दिले गेलेले नर टोळीच्या आसपास भटकत, प्रमुखाची नजर चुकवत नावडत्या माद्यांशी जुगतात. नावडत्या माद्या अशा समागमासाठी ‘निर्लज्ज’ होतात. प्रमुख नर म्हातारा झाला की ‘राज्यक्रांती’ होते. एकूण लैंगिक अधिकारावर असणारा/असणारे नर फक्त टोळीला संरक्षण देण्याचीच गुंतवणूक करतात, आणि जबरीने माद्यांना ‘भटकभवान्या’ होण्यापासून परावृत्त करतात. एकूण हे वागणे लज्जा आणि गुंतवणुकीत थेट प्रमाण दाखवते, तर बाहेरख्याल आणि गुंतवणुकीत व्यस्त प्रमाण दाखवते. चिंपांझींचे वागणे खूपसे गोरिला व माणसांच्या ‘सरासरी’ सारखे असते —- उत्क्रांतीतून स्वभाव घडतात ह्याला दुजोरा देणारे.
‘सी हॉर्स’ ह्या घोड्यासारखे तोंड असणाऱ्या माशामधले व्यवहार पहा —- नरमादी एकत्र येऊन गर्भधारणा होते. गर्भाच्या वाढीचा थोडासा भाग मादीच्या शरीरात होतो, पण मग मात्र ‘बाळ’ नराच्या पोटावरच्या एका पिशवीत वाढू लागते. त्याचे रुधिराभिसरणही नराच्या धिराभिसरणाचा भाग बनते. अखेर नर ‘बाळंत’ होतात. (जीवशास्त्रात आकाराने मोठे असे अंडबीज घडवणाऱ्या व्यक्तीला ‘मादी’ म्हणतात, पोटात बाळ वाढवणाऱ्या व्यक्तीला नव्हे!) इथे नराची गुंतवणूक जास्त आणि मादीची कमी असते. आणि ह्या जीवांत नर लाजाळू असतात, तर माद्या प्रियाराधनात पुढाकार घेतात —- हे अपेक्षित ‘नमुन्या’नुसारच आहे. ‘सी-स्नाइप’ (Sea Snipe) ह्या पक्ष्यातही मादी अंडे देते आणि नर ते उबवतो. इथेही नर ‘सलज्ज’ आणि माद्या त्यांच्याभोवती आमिषे ठेवणाऱ्या असतात. काही कीटकांमध्ये तर मादी नराची पुढची सारी गुंतवणूक ‘आगाऊ’ वसूल करते! नर एक अळी मास्न मादीपुढे टाकतो आणि मगच मादीशी समागम करतो. जर अळी लहान असली आणि मादीचे ‘जेवण’ समागमाआधी संपले, तर ती समागम संपायचीही वाट न पाहता चालती होते. थोडक्यात काय, तर गुंतवणूक जास्त करणाऱ्या लिंगाच्या व्यक्तीने ‘सावध’ असणे आणि ‘कनिष्ठ भागीदाराने’ प्रियाराधन करणे, हे सर्व जीवसृष्टीत दिसणारे गुण आहेत —- उत्क्रांतीतून रुजलेले. उत्क्रांतीचा विचार करताना सतत लक्षात ठेवायचे असते, की एखादा गुण जगण्या-तगण्याला जरा जरी मदत करणारा असला तरी तो प्रजेत पसरतो. माणूस ह्या प्राण्याच्या सुद्धा आज दीडदोन लक्ष पिढ्या झालेल्या आहेत. माकडे , सस्तन प्राणी, कणा असलेले जीव, अशा आपल्या पूर्वजांचा विचार केला, तर प्राणिजगतावर उत्क्रांतीची चाळणी थेट पंचावन्न कोटी वर्षे ‘काम करत’ आहे. एखाद्या नदीने कठीणातल्या कठीण दगडा–पहाडांमधून प्रचंड दरी घडवावी, तसा हा काळाचा प्रचंड पट आहे.
धोक्याच्या सूचना: पण उत्क्रांतीतून रुजलेले गुण कोणत्याही अर्थी ‘चांगले’ असणे आवश्यक नाही! उत्क्रांति मानसशास्त्राचा एक संस्थापक जॉर्ज विल्यम तर नैसर्गिक निवडीला ‘दुष्ट’ (Evil) मानतो —- अनेकांना क्लेश देत, तगणाऱ्यांना स्वार्थी बनवतच ‘पुढे’ नेणारी क्रिया मानतो. बरे, जीनपातळीवर रुजलेले, उत्क्रांतीतून निवडले गेलेले गुणही अपरि-वर्तनीयच असतात असे नाही. माणूस, कपि, माकडे, साऱ्यांचे जबडे, दात आणि पचनव्यवस्था मुख्यतः शाकाहाराशी जुळलेल्या आहेत. माकडे व कपि मांसाहार अपवादानेच करतात. किडेमाकोडे खाणे, क्वचित मोठ्या जनावरांचे मांस खाणे, एवढ्यावर माकडा-कपींचा मांसाहार संपतो. पण मीठ हा क्षार आणि ‘शिजवणे’ ही क्रिया माणसांना सापडली, आणि माणसांच्या दाता-पोटांना मांसाशन ‘झेपू’ लागले —- मोठा बदल आहे, हा. आपण सर्व माणसांमधली साम्ये शोधतो आहोत. पण अशा समान गुणां-मध्येही व्यक्तीव्यक्तींमध्ये मोठाले फरक असू शकतात. खरे तर अशी विविधताच नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेला ‘खाद्य’ पुरवते. परिस्थितीत होणारे बदल झेपायला ही विविधता आवश्यकच असते. म्हणजे साम्ये महत्त्वाची तर खरीच, पण अखेर ती सांख्यिकीय विविधतेसोबतच (Statistical Variation) असतात, हेही लक्षात ठेवाय-लाच हवे.
हुंडा : उत्क्रांति-मानसशास्त्र जर असे दाखवते, की पुरुषांनी स्त्रियांचे प्रणयाराधन करणे ही उत्क्रांतीतून रुजलेली गोष्ट आहे, तर आपण हुंडा ह्या पद्धतीचा अर्थ कसा लावायचा? खरे तर पुरुषांनी स्त्रियांना गुंतवणुकीची हमी देणारी वागणूकच नैसर्गिक असायला हवी. आणि तशी ती आहेही! अनेक समाजांच्या अभ्यासातून असे आढळते की ज्या समाजांना वर्णव्यवस्थेसारख्या श्रेणींनी विभागलेले आहे, आणि जिथे सक्तीची एकपत्नीव्रताची पद्धत आहे, तिथेच हुंडा प्रथा आहे. श्रेणीबद्ध नसलेल्या आणि बहुपत्नीकत्व मान्य असलेल्या समाजांमध्ये हुंडा पुरुषाने द्यायचा असतो!
आता आपण सुधारकाच्या दृष्टीतून उत्क्रांति-मानसशास्त्राचे महत्त्व जोखू शकतो. हुंड्याची प्रथा ठामपणे सामाजिक — सांस्कृतिक आहे, ‘निसर्गदत्त’ नाही. ती निसर्गविरोधी आणि दुष्ट आहे. मग ती प्रथा टिकवायला धडपडणारा वर्ग हा जनावरांपेक्षा ‘नीच’ ठरतो, हे निर्विवाद.
एक पूरक ‘चुटका’ असा —- एका पुरुषाला त्याचा मित्र विचारतो, ‘काय रे, तू बायकोला स्वयंपाकात मदत करतोस म्हणे?’ तो पुरुष उत्तरतो, ‘हो. ती नाही मला कपडे धुण्यात मदत करत?’ —- ह्यावर ज्याला हसू येईल, तो अनैसर्गिक आहे! अमानुष आणि ‘पाशवी’ ह्या वर्णनापेक्षाही खालचा आहे. गुंतवणूक शून्य राखून वर उल्लू-मशाल वृत्तीने स्त्रियांकडे पाहणारा आहे. अशा ‘माणसांना’ आमचा विरोधच राहील, आणि ह्या वादात उत्क्रांति-मानसशास्त्र आमच्या बाजूचे आहे! ह्या शेवटच्या उप-प्रकरणात ‘दार्शनिक तटस्थता’ ढळली आहे —- हे जाणीवपूर्वक झाले आहे.
१९३, शिवाजीनगर, मश्रूवाला मार्ग, नागपूर — ४४० ०१०