माणूस हा एक सस्तन प्राणी आहे. म्हणून जीवशास्त्राचे मूलभूत नियम माणसाला लागू पडतातच. जीवशास्त्राच्या अभ्यासात पुढील नियम आपल्याला आढळतात :–
१) पर्यावरणाची विविधता प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या जाती-प्रजातींच्या उत्क्रांतीस व टिकून राहण्यास आवश्यक असते. ही विविधता नष्ट केल्यास, सरसकट सारखे पर्यावरण निर्माण केल्यास, अनेक जाती प्रजाती जैविक चढाओढीत मागे पडून नष्ट होतात. पर्यावरणाच्या स्थानिक वैशिष्ट्यांमुळे केवळ काही विशिष्ट जाती प्रजाती शिरजोर ठरत असतात. उदाहरणार्थ डोंगराच्या शिखरावर, मध्य-उतारावर, घळीमध्ये, खालच्या उतारावर, सपाटीवर वेगवेगळ्या झाडांच्या जाती आढळतात. पूर्व दिशेच्या उतारावर व प िचम बाजूच्या उतारावर देखील वेगवेगळ्या जातींचे प्राबल्य आढळते. डोंगर बुलडोझर लावून सपाट केला तर त्यातील बऱ्याच जाती नष्ट होऊन फार थोड्या जाती शिल्लक रहातील. समुद्रातील भरती ओहोटीमुळे किनाऱ्यावरच्या वेग-वेगळ्या पट्ट्यांमध्ये वेगवेगळे जीव विकसित झालेले असतात. तेच कृत्रिमरीत्या भिंती बांधून भरती ओहोटी येणे बंद केले तर त्यातील बरेच जीव नष्ट होतील.
२. अलगतेमुळे (Isolation) अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व विविध जाती निर्माण होतात. त्यामुळे महासागरामुळे मुख्य भूमीपासून अलग पडलेल्या बेटांवर फार वैविध्याने नटलेले जीव उत्क्रांत होतात. पण मानवी हस्तक्षेपाने तेथे परकीय (Exotic) प्राणी/वनस्पती नेण्यात आले तर ते तेथील स्थानिक (Endogenous) प्राणी व वनस्पतींना खूप नुकसानकारक होऊ शकते व त्यामुळे काही स्थानिक जीव नष्ट होऊ शकतात. उदा. न्यूझीलंडमध्ये न उडणाऱ्या पोपटांची एक जात विकसित झाली होती. तेथे मांजरे, कुत्री वगैरे मांसाहारी प्राणी मुळात नसल्याने त्यांना स्वसंरक्षणासाठी उडण्याची आतश्यकता नव्हती, व त्यामुळे हळू हळू त्यांची उडण्याची शक्ती नाहीशी झाली. पण माणसांनी तेथे मांजरे, कुत्री नेली. त्यांच्यापासून बचावाचे कोणतेच साधन नसल्याने ही पोपटाची जात आता नष्टप्राय झाली आहे. भारतामध्ये केंदाळ, काँग्रेस-गवत, बेशरम, घाणेरी या परकीय वनस्पतींनी स्थानिक वनस्पती व प्राणी सृष्टीचे चांगलेच नुकसान केले आहे.
माणसाच्याही विविध जाती/प्रजाती ठिकठिकाणच्या पर्यावरणाला अनुसरून निर्माण झाल्या (होत्या?) ध्रुवीय प्रदेशात एस्किमो, उत्तर अमेरिकेत रेड इंडियन दक्षिण अमेरिकेत माया संस्कृतीचे, अंदमानमध्ये ओंगो वगैरे. हे विविध मानव-समूह टिकून राहण्यासाठी वरील दोन गोष्टींची जीवशास्त्राच्या नियमांप्रमाणे आवश्यकता होती. (१) अलगता अथवा परकीय (Exotic) मानवापासून संरक्षण (२) पर्यावरणाचे वैविध्य टिकून राहणे.
दुर्दैवाने, यांपैकी पहिली गोष्ट गेली कित्येक शतके धोक्यात आली. पश्चिम युरोपीय मानव-वंश जगभर सर्वत्र पसरला. त्याने उत्तर अमेरिकेतील रेड इंडियन लोक (व तेथील रानटी म्हशी, पॅसेंजर पीजन वगैरे) दक्षिण अमेरिकेतील मायन लोक, ऑस्ट्रेलियातील मावरी, आफ्रिकेतील निग्रो वगैरे अनेक मानव-समूह नष्टप्राय किंवा गुलाम किंवा गिळंकृत केले. प्राचीनकाळी हीच गोष्ट द्रविडी लोक, अनार्य, आर्य यांच्या दरम्यान झाली असण्याची शक्यता आहे, पण पूर्वी ही प्रक्रिया मंदवेगाने व सौम्य होती अशी आपण कल्पना करू शकतो. पण आता विज्ञान, जलद वाहतूक व शस्त्रे यांच्यामुळे ही प्रक्रिया वेगवान, निघृण व कार्यक्षम (efficient) झालेली आहे. पर्यावरणाचे वैविध्यही आता धोक्यात आले आहे. मानवाच्या दृष्टीने पर्यावरणात भौगोलिक परिस्थिती, वातावरण, पाऊस, पाण्याची उपलब्धता, प्राणी व वनस्पती सृष्टी, यांच्या बरोबरच मानवनिर्मित पर्यावरणाचाही समावेश होतो — उदा. — शिक्षण, साथीचे रोग व त्यांच्या प्रतिबंध, वैद्यकीय सेवा, कारखानदारी, कच्च्या मालाची, भांडवलांची उपलब्धता, शेती व औद्योगिक मालासाठी बाजारपेठ, स्पर्धा, इत्यादि अनेक मानवसमूहांना पूर्वी आनंदाने जगण्यासाठी शिक्षण, शेतीची कार्यक्षमता, औद्योगिक कार्यक्षमता, माल खपवण्याची कला इत्यादि कला किंवा गोष्टी आवश्यक नव्हत्या; या व अशा अनेक गोष्टी त्यांच्या दृष्टीने निरर्थक (Irrelevant) होत्या. पण जागतिकीकरणामुळे त्यांना जागतिक आर्थिक व्यवहाराच्या मुख्य प्रवाहात आणून सोडले. आता या सर्व पूर्वी निरर्थक असणाऱ्या गोष्टी एकदम जीवनावश्यक बनल्या. या गोष्टीत स्पर्धेत मागे पडल्याने हे मानव-समूह देशीधडीला लागण्याची व नष्ट होण्याची भीती आहे व ती प्रक्रिया वेगाने चालू आहे. वेगवेगळ्या डबक्यांत, ओढ्यांत, नद्या-नाले यांत राहणाऱ्या माशांना एकाच महासागरात आणून सोडले तर त्या माशांची जी अवस्था होईल, तीच अवस्था बऱ्याच मानवसमूहांची जागतिकीकरणाने तयार झालेल्या खेड्यात (Global Village) होत आहे. फक्त आदिवासींच्या बद्दलच ही गोष्ट घडते असे नाही. पंजाबात स्वस्तात पिकणारा गहू व तांदूळ महाराष्ट्रात सुलभतेने व खुल्या रीतीने येऊ लागला तर महाराष्ट्रातील तांदूळ/गहू पिकवणाऱ्यांचे नुकसान होणार — व त्यांना शेती विकावी लागणार. नदीवर धरण बांधल्याने हिलसा किंवा सॅमन माशांना उगमापर्यंत अंडी घालण्यासाठी जात येत नाही. त्यामुळे अनेक मासे मारून जगणारे लोकसमूह नष्ट होऊन जातात. चीनमधून स्वस्त माल आयात होऊ लागल्यावर महाराष्ट्रातील कुलुपे, घड्याळे, कॅलक्युलेटर वगैरे बनवणारे लहान कारखाने बंद पडतात. उत्तर अमेरिकेत गोमांसाची मागणी आल्याने अॅमेझॉनच्या जंगलात गोपालनाचा धंदा वाढतो, त्यासाठी जंगल तुटते व जंगलावर अवलंबून असणारे प्राणी व मानवसमूह नष्टप्राय होतात. हजारो वर्षांच्या अनुभवाने, संचित ज्ञानाने व त्यापासून निर्माण होणाऱ्या शहाणपणाने विविध मानवसमूहांनी आपापल्या पर्यावरणाशी जुळवून घेणाऱ्या जीवन-प्रणाली विकसित केल्या होत्या व आहेत. मारवाडातील वाळवंटात राहणाऱ्या लोकांनी कमी पावसाच्या प्रदेशात मिळणारे पाणी कसे साठवावे, कमी पाण्यात आपले, आपली पिके व आपले प्राणी यांचे कसे भागवावे, व तरीही पर्यावरणाचे नुकसान न होऊ देता कसे जगावे याचे ज्ञान व परंपरा विकसित केल्या. हजारो वर्षे त्यांना विध्वसंक अशा धरण-योजनांची आवश्यकता भासली नाही. तिबेटमध्ये राहणाऱ्या लोकांनी तेथील थंडीत व कमी पावसात जगता येईल अशी जीवनपद्धती विकसित केली. मध्यप्रदेशातील किंवा अंदमानमधील जंगलात राहणाऱ्या लोकांनी त्या परिस्थितीशी जुळवून राहणारे जीवन निर्माण केले. तेथील स्थानिक पर्यावरणात ते ते मानव-समूह स्वावलंबी असतात व पर्यावरणाचे व ऊर्जास्रोतांचे नुकसान न करता ते हजारो वर्षे जगू शकतात. त्यांच्यात बेरोजगारीचा प्र नच नसतो. स्थानिक मागणीवर त्यांचा पूर्ण रोजगार चालू शकतो. स्थानिक परिस्थितीत ते जगातील कोणत्याही अन्य मानव-समूहाशी स्पर्धा करू शकतील. पण हे सर्व संतुलन ‘अलगता’ नष्ट झाल्यास ढासळून पडते. भूगर्भातील तेलावर ऊर्जा मिळवणाऱ्या वाहनांनी वाहतूक अनैसर्गिकरीत्या इतकी सोपी, स्वस्त व सुरक्षित बनवली आहे, की अलगता अशक्यच व्हावी. विज्ञानाधारित शस्त्रांनी मानवसमूहांतील प्रत्यक्ष संघर्ष देखील पूर्णपणे एकांगी बनवला. स्वस्त वाहतुकीमुळे लांबलांबचा माल स्वस्तात स्थानिक बाजारपेठेवर आक्रमण करू लागला. स्थानिक बनावटीचा माल खपला नाही की बेकारी येते. मालाबरोबरच विकाऊ दारू इतर व्यसने व नाना प्रकारचे संसर्गजन्य रोग —- ज्यांना तोंड द्यायची स्थानिक लोक समूहांची कोणतीही पूर्वतयारी नव्हती —- यांचीदेखील भर पडली. अलग असताना हजारो वर्षे पर्यावरणाचे नुकसान न करता राहण्यासाठी जे गुण, ज्या परंपरा महत्त्वाच्या होत्या, त्यांची किंमत आता शून्य झाली. नवीन तंत्रज्ञान, नवीन शिक्षण, नवीन परंपरा नवीन बाजारपेठीय आर्थिक व्यवस्था, स्पर्धा यांसाठी लागणारे गुण विकसित व्हायला वेळही मिळाला नाही —- किंवा तशी जैविक (जेनेटिक–आनुवंशिक) ताकदही नव्हती. या असमान संघर्षांत कित्येक मानवसमूह नष्टप्राय झाले. जे टिकले त्यांना आपले हजारो वर्षांचे संचित ज्ञान व शहाणपण विसरावे (Unlearn) लागले व स्थानिक पर्यावरणाला पूर्णपणे विसंगत अशी निखळ व निघृण (Lean and Mean) जीवन पद्धती स्वीकारावी – — शिकावी लागली. त्या जीवनप्रणालीत अत्याधुनिक व सतत प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्षम उत्पादनपद्धती आहे, सेवा व वस्तू आक्रमकपणे खपवणे आहे. पण या शर्यतीत मागे पडणाऱ्या व्यक्तींबद्दल दया-माया नाही, पर्यावरणाची हानी आहे, ऊर्जा स्रोतांचा ह्रास आहे, निसर्ग-चक्राबद्दल कोरडे ज्ञान आहे, पण आस्था नाही, बांधिलकी नाही. संचित ऊर्जा स्रोतांचा -हास व पर्यावरणाचे प्रदूषण या दोन प्रमुख कारणांमुळे ही नूतन संस्कृति आतापर्यंतच्या सर्व संस्कृतींपेक्षा अल्पायुषी ठरण्याची शक्यता आहे. आणखी १-२ शतकांमध्येच ही संस्कृति नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत इजिप्शियन, सुमेरियन, ग्रीक, रोमन, मायन अशा अनेक संस्कृति लयाला गेल्या, पण त्या नष्ट झाल्याचे परिणाम स्थानिकच राहिले. पण सध्याची संस्कृति जागतिकीकरणामुळे सर्व पृथ्वी व्यापून राहिली आहे. ती नष्ट होण्यापूर्वी इतर सर्व संस्कृतींना नष्ट करून मगच स्वतः लयाला जाणार आहे. खंत याचीच वाटते की एका अल्पजीवी संस्कृतीमुळे सर्व मानव-समूहांचे संचित ज्ञान व शहाणपण नष्ट होणार आहे. या संस्कृतीच्या लयानंतर उरलेल्या मानवाला पर्यावरणाशी जळवून घेऊन व पुनर्निर्माणक्षम (रिन्यूएबल) ऊर्जा स्रोतावर कसे जगावे याचे विसरलेले ज्ञान पुन्हा मिळवावे लागेल.
जागतिकीकरणाच्या या घातक परिणामाचा विचार सुज्ञ व्यक्तींनी केला पाहिजे व त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
२५, नागाळा पार्क, कोल्हापूर