आपल्या सर्वांचाच मेंदू सक्षम असतो, फक्त त्याला डोळस अनुभव द्या. (We all have same hardware but only different software.) स्थळ आहे ऐने. वांगणीस्टेशन पासून १५-२० कि. मी. अंतरावर असलेले एक आदिवासी छोटेसे गाव. ग्राममंगल संस्थेच्या चवथीपाचवीतल्या १४-१५ मुला-मुलींचा गट. नीलेश गुरुजींनी ३-४ दिवस आधी या मुलांना पोष्ट ऑफीस पाहून यायला सांगितले होते. आणि मुलेमुली काय काय पाहिले ते सांगत होती : कोणाला शिक्के मारण्याचे काम आवडल, काही जणांनी पत्त्यांप्रमाणे पत्रांचे गढे कसे तयार करतात ते पाहिले. असे चालले होते. इतक्यात एका मुलाला प्र न पडला —
गुरुजी नदी आडवी आली तर टेलीफोनची तार कशी नेतात? गुरुजींनी माझ्याकडे सहेतुक नजरेने पाहिले. मी :– नदीच्या पात्राखालून नेतात. नाहीतर नदीवर पूल असेल तर पुलावर खांब टाकून पलीकडे तार नेतात. शंभर वर्षांपूर्वीच अशा मोठमोठ्या जाड तारा अटलांटिक महासागरच्या तळातून टाकून युरोप अमेरिकेला जोडले गेले.
विद्यार्थी :- गुरुजी तारा पोकळ असतात का? आवाज इकडून तिकडे वाहत जातो?
मी :– तुमच्या पैकी कोणीही इकडे या. या लाकडी खांबाला कान लावा. (मी वरून सात आठ फूट अंतरावर नखाने ओरखडतो, टकटक करतो). आवाज ऐकू आला का?
वि :– हो,
मी :– मग खांब पोकळ आहे?
वि :– नाही. पण मग आवाज कसा ऐकू आला?
मी :– मी टकटक करतो तेव्हा आवाजाच्या लाटा तयार होतात. त्या लाकडातून तुमच्या कानापर्यंत येतात म्हणून तुम्हाला ऐकू येते.
वि :– लाटा म्हणजे काय?
(मी एक थोडीशी जाडसर दोरी आणायला सांगतो. एक टोक माझ्या हातात एक टोक विद्यार्थ्याच्या हातात. मी दोरीला हलके हलके झोके देतो. हलके हलके दोरीत लाटा तयार होतात. त्या मुलापर्यंत जातात. त्याच्या हाताला लाटातली ऊर्जा जाणवते, डोळ्यांना लाट इकडून तिकडे गेलेली दिसते.)
मी :– कळले, लाट इकडून तिकडे कशी जाते? आपण टेलिफोनमध्ये बोलतो तिथे एक चकती असते ती कंप पावते. तुम्ही ऐकता तिथे पण एक चकती असते ती कंप पावते म्हणून तुम्हाला ऐकू येते. मधल्या तारातून विजेच्या स्वख्यात लाटा तिकडे जातात. तुम्ही काडेपेटी, पत्र्याच्या डब्यांचे खेळातले टेलिफोन करता की नाही?
वि :– पण लाटा तर दिसत नाहीत?
मी :– तुम्ही मॅग्नेट एकमेकांना खेचताना पाहिलेत? मग ते काय दोऱ्यांनी खेचतात, आपल्याला दिसतात दोऱ्या?
वि :– कॉर्डलेसवर काय होते? तिथे ताराच नसतात.
मी :– मी तुमच्याशी आता समोरासमोर बसून बोलतोय ते एक प्रकारच्या कॉर्डलेसनीच बोलतोय की. तारा कुठे आहेत?
(सर्व मुले एकमेकांकडे एकदम बघायलाच लागतात. खरंच की?)
मी :– मी बोलतो तेव्हा त्याच्या हवेत लाटा होतात त्या तुमच्या कानापर्यंत येतात. म्हणून तुम्ही ऐकता.
वि :– असं कसं? हवेतल्या लाटा दिसतात कुठे?
मी :– हवेत लाटा होतात. त्या मोडल्या, विस्कटल्या तर तुम्हाला ऐकू येणार नाही. तुम्ही शेतात असता. लांबून एकमेकांशी बोलता. एवढ्यात जोराचा वारा सुटतो. मग हवेतल्या लाटा विस्कटतात. तुम्हाला नीट ऐकू येत नाही. मग ओरडून बोलावे लागते म्हणजे लाटांची ताकद वाहते, त्या वाऱ्यांनी विस्कटत नाहीत, मग तुम्हाला ऐकू येते.
(मुलांच्या चेहऱ्यावर कळत आहे असे समाधान दिसते.)
मी :– तुम्ही पाण्यात दगड टाकता. तेव्हा बारीक लाटा पसरत जातात. हळू हळू लहान होतात. त्यांची ताकद जाते. तसेच हवेतल्या लाटांचे होते. त्या विरून जातात. मग तुम्हाला ऐकू येत नाही.
(इतक्यात तास संपल्याची घंटा होते. मुले आनंदाने निघून जातात. तासा-दोन तासांनी काडेपेटीचा टेलिफोन तयार होऊन येतो! या प्र नोत्तरात सरसकट सर्व मुलामुलींनी भाग घेतला. ती सर्व उत्साहात होती. आम्हा सर्वांनाच फार मजा आली.)
पाओलो फ्रेरी हा आधुनिक काळातला महान शिक्षणतज्ज्ञ. त्याच्या Teachers as Cultural Workers या पुस्तकातील हा संवाद पाहा —-
आम्ही गेलो त्यावेळी मुले पतंग उडवत होती. मी एका मुलाला विचारले. काय रे साधारण पतंग उडवताना किती दोरी सोडतोस?
वि. :– साधारण पन्नास मीटर सोडतो.
पा. :– कशावरनं म्हणतोस?
वि :– मी दर दोन मीटरवर दोरीला गाठी मारतो आणि दोरी सोडताना गाठी मोजतो.
पा. :– हा पतंग किती उंच उडालाय? वि :– चाळीस मीटर
पा. :– तुला कसे कळले?
वि :– मी पतंग भराभरा हापसून डोक्यावर आणतो आणि गाठी मोजतो. साधारण किती ढील दिली, झोल किती
आला याचा अंदाज घेतला की उंची कळते.
(यावर पावलोचे भाष्य असे : या मुलाला त्रिकोणमितीचे छान आकलन होते. आम्ही नंतर कोणांचे अंश शोधून काढण्याचा गंमत म्हणून खेळ पण खेळतो. शाळेत गेल्यावर कळले की या मुलाला गणित, त्रिकोणमिती कळत नाही म्हणून नापास केले होते! त्याच्या रोजच्या व्यवहारातील त्रिकोणमिती त्याला कळत होती. कागदावरच्या आकृत्या आणि व्यवहार यांची सांगड मात्र आमचे पुस्तकी शिक्षण घालू शकले नाही.)
त्याच पुस्तकातला हा आणिक एक किस्सा. ते बोटीतून संथपणे जात होते. जाता जाता भालाफेक करत माशांची शिकार करत होते. दरवेळी शिकारी भाला जरा अलिकडे फेके, थेट माशावर फेकतच नव्हता. फ्रेअरीला याचे आ चर्य वाटले. त्या शिकाऱ्याला पाण्यातील परावर्तनाचा नियम माहीत नव्हता. पण अनुभवातून तो त्या नियमाचे पालन करतच होता. आम्हाला लोकांच्या या प्रत्यक्ष ज्ञानाचा फायदा घेत विज्ञानाची तत्त्वे सुलभ करून सांगता येणार नाहीत? शिक्षण आणि व्यवहार वेगळेच ठेवायला हवेत? यांचा संबंधच ठेवायचा नाही?
आदिवासी मुले, मागासवर्गातील मुले, बुध्यंक, विज्ञान-शिक्षण, वैज्ञानिक दृष्टि कोन या सर्व संज्ञा एकदा नीट खुल्या मनाने तपासून, समजून घ्यायला हव्यात असं नाही वाटत तुम्हाला?
६ सुरुची, संत जनाबाई पथ, पूर्व विले पार्ले, मुंबई — ४०० ०५७