विद्वद्रत्न डॉ. केशव लक्ष्मण दप्तरी (१८८०-१९५६) हे गेल्या पिढीतले मोठे विचारवंत होते. मुख्य म्हणजे ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. आमच्या अर्थाने विवेकवादी होते का? याचे उत्तर एका शब्दात देता येणार नाही.
१. डॉ. दप्तरी थोर धर्मज्ञ होते, आणि जनसामान्यांसाठी धर्माची आवश्यकता मानणारे होते. मात्र धर्म काय किंवा धर्मग्रंथ काय अपौरुषेय नाहीत, पूर्णपणे बुद्धिगम्य आहेत, असा त्यांचा सिद्धान्त होता.
आता प्रश्न असा की, ते आधी बुद्धिवादी, आणि मग धार्मिक म्हणजे लोकशिक्षणाकरिता म्हणून धर्माचा आश्रय घेणारे होते की, मुळात धर्मभिमानी पण बुद्धिवादाचा आश्रय घेऊन धर्म विवेकवाद्यांना स्वीकार्य व्हावा अशा रीतीने सांगणारे धर्मसुधारक होते?
या बाबतीत आमचे असे मत आहे की, ते मुख्यतः बुद्धिवादी होते आणि धर्मापेक्षा बुद्धीचा अधिकार मोठा आहे असे मानणारे होते. या अर्थाने ते विवेकवादी होते.
२. ‘धर्म’ शब्द दप्तरी आणि त्यांचे विरोधक एकाच अर्थाने वापरत होते का? उत्तर आहे नाही. वेदादि धर्मग्रंथ श्री. शंकराचार्य व श्री. शबरस्वामी यांनी अपौरुषेय ठरविले. धर्म श्रद्धेवर नसून बुद्धीवर आधारलेला आहे. तो बुद्धिगम्य आणि बुद्धिप्रधान आहे असे दप्तरी म्हणतात. ‘धर्म’ शब्दाचा श्रद्धावाद्यांचा अर्थ अपुरा आहे व धर्माला मर्यादित करणारा आहे असे त्यांचे प्रमेय होते.
३. पुढचा प्रश्न – उपनिषदांतला आणि महाभारत, स्मृति, पुराणे यातला धर्म यांना एकच वैदिकधर्म हे नाव देता येईल का? यावर दप्तरींचे उत्तर “हो” असे आहे. धर्म बदलत आला आहे हे खरे, तरी उपनिषदे, महाभारत, स्मृति हे वैदिक धर्माचेच ग्रंथ आहेत.
धर्मज्ञ डॉ. दप्तरी उपनिषत्कालीन ऋषींप्रमाणे स्वतंत्रप्रज्ञ होते. प्रकांडपंडित होते. शंकराचार्यांनी भाष्य केलेल्या दहा व कौषीतकी या आणखी एका, अशा अकरा उपनिषदांवर त्यांनी भाष्य लिहिले. व्याससूत्रांवर भाष्य लिहिले. जैमिनीच्या पूर्वमीमांसा सूत्रांवर त्यांनी भाष्य लिहिले. धर्मरहस्य, धर्मविवादस्वरूप आणि औपनिषदिक जीवनसौख्य हे ग्रंथ त्यांनी लिहिले. धर्ममीमांसेच्या दोन पद्धती ते सांगतात. धर्म अपरिवर्तनीय मानणारी जुनी सनातनी पद्धती. तिला ते वैदिक पद्धती म्हणतात. धर्मात परिवर्तन होत आले आहे असे मानते ती दुसरी, ऐतिहासिक पद्धती. धर्माचे मूळ प्रयोजन म्हणजे अर्थ लक्षात घेऊन ती धर्मसुधारणेचा पुरस्कार करते. दप्तरी तिला तात्त्विक पद्धती म्हणतात. ते स्वतः तात्त्विक पद्धतीचे मीमांसक होते. प्रसंगानुरूप जुन्या शास्त्रीय पंडितांशी झालेल्या वादानिमित्त त्यांनी लिहिलेल्या लेखांचे दोन संग्रह प्रकाशित झाले आहेत व तिसरा होत आहे. नागपूर विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली होती. त्यांची संशोधक म्हणून योग्यता लो. टिळकांना मान्य होती. वाईचे प्राज्ञपाठ शाळेचे संस्थापक श्री. केवलानंद सरस्वती आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी त्यांच्या बुद्धिवादाचे स्वागत केले होते. त्यांचे ग्रंथ दप्तरी ग्रंथ प्रकाशन समिती तर्फे प्रकाशित – पुनर्मुद्रित होत असतात.*
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांना १९४१ साली लिहिलेल्या पत्रात डॉ. दप्तरी ह्यांनी ‘आत्यंतिक सुखाचे (निःश्रेयस) साधन’ अशी धर्माची व्याख्या केली आहे. ते पुढे म्हणतात, “तुम्ही समाजाचे सुख हे साध्य मानले व मी व्यक्तीचे सुख साध्य मानले तरी वरील विचारसरणीत फरक होत नाही. कारण समाजनिरपेक्ष व्यक्ती सुखी होऊ शकत नाही.” “पाश्चात्त्यांची धर्माची व्याख्या हिदुधर्मास लागूच नाही.” असाही खुलासा तेथे त्यांनी केला आहे. धर्माची वरीलप्रमाणे व्याख्या केल्यामुळे ‘तो पाहिजे’ असे त्यांना वाटते. मनुष्याला आत्यंतिक सुख कसे लाभावे हे सांगण्यासाठी धर्म प्रवृत्त झाला आहे, असे त्यांचे म्हणणे.
दप्तरी या आत्यंतिक सुखालाच वासनाभाव असेही शेवटी म्हणतात. झोपेत वासनांचा अभाव असतो तो वेगळा. जागेपणीचा वासनाभाव म्हणजे मनाची शान्ती (सान्ति – पुरे असे वाटणे) असे त्याचे स्वरूप सांगता येईल. विशेष म्हणजे हे आत्यंतिक सुख परलोकीचे नाही. ते इहलोकातच आहे. तसेच वासनाभाव हा एक प्रकारचा संन्यासमार्गाचा पुरस्कार आहे असेही नाही. याउलट तृप्तीनंतर वासनाभाव येण्यासाठी कर्म करणे जरूर आहे; असा त्यांचा आग्रह आहे. परलोकासंबंधी, “जोपर्यंत मृत्यु ही गोष्ट आहे तोपर्यंत परलोक ही कल्पना मनुष्याच्या डोक्यांत राहणारच. ती काढून टाका म्हणण्यापेक्षा तिला बुद्धीचे नियंत्रण घालणे अधिक चांगलें नाहीं काय” असा त्यांचा प्रश्न आहे. (म्हणून) “मीं ‘परलोक आहे’ असे मानले तरी त्यावर बुद्धीचे नियंत्रण घालतो. ज्या साधनांनी इहलोकीं अत्यंत सुख होते त्यांनींच परलोकींही सुख होते असे दाखवितों”. एकूण काय तर आत्यंतिक सुख आणि तेही इहलोकीचे हे मनुष्याचे साध्य आहे आणि धर्म हे आत्यंतिक सुखाचे साधन आहे असा दप्तरींचा सिद्धान्त आहे. धर्माच्या या प्रकारच्या ऐहिक स्वख्यामुळे धर्म पूर्णपणे बुद्धिगम्य आहे असे ते म्हणतात. अर्थात् धर्म पाहिजे असा त्यांचा निष्कर्ष आहे. याउलट तर्कतीर्थ मात्र धर्माला बुद्धिगम्य मानत नाहीत. म्हणून ते धर्मच नाकारतात. वेदान्ताचे प्रवक्ते श्री. शंकराचार्य व पूर्वमीमांसादर्शनाचे कैवारी, श्री. कुमारिल भट्ट व श्री. शबरस्वामी यांच्या लिखाणाच्या आधारे ते अशी भूमिका घेतात की आत्मा, देवता, ईश्वर, व पापपुण्य हे अलौकिक पदार्थ प्रत्येक धर्मात आहेतच, आणि त्यांच्या ज्ञानासाठी वेद इत्यादी अलौकिक शब्द प्रमाण मानले गेले. म्हणून अलौकिक आधारावर उभा, अलौकिक फळे देऊ करणारा धर्मच नको आहे. यावर दप्तरी लिहितात, “महाभारतातील शांतिपर्वात सांगितलेली धर्ममीमांसा ही बुद्धिवादी आहे अशी दिसते असे तुम्हींच म्हटले आहे”. (हिंदु धर्माची समीक्षा, पृ. क्र. ८६)
वरील पत्रसंवाद हा डॉ. दप्तरींच्या लेखनातील एक लहानसा नमुना आहे. आपले समकालीन धर्मपंडित आणि श्री. शंकराचार्य (करवीरपीठ) व सनातनी शास्त्रीमंडळी यांच्याशी त्यांनी अनेक वाद घातले. त्यांतून उत्पन्न झालेल्या प्रश्नांवर खुलासेवार लेख लिहिले. या लिखाणात डॉ. दप्तरींची बुद्धिगम्य धर्ममीमांसा व अभिनव सुखमीमांसा स्पष्ट झाली आहे. ही सुखमीमांसा अभिनव अशासाठी की तिच्यात धर्माचा समावेश आहे. आणि धर्ममीमांसा अभिनव अशासाठी की ती पूर्णतः बुद्धिगम्य आहे. ही मीमांसा त्यांनी स्वतःच्या बुद्धीने जशी केली तशीच ती वेद, उपनिषदे, स्मृति व पुराणे इत्यादी प्राचीन धर्मग्रंथांच्या आधारानेही केली आहे. या सर्व विचारमंथनातून त्यांनी अतिशय तर्ककुशलतेने आणि ठामपणे ऐहिक आत्यंतिक सुख हेच मनुष्याचे साध्य आहे असे या धर्मग्रंथांनी म्हटल्याचे दाखवून दिले आहे. पाश्चात्त्य सुखवादाच्या मांडणीतले एक न्यून असे की व्यक्तीने समाजाच्या हितासाठी का झटावे ह्याचा उलगडा तेथे नीट होत नाही. ते म्हणतात, “मला तो उलगडा करणे जरूर वाटते. व मी दाखवितों की समाज सुखी असल्याशिवाय व्यक्ती सुखी होऊ शकत नाही. म्हणून व्यक्तीने स्वतःच्या सुखाकरितांच समाजाच्या हिताकरितां झटावें”. (द. ले. सं. -१, पृ. क्र. ३६१)
दीर्घं पश्यत मा ह्रस्वं, परं पश्यत मा अपरम् । (वसिष्ठस्मृति)
दूरचे पाहा, अदूरदृष्टीने (पाहू) नका, उच्चाकडे पाहा नीचाकडे (पाहू) नका. धर्माचे साध्य सुख आहे हे सिद्ध करताना ते असा युक्तिवाद करतात की, “मनुष्य स्वभावतः जें इच्छितो किंवा ज्याकरितां झटण्याचा मनुष्याचा स्वभाव असेल त्याहून भिन्न असें धर्माचे साध्य मनुष्यास सांगणें निरुपयोगी आहे. कारण मनुष्य त्याप्रमाणे करूच शकणार नाही. मनुष्यस्वभाव तर सुख इच्छितो किंवा सुखाकरितां खटपट करणे हाच आहे. म्हणून सुख हेच धर्माचे साध्य ठरतें”. (धर्मविवादस्वरूप, पृ. क्र. १९५-९६)
आपला मुद्दा छांदोग्य उपनिषदातील प्रसिद्ध वचनाच्या साह्याने ते ठसवितात.
यदा वै सुखं लभतेऽथ करोति । नासुखं लब्ध्वा करोति
सुखमेव लब्ध्वा करोति । सुखं त्वेव विजिज्ञासितव्यम् ।। (छां. ७.२२)
सुखाचा लाभ असेल तरच (तो) कृती करतो. सुखाची आशा नसेल तर करत नाही. सुखासाठींच तो कर्म करतो म्हणून सुखच जाणून घेतले पाहिजे. (धर्मरहस्य, पृ. क्र. ६ उद्धृत)
मनुष्याला हवीहवीशी वाटणारी जी संवेदना ती सुख, आणि जी नकोशी वाटते ती दुःख, अशी सुखाची एक ढोबळ व्याख्या आहे. (अनुकूलवेदनीयं सुखं । प्रतिकूलवेदनीयं दुःखम् ।) ही अमान्य न करता ते असा बारकावा करतात की जे सुख आपल्या स्वाधीनचे आहे ते उच्चतर आणि ज्याच्या बाबतीत आपण पराधीन असतो ते सुख हलक्या प्रकारचे परिणामी दुःखदायक (सर्व आत्मवशं सुखं । सर्व परवशं दुःखम्।) विषयजनित सुख इद्रियांनी मिळते, ते अल्पकालिक असते. मनाने मिळणारे, कल्पनेचे जे आंतरिक सुख ते चिरकालिक आणि उच्चतर असते. बाह्य सुखे आणि आत्मिक सुखे हा भेद कस्न आत्मिक सुख अनुभवणारा मनुष्य इहलोकीच, या जन्मातच जीवन्मुक्त होतो आणि त्यासाठी त्याला कर्मे करावीच लागतात यावर त्यांचा कटाक्ष आहे. जीवनमुक्ताची अवस्था ही वासनाभावाची असली तरी तो संन्याशाचा वासनाभाव नाही. कर्मे करीत करीतच शंभर वर्षे जगा असे सांगणाऱ्या प्रवृत्तिमार्गी धर्माचा तो वासनाभाव आहे.
ईशावास्योपनिषदातील पुढील मंत्र ते उद्धृत करतात,
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतं समाः।। एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ।। (ईश. २)
कर्तव्ये, कर्मे करीतच ह्या लोकी शंभर वर्षे जगण्याची इच्छा धरावी; तुला दुसरा मार्ग नाही. असे वागल्याने मनुष्याला (तुला) कर्माचा वासनास्पी लेप लागणार नाही.
इहलोकीचे सुख आणि परलोकीचे सुख सारखेच आहे. कारण परलोकी भिन्न प्रकारची सुखे आहेत असा अनुभव कुणाला नाही आणि मेल्याशिवाय तो अनुभव येणे शक्य नाही, हा एक मुद्दा आणि दुसरा असा की इहलोकामध्ये ज्याच्या मनातला आपपरभाव दूर होतो म्हणजे ज्याला येथे नानात्व न दिसता एकात्मतेचा अनुभव येतो तो उच्च प्रतीचे सुख अनुभवतो. कारण सर्व दुराचरण अभिमानमूलक असते. स्वतःला इतरांपेक्षा वरचढ समजण्यातून अनीती उत्पन्न होते. याउलट सर्वत्र एकच आत्मतत्त्व भरले आहे अशी आत्मौपम्य बुद्धी ज्याला झाली तो आत्यंतिक सुखाचा धनी होतो. आणि वर सांगितल्याप्रमाणे आमरण शंभर वर्षे कर्मे करीतकरीत जीवन्मुक्तीचा आनंद घेतो.
एकात्मप्रत्ययसारं असे हे ज्ञान आणि या ज्ञानानंतर आजन्म कर्मे करणे ही वृत्ति असा धर्माचा प्रवृत्तिमार्ग आहे.
आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ दप्तरी कठोपनिषदातील पुढील लोक देतात :
यदेवेह तदमुत्र यदमुत्र तदन्विह । मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति ।।
मनसैवेदमाप्तव्यं नेह नानास्ति किंचन। मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति ।। (कठ ३.१०-११)
(येथे जे आहे तेच दुसऱ्या ठिकाणी आहे. जे तेथे आहे तसेच येथेही आहे. या जगात नानात्व दृष्टीने जो पाहतो तो दुःखामागून दुःख (मृत्योः मृत्युम्) पावतो ।।१०।। नानात्वाचा अभाव म्हणजे एकत्व प्रत्यक्ष न दिसले तरी ते मनाने ठरवावे आणि स्वीकारावे कारण नानात्वाची दृष्टी धारण करणारा दुःखामागून दुःख अनुभवतो।।११।।)
श्री. व्यासांच्या वेदान्तसूत्रांत कोठेही संन्यासमार्गाचा पुरस्कार नसता श्री. शंकराचार्यांनी बौद्धमताचे खंडन करण्याकरिता त्यांचा संन्यासवाद वेदान्तात आहे असे दाखविण्याचा खटाटोप केला. त्यामुळे धर्मभोळ्या भारतीयांची फार मोठी हानी झाली आहे आणि श्री. व्यासांवर आणि उपनिषदांवर अन्याय झाला आहे असे त्यांनी दाखविले आहे. श्री. व्यासांची श्री. शंकराचार्यांवर फिर्याद हा शास्त्रकाट्याच्या कसोटीवर उतरणारा आणि साहित्यगुणांनी समृद्ध असा एक लेख दप्तरींनी १९४८ मध्ये लिहिला. त्यात जनतेच्या न्यायालयात असा दावा केला आहे की उपनिषदांवरील शांकरभाष्ये शिकवू नयेत असा मनाई हुकूम शिक्षकांना देण्यात यावा. वादी श्री. व्यास यांच्यातर्फे त्यांचे वकील डॉ. दप्तरी जनतेच्या अदालतीस प्रार्थना करतात की प्रतिवादीची (श्री. शंकराचार्यांची) ब्रह्मसूत्रांवरील व उपनिषदांवरील भाष्ये कोणीही कोवळ्या बुद्धीच्या लहान मुलांस किंवा अल्प बुद्धीच्या मोठ्या व्यक्तीस शिकवू नये. आणि शिकवायचीच असतील तर त्यापूर्वी किंवा त्यानंतर या दाव्यात पुराव्यात दाखल केलेली ब्रह्मसूत्रांची व उपनिषदांची भाष्ये (डॉ. दप्तरींची) शिकविलीच पाहिजेत असा हुकूम कोर्टाने देऊन त्याची अंमलबजावणी करावी. समाजातील सद्गुणी लोकांनी संन्यास घेतल्यामुळे अशा लोकांना व त्यांच्या संततीस समाज मुकला. वेद व उपनिषदे अपौरुषेय आहेत अशी समाजाची समजूत करून दिल्यामुळे पुढील हजारो वर्षे धर्मपरिवर्तनाचे काम नीट झाले नाही. ब्रह्म या कारणापासून जग उत्पन्न झाले ही परिणामवादी भूमिका टाकून जगाची उत्पत्ती हा केवळ अध्यास (आभास) आहे अशी विवर्तवादी भूमिका शंकराचार्यांनी घेतली. ब्रह्मज्ञानी होतो तो अद्वैत स्थितीत जातो. तेथे कर्म करण्याचा प्रश्नच नसतो म्हणून कर्मसंन्यास जीवनाचा चुकीचा आदर्श बनला. इत्यादि अतिशय मार्मिक युक्तिवाद करून त्यांनी कठोपनिषदाचा आधार घेऊन ब्रह्म सूक्ष्मबुद्धी मनुष्याच्या श्रेष्ठ बुद्धीने पाहिले जाते (दृश्यते त्वग्र्यया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः) असे सिद्ध केले आहे.
वरील सर्व युक्तिवादात बुद्धिप्रामाण्यावर भर असून केवळ उपोबलक प्रमाणे म्हणून धर्मवचनांचा पुरावा घेतला आहे. शिवाय धर्माभिमान्यांना निस्तर करण्यासाठीही धर्मवचने देणे अवश्य आहे.
धर्माचा श्रद्धा हा आधार मानला तर वैदिकांचीच श्रद्धा का स्वीकारावी? पाश्चात्त्य धर्म इस्लाम, ख्रिस्ती, ज्यू हे सर्व श्रद्धाधिष्ठि त धर्म आहेत. त्यांच्यात परस्पर तीव्र मतभेद आहेत. विरोध आहेत. म्हणून श्रद्धेवर आधारलेला धर्म सर्वांना सारखाच स्वीकार्य होणार नाही. डॉ. दप्तरींच्या मते वैदिक धर्म श्रद्धेवर आधारलेला नाही. श्री. शंकराचार्य आणि शबरस्वामी यांनी त्याला अपौरुषेयत्वाची कलाटणी दिली आहे. त्यांच्या पूर्वीचा अतिशय जुन्या वेदोपनिषदादि धर्मग्रंथातला धर्म हा बुद्धिप्रत्ययक धर्म आहे. महाभारतात असे म्हटले आहे की सर्व वेदांचे रहस्य पूर्वीच्या काळापासून सांगण्यात आलेले असे नाही. अमक्या ग्रंथात सांगितले आहे असेही नाही तर ते आत्म्यास पटणारे असे आहे.
रहस्यं सर्ववेदानां अनैतिह्यमनागमम् ।
आत्मप्रत्ययिकं शास्त्रं . . . ।। (म.भा., शांतिपर्व २४६.१३) (द. ले. सं. खंड १, पृ. क्र. ४४)
श्रद्धावादी लोक धर्मग्रंथातील विसंगत वचने पाहून त्यांचा समन्वय करण्याचा व त्यांच्यातील विरोध दूर करण्याचा प्रयत्न करतात व आपला धर्म कधीही न बदलणारा म्हणजे सार्वकालिक आहे असे मानतात. हिंदुधर्माच्या संदर्भात या चिकित्सापद्धतीला आपण वैदिक पद्धती म्हणू. याउलट धर्मग्रंथांत, धर्मवचनांत परस्परविसंगती असते हे मान्य केले पाहिजे, ही वचने अनेक व्यक्तींनी भिन्नभिन्न काळी सांगितली आहेत, ही ऐतिहासिक गोष्ट लक्षात घेऊन धर्म बदलत आला आहे हे कबूल केले पाहिजे आणि धर्म कशाकरिता निर्माण झाला हे लक्षात घेऊन धर्मनिर्णय केला पाहिजे. हे दप्तरींचे म्हणणे. हे करताना अर्थाची ओढाताण किंवा केवळ समन्वय करण्याकरिता पदरचे शब्द घालणे हे प्रकार होता कामा नये. आपल्या या चिकित्सापद्धतीला दप्तरी ऐतिहासिक किंवा तात्त्विक पद्धती असे म्हणतात.
धर्माचा विषय बुद्धिगम्य असेल तरच धर्म बुद्धीस पटू शकेल. ऐहिक लोकयात्रा किंवा आत्यंतिक सुख हाच धर्माचा विषय आहे. हा त्यांचा मुख्य सिद्धान्त सुख कशाने होते व दुःख कशाने होते हे आपल्या अनुभवाने आणि विचाराने प्रत्येक मनुष्य ठरवू शकतो. महाभारतात असे म्हटले आहे की,
लोकयात्रामिहैके तु धर्मं प्राहुर्मनीषिणः।
समुद्दिष्टं सतां धर्मं स्वयमूहेत पंडितः।। (म.भा., शांतिपर्व, १४२.१९)
शहाणे लोक ऐहिक लोकयात्रेलाच धर्म म्हणतात, सज्जनांना उद्दिष्ट असणारा हा धर्म बुद्धिमान मनुष्य आपल्या स्वतःच्या बुद्धीने ठरवू शकतो’. वैदिक धर्म बुद्धिगम्य असल्यामुळे तो विश्वधर्म होण्याच्या योग्यतेचा आहे असेही त्यांना वाटते. महाभारताच्या शांतिपर्वात अध्याय २५९ मध्ये धर्माची चार लक्षणे सांगितली आहेत.
१. साधुपुरुषांचा आचार २. स्मृति म्हणजे धर्मशास्त्रे ३. वेदवचने. ह्यातून त्रिविध धर्म कळतो परंतु कवी म्हणजे शहाणे लोक धर्माचे चवथेही लक्षण मानतात ते म्हणजे अर्थ (द. ले. सं. खंड २, पृ. क्र. ४) अर्थ म्हणजे धर्माचा अर्थ म्हणजे त्याचे प्रयोजन. ते अर्थात धर्माचरण करणाऱ्याचे सुख हे आहे. धर्माचा नियम लोकयात्रेसाठी केला आहे असे तेथेच स्पष्ट केले आहे. लोकयात्रा म्हणजे लोकांची शरीरयात्रा, समाजातील घटकांचे स्वास्थ्य. व्यक्ती आणि समाज ह्यांच्यातील संबंध हाही धर्माचा विषय आहे. हे संबंध नियंत्रित करणारा नियम म्हणजे धर्म.
लोकयात्रार्थमेवेह धर्मस्य नियमः कृतः। (म.भा., शांतिपर्व, २५९.४) आणि नियंत्रणामागील तत्त्व म्हणजे समाजातील घटकव्यक्तींचे सुख आणि सार्वजनिक सुख यांच्यात संघर्ष न येता जीवनयात्रा चालणे म्हणजे लोकयात्रा. कोणत्याही धर्मग्रंथात भावी काळी येऊ शकणाऱ्या आपत्तींची गणना करून त्या त्या वेळी कसे वागावे यासाठी धर्माच्या म्हणजे आचरणाच्या नियमांच्या याद्या देता येणे शक्य नसते म्हणून शहाणे लोक धर्माचा अर्थ लक्षात घेऊन धर्म ठरवितात. धर्माचे हे नियामक तत्त्व काय करू नये असे नकारात्मक निकष सांगणारे आणि काय करावे असे भावात्मक निकष सांगणारे असले पाहिजेत. महाभारतात असे नियामक तत्त्व सांगितले आहे.
यदन्यैर्विहितं नेच्छेदात्मनः कर्मपूरुषः तत्परेषु न कुर्वीत जानन्नप्रियमात्मनः ।। (शान्तिपर्व, अ. २५९.२०)
यद्यदात्मनि चेच्छेत तत्परस्यापि चिन्तयेत् ।। २२ ।। (तत्रैव) १. जे कर्म दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणे योग्य नाही असे आपण समजतो तसे आपण दुसऱ्याशी वागू नये. कारण ते आपल्याला अप्रिय वाटते. (२०) २. जे जे आपल्याला लाभावे अशी आपण इच्छा धरू ते ते इतरांनाही लाभेल अशा पद्धतीने इच्छावे. (२२)
१६ शांतिविहार, सिव्हिल लाईन्स, नागपूर ४४० ००१