[रिचर्ड पी. फाईनमन हा या शतकातला एक अग्रगण्य भौतिकीतज्ज्ञ. विज्ञानाची चुकतमाकत, तात्पुरती मते बनवत, थोड्याशाच पण अत्यंत भरवशाच्या ज्ञानाकडे जाणारी पद्धत वारंवार इतर अ-वैज्ञानिकांसमोर मांडण्यासाठीही त्याची ख्याती. या पद्धतीवरच्या आग्रहानेच सतत ‘हे मला माहीत नाही’, ‘हे मला समजायला अवघड वाटते’, असे तो म्हणतो — सामान्य माणूस ज्या ठामपणाने ‘हे चूक आहे’, ‘हे तर्कविसंगत आहे’, असे म्हणतो, त्या ठामपणाला फाईनमन हट्टाने सौम्य करतो. त्याने १९६३ साली दिलेल्या तीन ‘जॉन डान्झ व्याख्यानां’चे ‘द मीनिंग ऑफ इट ऑल’ या नावाने पुस्तक निघाले आहे (पेंग्विन, १९९८). ‘विज्ञानाची अनि िचतता’, ‘मूल्यांची अनि िचतता’ आणि ‘हे अवैज्ञानिक युग’, अशी ही तीन भाषणे. त्यातल्या मूल्य-विषयक भाषणाच्या कळीच्या भागाचे हे भाषांतर. स्पष्टीकरणाच्या सोईसाठी व खात्रीसाठी कंसांमध्ये पूरक मजकूर भाषांतरकाराने ‘जोडला’ आहे.]
समजा धार्मिक कुटुंबातला एक तरुण विद्यापीठामध्ये विज्ञान शिकायला जातो. त्याचा अभ्यासविषयच असा आहे की तो आपोआपच साशंक होतो. (विज्ञानाच्या अभ्यासात शंका घेणे आवश्यक मानले जाते). आधी त्याच्या मनात त्याच्या आईवडलांच्या देवाबद्दल शंका उत्पन्न होतात; आणि मग अविश्वास. इथे देव म्हणजे व्यक्तिरूप देव, ज्याची पूजा करता येते, ज्याचा निर्मितीशी संबंध असतो, नीतीशी संबंध असतो, असा देव. अशी साशंकता — अविश्वास — असा प्रकार वारंवार होताना मला दिसतो. माझ्यापाशी आकडेवारी नाही, पण अर्ध्यापेक्षा जास्त वैज्ञानिकांचा आपल्या आईवडलांच्या देवावर, किंवा इतर पारंपरिक (conventional) देवकल्पनांवर विश्वास नसतो. असे का घडते? मला वाटते की या प्रश्नाच्या उत्तरातच विज्ञान आणि धर्म यांच्यातल्या संबंधाची खरी जाण दडलेली आहे. अविश्वास कशातून उद्भवतो याबद्दल तीन शक्यता सुचतात. एक म्हणजे आपल्या तरुणाला शिकवणारे जे वैज्ञानिक असतात, ते नास्तिक असतात आणि त्यांचे हे ‘पाखंड’ त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये उतरते. तुम्हाला हसू आले ! धन्यवाद . . . पण मला धर्मातले जेवढे कळते तेवढेही तुम्हाला विज्ञानातले कळत नाही. दुसरी शक्यता अशी की आपल्या उदाहरणातला तरुण अर्धवट ‘ज्ञानी’ असेल. अर्धवट ज्ञान धोकादायक असते. (आणि त्यातून अविश्वास उपजतो). तो जसजसा परिपक्व होईल तसतसा त्याचा अविश्वास कमी होईल. पण मला असे वाटत नाही.
मला अनेक परिपक्व वैज्ञानिक माहीत आहेत —- तुम्हाला ते भेटले तर तुम्हालाही ते परिपक्व वाटतील —- पण ते नास्तिक आहेत. मला उलटेच वाटते. ते असे की आपल्या तरुणाला ‘आपल्याला सर्व समजले’ असे वाटत नाही. त्याला जाणीव येते की त्याला काहीच माहीत नाही.(!)
तिसरी शक्यता अशी की ह्या तरुणाला विज्ञान नीटसे समजलेले नाही. विज्ञानाने देवाचे अस्तित्व कसे असिद्ध होते हेही त्याला समजत नाही आणि विज्ञान आणि धर्म या दोन्हींवर विश्वास ठेवण्यात सुसंगती आहे, हेही त्याला समजत नाही.
विज्ञानाने देवाचे अस्तित्व खोटे पडत नाही, हे मला पटते —- पूर्णपणे पटते. मला हेही पटते की एकाच वेळी देवावर आणि विज्ञानावर विश्वास ठेवता येतो. मला बरेच आस्तिक वैज्ञानिक माहीत आहेत, अगदी पारंपरिक सश्रद्ध वैज्ञानिकही माहीत आहेत. ते नेमके कसे देवावर श्रद्धा ठेवतात, हे मला माहीत नाही. त्यांना दोन्ही गोष्टींवर विश्वास ठेवणे कसे सुसंगत वाटते, हे मला समजायला अवघड जाते. मला हेच तपासायचे आहे — ही सुसंगती मला अवघड का वाटते, आणि (मुळात) देव-कल्पना आणि विज्ञान यात सुसंगती शोधण्यात काही अर्थ आहे, की नाही?
आपल्या तरुणाला अवघड जाणाऱ्या दोन बाबी आहेत. एक तर विज्ञानाचा अभ्यास, त्याला साशंक असणे आवश्यक आहे, चांगले आहे, असे दाखवून देतो. मग तो सर्वच क्षेत्रांबद्दल शंका व्यक्त करायला लागतो. आधी त्याला प्रश्न पडलेला असेल, “देव आहे की नाही?’ तर आता प्रश्न पडतो, “देव आहे याची मला कितपत खात्री वाटते?” हा नवा आणि तरल प्रश्न आधीच्या प्रश्नापेक्षा वेगळा आहे. आता त्याला (पूर्ण) विश्वास आणि (पूर्ण) अविश्वास यांच्यामधली स्वतःची जागा ठरवायची आहे. त्याचे ज्ञान हमखास एका टोकाकडे जाण्याइतकी खात्री देत नाही. आता त्याला निर्णय घ्यायचा आहे, “पन्नास टक्के की साठ टक्के?’ या प्रश्नामध्ये पडलेला फरक थोडासाच वाटतो, पण तो खूप नाजुक आणि महत्त्वाचा आहे. एक खरे आहे, की माणूस एकदम देवावरच्या विश्वासाला हात घालत नाही. आधी तो तपशिलाबद्दल शंका घ्यायला लागतो. मृत्यूनंतरचे अस्तित्व, ख्रिस्ताच्या (किंवा रामाच्या) आयुष्यातले तपशील, किंवा तसले काही तरी (आधी) शंकास्पद वाटू लागते. मी प्रश्नाचे महत्त्व ठसवायला थेट देवावरच्या विश्वासाकडे वळलो आहे.
अशा विचाराचे, मननाचे, जे काही म्हणाल त्याचे उत्तर बरेचदा ‘देव आहे’ अशा खात्रीच्या जवळ येते. तर कधी हे उत्तर ‘देव नाही’ अशा खात्रीच्याही जवळ येते. देव–विज्ञान यांच्यात) सुसंगती अवघड बाटण्याचे दुसरे कारण दोन वेगवेगळ्या प्रणाली शिकण्यामध्ये आहे. आपण उच्च थिऑलजी व तत्त्वज्ञानाच्या पातळीवर म्हणू शकूही, की विज्ञान आणि धर्म यांच्यात विसंगती नाही. पण धार्मिक घरातून येणाऱ्या विज्ञानाच्या विद्यार्थ्याला स्वतःशी विचार करताना आणि इतरांशी चर्चा करताना या कल्पनांमध्ये काहीतरी विरोध जाणवणारच. विज्ञानाचा विद्यार्थी काही सत्य आणि काही अंशतः सत्य गोष्टी शिकतो. उदाहरणार्थ, तो शिकतो की विश्वाचा आकार प्रचंड आहे, आणि आपण त्यातल्या एका लहानशा कणावर बसून सूर्याभोवती गरगरत आहोत. हा सूर्य या तारकापुंजातल्या शंभरेक अब्ज ताऱ्यांपैकी एक आहे, आणि असे अब्जभर तारकापुंज आहेत. तो हेही शिकतो की सर्व सजीवांमध्ये खूप जवळचे जीवशास्त्रीय संबंध आहेत आणि या जंजाळात माणूस हा नव्याने उत्क्रांत झालेला जीव आहे. बरे, हे सारे अटळ, अचल अशा नियमांनी सांधलेल्या अणूंपासून बनले आहे. प्राणी — वनस्पतीही त्याच घटकद्रव्याची आणि ग्रहतारेही त्याच द्रव्याचे, पण प्राणी-वनस्पती जिवंत वाटावी इतक्या गूढ किचकटपणाने रचलेली आहेत. हे सारे शिकल्यावर विद्यार्थी विचार करतो, “माणूस या एकाच जीवाच्या समजुतीसाठी, विचारांसाठी देवाने हा इतर सारा ‘सांगाडा’ (scaffolding) घडवला असेल का?”
विश्वाचा विचार करणे ही एक उत्तम साहसिक सफर (adventure) आहे. माणसापलिकडचे विश्व. माणूस नसतानाचे विश्व — खऱ्या इतिहासाच्या बहुतेक स्थळकाळात विश्व हे माणूसविरहितच आहे. मग या विचारांच्या गूढतेकडून, त्या प्रचंड पटाकडून आपण माणूस या वस्तूकडे नजर वळवतो, सजीव रचनांचा, विश्वाचे एक गहन गूढ म्हणून आपण विचार करतो. हा एक दुर्मिळ अनुभव असतो, अत्यंत उत्तेजक, बहुतेक वेळी हर्षोल्लासात परिणत होणारा. काय आहे हा माणूस नावाचा कुतूहल असलेला कण? स्वतःकडे बघणारा आणि स्वतःला समजून घ्यायची असफळ धडपड करणारा? हे वैज्ञानिक विचार गूढता आणि परमादर या पातळीवर पोचतात, ‘आपल्याला कशाचीच खात्री नाही’ या अवस्थेप्रत पोचतात. पण हे विचार इतके गहन आणि आ चर्यकारक असतात की त्या मानाने देवाने भल्याबुऱ्याचे खेळ पाहायला हा विश्वाचा रंगपट घडवला असेल, ही कल्पना कोती, थिटी वाटते.
कोणी म्हणेल की मी वर एका धार्मिक अनुभवाचेच वर्णन केले आहे. म्हणा तसे, हवे तर — मग मी तीच भाषा वापस्न म्हणेन की या धार्मिक अनुभवानंतरच्या भावना व्यक्त करायला चर्चचा (धर्मसंस्थेचा) धर्म तोकडा पडेल. धर्मसंस्थेचा देव तेवढा मोठा नाही. हे माझे मत आहे. असतात वेगवेगळी मते लोकांची. पण समजा आपल्या तरुणाला वाटायला लागले की व्यक्तिगत पूजा-प्रार्थना कोणी ऐकत नाही — मी देवाचे अस्तित्व खोडून काढत नाही आहे, मी दोन वेग-वेगळ्या पद्धतींनी, दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांनी शिकवल्या गेलेल्या माणसांच्या अडचणी सांगतो आहे. हे दृष्टिकोन एकमेकांशी मिळते कस्न घेणे कठीण आहे, आणि आपला विद्यार्थी प्रार्थना ‘पोचत’ नाहीत अशा धारणेला पोचला आहे. यानंतर त्याची साशंकता, त्याची अश्रद्धा नीतिविचारांकडे वळेल. नीतीचे नियम म्हणजे देवाचा कायदा, असे शिकलेला हा माणूस. आता देव जर आपले ऐकत नाही, तर त्याचा कायदाही बरोबर नसणार, असे त्याला वाटले तर आ चर्य नाही. यात गंमत ही की नीतिनियम खूप काळ टिकून राहिलेले आहेत. आपला (संभ्रान्त!) विद्यार्थी काही काळ नीतिविचारांबद्दल अश्रद्ध होईल —- आणि मग परत त्यांना ग्राह्य मानू लागेल. (कारण सावध, साशंक तपासणीतच तात्पुरती, provisional मान्यताही अंतर्भूत आहेच.)
माझे सहकारी-वैज्ञानिक सश्रद्ध की अश्रद्ध हे मला माहीत नाही, पण त्यांची माणुसकी, त्यांचा समजूतदारपणा, त्यांची नीती ही सश्रद्धांमध्ये, अश्रद्धांमध्ये सारखीच जाणवत असते. नीतीचे विचार विश्वस्वख्याबद्दलच्या तत्त्वविचारांपासून स्वतंत्र असल्याचे दिसते.
विज्ञानाचा धर्माशी निगडित अनेक कल्पनांवर परिणाम होताना दिसतो, पण मला तो नीतिविचारांवर होताना दिसत नाही. माझे म्हणणे स्पष्ट करायला मी धर्माची तीन अंगे नोंदतो. वस्तू काय आहेत, कुठून येतात त्या, माणूस म्हणजे काय, देव म्हणजे काय, कसा असतो तो, असल्या बाबतींतल्या धर्माच्या मतांना धर्माचे मेटॅफिजिकल अंग म्हणतो. कसे वागावे, अशा व्यवहारी नीतिविचारांना मी दुसरे अंग मानतो. यात कर्मकांडे, पूजा-उपासना नाहीत. माणसे कमकुवत असतात. नुसत्याच ‘स्वच्छ’ सदसद्विवेकातून सदाचरण घडतेच असे नाही. सदाचरण म्हणजे काय हे माहीत असूनही आपण तसे वागतोच असे नाही. धर्माचे एक सशक्त अंग हे, की तो माणसांना सदाचरणाला प्रवृत्त करतो. सोबतच कला वगैरे क्षेत्रांतही धर्माच्या नावाने बरेच चांगले काम घडत असते. मी याला धर्माचे इन्स्पिरेशनल अंग म्हणतो, सत्प्रवृत्त करणारे. धर्मात ही तीन्ही अंगे एकत्र जोडलेली(च) असतात, असे धार्मिक मत आहे. (देव हा विश्वनिर्माता) नीतिनियम ही देववाणी, यामुळे मेटॅफिजिकल आणि नैतिक अंगे सांधलेली आहेत. आणि हा जुळलेपणा सत्प्रवृत्तींना चालना देतो, म्हणून तीन्ही अंगे जुळतात —- असे धर्मिक मत आहे. यात अडचण अशी की विज्ञान कधीकधी पहिल्या दोन अंगांच्या विरोधात जाते. [जरी फाईनमन असे म्हणतो, तरी प्रत्यक्ष व्याख्यानात तो विज्ञान आणि नीतिविचार एकमेकांशी असंबद्ध असण्यावर बराच भर देतो. —- भाषांतरकाराची टीप]. पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते हे जेव्हा (वैज्ञानिक) शोधातून समजले, तेव्हा ते धर्ममताशी जुळत नव्हते. बऱ्याच वादावादीनंतरच सूर्यकेंद्री ग्रह-भ्रमण धर्माने मान्य केले —- पण याने नीतिनियम बदलले नाहीत. माणूस इतर प्राण्यांचा वंशज आहे हे (वैज्ञानिक शोधातून) कळल्यावरही वादंग माजले. आज बहुतेक धर्म हे मान्य करू लागले आहेत. —- पण यानेही नीतिविचार बदललेला नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरायला लागल्याने एका गालावर थप्पड बसता दुसरा पुढे करण्यावर परिणाम झालेला नाही. निरीक्षणातून मिळालेली तथ्ये (facts) मेटॅफिजिकल धर्ममतांशी जुळत नाहीत, (तसेच) वृत्तीही जुन्यानव्यांत विरोध आहे असे दाखवतात. विज्ञानातली साशंक वृत्ती कधीच सश्रद्ध असू शकत नाही. काही लोकांना हे जमतही असेल — मला ते अवघड वाटते. पण मेटॅफिजिकल बाबींचा नीतीशी संबंध नाही आणि वैज्ञानिक व मेटॅफिजिकल धर्ममतांमधले वाद नीति-विचारांवर परिणाम घडवत नाहीत. नीतिविचार विज्ञानाच्या कक्षेबाहेर असतात हे अनेकांना पटत नाही. त्यांना वाटते की वैज्ञानिक तत्त्वांमधून नीतिमूल्ये ठरवता येतात. मला हे पटत नाही. माझ्या मतामागे बरीच कारणे आहेत — एक सबळ कारण नसले तर बरीच कारणे द्यावी लागतात. एक कारण हे की मेटॅफिजिकल धर्ममते बदलूनही नीतिविचार बदलत नाहीत, त्या दोन बाबी (संलग्न नसून) स्वतंत्र आहेत.
दुसरे म्हणजे अनेक जण ख्रिस्ताचे देवत्व नाकारणारे असून वागताना ख्रि चन नैतिकतेने वागतात. मी जरा ‘प्रादेशिक’ होतो आहे, पण तुम्ही माझे मत तुमच्या देशा-धर्माच्या संबंधात रूपांतरित करून घेऊ शकता.
तिसरे म्हणजे वैज्ञानिक निरीक्षणात कुठेच कोणत्या नीतिनियमाला आधार देणारे काही सापडत नाही.
शेवटी मी एक मला न जमणारा तात्त्विक युक्तिवाद देण्याचा प्रयत्न करतो. माणसांना पडणाऱ्या प्रश्नांमध्ये महत्त्वाचा, सामान्य असा एक प्रश्न असतो; “मी हे अमुक करावे का?’, असला, कृतीबद्दलचा प्रश्न. याचे उत्तर शोधायला आपण या प्रश्नाचे दोन भाग पाडू शकतो. पहिला भाग म्हणजे, “मी अमुक केले तर काय होईल?” इथे करावे — न करावे असा प्रश्न नाही. हा विज्ञानाच्या कक्षेतला प्रश्न आहे — म्हणजे त्याचे उत्तर सापडेलच असे नाही — बहुतेक वेळा नाहीच सापडणार कारण विज्ञान अगदी प्राथमिक अवस्थेत आहे. पण असले प्रश्न सोडवायच्या पद्धती विज्ञानाला माहीत आहेत, ‘करून पहा’ या जातीच्या पद्धती आहेत त्या. पण (पुढचा भाग) “मला हे व्हायला हवे आहे का?’, हा असा (वैज्ञानिक) प्रश्न नाही. शेवटचा निर्णय विज्ञानाचा टप्प्यात येत नाही. कुठेतरी तुम्हाला निर्णय घ्यावा लागतोच, “हो, मला हे घडून हवे आहे/नको आहे”. आता उरले सत्प्रवृत्त करणारे धर्माचे अंग. मी तुम्हाला (याबद्दल) विचारतो, कारण मला उत्तर माहीत नाही. माणसांना सत्प्रवृत्त करणारे धर्माचे अंग सर्वच धर्मांमध्ये मेटॅफिजिकल अंगांशी जोडले जाते. ‘देवाचे काम करणे’, अशा स्यात चांगल्या कामांचा संबंध मेटॅफिजिकल अंगांशी जोडला जातो. हा भावनिक सांधा जराशाही अश्रद्धपणाने कमकुवत होतो. देवावरचा विश्वास क्षीण झाला की सदाचरणाची ओढही मंदावते. धर्मांची सदाचरणाला मिळणारी मदत तर शाबूत ठेवायची, पण मेटॅफिजिकल अंगावरची श्रद्धा तर संपवायची —- हे कसे करावे हा मोठाच प्रश्न आहे. विज्ञानाला, ज्ञानाला बरकत येत असताना मेटॅफिजिकल अंगाचा नीतीशी आणि सत्प्रवृत्तीशी संबंध कसा तोडायचा? गंभीर, गहन प्रश्न आहे हा !