नाशिकचे नाव–
आजचा सुधारक जून २००० च्या अंकात ‘मुक्काम नासिक’ मथळ्याखाली नाशिकच्या वाचक मेळाव्याचे वर्णन लिहिताना लेखकांनी नाशिक किंवा नासिक शब्दाची भौगोलिक व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटते, या शब्दाचा संदर्भ जास्त करून रामायणकालीन असावा. याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले यावरून या स्थानाचा निर्देश नासिक असा करू लागले असावेत हे अधिक समर्पक वाटते. अंक आवडला.
गं. र. जोशी
७, सहजीवन हौ. सोसायटी, ‘ज्ञानराज’ सिव्हिल लाइन्स, दर्यापूर, अमरावती — ४४४ ८०३
अलबत्ये गलबत्ये, उपटसुंभ आणि हडेलहप्पी
जून २००० च्या आजचा सुधारक च्या अंकात श्री. रवीन्द्र विख्याक्ष पांढरे यांचे ‘पुतळा–प्रक्षालनाच्या निमित्ताने’ एक पत्र प्रसिद्ध झाले आहे. पत्रातील भाषा अत्यंत संयत, विचारपूर्ण पण रोखठोक आहे. त्याच पत्राखाली श्री. भा. ल. भोळे यांचे उत्तरादाखल सविस्तर पत्र आहे. पण त्यांनी मांडलेल्या बाजूचे पूर्ण समाधान होत नाही. सविस्तर असूनही ते अपुरे वाटते. शिवाय श्री. पांढरेंचा ‘अलबत्या गलबत्या’ म्हणून प्रत्यक्ष उल्लेख करणे व त्यांना अप्रत्यक्षपणे ‘उपटसुंभ’ म्हणणे आक्षेपार्ह वाटते. मुद्दे संपल्याचे हे लक्षण मानावे काय?
आ. सु. मध्ये हडेलहप्पी शिरलेली नाही याची ग्वाही श्री. भोळे देतात. पण डॉ. ख्या कुळकर्णी यांचे नाव सल्लागार मंडळातून त्या धर्म मानतात म्हणून, एकाएकी कमी केलेले होते. पण त्याबाबत आ. सु. मध्ये निदान स्पष्टीकरण तरी प्रसिद्ध झाले होते असे स्मरते. पण डॉ. विवेक गोखले यांचे नाव सल्लागार मंडळातून एकदम नाहीसे झाले व त्याबाबत आ. सु. मध्ये काही चर्चा माझ्या तरी वाचनात आलेली नाही.
खरे म्हणजे पुतळा–प्रक्षालनाबाबत खुद्द संपादकांनी आपले मत निर्भीडपणे मांडणे गरजेचे आहे. दोघांची पत्रे छापून त्यांत ‘तिरपा ठसा आमचा’ असे कंसात टाकून निभावून नेऊ नये.
वसंत राजाराम पितळे, पितळेवाडा, पोथी गल्ली, इतवारी, नागपूर बालिश कृतीचे लंगडे समर्थन
मागील अंकातील श्री. पांढरे यांचे पत्र आणि श्री. भोळे यांचे उत्तर दोन्ही वाचनात आले.
१. भोळ्यांनी पुतळा धुण्याच्या कृतीचे जे समर्थन केले आहे ते योग्य नाही. कारण उद्या सवर्णांनी जर अशीच कृती केली तर भोळे तिचेही समर्थन करतील काय?
२. सुधारकाची या वादात भूमिका कोणती? भोळ्यांची ही कृती म्हणजे त्यांच्या व्यावहारिक राजकारणाची एक बाब म्हणून तिकडे दुर्लक्षही केले असते. पण ते सुधारक मासिकात जेव्हा ह्या कृतीचे समर्थन करतात तेव्हा सुधारकच्या संपादकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्या अभावी भोळ्यांनी दिलेले उत्तर हीच सुधारकची भूमिका आहे असे आमच्या सारख्या सर्वसामान्य वाचकांना वाटते; आणि जर ती खरोखरच तशी असेल तर ती काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. कारण त्या उत्तरात सुधारकच्या वाचकांविषयीचा तिरस्कार स्पष्ट जाणवतो. सुधारकने आपले वाचक कष्टाने मिळविले आहेत, आणि ते विचार करणारे आहेत असा सर्वसाधारण समज आहे. अपशब्द वापरून भोळ्यांनी मुद्द्यांच्या ऐवजी गुढ्यांचा उपयोग केला आहे. विचाराऐवजी व्यक्तीवर टीका केली आहे, आणि पत्राच्या शेवटी तर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाच पेचात टाकले आहे.
३. धरले तर चावते अन् सोडले तर पळते अशा पेचात तुम्ही सापडले आहात का? संकटात सापडलेल्या संपादक-मंडळाला माझ्या सहसंवेदना !
मंजिरी घाटपांडे
४ सी/२, कृत्तिका सोसायटी, तेजसनगर, कोथरूड, पुणे–४११०२९
आ. सु. चे वैशिष्ट्यपूर्ण संपादन जपावे.
आपल्या जून २००० च्या अंकातील शकुंतलाबाईंवरील लेख वैशिष्ट्य-पूर्ण वाटला. त्यातील कुटुंबकल्याण कार्यक्रम प्रामाणिकपणे राबविणाऱ्या राज्यांवरील अन्यायाची त्यांनी घेतलेली दखल हा उल्लेख इतर कोणत्याही मृत्युलेखात दिसून आला नाही मासिकाच्या ह्या वेगळेपणाचा व संपादकांच्या सव्यसाचित्वाचा ठसा मनावर उमटला. असेच वैशिष्ट्यपूर्ण संपादन जपावे.
गोविंद पुरुषोत्तम देशपांडे
११५, उत्तराखंड, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली — ११० ०६७
काळ्यावरती जरा पांढरे . .
आ .सु. च्या जून च्या अंकातील श्री. पांढरे ह्यांचे पत्र व त्यांना श्री भा. ल. भोळे ह्यांनी दिलेले उत्तर हा संदर्भ. श्री. पांढरे ह्यांनी बहुधा “काळ्यावरती जरा ‘पांढरे’ ह्या पाप्याच्या हातुन व्हावे” ह्या मढेकरी इच्छेला अनुसरून काही लिहिले आहे. त्यातली बालसुलभ निरागसता कौतुकास पात्र आहे. राजीनाम्याचे प्रकरण ते तिथे ना आणते तर ती निरागसता गालबोटविहीन ठरली असती. तथापि श्री. भोळे ह्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असते तर बरे असे वाटते. श्री. भोळे ह्यांच्या उत्तरासंबंधी खरी अडचण निराळीच आहे. शब्दांचे अर्थ कसे ठरतात, कृतींचा अर्थ कसा ठरतो ह्या प्रश्नांकडे त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असे म्हणावे लागते.
आता प्रक्षालन हाच शब्द घ्या. आमच्या मनात हे नव्हते, ते नव्हते (संपादकांनी तिरप्या टशात घातलेले सगळे शब्द) असे म्हणून भागत नाही. ब्राह्मणी घरात कुणाचा हात लागला म्हणून भांडे पुन्हा धुऊन घ्यायची पद्धत होती. प्रक्षालन हा शुद्धतेशी जोडलेला व्यवहार आहे. ह्यापासून सुटका नाही. एकदा शुद्धता आली की विटाळही आलाच. ह्याला पुण्याकडचे (किंवा कुठलेही) संपादक जबाबदार नाहीत. शब्दार्थांची सामाजिकता (सोशिऑलॉजी ऑफ मीनिंग) जबाबदार आहे. म्हणूनच सुदर्शन ह्यांच्या मानभावीपणाला जास्त कल्पक आणि ब्राह्मणवादाच्या पलिकडे जाणारे उत्तर मिळाले असते तर बरे झाले असते असे माझ्यासारख्याच्या मनात येऊन गेले. पांढऱ्यांसारखी मंडळी एका चक्रात फिरत आहेत. त्याच्या उलट भूमिका घेणारी मंडळी दुसऱ्या चक्रात फिरत आहे. परिणामी तीही सांकेतिकतेत अडकून पडली आहेत असे वाटते. एरवी प्रक्षालनाच्या व्यवहारात ती गुंतली नसती. दुर्दैवाने त्यात फारसे कल्पक असेही काही नाही.
चन्द्रकान्त गजानन गवारीकर
सी १६३, अपूर्व सोसायटी, वाघोडिया रोड, वडोदरा — ३९० ०११
आपले कार्य अविरत चालू राहो
माझ्या स्नेह्यांनी फेब्रुवारी २००० चा आजचा सुधारक वाचण्यास दिला. नवे हवे ते वाचण्यास मिळाल्याने आनंद वाटला. असे विचार करायला लावणारे वाचण्यास मिळावे म्हणून रु. ५०/- चा D.D. पाठवीत आहे. फेब्रुवारी २००० पुढील अंक वरील पत्त्यावर पाठवावेत ही विनंती.
यापूर्वीचे आजचा सुधारकचे अंक हवे असल्यास किती अंक मिळू शकतील व त्यांचे मूल्य काय हे कळवावे म्हणजे त्याप्रमाणे मागवता येतील. आपण १० वर्षे तन्मयतेने आणि कार्यकर्ता भाव ठेवून समाजासाठी जे काम करत
आहात त्याबद्दल आपणांस मनःपूर्वक दाद. हे कार्य अविरत चालू राहो ही सदिच्छा.
आजीव वर्गणीदार आ. ३९७
श्री. मु. आ. भागवतवार
१४, प्रदीप को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसा. क्रेन्डस कॉलनी, प्रतापनगर, नागपूर — ४४० ०२२