आम्हा तरुण पिढीच्या वाचकांना असे वाटत होते की, आजचा सुधारक या मासिकामधून जुन्या पिढीचे अनुभवी, ज्ञानी, शांतपणे विचार करणारे लोक आम्हाला जगात कसे वागावे व तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ जीवन कसे जगावे हे शिकवतात. पण अलीकडे आजचा सुधारक हे मासिक घाणेरड्या जातीय राजकारणाचे घासपीठ होऊ लागले आहे. सोनीया गांधीची सभा यशस्वी व्हावी म्हणून आंबेडकराचा पुतळा धुणारे लोक आम्हाला पूर्वी विचारवंत व आमच्या नागपूर विद्यापीठाचे भूषण वाटत होते. पण आता त्याबद्दल संशय वाटू लागला आहे. बाटलेला पुतळा धुऊन पवित्र करणे हा पोरखेळ वडीलधारी माणसे करू शकतात व या कृतीमुळे दलित बांधवामध्ये या वडिलधाऱ्यांविषयी आपुलकी उत्त्पन्न होईल यावर विश्वासच बसत नाही. आणि कोणा वाचकाने या त्यांच्या कृत्यावर आक्षेप घेतला तर त्या वाचकाविषयी, गल्ली बोळातील गुंड मुले वापरतात तशी असभ्य भाषा वापरणे हे सुद्धा स्तंभित करणारे आहे. आपले घाणेरडे राजकारण खेळून सवंग लोकप्रियता मिळविण्याची धडपड करणारे प्रा. भा. ल. भोळे हे इतक्या खालच्या पातळीवर उतरले हे पाहून नागपूर विद्यापीठाच्या माझ्यासारख्या माजी विद्यार्थ्यांना अशा प्राध्यापकाची लाज वाटते. आजच्या सुधारकाने हा कलंक धुवून टाकला पाहिजे.
अपार्टमेंट्स, जीवनछाया सोसायटी, दीनदयाल नगर,
सुरेखा बापट, ११, श्री विष्णु नागपूर — ४४० ०२२