‘लग्नानंतर स्त्रीचे नाव बदलावे का?’ हा मुळी कधी प्रश्नच उपस्थित झाला नाही. त्याचा स्त्रीच्या अस्मितेशी काही संबंध आहे अशी जाणीवही होऊ नये इतकी ती अंगवळणी पडलेली गोष्ट आहे. मग त्याचे वेगवेगळे कंगोरे बोचू लागणे ही गोष्ट दूरच! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीने पुरुषाच्या अधीन राहावे ही समाजमानसाने, मग त्यात स्त्रियाही आल्याच, पूर्णतः स्वीकारलेली गोष्ट असल्यामुळे पिढ्यानपिढ्या त्यात कुणाला काही वावगे वाटलेले नाही. परंतु गेल्या ५०-६० वर्षांत स्त्रीविषयक कल्पना भराभर बदलत गेल्यामुळे आणि स्त्रीमुक्तीचे वारे वाहू लागल्यामुळे स्त्रीची अस्मिता आणि स्त्रीचा समान दर्जा या जाणीवा निर्माण झाल्या. सुधारकांच्या धडपडीमुळे, स्त्रियांच्या स्वप्रयत्नांनी आणि स्त्रीसुधारणाविषयक कायद्यांच्या द्वारे हे घडत गेले. स्त्रियांनी बरीच मजल गाठली आहे तरी स्त्रीपुरुषसमानता अजूनही पूर्णांशाने दृष्टिपथात आलेली नाही. स्त्रीसुधारणेच्या ह्या प्रवासातील ‘लग्नानंतर स्त्रीचे नाव बदलावे का?’ हा प्रश्न एक मैलाचा दगड ठरावा. आपल्याला पूर्णपणे समानतेकडे जायचे असेल तर हा दगड ओलांडावा लागेल. २१ व्या शतकात पदार्पण केल्यानंतरही आपण हा दगड ओलांडू शकत नाही का? पूर्वीच्या काळी हा प्रश्न कधी पडलाच नाही, पुढच्या पिढ्यांमध्ये तो शिल्लक राहणार नाही, आज मात्र आपल्याला त्याच्याशी झगडायचे आहे.
वास्तविक लग्न हा स्त्री व पुरुष दोघांच्याही आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. येथपासून त्यांच्या स्वतंत्र सहजीवनाला प्रारंभ होतो. दोन तरुण जीव जोडीदार बनावे, त्यांच्यात साहचर्य निर्माण व्हावे हा सुंदर निसर्गनियम आहे. पण सामाजिक संकेतांनी त्याचा चोळामोळा करून टाकला आहे. लग्न म्हणजे स्त्रीचे पुरुषाला दान व स्त्रीचे संपूर्ण समर्पण असल्या समजुतींनी स्त्रीपुरुषांमध्ये असमानतेची जी दरी निर्माण केली आहे, त्यामुळे पुरुषाचा अहंकार सुखावत असेल, परंतु स्त्रीपुरुषांमध्ये साहचर्य फुलतच नाही. स्त्री ही एखादी वस्तू आहे काय की एकाने ती दुसऱ्याला द्यावी अन् मालकी हक्क बदलावा. लग्नानंतर स्त्रीचे नाव बदलते, तिला तिच्या नवऱ्याचे नाव लागते यात तिच्यावर आता तिच्या नवऱ्याची मालकी आहे हे सूचित होत नाही काय? महाराष्ट्रात तर स्त्रीचे नाव जवळजवळ संपूर्णपणे बदलून जाते. ती कुमारीची सौभाग्यवती होते. तिचे पहिले नावही पुष्कळदा बदलतात. ते नवऱ्याच्या नावाशी जुळेल असे किंवा त्याला आवडेल असे ठेवले जाते. तिचे आडनाव म्हणजे कूळ बदलते. याप्रमाणे तिची पूर्ण ओळखच पुसून टाकली जाते. तिला शिकवणही हीच असते की तिने आपल्या पहिल्या जीवनाचा त्याग करून नवीन जीवनाशी समरस झाले पाहिजे. तिच्या नवऱ्याचे मात्र काहीच बदलत नाही अन् त्याला कोणता त्यागही करावा लागत नाही. स्त्रीच्या माथी समाजाने जो त्याग मारला आहे, त्याचे प्रतीक म्हणजे तिचे नाव बदलणे आहे. यातली बोच आपल्याला जाणवत नाही, कारण ते सारे सवयीचे होऊन गेले आहे. ही झाली या प्रश्नाची तात्त्विक बाजू. पण त्याला व्यावहारिकही बाजू आहे आणि त्यामुळे त्याची निकड वाढली आहे. स्त्री आता केवळ घरात कोंडलेली आणि व्यवहारात नगण्य नाही. ती शिकतेय, नोकरी करतेय, व्यवहार सांभाळतेय आणि हे सारे ती लग्नापूर्वीपासून करतेय, लग्नापूर्वी ती ते माहेरच्या नावाने करते आणि लग्नानंतर बदललेल्या सासरच्या नावाने. यासाठी सर्व ठिकाणी नाव बदलून घेण्याचा उपद्व्याप तिला करावा लागतो. तिच्या सह्याही बदलतात. यात कटकट वाढते आणि गोंधळही वाढतो. त्यापेक्षा तिचे लग्नाआधीचेच नाव कायम राहिले तर व्यवहार सुटसुटीत होईल.
याबाबतीत बदलत्या समाजाप्रमाणे आणखी एका गोष्टीचा विचार करावा लागेल. तो म्हणजे घटस्फोट आणि पुनर्विवाहाचा. आजकालच्या समाजात या क्षुल्लक बाबी नाहीत. त्याने नाव बदलण्याचा त्रास मात्र किती वाढतो! घटस्फोटानंतर स्त्रीला पुन्हा माहेरचे नाव धारण करावे लागते. तसेच पुनर्विवाहानंतर पुन्हा नवीन नाव. यापेक्षा स्त्रीचे पहिलेच नाव कायम राहिले तर? पुरुषाचे नाव कधी बदलत नाही. त्यामुळे विवाह, घटस्फोट पुनर्विवाह या घडामोडींचा त्याच्या नावावर व नावाशी निगडित व्यवहारांवर काहीच परिणाम होत नाही. तसेच स्त्रीचेही का असू नये? आजकाल तर ते आवश्यक झाले आहे.
खरे पाहिले असता, व्यवहारांत स्त्रीची वैवाहिक दर्जा दाखविण्याची मुळीच गरज नाही. त्याने काहीही अडत नाही. पुरुषाच्या वैवाहिक स्थितीचा जर कुठे निर्देश करावा लागत नाही, तर तसा तो स्त्रीचाही करावा लागू नये. पुरुषाच्या नावामागे नुसते श्री. किंवा Mr. लावतात व ते उपपद फक्त पुरुषवाचक असते, लग्नवाचक नाही. तसे स्त्रीच्या नावामागे श्रीमती किंवा अलिकडे लावतात तसे Ms. असावे. ते केवळ स्त्रीवाचक आहे, लग्नवाचक नाही. स्त्री कुमारिका असो, विवाहित असो किंवा विधवा असो, ती सरसकट श्रीमती किंवा Ms. असेच लिहील. यात आणखी एक फरक करता येईल. लहान वयात मुलीला कुमारी किंवा मिस म्हणावे व सज्ञान झाल्यानंतर म्हणजे १८ वर्षे वयानंतर श्रीमती किंवा Ms. संबोधावे. लहान मुलाला कुमार किंवा मास्टर म्हणण्याचा प्रघात आहेच. हा फरक वयवाचक आहे, लग्नवाचक नाही. Ms. ऐवजी Mrs. लावायलाही हरकत नाही. कारण ते आपल्या सवयीचे आहे. परंतु Mrs. या अभिधानाचा संबंध स्त्रीच्या सज्ञानतेशी आहे, लग्नाशी नाही. म्हणून प्रौढ कुमारिकेलाही श्रीमती किंवा Mrs. लिहायला काहीच हरकत असू नये. मी कुमारिकेनेही हे Mrs. उपपद लावावे म्हटले म्हणून दचकू नका. पुरुष जसा लग्न होवो अथवा न होवो Mr. असतो, तशी स्त्री Mrs. राहील. म्हणजे एखादी कु. अर्चना साने १८ वर्षांनंतर श्रीमती किंवा Mrs. अर्चना साने होईल, व मरेपर्यंत त्याच नावाने राहील. यात सौभाग्यवतीला कुठेही थारा नाही व नसावाही. हे सारे आपल्याला विचित्र वाटते. कालांतराने वाटणार नाही. पण व्यवहाराला खूप सोपे पडेल.
स्त्रीपुरुषांनी नेहमीकरिता आपापल्या वडिलांचेच नाव व आडनाव लावावे असे तूर्त आपण मान्य करू वडिलांचेच नाव लावावे का हा एक वेगळा विषय आहे, पितृसत्ताक पद्धतीला आव्हान देणारा आहे आणि त्याची चर्चा इथे अभिप्रेत नाही. फक्त स्त्रीला लग्नानंतर आपले नाव बदलण्याची गरज नाही, ते व्यावहारिकही नाही हाच येथे मुख्य मुद्दा आहे. कोणी या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित करतील की, नवऱ्याला मागोमाग पत्नीचा कायदेशीर वारस म्हणून हक्क असतो. याकरिता तिचे नाव नवऱ्याच्या नावाशी जोडलेले असले पाहिजे. परंतु कायदेशीर हक्काकरिता पत्नीच्या नावाचा निर्देश करून ठेवावा लागतो. तो तिच्या मूळ नावाचा केला तर कुठे बिघडले? तसे पाहिले तर, आता स्त्रीला पतीचा वारसा हक्क असतो, तसा पित्याचाही असतो. मग पित्याच्या वारसा सांगताना तिच्या बदललेल्या सासरच्याच नावाचा उल्लेख केला जातो ना? आणि कागदोपत्री तो मान्यही होतो ना? मग पतीचा वारसा सांगताना स्त्रीचे मूळचे माहेरचेच नाव सांगितले तर हरकत असू नये. कागदोपत्री पत्नी म्हणून तिचे तेच नाव असल्याने कायदेशीर अडचण येऊ नये.
याठिकाणी सरकारी कामकाजातील एक प्रशंसनीय गोष्ट मला सर्वांच्या नजरेस आणून द्यावीशी वाटते. इनकमटॅक्सच्या पॅन नंबरसाठी स्त्री विवाहित असली तरी तिच्या पतीऐवजी तिच्या वडिलांचे संपूर्ण नाव मागितले आहे. हीच गोष्ट योग्य आहे. स्त्री रक्ताच्या नात्याने कायम माहेरशीच संबंधित असते, म्हणून तेच तिचे नाव असायला हवे. आपल्या मराठी लोकांत तर लग्नानंतर स्त्रीचे पहिले नाव, नवऱ्याला हवे असले तर, बदलण्याची प्रथा आहे. त्याने व्यवहारात किती अडचण निर्माण होते! कागदोपत्री पहिल्या नावाला फार महत्त्व असते. ते जिचे बदलले जात नाही तिला सोपे जाते. मग कटकटी निर्माण करणारा हा पहिल्या नावातला बदल हवा कशाला? नवऱ्याच्या आवडीचे नाव हवे तर त्यांनी घरात वापरावे, पण ते कागदोपत्री कशाला बदलावे? खरे तर ते नाव त्या स्त्रीची ओळख असते, त्यात तिची अस्मिता असते. ते एका फटक्यात छाटून टाकणे अजिबात योग्य नाही. स्त्रीनेच त्याला विरोध करायला हवा. माझे नाव बदलू नये असे मी माझ्या नवऱ्याला सांगितले होते. ‘चांगले आहे म्हणून नाही. तर ते माझे आहे म्हणून बदलायचे नाही. माझे नाव गंगा, गोदा असले काही असते तरीही मी तुम्हाला हेच म्हटले असते.’ परंतु लग्नानंतर मी माहेरचे नाव म्हणजे वडिलांचे नाव व आडनाव बदलले हे मी कबूल करते. कागदोपत्री नाव बदलण्याच्या सोपस्कारातूनही मला जावे लागले. मग स्त्रीने लग्नानंतर नाव बदलू नये हे माझे म्हणणे ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ या जातीचे आहे असे आपण म्हणाल. तसे नाही. मी हे ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या न्यायाने सांगते आहे असे समजावे. माझ्या एका मैत्रिणीने लग्नानंतर नाव बदलले नाही आणि तिचे कुठेही अडले नाही. तिचे मला फार पटले. वाटले, असे तुरळक नको, सार्वत्रिक व्हायला हवे.
पण हे होणार कसे? हे कायद्याने होईल. कागदोपत्री स्त्रीचे पहिलेच नाव आवश्यक आहे असे जेव्हा नियमच होतील तेव्हा ते आपोआप रूढ होईल. एकदा रूढ झाले म्हणजे समाजात रूळेल. त्याची हळूहळू सवय होईल व मग असे लक्षात येईल की हीच खरी सोपी व सयुक्तिक पद्धत आहे. आजवर स्त्रीसुधारणा बहुतांशी कायद्याने घडून आली आहे. नंतर आपल्याला ती पटली आहे.
स्त्रीचे नाव न बदलणे हे स्त्रीपुरुषसमानतेच्या दिशेने एक छोटेसे पाऊल आहे. स्त्रीपुरुष निसर्गतः समानच आहेत. ते परस्परांहून वेगळे आहेत, पण श्रेष्ठ-कनिष्ठ नाहीत. ही असमानता आपण कृत्रिमतेने निर्माण केली आहे. म्हणून स्त्रीपुरुषसमानता म्हणजे काही स्त्रीची पुरुषाशी अहमहमिका नाही आणि वरचढपणा तर नाहीच नाही. उलट निसर्गदत्त समानता स्वीकारणे आहे. ते झाले तर स्त्रीपुरुषांमधले नितांतसुंदर नाते प्रस्थापित व्हायला मदत होईल.
११, श्रीविष्णु अपार्टमेंटस्, जीवनछाया ले-आऊट, दीनदयाल नगर, रिंग रोड, नागपूर