अरवली गाथा (२)

प्रस्तुत लेखकाने फेब्रुवारी महिन्यात, १०-२-२००० पासून १४-२-२००० पर्यंत पाच दिवस तरुण भारत संघाच्या काही कार्यकर्त्यांच्या समवेत ६/८ गावांची भटकंती केली, २०/२५ जोहड, अनिकट इत्यादि पाहिले, जमेल तितक्या मंडळींशी संवाद, चर्चा केल्या आणि जो अनुभव मिळाला तो थोडक्यात असा —-
१. फेब्रुवारी २००० मध्ये २०/२५ पैकी फक्त दोन जोहडांमध्ये थोडेसे पाणी होते. बाकी जोहड, अनिकट, बांध हे कोरडे होते.
२. गावांमधल्या आणि शेतांमधल्या विहिरींना भरपूर पाणी होते. शेतांवर डिझेलचे पंप होते आणि कितीही उपसा केला तरी चालेल अशी परिस्थिती होती.
३. शेते हिरवीगार होती. गहू, जव, मोहरी, हरभरा इ. पिके उभी होती. अपवादात्मक ठिकाणी ऊसहि होता.
४. वर्षातून तीन पिके सर्रास घेतली जात होती असे कळले.
५. पिण्याच्या पाण्याचा प्र नच नव्हता.
६. एकूण गावकरी मंडळी सुखात असावीत असे दिसले.
७. बाजूच्या डोंगरांवर थोडीफार हिरवळ आहे. चराईबंदी नाही पण फक्त गावकऱ्यांचीच गुरे चरतात. बाहेस्न शेकडो गुरे घेऊन येणाऱ्या गुराख्यांना मज्जाव आहे. मोठ्या वाढलेल्या वृक्षांच्या छोट्या डहाळ्या तोडून गुरांना घालतात. पण एक इंच जाडीची फांदी तोडायला पूर्ण मनाई आहे. ही बंदी मोडणाराला दंड होतो.
८. गोपालपुऱ्याजवळ मेवाडवाला बाँध नावाचा २०० मीटर लांबीचा बांध पाहिला. पावसाळ्यात बांधामागचा ३० हेक्टर एवढा भाग एक जलाशय बनतो. वाहून आलेली थोडीशी माती, पालापाचोळा, काटक्याकुटक्या, पाण्यातले जीवजंतू या सर्वांपासून उत्तम सेंद्रिय खत निर्माण होते. पाण्याचा निचरा केल्यावर जमिनीतली ओल हे खत यामुळे काहीही मेहनत न करता तेथे एक उत्तम रबी पीक घेता येते.
९. साधारण दर माणशी बिघा/दीडबिघा शेतजमीन आहे. कन्हैय्यालाल या त. भा. सं. च्या कार्यकर्त्यांच्या मते मेहनतीची तयारी असेल आणि पुरेसे पाणी असेल तर एका बिघ्यात ४० मण (१६ क्विंटल) गहू पिकवता येतो. ५ बिघे जमीन १० जणांच्या एकत्र कुटुंबाला पुरेशी आहे.
१०. त. भा. संघाच्या पद्धतीने वनरक्षण आणि वनखात्याचे वनरक्षण यातला फरक पहिल्याच दिवशी पाहायला मिळाला. रस्त्याच्या एका बाजूला वनखात्याच्या अखत्यारीतला पूर्णपणे बोडका डोंगर होता तर दुसऱ्या बाजूच्या डोंगरावर बरीच हिरवळ होती, झाडे होती. गावकऱ्यांनी एक संरक्षक भिंत बांधली होती. चराईबंदी लागू केली होती आणि रखवालीसुद्धा केली जात होती. नियम तोडणारास दंड आणि दंडाच्या रकमेचा परत वनरक्षणासाठी
वापर.
११. सर्वच शेतकरी पशुपालन हा जोडधंदा करतात. गाई, म्हशी, बकऱ्या पाळतात. दूध विकतात —- दूध संकलन होते. दूध विकले गेले नाही तर तूप बनवतात व विकतात. जनावरे विकूनही उत्पन्न येते. पूर्ण वाढ झालेल्या बकरीचे १००० ते २००० रुपये मिळतात.
१२. शेतकरी बरेचसे शाकाहारी आहेत. थोडासा मांसाहार चालतो. खूप गावांमध्ये दारूबंदी आहे. जुनाट सवयवाले घरी एकटे दारू घेतात. सार्वजनिक ठिकाणी दारूबंदी.
एकूण इथला शेतकरी गावाची शिस्त पाळतो आहे, पुरेशी मेहनत करतो आहे, जोहड, वनश्री आणि पर्यावरणाबद्दल जागरूक आहे, निसर्गाचा फायदा निसर्गाची शिस्त पाळून घेतो आहे, सामाईक जबाबदारी जाणणारा आहे आणि या सगळ्यांमुळे गावात एक प्रकारचा एकोपा पाहावयाला मिळत आहे.
स्वनिरीक्षणाच्या बराचसा भाग येथे संपला आहे. यापुढची माहिती आकडेवारी वगैरे इतरांच्या लिखाणावस्न नमूद केलेल्या आहेत.
आजपावेतो या भागातल्या सुमारे ७०० गावांमध्ये एकूण ३००० जल-संधारण कामे झाली आहेत. या कामांमध्ये कुठल्याही स्थापत्य-शास्त्रज्ञाने सल्ला दिलेला नाही. गावकऱ्यांचे पारंपारिक ज्ञान व अनुभव पुरेसे ठरले आहेत. पूर्वीच्या दारिद्र्याइतकीच आजची सुबत्ता नजरेत भरत आहे. या सुबत्तेचा वाहता पुरावा म्हणजे अर्वरी, सरसा, तिलदेही, जहाजवाली आणि स्पारेल या नद्यांमधला पाण्याचा बारमाही प्रवाह!
१९८५ साली फक्त २०% जमिनीवर पिके होती. आज १००% जमिनीवर पिके आहेत. काही ठिकाणी वर्षातून तीन पिके आणि काही ठिकाणी ऊससुद्धा! जशी आर्थिक परिस्थिती सुधारते आहे तशी शिक्षण, आरोग्य याबद्दलची जागरूकता वाढते आहे. गुन्हेगारी कमी झाली आहे. एकूण जीवनाची गुणवत्ता वाढते आहे.
ऑगस्ट १९९५ मध्ये आय. आय. टी. कानपूरचे स्थापत्यशास्त्राचे प्राध्यापक जी. डी. अग्रवाल यांनी तरुण भारत संघाच्या क्षेत्रातील ३६ गावांमधील जलसंधारण संरचनांचा काटेकोर शास्त्रीय अभ्यास केला. त्यातील काही निष्कर्ष असे आहेत —-
१. प्रत्येक जलसंधारण संरचनेमध्ये एक घनमीटर पाणी साठेल एवढी धारणा निर्माण करायला काय खर्च येतो यावर त्याची गुणवत्ता ठरते. मोठाल्या धरणांच्या बाबतीत दर घनमीटर धारण निर्मितीसाठी सुमारे स्पये वीस किंवा त्यापेक्षा जास्तच खर्च येतो. जोहडांच्या बाबतीत दर घनमीटर धारणानिर्मितीसाठी कमीतकमी रुपये ०.२०,
जास्तीतजास्त रुपये ३. आणि सरासरी रुपये ०.९५ असे हे आकडे आहेत. हा खर्च फारच कमी आहे.
२. कोठलीही गणिते न करता ३६% जोहडांची क्षमता जेवढी असायला हवी होती बरोबर तेवढीच आहे. केवळ १३% ची धारणा आवश्यकतेपेक्षा थोडी जास्त आहे. धारणेचे निर्णय त्यांनी पारंपारिक ज्ञानानुसार व अनुमान-शक्तीच्या जोरावर घेतले होते. कुठल्याही प्रकारचे स्थापत्यशास्त्रीय शिक्षण नसलेल्या या मंडळींची अनुमानशक्ती मानायलाच हवी.
३. संरचना सुरक्षित आणि पर्याप्त आहेत याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे १९९५ व १९९६ साली आलेले राजस्थानातील महापूर. या महापुरांनी राजस्थानातली स्थापत्यविशारदांनी बांधलेली ३०/४० बांधकामे/धरणे जमीनदोस्त करून हाहाकार माजवला. पण तेवढ्याच पावसाने त. भा. संघाच्या क्षेत्रात काहीच नुकसान झाले नाही. यात बांधकामांच्या आराखड्यांच्या गुणवत्तेचा दोष नाही पण सरकारी कामे रखवाली आणि देखभाल यात फार कमी पडली.
४. कुरुक्षेत्र विद्यापीठाचे प्रा. लुंकड आणि प्रा. मिश्र यांनी वरील ३६ पैकी १६ बांधकामांची पाहणी केली. या सर्व ठिकाणी जागेची निवड, आराखडा आणि बांधणी अत्यंत सुयोग्य असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
तरुण भारत संघाने बांधलेल्या ५०० गावांमधील एकूण २५०० जोहडांना १५ कोटी रुपये एवढा खर्च आला. त्यापैकी ११ कोटी रुपये एवढी रक्कम नगद किंवा माल व मजुरी या स्वरूपात गावकऱ्यांनी अदा केली.
आकड्यांवरून असे दिसते की गावाने दर माणशी १०० रुपये खर्च जोहड-बांधणीसाठी एकदा केला तर गावची आर्थिक आमदानी (दरवर्षीची) दर माणशी ४०० रुपयांनी वाढते.
जोहडांमधली गुंतवणूक ही ग्रामीण भागातील सर्वांत कल्याणप्रद गुंतवणूक आहे. एक महत्त्वाची गोष्ट येथे आपण नमूद करायला हवी. ती अशी–यंदा राजस्थानातील दुष्काळ निवारणासाठी सरकार ५०० कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च करणार आहे. पण तरुण भारत संघाच्या क्षेत्रातील एकही गाव दुष्काळी म्हणून जाहीर झालेले नाही. एकाही गावाला पाण्याचे दुर्भिक्ष नाही. एकाही गावाने मदतीची याचना केलेली नाही.
“अरवली गाथा’ तिच्यातील घटनांपुरती इथे संपली आहे. पण या घटनाक्रमामागची प्रेरणा, या परिवर्तनातल्या सहभागी व्यक्ती, त्यांनी घडवलेले मानसिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिवर्तन आणि सुजाण अभ्यासकांना यातून काढता येतील ते निष्कर्ष यांच्याशिवाय ही पाचा उत्तरीची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होणार नाही.तरुण भारत संघाचे महामंत्री डॉ. राजेन्द्र सिंह यांनी तरुण भारत संघाची यासंबंधीची भूमिका छान विशद केली, ती अशी तरुण भारत संघ” समोर येतील ती कामे करीत आहे. त्यातली कुठली टिकणार नाहीत हे सर्वस्वी समाजाने ठरवायचे आहे.
होणाऱ्या कामाचा आणि घडणाऱ्या गोष्टींचा समाजावर व सरकारवर हळूहळू परिणाम घडतो. आपण नेहमीच संघर्षात्मक भूमिका घ्यायला नको. ज्या पद्धतीने आपले काम पुढे रेटले जाईल ती भूमिका आणि ते डावपेच योग्य!
या बाबतीत तीन उदाहरणे फार बोलकी आहेत
१. गोपालपुयातील तीनचार जोहड बेकायदेशीर आहेत ते आम्ही तोडून टाकू अशी भूमिका जलसिंचन खात्याने आधी घेतली होती. पण गोपालपुऱ्याच्या गावकऱ्यांनी शांततापूर्ण ‘सत्याग्रह’ केला, अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि चाललेली कामे गावाला हितप्रद आहेत हा निष्कर्ष काढून १०,०००/- रु. अनुदान दिले.
२. सारिस्का या राखीव वनात (Tiger Reserve) सुद्धा जोहड-बांधणी चालते. प्रथम तीव्र विरोधात असलेल्या वनखात्याला हळूहळू त्यांचे वनावर चांगले परिणाम होत आहेत हे पटले आणि ते आता आम्हास वनखात्याचे सहकार्य देत आहेत.
३. “अर्वरी’ नदीवर हमीरपुर येथे गावकऱ्यांनी बांध घालून एक तलाव निर्माण केला. एक व्यक्ती या तलावात मासेमारी करण्याचा परवाना राजस्थान सरकारकडून घेऊन आली. गावकऱ्यांनी या प्रकरणात सत्याग्रह करून मासेमारीला अटकाव केला. सत्याग्रह काही महिने चालला. शेवटी सरकारने मासेमारीचा परवाना रद्द केला;
आणि हा विभाग गावकऱ्यांच्या मागणीप्रमाणे जैवविविधतेसाठी (Biodiversity) सुरक्षित म्हणून जाहीर केला.
कुणीही समाजपरिवर्तनाचा ठेका घेतल्यासारखे वागायची आवश्यकता नसते. आपण आपल्या पद्धतीने काम करावे. इतरांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्यावे — ती पद्धत चुकीची आहे असे वाटत असले तरी! चुकीच्या मार्गाने जाण्याचा सुद्धा त्यांना हक्क आहे. चूक उमगल्यावर ते बरोबर रस्त्यावर येतील. कदाचित चुकीची भक्कम किंमत त्यांना मोजावी लागेल. पण त्याला इलाज नाही.
समाजाचे प्रबोधन आवश्यक आहे. त्यासाठी काही वेळा संघर्ष, आंदोलने इ. अटळ आहेत. पण मुख्य काम रचनात्मक असायला हवे. ज्या वैकल्पिक मार्गावरून समाजाला नेण्याची इच्छा आहे त्या वैकल्पिक मार्गाने होऊ शकणाऱ्या प्रगतीची उदा-हरणे निर्माण केली पाहिजेत. अशा कामात आपोआपच रचनात्मक कामाची सवय असलेली आणि जाण असलेली स्थानिक कार्यकर्त्यांची पायाभूत संघटना निर्माण होते. लोकांच्या सहकार्यावर, बळावर व श्रमावर उभी राहिलेली अशी संघटना हे लोक-शिक्षणाचे सर्वोत्तम साधन होय. संयोजकांची भूमिका —- या सर्व सामाजिक परिवर्तनात तरुण भारत संघाच्या कार्यकर्त्यांची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. थोडक्यात ती अशी :–
१. कोठल्याही रोमांचक सामाजिक तत्त्वज्ञानाचा वसा त्यांनी घेतलेला दिसत नाही.
२. तुमचे प्र न आम्हाला माहीत आहेत आणि त्यांची उत्तरे आमच्या-कडे आहेत अशी बड्या दादाची (Big Brother) ची भूमिका त्यांनी कधीही घेतलेली नाही.
३. तरुण भारत संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये अहं चे प्र न (Ego Problems) उद्भवलेले दिसत नाहीत. त्यामुळे बांधिलकी निर्माण झालेल्या स्थानिक कार्यकर्त्यांची वाण त्यांना पडली नाही.
४. कोणीतरी ज्ञान देणारे गुरू आणि बाकी काम करणारे चेले असे न होता कार्यकर्ते व तरुण भारत संघ एकाच वेळी “निसर्ग’ या शिक्षकाकडून शिकत होते.
५. प्रत्येकाकडून तनमनधनाने संपूर्ण सहकार्य हवे अशी मागणी नव्हती. समोरच्या प्र नाची पुरेशी उकल होण्यासाठी आवश्यक तेवढे सहकार्य पुरे होते.
६. गावकऱ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे, स्वतःची कामे स्वतःच करायला हवीत आणि त्यासाठी आवश्यक त्या समाजिक संस्था निर्माण करायला हव्यात अशी धारणा होती. यात व्यक्ती (सुशिक्षित अशिक्षित कोणीही) स्वतःचे हित समजू शकते, आपल्या हिताचे आणि शेजाऱ्यांच्या हिताचेही रक्षण करण्याची व्यक्तीची इच्छा असते, त्यासाठी आवश्यक ते निर्णय व्यक्ती घेतात आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती सामाजिक शिस्त व्यक्ती पाळतात अशा प्रकारचा व्यक्तिवाद अध्याहृत आहे.
७. आपल्या भोवतालचे जलावरण, वातावरण, निसर्ग आणि पर्यावरण यांच्यावरचे सामाईक हक्क आपण सोडले तर आपले काय होते हे लक्षात घेतल्यावर शांततापूर्ण मार्गांनी पण ठामपणे गावकऱ्यांनी हे सामाईक हक्क आपल्या हातांत जमतील तितके घेतले आणि या सामाईक संपत्तीचा संयमित, निसर्गपोषक वापर करायला सुरवात केली. या बदललेल्या मानसिकतेनेच खरे म्हणायचे तर दुष्काळावर मात केली आहे. गेली पन्नास वर्षे निरंकुश सत्ता उपभोगणारे राजकारणी आणि नोकरशहा यांच्या खिजगणतीत सामान्य माणूस नसतोच. सर्व शहाणपणाचे निधान आणि सर्व चांगुलपणाचे भांडार म्हणजे सरकारी यंत्रणा अशी त्यांची ठाम समजूत आहे. त्यामुळे राजीव गांधींनी म्हटल्याप्रमाणे नियोजन-खर्चाच्या प्रत्येक स्पयातले फक्त वीस पैसे सत्कारणी लागतात याची सरकारला शरम वाटत नाही.
तरुण भारत संघाने आणि ठाणागाझीतल्या समाजाने एक अतिशय छोटा पण भ्रष्टाचारविरहित, निर्मळ असा आरसा सरकारापुढे धरला आहे. त्यात आपली प्रतिमा कशी दिसते ते सरकारी मंडळींनी अवश्य पाहावे आणि याउपरही आपली प्रतिमा आपल्याला आवडत असेल तर तसे म्हणावे.
अरवलीतला ठाणागाझी भाग पाहिल्यावर मला इंग्रजीतल्या फक्त दोन उक्ती आठवल्या. पहिली —- “Fools rush in where Angels fear to tread” आणि दुसरी “They also serve who only stand and wait.” यांचा संदर्भ आणि अन्वयार्थ प्रत्येकाने विचार करून आपापल्या मनात लावला पाहिजे.
संदर्भ :–1) A Story of a Rivulet Arvari – Jashbhai Patel
2) सरस गयी सरसा — प्रा. मोहन श्रोत्रिय, अविनाश
3) 1996 Floods of Barah Basin
4) The Promotion of Community Self-Reliance — Dr. Margaret Kholakdina. वरील चारही पुस्तके तरुण भारत संघाने प्रकाशिली आहेत.
5) Down to Earth – March 1999 issue
C/o Mrs. Meera Bapat 3, Raj Apartments, 44/1, Shivadarshan Chowk, PUNE – 411 009

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.