आजचा सुधारकच्या एप्रिल २००० च्या अंकातील र. धों. कर्वे यांचा प्रवाही कुटुंब हा पुनर्मुद्रित लेख वाचला. प्रवाही कुटुंब असे शीर्षक असले तरी त्यात कुटुंबाबाबत नवीन विचार मांडलेला दिसत नाही. व्यक्तीच्या अनिर्बंध, मुक्त, लैंगिक आचार-स्वातंत्र्याबाबतच सर्व मांडणी दिसते. लैंगिक प्रेरणेविषयी भारतात जी उपेक्षा व त्यातून निर्माण झालेले ढोंग सर्वत्र दिसते त्याची चीड या लेखात प्रतिक्रियात्मक स्वरूपात व्यक्त होते आहे. ती स्वागतार्ह आहे पण व्यवहार्य मात्र नाही.
| कुटुंब प्रवाही असावे हाच नवीन विचार आहे. संपा.]
मुळात नियमनाशिवाय समाज अशक्य असतो. अगदी लेखात पुरस्कार-लेल्या स्वैर-समागम-संघातसुद्धा, ‘प्रत्येक सदस्याने दुसऱ्याची समागमाची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे’ असा नियम आहेच. ‘नाही तर माझी इच्छा पूर्ण
झाली की दुसऱ्याच्या वेळेला मी नकार देईन’ (व संघाचे संतुलन ढासळेल) अशी रास्त भीती लेखक व्यक्त करतो. म्हणजे यात स्वतःच्या इच्छेविरुद्ध भोग देण्याची सक्ती आहेच. पण असे केले नाही तर संघ टिकणार नाही अशी भीती आहे. याचा अर्थ संघाच्या अस्तित्वासाठी स्वतःच्या इच्छेला मुरड घालणे आले. मग स्वैरता कुठे राहिली! सुंदर पीळदार शरीरयष्टीचे पुरुष व भरदार शरीरयष्टीच्या स्त्रिया ज्या संघात असतील त्यात भरती होण्यास अनेक जण इच्छुक असतील. तेथे या मोजक्या स्त्री पुरुषांना इतरांना भोग देणे एवढेच काम होऊन बसेल! म्हणजे भोगवस्तू होणेही टळत नाही. शिवाय स्त्रिया एक वेळ संघनियमाचे पालन म्हणून स्वतःच्या इच्छेविरुद्ध इतरांना भोग देऊ शकतील पण पुरुष इच्छा असली तरी अखंडपणे वीर्याचे रतीब घालू शकणार नाहीत व त्यांची इच्छा नसली तर त्यांचा भोग घेणे निसर्गतःच अशक्य दिसते. म्हणजे विषम-ताही आलीच!
[‘Ought’ implies can हे तत्त्व असे की शक्यतेच्या कोटीत बसणाऱ्याच गोष्टींना कर्तव्याची भाषा लावता येते. निसर्गतः अशक्य गोष्टींना नाही. एखाद्या क्लबात कोणाला घ्यायचे याचे नियम असतात. किमान पात्रता ठरविणे तसेच ही पात्रता असणाऱ्यांची प्रवेश घेणे ही उभयपक्षी ऐच्छिक बाब आहे.]
खरे तर मर्यादेचे पालन कस्न भोग घेणे म्हणजे दमन नव्हे व अमर्याद उपभोग म्हणजे शमनही नव्हे. भारतात ‘वासना’ ही ‘पाप’ मानल्याने अनेक विकृती व ढोंग यांचा प्रसार झाला आहे. त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे हे नक्की. पण कामवासना-शमन हेच जणू काही आयुष्याचे एकमेव सार्थक आहे अशी प्रतिक्रियात्मक मांडणीही नव्या विकृतींना जन्म देईल. उदा. या लेखात लेखक म्हणतो “पाहुणा म्हणून मी कुणाच्या घरी गेलो तर माझ्या लैंगिक भुकेचेही समाधान त्यांनी केलेच पाहिजे”. इथे ‘पाहुणा’ व यजमान यांच्या संबंधांविषयीच लेखकाची काहीतरी गफलत झालेली दिसते. पाहुण्याने यजमानांकडे मागणी करायची नसते. त्यांना उपद्रव न देता राहायचे असते. सुखकर सहवास हा नेहमीच संकेतांवर आधारित असतो. पण इथे तर लेखकाने पाहुण्याच्या हक्कांची सनदच सादर केली आहे!
[सुखप्राप्ती हेच आयुष्याचे एकमेव साध्य आहे अशी एक तत्त्वप्रणाली सुखवाद (Hedonism) या नावाची आहे. कामशांती हे सर्वांना शक्य असे सर्वांत मोठे सुख आहे, हा त्या प्रणालीचा उपसिद्धान्त आहे. प्रवाही कुटुंब हीसुद्धा अशीच निसर्गाविरुद्ध जाणारी मांडणी आहे. लहान मुले सर्वांनाच आवडतात. त्यामुळे कुणी कुठलीही मुले आनंदाने सांभाळतील ही अगदीच हास्यास्पद कल्पना आहे. समाजवादात जसे ‘सर्वजण आनंदाने सामूहिक श्रमात सहभागी होऊन सामूहिक संपत्ती निर्माण करतील’ असे ‘मिथक’ सत्य म्हणून सांगितले जाई, तसेच किंवा त्याहीपेक्षा अशक्य असे हे कल्पचित्र आहे! कारण श्रम आनंदासाठी नाही तरी पोट भरण्यासाठी तरी माणूस करेल पण ‘वात्सल्य’ काही श्रमासारखे करता येत नाही. ते ऊर्मिरूप आहे. वात्सल्याचे नाते ‘स्व’शीच जुळते, समूहाशी नाही. म्हणजे सामान्य माणसांबाबत तरी हेच खरे आहे. बाकी साने गुरुजी, ताराबाई मोडक, गिजूभाई बधेका, मॅडम माँटेसरी यांच्याबाबत कदाचित काही वेगळे असू शकेल. पण त्याही व्यक्तीच आहेत. त्यांचा सर्व समाज कसा असेल?
अशा त-हेच्या लेखात पूर्वीच्या काळातील समाजव्यवस्थेतील उदाहरणे हटकून दिली जातात. समाजाच्या विकासाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळ्या संस्था, संकेत व संकल्पना ह्यांचा गरजेनुसार विकास वा अस्त झालेला दिसतो. आजच्या गुंतागुंतीच्या समाजव्यवस्थेत पूर्वीच्या अविकसित व तुलनेने सरळ समाज-रचनेतील व्यवस्था गैरलागू ठरतात. त्यामुळे ते दाखलेही गैरलागू ठरतात. आजच्या विकसित व गुंतागुंतीच्या समाजरचनेला स्वतःची उत्तरे स्वतःच शोधावी लागतील. काही नवी सुखे मिळतील, काही नवे ताणही निर्माण होतील. ते सहनही करावे लागतील व त्याच्या समायोजनेचे मार्गही शोधावे लागतील. सर्वच मानवी संबंध गुंतागुंतीचे झाल्यावर कामसंबंध हाच तेवढा सरळ राहील अशी अपेक्षाच करणे व्यर्थ आहे. उगाच जुन्या व्यवस्थेचे कढ काय उपयोगाचे ? ‘पूर्वीचे सगळे चांगले होते’ असे धार्मिक मूलतत्त्ववाद्यांसारखे लैंगिक मूलतत्त्ववाद्यांनाही वाटते हे नव्यानेच कळले!
[ज्याच्यात जास्त मोकळीक आणि किमान बंधने ते चांगले. मग ते पूर्वीचे असो की आताचे. अनेक लैंगिक बंधने धार्मिक आग्रहातून आलेली आहेत, भ्रांत आहेत असे नवनीति- वाद्यांचे म्हणणे आहे.]
मी शुद्धतावादी वा पावित्र्यवादी मुळीच नाही. स्त्रीपुरुषांनी पर-स्परांच्या संमतीने (व लग्न झाले असेल तर जोडीदाराच्या संमतीने) लैंगिक उप-भोगाचा आनंद मुक्तपणे घेण्यास काहीच हरकत नसावी. पण कुटुंबव्यवस्थेचे आजच्या मानवी समाजाच्या स्थैर्याशी जुळलेले नाते बघता केवळ लैंगिक आनंदासाठी कुणी कुटुंब सोडेल असे वाटत नाही. माणसाचे मूल मोठे होण्यास किमान दहा वर्षे घेते. तेव्हा त्याचा सांभाळ अन्य मार्गे शक्य दिसत नाही. माणूस नागरी जीवनाकडून टोळी जीवनाकडे उलटा प्रवास करेल अशी शक्यता वाटत नाही. बेबंद व्यक्ती असू शकतात समाज असू शकत नाही. आणि अशा व्यक्तींना तर आजही ‘हवे तसे’ वागणे जमत असतेच. भारतात कामवासनेतून’ ‘पापभावना’ काढून टाकून ती निकोपपणे भोगणे शक्य व्हावे एवढाच बदल सध्या गरजेचा आहे. त्यासाठीही असे धक्कादायक लेख उपयुक्त ठरू शकतात हे मान्य. पण तरीही लेखातले चित्र हे प्रतिक्रियात्मक आहे पर्यायात्मक नाही याचे भान राखलेले बरे!
[आजच्या कुटुंबव्यवस्थेचे स्थैर्य स्त्रियांचा बळी देऊन आम्ही मिळविले आहे. स्त्रियांची जन्मजात दुय्यम अवस्था संपवून त्यांना पुरुषाइतकी स्वाधीनता असावी हे कबूल असेल तर वर्तमान कुटुंबसंस्थेला धक्का बसणारच.]
कृष्णकल्प, पी अँड टी कॉलनी, नाशिक — ४२२ ००५