ईश्वरावरील श्रद्धा हा एक प्रकारचा पोरखेळ आहे. मनुष्यजातीच्या बाल-पणांत ही श्रद्धा शोभली असती, परंतु प्रौढ वयांत बाललीला शोभत नाहीत. ईश्वराचा मुख्य उपयोग म्हणजे पाप केले तर ते कृष्णार्पण करतां येतें, संकट आले तर जेथे स्वतःचे कांही चालत नाही तेथे ईश्वरावर हवाला ठेवून समाधान मानतां येते, आणि ईश्वराची प्रार्थना केल्याने आपल्या मनासारखे होईल अशी आशा बाळगतां येते, पण या फोल आशेचा उपयोग काय? युद्धांत दोन्ही बाजूच्या लोकांनी ईश्वराची प्रार्थना केली तर तो जय कोणाला देणार? हे देखील समजण्याची ज्यांना अक्कल नाही तेच ईश्वरावर विश्वास ठेवतात. जगाची रहाटी निसर्गनियमांप्रमाणे चालली आहे आणि ईश्वर त्यांत कोठेही ढवळाढवळ करीत नाही हे अलीकडील शास्त्रीय ज्ञानाने ठरते. हे नियम ईश्वराने केले असें पाहिजे तर म्हणावें पण तें म्हटल्याचा उपयोग काय? काहीही न करणारा ईश्वर असला काय आणि नसला काय? आणि तो असल्याचा काहीच पुरावा नसल्यामुळे तो मानण्यांत समाधान तरी काय आहे? ईश्वर आपल्या बारीकसारीक हालचालीकडे लक्ष देतो ही घमेंड पोरकट नाही तर काय? रोगजंतु, दुष्काळ, धरणीकंप वगैरे उत्पन्न कस्न मनुष्याचे हाल करणारा ईश्वर मानण्यांत कोणाला समाधान वाटत असेल तें वाटो. त्यांत समंजसपणा मात्र नाही. कोणी म्हणेल ही आपल्या कर्माची फळे असतात. मग मध्ये ईश्वराची लुडबुड कशाला?