‘मनात आलं ते केलं’ हे हलके -फुलके तत्त्वज्ञान बाळगणारी व्यक्ती केवढे भरीव काम करू शकते हे शकुन्तलाबाई परांजपे यांनी दाखवून दिले आहे.
“मी बहुधा फ्रान्समध्ये असताना वडिलांना लिहिले की मी आज सिग्रेट ओढली.” वडिलांनी उत्तर दिले, की “हे मला आवडले नाही. पण तू आता मोठी झाली आहेस. तुझ्या मनाप्रमाणे वाग.” पुढे जन्मभर, मनात आले ते केले असे ब्रीद ठेवून वागणाऱ्या शकुन्तला परांजपे ३ मे २००० रोजी वारल्या. दिवंगत झाल्या हे म्हणणेही येथे साजायचे नाही कारण मेल्यावर काहीच राहत नाही मग स्वर्गवास काय नि दिवंगत होणे काय, सारखेच निरर्थक असे मानणाऱ्या पंथाच्या त्या होत्या.
रँगलर परांजपे यांच्या त्या एकुलते अपत्य होत्या. स्वतः रँगलरसाहेब तेरा भावंडांमधले सातवे होते ही पार्श्वभूमी लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यांची आई ही प्रसिद्ध आनंदी–गोपाळ दाम्पत्यातल्या गोपाळरावांची पुतणी. गोपाळरावांजवळ ती वाढली. त्यांनीच तिला मॅट्रिक केले. तिचे लग्न ठरले तेव्हा कशाला करतेस लग्न, मी तुला आणखी शिकवतो असे ते म्हणाले होते.
वडिलांप्रमाणे रँगलर व्हायचे असे ठरवून त्या केम्ब्रिजला गेल्या. येथून B. Sc. होऊन गेल्या होत्या. केम्ब्रिजची गणित विषयातली उच्च पदवी म्हणजे Tripos. तिच्यात प्रथम वर्गात येणाऱ्याला रँगलर म्हणत. शकुन्तलाबाईंना रँगलर होता आले नाही तरी त्यांनी Tripos घेतला.
आपल्याकडे नीतिमत्ता म्हणजे स्त्रीपुरुष-संबंध, आणि त्यातही चालत आलेल्या स्ढी निमूटपणे पाळणे एवढाच अर्थ करतात. तसेच मितप्रमाणात मद्यपान, धूम्रपान केले तरी ते नीतिसंमत मानत नाहीत. शकुन्तलाबाई दोन्ही करीत. १७ जाने. १९०६ रोजी जन्मलेल्या या विदुषी ९४ वर्षांचे नुसते दीर्घायुष्यच नाही तर स्वच्छंद-सुखी विविधांगी जीवन जगल्या. त्या मॅट्रिकला होत्या तेव्हाची गोष्ट. वडील शिक्षण मंत्री होते. त्याच वर्षी मॅट्रिकला बसण्याची वयोमर्यादा १६ हून १ वर्षाने कमी करण्यात आली. पण आपण आपल्या मुलीकरिता ही वयोमर्यादा उतरवली असा ठपका येऊ नये म्हणून वडिलांनी त्यांना एक वर्ष थांबायला लावले. त्यांच्या मैत्रिणींना फायदा मिळून त्या मात्र पुढे गेल्या.
मनात आले ते केले या न्यायाने त्यांनी एका रशियन चित्रकाराशी लग्न केले. त्याचे नाव युरा स्लेप्टझॉफ, एका पार्टीत समानशील, मांजर-प्रेमामुळे तो ह्यांच्या डोळ्यात भरला. लग्नानंतर दोनेक वर्षांनी सईचा जन्म झाला नि लागोलाग त्यांनी घटस्फोट घेतला. त्या भारतात परतल्या. १९३८ पासून पुढे वीस वर्षे त्यांनी कुटुंबनियोजनाचे काम केले. लहान खेड्यात व मोठ्या शहरातील गरीब वस्त्यात फिस्न त्यांनी गरजू स्त्रिया हेरून त्यांना मदत केली. र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य या मासिकात त्या १९३८ पासून ग्रंथपरीक्षण करू लागल्या. त्यांनी कथाही लिहिल्या. नाटके, कादंबऱ्या, ललित निबंध अशी त्यांची ९ पुस्तके प्रसिद्ध आहेत. मिष्किल-पणे नर्मविनोदी शैलीत त्या
खुमासदार मराठी लिहितात. र. धों. कर्त्यांच्या कामाचे महत्त्व जाणून त्यांनी मनोभावे त्यांच्या कामात मदत केली. सामाजिक सेवेबद्दल १९५८ मध्ये त्यांना आमदार पदावर ६ वर्षांसाठी सरकारने निवडले. आपल्याला राज्यसभेवर घ्या, तिथून कुटुंबनियोजनाच्या कामाकडे देशाचे लक्ष वेधता येईल असे पत्र त्यांनी राष्ट्रपतींना लिहिले. अशा नेमणुका पंतप्रधानांच्या सांगण्यावरून होतात असे उत्तर डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांना लिहिले. म्हणून त्यांनी जवाहरलाल नेहरूंना लिहिले. त्यांनी, ह्या नेमणुका राष्ट्रपती करतात असे कळवले तेव्हा त्यांचे हे उत्तर त्यांनी राधाकृष्णन यांच्याकडे रवाना केले. परिणामी त्यांना १९६४ मध्ये राज्यसभेवर घेण्यात आले. तेथे त्यांनी महत्त्वाचे काम केले. केंद्राची आर्थिक मदत आणि लोक-सभेतले संख्याबळ राज्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर अवलंबून असते. लोक संख्येचा भस्मासुर आटोक्यात ठेवला पाहिजे हे पटून काही जी राज्ये कुटुंब-कल्याणाचा कार्यक्रम प्रामाणिकपणे राबवतात ती एका चमत्कारिक अन्यायाला बळी पडतात. हे त्यांनी सरकारला दाखवले. आर्थिक मदत व लोकसभेतील बळ यांचा संबंध लोकसंख्ये-पासून तोडल्याशिवाय हा अन्याय दूर होणार नाही ही गोष्ट त्या १० वर्षे ओरडून सांगत होत्या. शेवटी या वर्षी केंद्रसरकारने लोकसभेतील राज्यवार संख्या सध्या आहे तीच पुढे कायम ठेवण्याची घोषणा केली आहे.
स्वा. वीर सावरकरांच्या आधी माधव ज्युलियन — माधवराव पटवर्धनांनी भाषाशुद्धीसाठी काम केले असे मानले जाते. पण त्यांच्याही आधी शकुन्तलाबाईंनी मराठी लिहिताना इंग्रजीची भेसळ न करता लिहिण्याचा आग्रह धरला आणि पाळला. मजेदार प्रतिशब्द बनवले. झरता टाक (पेन) राखदाणी (अॅशट्रे) असे शब्द घडविले. अगदी 1ो कला आह.
अपरिहार्य झाल्याशिवाय इंग्रजी शब्द त्या मराठीत येऊ देत नसत. इंग्रजी धाटणीच्या वाक्यरचना त्यांनी आपल्या लिखाणात टाळल्या आहेत.
रणांगण कादंबरीचे परीक्षण त्यांनी जानेवारी १९४० च्या समाजस्वास्थ्यात केले आहे ते मोठे मार्मिक आहे. त्या म्हणतात, चक्रधर विध्वंस हा कथानायक लेखक इग्लंडहून स्वदेशी परतताना त्याच्यावर हर्टा नावाची ज्यू तरुणी भाळते. दोघांचे प्रेम जमते. चुंबन-आलिंगनापर्यंत वाटचाल होते. १५ दिवसांचा जहाजावरचा एकान्तवास, ज्ञातास्वाद प्रियकर; आणि अनुरक्त प्रेयसी स्वतः पुढाकार घेत असूनही हा नायक तिच्याशी समागमाबाबत उदासीनता दाखवतो हे काही पटत नाही असे त्यांचे रोखठोक समालोचन आहे. लेखकाचे शृंगाराविषयी लिहिण्याच्या हातोटीचे त्यांनी कौतुक केले आहे. अतिशयोक्ति न करता या नाजुक विषयातील खरीखुरी चित्रे हुबेहूब रंगवण्यात लेखकाने कमाल केली आहे अशी शाबासकी त्या देतात. एवढे सुदीर्घ आणि स्वच्छंद पण नीतिमान जीवन जगून समाजसेवा केल्या बद्दल आपण कृतज्ञतेने त्यांची आठवण ठेवली पाहिजे.