येत्या काही महिन्यांत माणसाच्या संपूर्ण जेनोमचा (genom) कच्चा आराखडा आपल्या हातात येईल. या घटनेबद्दलच्या बातम्या तिला वैद्यकीय आणि (बहुधा) नैतिक महत्त्व देतात. माझ्या मते एवढ्याने भागत नाही. मला वाटते की हा माणसाच्या इतिहासातील निरपवादपणे सर्वाधिक बौद्धिक महत्त्वाचा क्षण असेल. कोणी म्हणेल की एखादा माणूस म्हणजे केवळ त्याचे (किंवा तिचे) जीन्स नव्हेत, तर इतरही काही आहे मी हे नाकारत नाही. आपल्या सर्वांमध्ये केवळ जेनेटिक कोडपेक्षा बरेच काही आहे. पण आजवर मानवी जीन्सबाबत जी गूढता होती, जे अज्ञान होते, ते उल्लंघणारी आपली पिढी पहिली असेल.
जेनोम हे एका प्रकारचे आत्मचरित्र असते. ‘जेनेटिश’ या भाषेत आपली जीवजात आणि तिचे पूर्वज यांच्या इतिहासातील सर्व घडामोडींची इथे नोंद असते — थेट जीवांच्या उत्पत्तीपासूनची. आपले सर्वांत जवळचे नातलग चिंपांझी आहेत, हे जीन्सनी आपल्याला सांगितलेच आहे. आपण आणि फळांवरील केंबरे (Fruit Flies) यांचा समान पूर्वज एक साठ कोटी वर्षांपूर्वीची गांडुळांसारख्या मण्यांमध्ये विभागलेले शरीर असणारी कृती होती हेही जीन्स सांगतात. (स्पेनमधील) बास्क (Basque) लोक इतर युरोपियनांपेक्षा भिन्न वंशांचे आहेत, नुसत्याच भिन्न भाषेचे नव्हे, हेही जीन्स सांगतात. अगदी चारेक अब्ज वर्षांपूर्वीच्या पहिल्या जीवाबद्दल, सर्व सजीव सृष्टीच्या ‘मूळ पुरुषा’बद्दलही काही अंदाज जीन्सच्या आधारे बांधता आले आहेत.
साधारण आत्मचरित्रांपेक्षा काही वेगळ्याही बाबी या जेनोम-ग्रंथात आहेत —- भविष्याबद्दलच्या गोष्टी आहेत या. वाढत्या वयासोबत आपल्या शरीरांमध्ये काय बदल होतात हे जीन्सपासून कळू लागले आहे. जसे — जेनोमचे ३३४ वे ‘अक्षर’ G आहे की A ह्यानुसार ‘आल्झहाईमर्स’ हा रोग होण्याकडचा कल अकरा पटींनी वाढतो.
जेनोम पुस्तकासारखे आहे —- आठशे बायबलांइतके मोठे पण आपल्या शरीरातच निखर्व (दहा घात बारा १०१२) प्रती असतात इतके छोटे —- हे आता स्पकही मानायला नको. ते शब्दशः खरे आहे. पुस्तक जसे एकाद्या, एका दिशेने मांडलेल्या थोड्याशा चिन्हांच्या क्रमामधून अनेक अर्थवाही शब्द नोंदते, नेमके तेच जेनोममध्येही घडते.
माझा आकार, मला पाच बोटे व बत्तीस दात असणे, माझी भाषेच्या वापरातली क्षमता आणि माझ्या बौद्धिक क्षमतेचा अर्थामुर्धा भाग जीन्स ठरवतात. मला जेव्हा काही ‘आठवते’ तेव्हा जीन्सच चेता–रसायनांच्या क्रिया सुरू करीत असतात, ज्या क्रिया माझी स्मरणशक्ती चेतवतात.
मग ‘ईहे’चे (free will) काय? काही जण असे सांगतात की ईहा आपल्या समाजातून उद्भवते, संस्कृती व संगोपन (culture and nurture) यातून उद्भवते. या युक्तिवादानुसार ‘ईहा-स्वातंत्र्य’ म्हणजे आपल्या स्वभावाचे जीन्सवर अवलंबून नसलेले भागच, फक्त —- आपल्या जीन्सच्या कठोर नियंत्रणाच्या समाप्ती नंतर उगवलेले फूल. या युक्तिवादाच्या प्रवर्तकांनुसार जेनेटिक नियतवादाच्या पलिकडे जाऊनच आपण स्वातंत्र्य हे गूढ फूल ‘धरू शकतो.
पण या त-हेने फक्त सामाजिक नियतवादाची जागा जेनेटिक नियतवाद घेतो —- जे मला अधिकच स्क्ष व भेसूर वाटते. मला आल्डस हक्स्लेचे ब्रेव्ह न्यू वर्ल्ड पुन्हा वाचताना जाणवले की त्यात जेनेटिक्सबद्दल आ चर्यकारक कमी उल्लेख आहेत. त्या पुस्तकात आल्फा (‘उच्च वर्गी’) व एप्सिलोन (‘कामगार-निम्नवर्गी’) लोक थोड्याशा रासायनिक नियंत्रणाने व पाव्हलोव्हच्या ‘कंडिशनिंग’ आणि ‘ब्रेन-वॉशिंग’ने घडवले जातात, म्हणजे विसाव्या शतकातील सर्वांत गाभ्याची भीषणता असलेले भविष्यचित्र (quintessential dystopia) हे पूर्णपणे संगोपनावर आधारलेले आहे आणि त्यात पूर्वजदत्त, जीनदत्त स्वभावाला स्थानच नाही. एको-णीसशे तिशीत जर्मनीत टोकाचा जेनेटिक नियतवाद मानला गेला, तर रशियात टोकाचा संगोपनाधिष्ठित नियतवाद. यांपैकी कशाने माणसांना जास्त यातना दिल्या, हे ठरवणे कठीण. पण तरीही जेनेटिक नियतवाद सामाजिक नियतवादापेक्षा जास्त कठोरपणे ‘नियत’ आहे, ही दंतकथा टिकून आहे. प्रत्यक्षात हे खरे ठरताना दिसत नाही. बुजरेपणा व वाचनदोष (dyslexia) या दोन्हीत खूपसा जेनिटिक भाग आहे, हे समजल्याने उपचाराची नवनवी तंत्रे सुचली — असंवेदनशील तुटकपणा रुजला नाही. तसेच जेनेटिक नियतवादाने व्यक्तीची जबाबदारीही कमी होत नाही. तुम्ही ‘स्वभावा-नुसार’ वागता तेव्हा तुमच्या क्रियांसाठी तुम्ही जबाबदार नसता पण स्वभावानुसार वागणे अनेक नियत घटकांच्या संयुक्त परिणामातून घडते. इथे एक पॅरॅडॉक्स (paradox) आहे. जर आपले वागणे स्वैर नसेल तर ते नियत आहे. आणि नियत असेल तर स्वतंत्र नाही.
आपण नियत असणे आणि भाकीत वर्तवता येणे यांच्यात फरक करून हा पॅरॅडॉक्स टाळू शकतो. हवामान नियत असते, पण त्याचे भाकीत वर्तवता येत नाही. आपण हवामानासारखीच अत्यंत व्यामिश्र (complex), गुंतागुंतीची रचना आहोत. प्रत्येक क्रियेचे मागेपुढे परिणाम होत आपले वागणे घडते. जीन्स मेंदूच्या पेशींवर परिणाम करून वागणूक बदलतात तशीच वागणूकही मेंदूच्या पेशींवर परिणाम करतेच. असेही शक्य आहे की स्वातंत्र्य म्हणजे इतरांचे नियत वर्तन न करता स्वतःचेच नियत वर्तन करणे. लिंडन ईव्हज् हा मानसशास्त्रज्ञ विचारतो, “तुम्ही ‘नसलेल्या’ पर्यावरणाने तुम्हाला ढकलणे चांगले की एका अर्थी तुम्ही(च) असलेल्या जीन्सच्या रेट्याप्रमाणे वागणे चांगले?” मला संगोपना–(नर्चर)पेक्षा स्वभाव (नेचर) कधीही बरे वाटेल.
(मॅट रिडली या लेखकाच्या जेनोम या नव्या पुस्तकावरून हा उतारा टाईम साप्ताहिकाने घडवला (२८ फेब्रु. २०००). यात मूलप्रवृत्ती की संगोपन, स्वतंत्र ईहा की नियत वर्तन हे जुनेच वाद नव्याने उभे झाले आहेत. एका अर्थी ‘सुधारकांची’ जबाबदारी इथे जास्त नेमकेपणाने नोंदली आहे—-जीन-नियत नसलेले वर्तन जास्त चांगले कसे करता येईल, हा सुधारकाचा मूळ प्र न, ‘चांगले’ म्हणजे काय, हाही मूळ प्र नच!)
१९३, शिवाजीनगर, मश्रूवाला मार्ग, नागपूर — ४४० ०१०