१. प्रा. ह. चं. घोंगे यांचा गोमांसभक्षण : एक ऐतिहासिक वास्तविकता या शीर्षकाचा आजचा सुधारकमध्ये (मार्च २०००) प्रसिद्ध करण्यात आलेला लेख वाचून बरीच करमणूक झाली. त्यामुळे सध्या काही विद्वानांचे प्राचीन इतिहासाचे संशोधन आणि त्याची अभिव्यक्ती कोणत्या दर्जेदार रीतीने चालते याचा एक नमुना उपलब्ध झाला आहे. प्रस्तुत लेख घोंगे यांनी ‘मित्रवर्य’ डॉ. भाऊ लोखंडे यांच्या ब्राह्मणांचे गोमांसभक्षण या लेखाच्या समर्थनार्थ लिहिला आहे. परंतु, तो मूळ प्रतिक्रिया समजून न घेता ‘पूर्ण ग्रंथ पाहिल्यावीण’ लिहिला आहे.
[१. आपली करमणूक व उद्बोधनही झाले असावे. आपण एकच कबूल केले तरी दुसरे झाकत नाही. संपा.]
२. पूर्वी डॉ. लोखंडे यांच्या ब्राह्मणांचे गोमांसभक्षण या लेखावर अनेक प्रतिक्रिया आल्याचे नोंदून आ. सु.च्या संपादकांनी त्या प्रसिद्ध न करता केवळ त्यांना वाटणारे मुद्दे उपस्थित करून त्यांचा परामर्श आपल्या पत्रपरामर्श या सदरात घेतला होता. त्या प्रतिक्रियांपैकी के. रा. जोशी यांची ‘या त-हेचे सत्य सांगून त्या पूर्व- स्थितीला समाजाला नेणे इष्ट होईल काय?’ अशी प्रतिक्रिया देऊन आ. सु.च्या संपादकांनी आपले विचार मांडले होते. त्यांचा परामर्श घेणारा ‘आ. सुधारकातील अद्भुत तर्कशास्त्र’ हा लेख प्रस्तुत लेखकाने पाठविला होता. पण तो आ. सु.च्या संपादकांनी छापला नाही. मुळात गोमांसभक्षण ऋग्वेदकाळी होते की नव्हते याविषयी कोणी प्र नही उपस्थित केला नाही.
[२. तुमचे अध्ययन काय सांगते ते सांगायला हवे होते.]
३. डॉ. लोखंडे यांचा लेख छापत असताना तो ‘अनाग्रही सत्यशोधक व अभ्यासपूर्ण’ असल्याची ग्वाही देणे, त्या लेखासंबंधीच्या प्रतिक्रिया न छापणे, नामनिर्देश कस्न प्रतिक्रियेच्या घेतलेल्या चुकीच्या परामर्शाबद्दल लिहिलेला लेखही समोर येऊ न देणे, पण लोखंडे यांच्या लेखाचे समर्थन करणारा घोंगे यांचा प्रदीर्घ लेख प्रसिद्ध करणे हे आ. सु.च्या संपादकाचे नवे धोरण पत्रकारितेच्या किमान संकेताच्या प्रतिकूल आणि आ चर्यकारक आहे.
[३. आ. सु.चे संपादन आपल्या धोरणानुसार कसे चालेल? काय संबंधित आणि काय असंबद्ध, काय चूक आणि काय बरोबर याबद्दल आपणांत मतभिन्नता आहे.]
४. अलीकडच्या आ. सु.च्या संपादकीय मतप्रदर्शनातून इतके नव्याने कळले की आ. सुधारक हे मासिक सत्यसंशोधनपर व इतिहासविषयकही आहे. त्यामुळे आ. सुधारक हे मासिक नुसते पुरोगामी, समाजसुधारणेचा विचार करणारे, विवेकवादी व प्रामाणिक आहे हा वाचकांचा समज सुधारण्याचे श्रेय संपादकांनी मिळविले आहे.
५. ब्राह्मणांचे गोमांसभक्षण हा मथळा, आणि हिंदुधर्मीयांना याविषयी काय म्हणावयाचे आहे हे लोखंडे यांचे आव्हान मूळ लेखात असताना हा लेख सत्य-संशोधनासाठी आहे हे आ. सु.चे संपादक व घोंगे वरचेवर सांगून लोकांचा बुद्धिभेद करण्यात कसे काय यशस्वी होतील?
[४,५. इतिहास, समाजशास्त्र, कायदा व धर्मशास्त्र या विषयांचा संबंध समाज-सुधारणेच्या कामाशी पोहोचतो याची माहिती असलेला कुणीही आपण लिहिले तसे लिहिणार नाही.]
६. घोंगे आरंभी हे सत्यान्वेषण आहे म्हणून सांगतात आणि पुढे ‘कर्मठांचे हे सांस्कृतिक आक्रमण अनाठायी आहे हे सर्वहारा समाजाने सांगितले तर बिघडले कोठे’ असे म्हणून लोखंडे यांच्या उद्देशाचे समर्थनही करतात! आपण शब्दबंबाळपणे काय लिहीत आहोत, कशासंबंधी लिहीत आहोत, याची इतकी कमी जाण क्वचितच समंजस लेखनात आढळते.
[६. आपला प्रस्तुत लेख हे या प्रकाराचे उत्तम उदाहरण आहे, असे कोणाला वाटू शकते. आपण घोंगे यांच्या कुठल्याही मताचे खंडन केले नाही.]
७. प्रा. घोंगे हे प्राचीन इतिहासाचे अभ्यासक आहेत. परंतु, त्यांनी आपल्या लेखात ब्राह्मणांचे गोमांसभक्षण या लोखंडे यांच्या लेखाचे केलेले समर्थन वाचून लोखंडे यांचेवर ‘मित्रा’, समर्थन आवर म्हणून काकळूत करण्याची पाळी आपली आहे. घोंगे यांच्या मताने ऋग्वेदातले वशिष्ठ प्रभृती ऋषी हे ब्राह्मणच नव्हते. (आ. सु. पृ. ३०३). पुढे घोंगे यांनी आपला लेख ऋग्वेदकाळापुरता मर्यादित आहे असे लेखाच्या आदि–अंती लिहून अथर्ववेद, शतपथ ब्राह्मण, तैत्तिरीयसंहिता, मानसोल्लास (१२ वे शतक) यासंबंधीची खिचडी करीत प्राचीन इतिहास-संशो-धनाचा जो नमुना दाखवला आहे त्याला तोड नाही!
[७. घोंगे यांच्या खंडनासाठी वशिष्ठादी ऋषी जन्मतः ब्राह्मण होते हे दाखवायचे सोडून आपण लोखंड्यांचा वृथा कैवार घेताहात. घोंगे यांनी दिलेल्या ज्यादा पुराव्यांनी लोखंड्यांपेक्षा आपल्याला अधिक दुःख झालेले दिसते.]
८. त्यामुळे लोखंडे हे ब्राह्मणांचे गोमांसभक्षण म्हणून जे म्हणतात त्यांना ऋग्वेदातला इतिहास समजत नाही असे ‘ऋग्वेदाचे सांस्कृतिक अध्ययन करणाऱ्या’ घोंगे यांचे मत दिसते. लोखंडे यांचा दुसरा शोध आहे की बौद्धजैनांच्या यज्ञविरोधामुळे गोहत्या बंद झाली. पण घोंगे यांनी प्रत्यक्ष ऋग्वेदातच गाय अवध्य असल्याचे अनेक उतारे देऊन लोखंडे यांना सत्यशोधनही करता आले नाही असे दाखवून दिले आहे. हा ‘मित्रवर्या’च्या समर्थनाचा अद्भुत प्रकार वाखाणण्याजोगा झाला आहे!
[८. लोखंड्यांऐवजी आपल्याला दुःख व्हावे ही गोष्ट बरेच काही सांगून जाते.]
९. घोंगे यांनी महाभारतातील खास प्रसंग, कुमारसंभवातील शंकर-पार्वतीची रतिक्रीडा, काव्यप्रकाशातल्या अपह्नती अलंकाराचे दुसरे उदाहरण उल्लेखून संस्कृत-साहित्यातून त्यांनी काय काय लक्षात ठेवले याची सुरेख जंत्री सादर केली आहे. पण त्यामुळे घोंगेंच्या मते ऋग्वेदात नसलेल्या ब्राह्मणांच्या गोमांसभक्षणाचे समर्थन कसे होणार? घोंगे यांच्या मतानुसार ज्याला ऋग्वेदाचीही धड माहिती नाही असा लेखक (डॉ. लोखंडे) वेदव्यास व सरदेसाई यांच्या पद्धतीचा थोर इतिहास-संशोधक किंवा कालिदास किंवा मम्मटाचार्य यांच्यासारखा साहित्यधुरंधर म्हणून मानावा हा घोंगे यांचा दावा कोणत्या दर्जाच्या विनोदाचा विषय ठरतो हे वाचकांनीच ठरवावे. आ. सु.च्या संपादकांच्या ब्राह्मणांचे गोमांसभक्षण या लेखाच्या समर्थना-बरोबरच मित्रवर्य भाऊ लोखंडे यांच्या संशोधनातील भकासपणा घोंग्यांच्या प्रस्तुत समर्थनलेखाशिवाय अधिक चांगला प्रकाशात आला नसता. त्याबद्दल घोंगे हे अभि-नंदनास पात्र आहेत.
[९. घोंगे यांनी लोखंडे यांच्या पूर्वपक्षाचे समर्थन कस्न म्हटले आहे की, उत्तरपक्ष करण्यासाठी सनातनी प्रतिक्रियावाद्यांनी ऋग्वेदाचे सांस्कृतिक अध्ययन केले नसावे. आपण या शंकेबद्दल मौन पाळून घोंगे यांची समजूत खरी ठरविली आहे.]
२/२ एम्. आय. जी. कॉलनी, वंजारीनगर, नागपूर — ४४० ००३