. . . . ज्या वेळी स्वतःच्या कर्तृत्वाविषयी मनात विचार येतात त्या वेळी मी हे मानवसमूह नजरेसमोर आणतो. त्या विचारांची स्वतःलाच लाज वाटू लागते. एखाद्या यंत्रमाग-कामगाराच्या पोटी जन्मलो असतो आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून वही-फणीच्या कामाला जुंपला गेलो असतो तर? किंवा कामाठीपुऱ्यातल्या एखाद्या वेश्येपोटी जन्मलो असतो तर? या समूहांमध्ये जन्मणाऱ्या बहुतेकांच्या वाढण्याला केवढ्या मर्यादा असतात! … .
एखाद्या भीषण खुनाची बातमी वाचल्यावर आपण किती हादरतो! पण असे या परिस्थितीच्या दडपणाखाली चिरडून होणारे माणूसपणाचे खून किती सहजपणे आपण पाहू शकतो, किंवा पाहायचे नाकारू शकतो.
‘जी दुःखे मनुष्यनिर्मित आहेत, त्यांचा निरासही तो करू शकतो’ या वाक्याने मला नेहमीच धीर वाटत आलेला आहे. आजची इथली ही दुःखे दूर करण्या साठी ती दुःखे निर्माण करणाऱ्या यंत्रणा बदलाव्या लागतील, त्यासाठी हे समूह जागृत व्हावे लागतील. चांगल्या जीवनाची तहान त्यांच्यामध्ये निर्माण करावी लागेल. हे काम आजच्या सर्व थरांमधल्या सुशिक्षित, सुजाण तरुणांपुढे वाढून ठेवले आहे. हे बदल वर्षा-नुवर्षांच्या कठोर परिश्रमानंतर, परखड आत्मपरीक्षणातून होतात. अशा अनेक शक्ती एकत्र याव्या लागतात. प्रचलित व्यवस्थेमधून ज्यांना फायदा मिळतो अशांशी टक्कर घ्यावी लागते. या थरातील काही मोजक्या समूहांचे लोक-जीवन इतरांच्या नजरेस आणायचे थोडेसे काम मी करीत आहे. अजूनही अनेक शोषित समूह समोर दिसत आहेत त्यांचे जीवन समजून घ्यायचा प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना किती प्रतिसाद मिळेल हे इतरांच्या सहभागावर अवलंबून आहे.