स्पष्ट विचार, नेमके शब्द, आपुलकी आणि सूक्ष्म विनोदबुद्धी यांचा परिचय देणारी एक प्रतिक्रिया.
पुण्याचा वाचक मेळावा आपल्या खुसखुशीत अहवालातून कळला. उपस्थितांची नावे वाचून विचारवंताचे अग्रणी कोणकोण आहेत ते कळले. आणि समाधान वाटले की, जाहिरात न करता, अंदाजपत्रकी कौशल्य न वापरता आजचा सुधारक एवढा मेळावा करू शकतो. जाहिरातीच्या आवश्यकतेबद्दल बोलणाऱ्यांना ही गोष्ट पुरेसे उत्तर नाही का? अन्वर भाई आणि ताहेरभाईची नावे वाचून विशेष आनंद झाला. का ते पुन्हा केव्हातरी सांगेन.
पुष्कळ हितचिंतकांना वाटते की हे मासिक अधिक आकर्षक दिसावे .. मला त्यांना विचारावेसे वाटते की ते स्वतः या मासिकाकडे आकृष्ट झाले ते कशामुळे? असो, पण संपादन-व्यवसायातले दिग्गज असा लौकिक आणि प्रदीर्घ कारकीर्द असलेले माननीय मुकुंदराव किर्लोस्करही मासिक आकर्षक दिसले पाहिजे म्हणतात. ते वाचून मी तर बुचकळ्यात पडलो. सगळ्या गोष्टींचे थोडेथोडे मिश्रण करून बनविलेली मिसळ नेहमीच चविष्ट व्हावी का? प्रत्येक आघाडीवर अधिक सुधारणा करण्याच्या हव्यासात मूळ उद्दिष्टांकडे दुर्लक्ष होऊ द्यावे का? विचारवंत, आजचे आणि पुढचे आणि माझ्या- सारखे कसवी फिरस्ते चतुरंगी छपाई, गुळगुळीत कव्हर आणि अंतरंगात बिल्डरांच्या तुमच्या पोटात कालवाकालव करणाऱ्या काव्यात्म जाहिराती अशा साज-शृंगाराने सजलेले दिमाखदार मासिक पाहून अधिक प्रभावित होतील? मी कदाचित जुण्या- पुराव्या मताचा असेन किंवा बौद्धिकदृष्ट्या आजच्या सुधारकाच्या सुविद्य वाचकाच्या मानाने मागासलेला असेन, पण मला हे मासिक ‘आहे तसेच’ खूप आकर्षक वाटते. ते मी वाचू लागलो की त्यातल्या विचारांचे ग्रहण करताना माझ्या मनाला आणि बुद्धीला हादरे बसतात. तेच ते लेख मी एकदा-दोनदा नाही तर वारंवार वाचत राहतो.. मासिकाची ही मौल्यवान आठ-दहा पाने माझ्यासारख्याला महिनाभर विचारांचे खाद्य यथेष्ट पुरवितात.
तुम्ही अमुक अमुक विषयाला काही पाने का दिली नाहीत हा प्रश्न ऐकून मला एका मित्राची आठवण येते. ज्ञानेश्वरांनी जातिभेद, अस्पृश्यता अशा खऱ्या प्रश्नांना हात घातलाच नाही म्हणून त्यांना कसलेच श्रेय द्यायला माझा हा मित्र तयार नसतो. आगरकरांनी खऱ्या सामाजिक दुखण्यांचा विचार केलाच नाही हा आक्षेपही तसलाच. खरे म्हणजे काय ते तेच जाणोत. आपण स्वीकारलेल्या कामाकडे लक्ष पुरवावे. उरलेली कामे अनेक आहेत. म्हणून आपले यश उणे होणार नाही. कोणीही व्यक्ती झाली तरी ती महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या सगळ्याच प्रश्नांना काळाचे भान न ठेवता सामोरे जाऊ शकत नाही.
मासिकाने बदलत्या काळाला सामोरे गेले पाहिजे हे मला पटते. परंतु मला प्रामाणिकपणे असे वाटते की मासिकाचे मूळ उद्दिष्ट विवेकवादाचा प्रसार हे काही लहान आव्हान नाही.
काहींनी म्हटले आहे, तुम्ही प्रश्नांचा ऊहापोह तडा लागेपर्यंत का करीत नाही? विचार छान आहे! पण चर्चिले जाणारे प्रश्न इतके गुंतागुंतीचे असतात की त्यांचा निकाल आणखी अनेक वर्षे लागणार नाही. मग थोड्या महिन्यांची काय बात? मतभिन्नता इतकी असते की हे प्रश्न जणू अंत नसल्यासारखे होऊन बसतात. माझ्या मते एखादा प्रश्न होईल तेवढा चर्चेला घ्यावा आणि पुढे सरकावे. वाचक अंतर्मुख झाला की घडणाऱ्या चर्चेला किती मोल आहे हे त्याला कळते. एखाद्या प्रश्नाशी किती विचारप्रवाह निगडित आहेत ते पाहण्यासारखे असते. याला महत्त्व जितके आहे तितके प्रश्नाचा निर्णय करण्याला नाही. एक स्वगत म्हणू का, “ज्याचा सर्वांना मान्य होईल आणि कोणालाही पडताळा घेता येईल इतका कायमचा निर्णय लागला आहे असा एखादा प्रश्न मला अजून गवसायचा आहे. ”
आ. सु. तून मांडले जाणारे विचार कठीण आणि भाषा दुर्बोध असते असाही एक आक्षेप घेतला गेला. ज्ञानाच्या साधनेसाठी भाषा कमावणे किती गरजेचे असते हे ज्यांना उमगले आणि ज्यांनी हे प्रतिपादन केले त्यांना मी धन्यवाद देतो.
शेवटी, उपस्थितांचे सगळेच विचार मला पटोत, न पटोत पण असल्या मेळाव्यातली त्यांची हजेरी आणि चर्चेतला त्यांचा वाटा पाहून मला दिलासा मिळाला की समाजात अजून विचारमंथनाला वाव आणि विचारवंताना भाव आहे. मला त्यांच्या- बदल कृतज्ञता वाटते.
18, Indian Run Road, PRINCETON JCT,
NJ 08550-1406, U.S.A.