पाश्चात्त्य समाजात वृद्धाना कोणी विचारत नाही हे खरे आहे का? आमच्याकडील वृद्धांचे जे समाधान आहे ते अज्ञान आणि जाणीवेचा अभाव यामुळे की आमच्या तत्त्वज्ञानामुळे? देह जर्जर अन् व्याधिग्रस्त झाला की, गंगाजल हेच औषध आणि नारायणहरि हाच वैद्य – ही विचारधारा पुरेशी आहे?
माझी एक वृद्ध मैत्रीण अमेरिकेत असते. वय ७९; वजन २१५ पौंड; उंची ५ फूट १ इंच. दोनही पायांनी अधू झाल्याने पांगुळगाडा घेऊन चालत असे. आता तीही विजेवर चालणारी चारचाकी गाडी घेऊन कोठेही फेरफटका करीत असल्याने आनंदात असते. पण त्यामुळे वजन व अधूपण दोनही वाढून आणखी गोत्यात येते आहे व त्याची जाणीव ती सुखाने विसरते आहे. ही वृद्धा अत्यंत सुस्वभावी, आनंदी. जेथे असेल तेथे आपल्या स्वभावाने सुख पसरविणारी मायाळू स्त्री. तिला लेखिकेचे वृद्धांच्या समस्येबद्दल कुतूहल माहीत होते. ती ज्या वृद्धाश्रमात राहत होती त्याला वृद्धसाहाय्यक संघटना (Assisted living of the aged) म्हणत. त्यात वर्षाला पंधरा दिवस आपल्या खोलीत आपल्या आप्तांना किंवा सोबतींना विनामूल्य राहण्याची परवानगी होती. खाणेपिणेही तेथेच मिळे. सर्व व्यवस्था एखाद्या चांगल्या (तारांकित) हॉटेलप्रमाणे होती. मी तेथे जाऊन राहिले. बऱ्याच स्त्री-पुरुषांशी बोलले व तेथे राहण्याचा अनुभव घेतला.
भर गावात आठदहा एकरावर ह्या संघटनेच्या चार मोठ्या इमारती उभ्या होत्या आवारातच भोवती ४०/४५ फुटी रस्ते इमारतींना वेढीत होते. एक-दोन कडांना मोटारी ठेवण्याची सोय होती. रस्त्यांच्या कडेला इमारतींमध्ये हिरवळ लावून फुलांच्या शोभिवंत बागाही मन प्रसन्न ठेवीत होत्या; त्यात मोठमोठाले वृक्षही होते. त्यातले जवळजवळ ३०/३५ टक्के वृक्ष ‘पीकॅण्ट’चे होते. पीकॅण्ट म्हणजे आक्रोडा- सारखे खाण्याचे फळ. एका वृद्धेने आपल्या खोलीत पीकॅण्ट साठविल्याने अर्धी खोली भरली होती. एरवी या पीकॅण्टना कोणी विचारीत नव्हते. येथला सर्व परिसर पानाफुलांनी खरोखरीच नयनरम्य झालेला होता. परिसरातील सर्व इमारती चार ते पाच मजली होत्या. इमारतीत शिरल्यावर आत सहा फुटी मार्ग (कॉरिडॉर्स) होते. दर दहाएक खोल्यानंतर एलिव्हेटर्स होते. ते जवळजवळ ७०७ फुटांचे होते. म्हणजे त्यातून एका वेळी (चारचाकी) दोनतीन ढकलगाड्या सहज मावू शकत. सर्व इमारती अगदी स्वच्छ वाटत. प्रत्येक मजल्यावर एकदोन, एकदोन गप्पाघरे ( lounges) होती. त्यात बसून म्हातारी माणसे गप्पा मारीत. पण त्यात सिगरेटी फुंकण्याची परवानगी नव्हती. काही गप्पाघरात मफीनस किंवा अशा तऱ्हेचे बेकरीचे पदार्थ ठेवलेले होते. ते तेथून कोणीही तेथेच किंवा आपल्या खोलीत नेऊन खाऊ शकत. तीच गोष्ट फळांची. सफरचंद, पेअर्स, केळी अशीच ठेवलेली असत.
मी ज्या इमारतीत राहत होते ती इमारत एकेकटे स्त्री किंवा पुरुष राहत असलेली. एकेकटी राहत त्यांच्या खोल्या १६x१६ असून त्यात मायक्रो वेव्ह, बेसिन, छोटी छोटी कपाटे होती. त्यात कपबश्या, चमचे इ० सामान आणून ठेवता येई. दूरदर्शन, दिवाण किंवा संगीत-साधने आपापली आणून मनोरंजन करावे लागे. तरी सामायिक हॉलमधून मोठमोठे दूरदर्शन संच असतच.
इतर इमारतींतून पतिपत्नींच्या राहण्याची सोय होती. त्यांना आपा- पल्या ब्लॉकमध्ये स्वयंपाक करण्याची सोय होती. वाटल्यास त्यांनाही जेवण मिळण्याची सोय होती..
ह्या सर्व व्यापाला वृद्ध साहाय्यक संघटना संबोधीत. सकाळी सात साडेसात वाजता नोकरदार खोलीत येऊन नाश्त्याला काय काय आहे आणि आपल्याला त्यातले काय पाहिजे विचारीत. त्याप्रमाणे प्रत्येक ब्लॉकमध्ये आठ वाजता १२ ते १६ माणसे जाऊन नाश्ता घेत मी जेव्हा जाऊन म्हणने तेव्हा ८० टक्के लोकांना स्वतःच्या पायाबी किंवा काठी टेकीत जाता येत नसे. त्यामुळे प्रत्येक जण आपली चारचाकी ढकलखुर्ची हाताने वीजबटन नियंत्रण करीत घेऊन येत व आपापल्या चौघाचौघांच्या टेबलाला ती खुर्ची आणून बसवीत. अशा तऱ्हेने प्रत्येक टेबलामागे चौघेजण आपापला नाश्ता घेत. यात स्त्रीपुरुष एकत्र असत. प्रत्येकाची ढकलखुर्ची वेगवेगळ्या तऱ्हेने नियंत्रित केलेली असे.
सकाळचा नाश्ता घेता घेता औषधे देणारी परिचारिका प्रथम ‘गुड मॉर्निंग’ किंवा हेच गाण्यात म्हणत प्रत्येकाला औषधें देई. ह्याच वेळी कोणाचा वाढदिवस असल्यावर त्याप्रीत्यर्थ गाणे म्हणण्यात सर्व भाग घेत. नाश्ता घेतल्यावर सर्वजण मोकळे होत व आपापले सोवती निवडून कोठल्या तरी गप्पाघरात किंवा इमारतीबाहेर खुर्च्या टाकून आडोशाला बसत. बरीच जण सिगरेटी फुंकीत. इमारतीत सिगरेटी फुंकण्याची परवानगी नसल्याने बाहेर बसून फुंकीत. बहुतांशी स्त्रियांचा अड्डा किंवा एखादा पुरुष असे. विषय नेहमीचे – स्त्रियांचे असत. दुपारी १२ ला जेवण मिळे. तत्पूर्वी बऱ्याच लोकांना परिचारिका अंघोळ घाली. प्रत्येकाच्या खोलीला स्नान- गृह अर्थात होतेच. दुपारचे जेवण ज्याच्या त्याच्या हौशीप्रमाणे घेतले जाई – अर्थात ढकलखुर्च्या टेबलांना जुळवून घेण्याची पद्धत तीच. संध्याकाळचे जेवण पाचसाडे- पाचला असे.
आठवड्यातून काही ठरलेल्या वेळी पत्ते खेळण्याचे कार्यक्रम असत. अधून- मधून बाहेरचे कलाकार येऊन वृद्धांचे मनोरंजन करीत, तर कधी वृद्ध लोक आपापसात स्पर्धा लावून बक्षिसे देत. तसेच ह्या वृद्धांना बाहेर बसने उद्याने, म्युझियम अशा ठिकाणी नेऊन मनोरंजनाचे कार्यक्रम होत. ह्या सर्व कार्यांकरिता महिना पाच एकशे डॉलर घेऊन हे वृद्ध एकाएकटे राहत होते. बहुतांशी हे पैसे सरकारकडून मदत म्हणून असत. दाम्पत्य-निवासात (अडीच खोल्या म्हणजे बैठक, स्वयंपाकघर व झोपण्याची खोली) राहणाऱ्यांना किती भाडे देता असे एकदोनदा विचारले, पण सरळ उत्तर मिळाले नाही. जेव्हा एकेकटी राहत तेव्हा वृद्ध म्हणून मिळणारे सर्व पेन्शन संघटनेला द्यावे लागे. त्यातली ३० डॉलरसारखी रक्कम स्वतःच्या खाजगी खर्चाकरिता (विडीकाडी, काही विशिष्ट खाणेपिणे इ० ) तुमच्या जवळ ठेवतात, असे आढळले.
कधी स्त्रियाना नखे रंगविणे, केशभूषा वगैरे गोष्टी करण्याकरिता त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ केवळ समाजकार्य म्हणून फुकट मदत करीत. माझ्या वृद्ध मैत्रिणीला शिवणाची व विणकामाची हौस होती. आपल्या खोलीत शिवण्याचे मशीन ठेवून ह्या बाई शिवणकाम करीत. सभोवताली शिवणाची जरूर असलेले लोक कामे करवून घेऊन पैसे देत. कोठल्याही परिस्थितीत मोकळीक मिळाली तर हौशी कमी होत नसतात असा एकूण अनुभव आला.
मी ह्या परिसरात असताना आठदहा वृद्धांच्या मुलाखती घेतल्या. त्यामध्ये कोणी निवृत्त एंजिनियर होते, कोणी वकील होते, कोणी कारकुनी करणारे होते. सहाजिकच एंजिनियर किंवा वकील म्हटल्यावर आपल्यासमोर उभी राहणारी माणसे सामान्य नसतील, सुशिक्षित सुसंस्कृत, पुढारलेली असतील अशी कल्पना. पण म्हातारपणी सगळ्यांत एकसारखेपण येते असे मला वाटलेच.
जो वकील होता तो ६५ वर्षांचा, तीन वर्षांपूर्वी निवृत्त झालेला. त्याची ३० एकर जमीन होती, तीन गायी होत्या व कोंबडे झुंजविण्याचा व्यवसाय होता. वकिली जेमतेमच असावी. त्याच्याजवळ सातआठशे पुस्तकांचा संच होता; त्याबद्दल विचार- ताच मोठ्या उत्साहाने तो बोलू लागला. ह्या पुस्तकांतील नव्वद टक्के पुस्तके कुत्रे व त्यांचे प्रशिक्षण यांवर होती. त्याच्या बिऱ्हाडामध्ये भयंकर गवाळा कारभार होता. कारण तो स्वतः हृदयविकाराने आजारी होता व बायको कॅन्सरने आजारी होती. दोन मुले होती, पण त्यांच्याकडून फारशा अपेक्षा नव्हत्या.
जो एंजिनियर वय ७१ चा होता तो फार अबोल होता. तो वयाच्या पहिल्या वर्षीच अमेरिकेत आला असला तरी त्याला जन्मस्थान म्हणून इंग्लंडबद्दल अभिमान होता. त्याची बायको अमेरिकी नर्स होती. ती नेहमी त्याला भेटायला येई. ह्या जोडप्याने केवळ सरकारी मदत मिळत राहावी म्हणून घटस्फोट घेतलेला होता.
असे एकूण वरील चित्र. म्हणजे स्वर्गीय राहणीच. दोन अर्थांनी. सुख सोयींनी तर हा परिसर स्वर्गच होता. शिवाय इकडे तिकडें हिंडताना गाडीवर बसून माना टाकलेले व कोणी त्यांना गाडीतून ढकलत नेताना पाहून ते स्वर्गाच्या मार्गावरचे प्रवासी भासत. बऱ्याच अंशी स्वर्गाजवळ असूनही आनंदी दिसायची किमया त्यांच्यात दिसे. एक ९२ वर्षांचा म्हातारा क्वचित आपल्या पायांनी हिंडणाऱ्या माणसांपैकी होता. तो कोठेही काठी टेकीत हिंडे व गाणे म्हणत असे.
मी साडेचार दिवस पाहिलेले हे स्वर्गीय राहणीचे चित्र. त्यातलं लोक अधू होते हे वर सांगितलेच आहे. ज्यांना २४ तास कोणी काळजी घेण्याची जरूर नाही अशा अधूंनाच ह्या इमारतीत घेतले जाई. कोणाला पक्षघात, कोणाचा मणका अधू, आय, कंबर, हात अधू, कोणाची मान जागेवरून सरलेली, कोणाचा एक किंवा दोनही पाय हत्तीचे झालेले अशा तऱ्हेने हे वृद्ध ‘चलत्या गाडीवर सर्वस्वी अवलंबून होते. इतर इमारतीत अधू जोडपी होती पण त्यातही कोणी मोटार चालवू शकत ती बाहेर फेरफटका करू शकणारी होती. ह्या सर्वांवर औषधपाण्याचा मारा असे.
अमेरिकेच्या ह्या परिस्थितीत एक गोष्ट लक्षात येते की आधुनिक वैद्यकशास्त्र कितीही पुढे गेले तरी माणसाला ते शंभर टक्के सुदृढ ठेवू शकत नाही. माणसे बहुतांशी जिवंत असतात व प्रयोगिक उपकरणांनी त्यांच्या बऱ्याचशा यातना कमी केलेल्या असतात. पंगू असले तरी आनंदी दिसायचे शास्त्र त्यानी आत्मसात केलेले असते. आठ टक्के रहिवासी सुदृढ असले तरी केवळ साधनसुविधांमुळे ते हालते बोलते दिसतात. पैशाच्या जोरावर चालणारे हे चित्र सकृद्दर्शनी तरी सुखासमाधानाचे वाटे. परंतु जरा जवळ बसून बोलले चालले तर एक सूक्ष्म तक्रार दिसे. ती म्हणजे आपल्या पूर्वायुष्याशी झालेल्या ताटातूटीची. इथल्या ऐषारामी वातावरणात ते विसरले तरी अधूनमधून डोकावे. बोलण्यातून खंत प्रगट होई. दुःख असलं तरी दुःखी न दिसण्याचं तंत्र ह्या समाजात पूर्ण रुजलेले वाटे. शेवटी अधूपणा जाणवला नाही तर तो माणूसच कसा?
वरील चित्र पाहताना आपल्याकडील – बहुतांशी ग्रामीण समाजातील वृद्ध माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले. दहावीस गावात जाऊन वृद्धांशी बोलून त्यांचे प्रश्न समजावून घेण्याचे प्रयत्न मी पाचएक वर्षांपूर्वी केलेले आहेत. त्यातली झोपडीतील जेमतेम पोटभर अन्न मिळते किंवा मिळतही नसेल अशी माणसे मला आठवली. सुदैवाने वैद्यकशास्त्राचे प्रयोग येथे पोहोचत नसल्याने भयंकर अपंगत्व येऊन त्यातूनही वाचलेली माणसे फारशी दिसत नाहीत. नैसर्गिक रित्या जितपत व जसे जगता येईल तशी ती जगत असतात. त्यांच्याभोवती पुढल्या एकदोन पिढ्यांची माणसे वावरत असतात आणि त्या सुखसमाधानात ती असतात. आपली विशेष आबाळ होते आहे याची जाणीवही त्यांना नसते. पैशाच्या जोरावर अधू माणसेही कशी आनंद उपभोग- ण्याचा प्रयत्न करीत असतात याचे ज्ञानही त्यांना नसते. शिक्षण, सामाजिक परिस्थिती बदलली तर हे आजचे समाधान टिकेल का? किंवा एकूण अज्ञान व त्यामुळे जाणिवेचा अभाव हे भाग्याचे लक्षण आहे का ?
आपले वृद्ध व संपन्न देशातील वृद्ध यांची तुलना करताना आपले वृद्ध जास्त सुखसमाधानात असतात, त्यांना मुले विचारतात अशा तऱ्हेची एक कल्पना आहे. भरभराटीबरोबर शिक्षण, वैद्यकाची मदत, घरांची सोय, व्यक्ति- विकासाची वाढ अशा अनेक गोष्टी आपोआप येतात. थोडक्यात या सर्व गोष्टी एकत्रित किंवा एक होऊन येतात. आपण विकासाची कास धरली तर ह्यातले काही सोडू व काही घेऊ असे म्हटले तरी ते होत नाही. उदाहरणार्थ घरांची सोय, गर्दी नको असणे वगैरे बाबी भरभराटीबरोबर येतात. पाश्चात्त्यांत वृद्धांना कोणी विचारीत नाहीत ही आपली समजूत तेथे वृद्धांना वेगळी घरकुले असतात म्हणून होत असावी. मी बऱ्याचशा (चार) भारतीय-अमेरिकी मानसोपचारतज्ज्ञांना विचारले असता अमेरिकेतही मुले किंवा पुढची पिढी वृद्धांना विचारीत नाही असे त्यांचे मत नव्हते. कदाचित वृद्धांची कणव वाटणे हे निसर्गाने दिलेले वरदान आहे. ते सर्वच मनुष्यजातीत सारखे असण्याची शक्यता आहे. एवढेच की त्याचे प्रकटीकरण समाजाच्या ठेवणीवर अवलंबून राहील.
८२०/२ शिवाजीनगर, पुणे- ४११००४ क (अपूर्ण)