प्रिय वाचक,

गेल्या महिन्यात वॉटर चित्रपट निर्मितीला विरोध करणारी निदर्शने झाली. चित्रिकरण जबरदस्तीने बंद पाडण्यात आले. व्हॅलेंटाइन डे निमित्त प्रेमिकांनी एकमेकांना छुपे संदेश देऊन प्रेम व्यक्त करण्याची पाश्चात्त्यांची पद्धत आहे. आपल्या तरुण- तरुणींनी तिचे नकळत अनुकरण सुरू केले आहे. हळूहळू छापील संदेश-पत्रे, त्यांच्या जाहिराती यांनी भव्य रूप घेतले आणि तो प्रकार डोळ्यात भरण्याइतका मोठा झाला. ज्यांना ह्या प्रघाताचा प्रसार व्हायला नको आहे त्यांनी त्याला विरोध करायला हरकत नाही. ज्या पद्धतींनी प्रसार झाला त्याच पद्धतींनी विरोध होऊ शकतो. प्रसारमाध्यमांचाही वापर केला जाऊ शकतो. पण दुकानांची तोडफोड केली गेली. धमक्या दिल्या गेल्या. हिंसक मार्ग अनुसरले गेले.
३१ डिसेंबरला गतवर्षाला निरोप आणि मध्यरात्री नव्या वर्षाचे स्वागत हा कार्यक्रम धडाक्याने साजरा होत असतो. दिवसेदिवस महानगरांची सीमाच काय मध्यम आकाराची शहरेही या उत्साहाला अपुरी पडू लागली आहेत.
ह्या तीन्ही गोष्टी आमच्या संस्कृतीत न बसणाऱ्या आहेत, म्हणून रोखायच्या काय? नव-वर्षाचे रंगीन स्वागत आता रोखण्याच्या मर्यादेपलीकडे गेले आहे. निदान भारतात लोकशाही आहे तोपर्यंत तरी.
मुद्दा आहे हे सारे रोखायची गरज आहे का? जग लहान होत चालले आहे. भारत भ्रमण सोपे झाले आहे. दृष्टी आता तरी विशाल व्हावी. पूर्वी एक काशीयात्रा घडावी यासाठी – काशीस जावे नित्य वदाने असा ध्यास जन्मभर धरूनही बहुत लोकांना तिला वंचित राहावे लागे. कोणा शेजाऱ्या-पाजाऱ्याच्या घरी गंगेच्या पाण्याचा गडू असे. त्यातले थेंबभर गंगाजल अन् तुळशीचे पान मरते समयी तोंडात गेले म्हणजे धन्य वाटत असे. आता काशीच काय त्रिखंड-यात्रा अनेकांच्या घर अंगणासारखी आटोक्यात आली आहे. मध्यमवर्गीय आजीबाईंनीही न्यूयॉर्कला गेल्यावर हडसन नदीची अनेकदा परिक्रमा घडते. कधी जमीनीच्या पोटातून तर कधी पृष्ठभागावरून. कारण न्यूयॉर्क तिच्या मुखावरच वसलेले आहे. लक्षावधी भारतीय अमेरिकेत वसले आहेत. समृद्ध झाले आहेत. तसे ते सगळ्या जगभर पसरले आहेत. विजातीयच नाही तर विदेशी आणि विधर्मी लग्ने करीत आहेत. भिन्न संस्कृतींचे अभिसरण होत आहे. काही गोष्टी आपल्या नाहीत हे सांगितल्याशिवाय पुढील पिढ्यांना कळेनाशा झाल्या आहेत. हॅपी बर्थडेला केक कापणे, शुभसंदेश देणे, लग्नाचे वाढदिवस करणे या गोष्टी आपल्या नाहीत म्हणून त्या सुटतील का ? विश्व संस्कृती काही जर असेल तर ती या रूपाने आकार घेत आहे. एवढा पुराणमताभिमानी
जपान पण आता ओळखू न येण्या इतका पास्चात्त्य झाला आहे. निदान निरुपद्रवी गोष्टींना रोखण्यात शक्तीचा अपव्यय कशाला? जे स्ववळाने लढ्यासारखे जगभर पसरते ते आर्य असे समजून तुम्हाला स्वीकारावेच लागते. ते. ‘कोण रोधील ? दे कोण कर सागरा?’ या न्यायाने. शिवाय स्वदेशीच्या, स्वसंस्कृतीच्या रक्षणासाठी प्रयत्न करायचा अधिकार आपल्याला आहेच. तो जन्मसिद्ध अधिकार लोकशाही पद्धतीने कोणीही वापरावा, झुंडशाहीने मात्र नव्हे. झुंडशाही विवेकवादाची शत्रू आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची तीन मार्मिक पथ्ये सांगितली आहेत. स्वमताचा प्रसार आणि दुसऱ्याच्या मतपरिवर्तनाचा अधिकार प्रत्येकाला जरूर आहे पण हिंसेचा अवलंब न करता, हे एक. राष्ट्रपुरुषांना कृतज्ञ राहावे पण त्यांचे देव्हारे माजवू नयेत हे दुसरे आणि आधी सामाजिक लोकशाही आणणे जरूर आहे, तिच्यावाचून राजकीय लोकशाही रुजणार नाही हे तिसरे.
१४ एप्रिलला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे झुंजार कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयन्ती. आम्ही त्यांना आदरांजली वाहतो. आमची लोकशाही चिरायू होवो !
*************************************************************
एप्रिलच्या २ तारखेला अमरावती येथे आजचा सुधारकच्या वाचकांचा मेळावा ठरला आहे. डॉ. मोतीलाल राठी, प्राचार्य डॉ. विजया डबीर आणि डॉ. सुशीला पाटील अन् डॉ. थोरात यांच्या परिश्रमांनी हा मेळावा होत आहे. एप्रिलच्याच १५ किंवा १६ तारखेला नासिक येथेही असाच मेळावा होऊ घातला आहे. तेथे श्री सुरेंद्र देशपांडे व श्री लोकेश शेवडे यांनी हे काम अंगावर घेतले आहे. दोन्ही ठिकाणच्या हकीकती मेच्या अंकात येतीलच. त्यांवरही वाचकांना आपली मते अवश्य द्यावीत. चालू अंकात पुण्याच्या मेळाव्यावर विस्तृत पण मार्मिक अभिप्राय न्यूजर्सी (U.S.A.) येथील आपले वाचक श्री. श्रीराम गोवंडे यांनी दिला आहे. तसेच मुद्देसूद अल्पाक्षररमणीय मत चंद्रपूर जिल्ह्यातील नेरीचे श्री. दीपरत्न राऊत यांनी दिले आहे. वाचकांच्या या प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. कळावे.
आपला
प्र. ब. कुळकर्णी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.