सॉक्रेटीसचे स्थान पौर्वात्य अन् पाश्चात्त्य संस्कृतीत ध्रुवाच्या तान्यासारखे अढळ होऊन बसले आहे. माझे अमेरिकन शिक्षक त्याच्या कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा करून त्यानेच जनकल्याणासाठी तत्त्वज्ञान स्वर्गातून पृथ्वीवर आणले असे मोठ्या अभिमानाने ठासून सांगत. त्यावेळी मला नेहमी आम्हाला शिकविणा-यांना अशा शिक्षकांचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास किती एकांगी असतो ह्याची चांगली कल्पना येई. मी एकदा चर्चेच्या वेळी म्हणालो, “सर, प्लेटोच्या पुस्तकांतील साक्रेटीसने आत्म्याच्या अमरत्वाबाबतची व पुनर्जन्माबाबतची केलेली चर्चा माझ्यासारख्या भारतीय विद्यार्थ्याला नवीन अशी वाटत नाही. ह्याची सांगोपांग चर्चा आमच्या उपनिषदांत व गीतेत मी वाचली आहे. त्यामुळेच सुप्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ एमर्सन हा उपनिषदांची जगातल्या उत्तम वाङ्मयात गणना करीत असे.”
सॉक्रेटीसने एकही पुस्तक लिहिले नव्हते ही गोष्ट तत्त्वज्ञानाच्या बहुतेक विद्यार्थ्यांना माहीत असते. जन्मभर चव्हाट्यावर वसूनच सॉक्रेटीसने तोंडाची टकळी चालवून प्लेटोसारख्या पैसेवाल्या शिष्यांना, (पुष्कळ वेळा त्यांच्याच खर्चाने!) तत्त्वज्ञानाचे डोस पाजले. सॉक्रेटीस हा दिसायला ओबडधोबड म्हातारा, तर प्लेटो हा तरुण व देखणा. सॉक्रेटीस हा गरीब घराण्यात जन्मला होता. ह्याच्या उलट प्लेटो हा रॉयल कुटुंबात जन्मलेला. त्यांच्यात तत्त्वज्ञानाची अतृप्त आवड हा दुवा सोडला तर त्या दोघांत काहीएक साम्य नव्हते. प्लेटो हा सॉक्रेटीसचा अत्यंत आवडता शिष्य. सॉक्रेटीसबाबतची माहिती मुख्यत्वेकरून आपणाला प्लेटोच्या धी रिपब्लिक ह्या अमर पुस्तकांतून वाचावयास मिळते. त्याच्या पुस्तकातील सॉक्रेटीसची चितारलेली छबी जगातील साहित्यात अत्यंत मानाचे स्थान पटकावून बसली आहे. सॉक्रेटीसची कुशाग्र बुद्धिमत्ता, त्याची सत्यनिष्ठा, अतुल धैर्य व त्याचा धीरोदात्त मृत्यु ह्याबाबत सारी माहिती आपणाला प्लेटोच्या पुस्तकावरूनच मिळते.
पण सॉक्रेटीससारखा महापुरुष एका प्रसंगी एखाद्या भ्याडासारखा कसा वागला ह्यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकणारे आय. एफ. स्टोन ह्याचे धी ट्रायल ऑफ सॉक्रेटीस हे पुस्तक वाचून मी अगदी अस्वस्थ होऊन गेलो. हे पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वी स्टोनने सॉक्रेटिसच्या खटल्यावर एक खळबळजनक, प्रदीर्घ लेख न्यू यॉर्क टाईम्स (एप्रिल ८. १९७९) मध्ये लिहून नेहमीप्रमाणेच अनेक सनातनी टीकाकारांचा रोष पत्करला होता. पण स्टोनच्या ह्या लेखाने जणू काही मधमाश्यांच्या पोळ्यावरच जबरदस्त आघात केला. काही वर्षांपूर्वी हे पुस्तक वाचून मी भारतातील माझ्या काही गुजराती विद्वानांशी ह्याबाबत जेव्हा चर्चा केली त्यावेळी त्यांची सॉक्रेटीसभक्ती दुखावल्याची चिन्हे मला त्यांच्या डोळ्यांत स्पष्टपणे पाहावयास मिळाली होती. पण आमच्या गुजरातमध्ये भक्तिमार्गाचे पीकच फार मोठ्या प्रमाणात होत असल्याने मला त्याचे आश्चर्य वाटले नव्हते. त्यांतील काहींनी स्टोनचे सॉक्रेटीसवरील पुस्तक वाचून स्टोनचे विचार समजवून घेण्याऐवजी त्यांनी सॉक्रेटीसारख्या महात्म्यावर हीन दर्जाची टीका करून सूर्याकडे सरळ पाहणा-या ह्या थोर पुरुषाच्या चारित्र्यावर निष्कारण शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न केला आहे असा अभिप्राय बोलताना व्यक्त केला.
अशा प्रकारची टीका करणा-यांत गुजरातचे माझे दोन “विचारवंत” मित्रही सामील झाले हे पाहून मला जरा वाईट वाटले. त्यांच्या मनावर कदाचित महात्मा गांधींच्या महात्मा सॉक्रेटीस ह्या पुस्तकाचा परिणामच जास्त झाला असावा असा विचार करून मी गप्प राहिलो.
हे पुस्तक समजवून घेण्यासाठी प्रथम मला स्टोनबाबत दोन शब्द सांगण्याची जरूरी वाटते. स्टोन हा मूर्तिभंजक म्हणून अमेरिकन जनतेला परिचित होता. सत्य असेल ते बोलणार, लिहिणार व त्यासाठी झगडणार हा त्याचा बाणा. तत्त्वाबाबत तडजोड नाही ही त्याची वृत्ती. स्टोन हा स्वतः ज्यू असूनही त्याने पॅलेस्टाईनच्या प्रश्नावर इस्राईलवर टीका करून पॅलेस्टाईनची बाजू उचलून धरल्याने अमेरिकेतील ज्यु जमात स्टोनवर भलतीच खवळली होती. त्याचप्रमाणे अमेरिकन सरकारच्या पक्षपाती धोरणावर टीका करून अणुबॉम्बच्या भूमिकेवर इंदिरा गांधींना त्याने पाठिंबा दिला होता. आपल्या अंतःकरणाला साक्ष ठेवून त्याने जन्मभर लिखाण करून आपले “स्टोन विक्ली” हे साप्ताहिक चालविले होते. आपल्या लेखणीच्या जोरावर त्याने ह्या साप्ताहिकाचा खप ७०,००० हजारांपर्यंत वाढवून अमेरिकेच्या वृत्तपत्रव्यवसायांत एक नवा विक्रम निर्माण केला. काही वर्षे तो येथील धी नेशन ह्या प्रगतिवादी साप्ताहिकाचा संपादक म्हणूनही अमेरिकन जनतेला परिचित झाला होता. व्यक्ती, समाज, व सार्वजनिक संस्था ह्याबाबतचे जनतेच्या प्रचलित विचारसरणीवर व त्यांच्या श्रद्धास्थानावर आघात करून त्यांना नव्याने विचार करण्यास लावणे हा जणू काही त्याचा आवडता छंद होऊन बसला होता. न्यूयॉर्क टाइम्सचे सीमोर हर्श, विल्यम गिडर व वॉटरगेट प्रकरणात निक्सनमागे हात धुऊन लागून शेवटी त्याला राजिनामा देण्यास भाग पाडणारे वॉशिंग्टन पोस्टच्या सुप्रसिद्ध बॉब वुडवर्डसारख्या वृत्तपत्रकारांना प्रेरणा देणारा लेखक स्टोन हाच होता.
पण स्टोनचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्याची अभ्यासू वृत्ती. त्याचेच उदाहरण म्हणजे त्याने सॉक्रेटीसवर लिहिलेले पुस्तक. पुष्कळसे वृत्तपत्रकार वेळेच्या अभावी उथळ लिखाण करणारेच आढळतात. एखाद्या विषयावर संशोधन करण्यास त्यांना कामाच्या दगदगीत वेळच मिळत नसतो. पण स्टोन त्याला अपवाद होता. त्यामुळे त्यांच्या शत्रुनासुद्धा त्याची पुस्तके वाचनीय वाटत. ग्रीक तत्त्ववेत्ते व ग्रीक संस्कृतीवर लिहिलेल्या अनेक पुस्तकांचा एक दोष म्हणजे अशा पुस्तकांच्या लेखकांना ग्रीक भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्याने त्यांना भाषांतरित लेखनांवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे त्यांच्या लेखनात अनेक दोष राहून जात. हा दोष टाळण्यासाठी वयाच्या ७० व्या वर्षी स्टोन ग्रीसमध्ये थोडी वर्षे राहिला. तेथे त्याने ग्रीक भाषेचा कसून अभ्यास केला, तेथील अनेक विद्वानांशी चर्चा केली व नंतरच हे पुस्तक लिहिले. सुरुवातीला त्याचा विचार होता विचारस्वातंत्र्याचा इतिहास लिहिण्याचा. पण शेवटी ह्या पुस्तकातच स्टोनने विचारस्वातंत्र्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काही टीकाकारांच्या मते स्टोनचे हे पुस्तक प्लेटोचे लोकप्रिय पुस्तक धी रिपब्लीक ह्याला दिलेले सडेतोड उत्तर आहे. ह्या पुस्तकातील स्टोनने व्यक्त केलेले विचार आपण प्रथम समजून घेतले तर स्टोनचे हे वादग्रस्त पुस्तक वाचण्यास आपणास मदत होईल म्हणून त्यांचा सारांश खाली देत आहे. स्टोनचे ग्रीसवर व ग्रीक संस्कृतीवर अपार प्रेम होते. ग्रीसची लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, न्यायप्रेम व ज्ञानलालसा ह्याचे स्टोनला जबरदस्त आकर्षण. ह्याच मूल्यांसाठी त्याने ५० वर्षे आपली लेखणीवाणी चालविली होती. स्टोन १९८९ मध्ये वारला.
ग्रीक ज्यूरीने सॉक्रेटीसवर दिलेला निर्णय स्टोनला मान्य होता. पण त्याला मृत्युदंडाची शिक्षा फर्मावून ग्रीसने एक मोठा गुन्हा करून आपल्या उज्ज्वल परंपरेला काळिमा फासला होता असे तो लिहितो. स्टोनच्या मते सॉक्रेटीस हा उजव्या पक्षाच्या विचारसरणीला बळी पडलेला एक विचारवंत होता. सॉक्रेटीस व प्लेटोचा लोकशाहीवर जराही विश्वास नव्हता ही गोष्ट प्लेटोच्या ग्रंथ वाचकांच्या लक्षात येतेच. त्याच्यावर व त्याच्या शिष्यांवर स्पार्टाच्या हुकूमशाहीचाच जास्त प्रभाव होता. पण असे असूनही तत्कालीन ग्रीक राज्यकर्त्यांनी विचारस्वातंत्र्याचा बळी देऊन सॉक्रेटीसला हलाहल घेण्यास भाग पाडले ह्या गोष्टीचा स्टोन धिक्कार करतो. पण स्टोनने चितारलेला सॉक्रेटीस हा प्लेटोच्या सॉक्रेटीसपेक्षा कितीतरी वेगळा वाटतो! प्लेटोचा सॉक्रेटीस हा गुणांचा पुतळा म्हणून वाचकांच्यापुढे सादर केला जातो. आपल्या हिरोचे दोष प्लेटाला दिसतच नाहीत.
त्यावेळी ग्रीसची ऐतिहासिक परिस्थिती नीट आकलन व्हावी व सॉक्रेटीसचे एकवेळचे शिष्य कसे स्वार्थीवृत्तीने वागले हे वाचकांना कळावे ह्या हेतूने लेखकाने दिलेली माहिती फार उपयुक्त वाटते.
ख्रिस्तपूर्व ५ व्या शतकाच्या शेवटी स्पार्टाने युद्धात ग्रीसचा दणदणीत पराभव केल्याने ग्रीसचा आत्मविश्वास नष्ट होऊन ग्रीसच्या नैतिक अधोगतीला सुरुवात झालेली होती. ग्रीक जनतेच्या लोकशाहीवरील विश्वासाला बुरूज लावण्याची कामगिरी स्पार्टाने सॉक्रेटीसच्या काही सत्ताधारी शिष्यांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पाडली होती. त्यामुळे लोकशाहींचे पारडे कमी होऊन स्पार्टाच्या हुकूमशाहीचे आकर्पण ग्रीक जनतेत झपाट्याने वाढत चालले होते. ह्यावेळी लोकशाहीवर विश्वास नसलेले ३० ग्रीक पुढारी इसवी सनापूर्वी ४०४ मध्ये स्पार्टाच्या कृपेनेच सत्तेवर आले होते. सॉक्रेटीसचे दोन शिष्य – क्रायटीस आणि अॅलसिविडस-ह्या दोघांनी ग्रीसमधील लोकशाही उलथून पाडण्यात पुढाकार घेतला होता ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यात पुन्हा अॅलसिबिडस हा स्पार्टाचा गुणगायक होता व तो पळून स्पार्टाला गेला होता. लोकशाही नष्ट झाल्यानंतर ग्रीसमध्ये जेव्हा “३० हुकूमशहांच्या सत्तेस सुरुवात झाली त्यात क्रायटीस हा एक होता. ह्या हुकूमशहांचा नंगा नाच ८ महिने ग्रीसमध्ये चालू असताना क्रायटीसने १५०० ग्रीक लोकांच्या कत्तलीत पुढाकार घेतला होता ही गोष्ट विसरणे जनतेला अशक्य होते. ह्या काळात सॉक्रेटीस हा संकटात मूग गिळून गप्प बसला होता हे जनतेच्या लक्षात राहिले होते. त्यामुळे सॉक्रेटीस हा संकटात आला तो त्याच्या तत्त्वज्ञानाच्या अन् विचारांच्या उच्चारांमुळे नव्हे तर त्याच्या राजकीय विचारसरणीमुळे. ही गोष्ट स्टोन वाचकांच्या नजरेस आणून देतो. सॉक्रेटीसने अॅथेन्सच्या तरुणांची मने कलुषित केली ह्या आरोपात जनतेला खरा रस नव्हता. ते एक फक्त वरवरचे कारण होते एवढेच. पण सॉक्रेटीस तरुणांचे मतपरिवर्तन हे फक्त घटनेद्वारेच नव्हे तर नैतिक बळाच्या आधारे करू इच्छित होता ही गोष्ट स्टोन नमूद करण्यास विसरत नाही.
ग्रीसच्या ह्या अतिशय लोकप्रिय पंडिताने अशा आणिबाणीच्या काळात सत्याचा आवाज उठविण्याऐवजी परिस्थितीकडे शांतपणे पाहत बसावे ह्याचीच ग्रीक जनतेला खरोखर चीड आली होती. अन् सॉक्रेटीसने स्वतःच्या बचावाच्या भाषणांत पुन्हा ग्रीसच्या ज्यूरी पद्धतीचा उपहास करून स्वतःची बाजू लंगडी करून घेतली. सॉक्रेटीसच्याच काही शिष्यांनी ग्रीसची लोकशाही हाणून पाडण्यात पुढाकार घ्यावा ह्याचे त्याला (स्टोन) दुःख होते. सॉक्रेटीसचा मृत्यु हा तेथील लोकशाहीला लागलेला कलंक आहे असे त्याला वाटते. त्यामुळेच ७० वर्षांच्या म्हाता-या सॉक्रेटीसविरुद्ध हा निघृण निर्णय का देण्यात आला हे तो समजू शकतो; पण स्टोन ग्रीक जनतेला त्या निर्णयाबद्दल क्षमा करत नाही
तरी स्टोनचे हे पुस्तक वाचून काही प्रश्न अनुत्तरित राहतातच. सॉक्रेटीसने आपला बचाव फक्त दोन आरोपांबाबतच- अॅथेन्सच्या तरुणांची मने कलुषित केल्याच्या व सरकारमान्य देवदेवतांवर श्रद्धा नसल्याच्या – आरोपांवावतच का केला? आपला माणसाच्या सद्गुणाप्रमाणेच लोकशाहीवरही विश्वास आहे ही गोष्ट तो ह्या प्रसंगी उघडपणे जाहीर का करीत नाही? ग्रीसमध्ये ३० हुकूमशाहांचा धिंगाणा जेव्हा चालू होता तेव्हा सॉक्रेटीस तोंडात गुळणी घेऊन गप्प का राहिला? तो भ्याड नव्हताच. तो भ्याड असता तर ऐन जवानीत सुरुवातीच्या एका युद्धात त्याने ग्रीसच्या वतीने भाग घेऊन स्वतःचा जीव धोक्यात टाकून अनेक सैनिकाना का वाचविले असते? त्याशिवाय मृत्युदंडाची शिक्षा झाल्यानंतर जेलमधून पळून जाण्याची व्यवस्था त्याच्या काही मित्रांनी केली असतानाही त्याने पळून जाण्यास नकार का दिला असता?
मग मॉक्रेटीसच्या विचित्र वर्तनाचा अर्थ कसा लावावयाचा? मृत्युसमयी सॉक्रटीस हा ७० वर्षांचा म्हातारा होता. आपण लौकरच मरणार हे नैसर्गिक सत्य त्याला डोळ्यापुढे दिसत होते. तेव्हा मरताना आपली वदनामी व्हावी ही कल्पनाच त्याला सहन होणे शक्य नव्हते. जगाच्या इतिहासांत एक सत्यवादी वीर म्हणून आपले नाव अमर व्हावे ह्या हेतूनेच त्याने हे आत्मबलिदान स्वछेने केले होते का? का आपले वलिदान देऊन ग्रीसच्या लोकशाहीला काळिमा फासण्याचा त्याचा बेत होता? ते कळण्यास काहीच मार्ग नाही. सारा जन्म पंडित, कवि, राजकीय पुढारी, ह्यांची जाहीरपणे उलटतपासणी करून त्यांचा दांभिकपणा त्यांच्या पदरांत टाकून, सत्य, नीती व सदाचार ह्यांचा वर्षांनुवर्षे उदोउदो करणा-या ह्या ग्रीक वीराने व प्लेटोसारख्या त्याच्या पट्टशिष्याने त्याच देशातील गुलामांच्या व्यापाराविरुद्ध अथवा स्त्रियांच्या असमान दर्जावद्दल व त्यांच्या हक्कांबद्दल तोंडातून एक शब्दही कधी उच्चारला नव्हता! ह्याचे कारण म्हणजे ह्या महान् तत्त्वज्ञानी पुरुषांच्या मताने ग्रीसमधील गुलाम व स्त्रिया ह्या हीन दर्जाच्या व अक्कलशून्य होत्या! त्यांनी शारीरिक कष्ट करावयाचे व ह्या पंडितांनी भरल्यापोटी दारू पिऊन तत्त्वज्ञानाच्या गप्पा मारावयाच्या! ही गोष्टसुद्धा स्टोन विसरत नाही. पण सॉक्रेटीससारख्या सुप्रसिद्ध नागरिकाला हलाहल घेण्याची सक्ती करून तत्कालीन ग्रीस सत्ताधा-यांनी तेथील लोकशाहीला कायमचा बट्टा लावला हा स्टोनचा निष्कर्ष चुकीचा वाटत नाही. काही टीकाकारांच्या मते स्टोनने सॉक्रेटीसवर धार धरून त्याला थोडा अन्यायच केला आहे. पण त्याच्याच काही शिष्यांनी लोकशाहीला मूठमाती देऊन हुकूमशाहीचे तांडवनृत्य जेव्हा सुरू केले होते त्याच्याविरुद्ध सॉक्रेटीसने आवाज उठविला नाही व तो अशा प्रसंगी चुप राहिला ह्या गोष्टीचे स्टोनला अतोनात दुःख होते. स्टोनचे हे पुस्तक वादग्रस्त पण वाचनीय आहे ह्यात शंकाच नाही. त्याच्या काही निष्कर्षाबाबत मतभेद असू शकतील. पण त्याचे पांडित्य, ग्रीसप्रेम व तत्त्वनिष्ठा ह्याबाबत दुमत होणार नाही. पण हे पुस्तक म्हणजे फक्त सॉक्रेटीसच्या खटल्याचीच कथा नव्हे, तर त्या संदर्भात स्टोनने जागतिक विचारस्वातंत्र्याचा प्रश्नावर वाचकांच्या विचारांना चालनाही दिली आहे ही गोष्ट लक्षात ठेवणे जरूरीचे आहे.
पुस्तकाचे नाव: धी ट्रायल ऑफ सॉक्रेटीस
लेखक: आय. एफ. स्टोन
प्रकाशक: लिटल ब्राऊन अॅन्ड कंपनी, बॉस्टन.
वर्ष: १९८८. पाने: २८८. किंमत: १८ डॉलर्स व ९५ सेटस्.
पोस्ट ऑफीस बॉक्स ५१२३४
इरहॅम. नॉर्थ करोलायना, यु. एस. ए. २७७१७