प्रिय वाचक,
आजचा सुधारक गेली दहा वर्षे आपल्या मगदुराप्रमाणे पुरोगामी विचारांचा प्रसार-पुरस्कार करीत आहे. हा पुरोगामी विचार काय आहे नि काय नाही याचा थोडा ऊहापोह करू या. पुरोगामी – म्हणजे पुढे जाणारा. नुसता परिवर्तनशील नाही.
पण पुढे म्हणजे कुठे? ‘पुढे’ ही सापेक्ष कल्पना आहे. विवाद्य आहे. दिशा सापेक्ष. म्हणून आम्हाला अपेक्षित दिशा कोणती आहे, कोणती नाही याचा खुलासा केला पाहिजे.
आमची दिशा आहे मानवधर्माची, समतेची, न्याय्य व्यवस्थेची, व्यक्तिस्वायत्ततेची. याला आम्ही विवेकवाद म्हणतो. दिशा मानवधर्माची म्हणून आम्हाला विशिष्ट समूहाच्या धर्माच्या बंधनापलीकडे जाणे ही पुढची दिशा वाटते. उदा. हिंदू धर्माचे श्रुति-स्मृतिप्रामाण्य आम्हाला निरर्थक वाटते. पुराणे अंधश्रद्धांची कोठारे वाटतात. प्रतिगामी वाटतात. हिंदुधर्मात आणि तसा सगळ्याच संघटित धर्मात विषमतेची चलती नाना रूपांनी सांभाळली आहे. जन्मजात विषमतेमध्ये स्त्रियांचा दर्जा कायम दुय्यम. यावावतील जवळ जवळ सगळे धर्म सारखेच. हिंदुधर्मात आणखी अनेक विषमतांचे प्रस्थ माजवलेले आहे. आम्ही त्याच्या विरोधी आहोत. म्हणून आम्हाला मानवामानवामधील समता ही दिशा पुढची दिशा वाटते.
विषमतेला चिकटून राहिलेल्या हिंदु-समाजात फार मोठा दलित-वंचित समाज आहे. समाजरचनेमुळे शोषित झालेल्या या समाजाला नव्या युगात उठून उभे राहायला हात देणे आवश्यक आहे. म्हणून वरवर समताविरोधी वाटले तरी आरक्षण ठेवणे न्याय्य आहे. घरात लिटरभर दूध येत असेल तर आजारी, लहानग्यांचा त्यावर इतरांपेक्षा जास्त अधिकार आहे. ही न्याय्य व्यवस्था पुढची दिशा आहे. आपला समाज समूहसत्तावादी आहे. पारंपरिक हिंदुधर्म व्यक्तिवादी आहे. ज्याला ज्याची उपासना करायची असेल त्याला त्याची मोकळीक आहे. सर्व देवांना केलेला नमस्कार शेवटी एका केशवालाच पावतो हे उपासनास्वातंत्र्य व्यक्तिवादी आहे. पण समाजव्यवस्था अशी नाही. तिथे कुळासाठी एकाचा बळी द्यायला हरकत नाही. किंबहुना ते योग्य आहे. गावासाठी एका कुटुंबाचा, जनपदासाठी-जिल्ह्यासाठी गावाचा त्याग करणे योग्य आहे.असा आदर्श आमच्या समाजव्यवस्थेत रुजला आहे. त्यात बहुसंख्येच्या जुलुमासमोर दुर्बल अल्पसंख्यकाने मान तुकविली पाहिजे हा दंडक आहे. ही व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी आहे. सामाजिक शक्तीची आणि सामूहिक सक्तीची ही दांडगाई आहे. आम्ही तीविरुद्ध आहोत. वर सांगितलेल्या समतेच्या आणि न्यायाच्या तत्त्वाला धरून व्यक्तीला जेवढे स्वातंत्र्य घेता येईल तेवढे घेऊ द्यावे हिला आम्ही पुढची दिशा म्हणतो. मानवधर्म, समता, न्याय आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांकडे जाणे म्हणजे पुढे जाणे असे आम्हाला वाटते, पुरोगामीपणा वाटतो.
पुरोगामी विचारांना आणि अर्थात् आचारांना आपल्या समाजात अनेक अडथळे आहेत. आमच्या जीवनात श्रद्धा आणि परंपरा यांचा बडिवार फार आहे. शास्त्रवचनावर गाढ विश्वास आणि गुरुवचनावर अचल निष्ठा म्हणजे श्रद्धा. आमची धर्मशास्त्रे कालवाह्य झाली आहेत. ज्यांनी ती रचली त्यांना जे ज्ञान होते त्यापेक्षा आता ज्ञानात प्रचंड वाढ झाली आहे. सृष्टीच्या ज्ञानात आणि समाजविज्ञानातही. त्यांच्या समजुतीनुसार त्यांना इष्ट वाटणा-या गोष्टी त्यांनी धर्मात गोवल्या. त्याचे धर्मशास्त्र बनवले. त्या जशाच्या तशा घेणे वेडेपणा आहे.
गुरुमहिमा हे आमच्या संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण असावे. इतके की कबिरासारखे परखड बोल बोलणारे महात्मेही देवापेक्षाही गुरु मोठा मानतात. आपली संस्कृती श्रवणसंस्कृती होती. आजही आहे. लेखनसंस्कृती नव्हती. अक्षर-ज्ञान सुलभ आणि सार्वजनिक नव्हते. ग्रंथरचना अत्यंत सीमित होती. अध्ययन सीमित होते. सहस्रावधी वर्षे स्वप्रयत्नाने ज्ञान लभ्य नव्हते. ग्रंथलेखनपद्धतीही अल्पाक्षरप्रधान असे. मुख्य ग्रंथ मुखोद्गत करता येईल इतका लहान, सूत्रमय असे. मग त्यावर गुरूकडून भाष्य, भाष्यावर भाष्य असा कालाच्या प्रवाहात ग्रंथविस्तार झाला. ज्ञानभांडारे गुरूच्या मदतीवाचून जिज्ञासूंना उघडता येईनात. यामुळे गुरूचे माहात्म्य फार वाढले. गुरु सांगेल तो अर्थ. इतकेच नाही तर आमचा गुरु सांगेल तोच अर्थ प्रमाण. ही श्रद्धा.
शास्त्र-गुरुवचनांवर अटळ विश्वास ही श्रद्धा. आणि अशा श्रद्धावानालाच ज्ञान मिळते ही शिकवण. हा पुरोगामीपणाला मोठा अडथळा आहे. कशी ते पाहा.
दूरदर्शनच्या अनेक वाहिन्यांवर सकाळी ७ ते ८ बुवा-बापूंची प्रवचने असतात. गुरु-महाराजांच्या तोंडून न चुकता मांडला जाणारा मुख्य मुद्दा असतो गुरुमाहात्म्याचा. ही सूचकपणे केलेली स्वतःची बढाई कमी पडते म्हणून की काय मधून मधून आपल्या चमत्कारांची वर्णने. कोणा मुख्यमंत्र्याचे ऑपरेशन सुरळीत पार पडले, आपल्या सान्निध्याने. कोणा ७५ वर्षांच्या पाटलाला संतान लाभले आपल्या आशीर्वादाने. असे किस्से. शास्त्रांची शिकवण काय तर नाममहिमा. अजाणतेपणी, नकळत जरी हरि-नाम मुखातून निघाले तरी सद्गती. एक दुष्ट-दुरात्मा मेल्यावर आपण स्वर्गात कसे आलो या विचारात पडला तर उत्तर मिळाले, तुझ्या तोंडी अहोरात्र हरामखोर ही जी शिवी असे तिच्यात राम नाम आले. त्याचा प्रताप. दुस-या कोणा पापी पुरुषाला एकादशीच्या दिवशी उपवास घडला. नकळत. तरी पुण्याचा धनी होऊन तो विष्णुलोकात गेला. अशा कथा-अशी शास्त्रे. ‘राम’, हा शब्द उच्चारणाने शरीराच्या कोण-कोणत्या भागांना कसकसा ताण मिळतो आणि त्यामुळे कसा लाभ होतो असे शास्त्रीय विवेचन. हरिःॐप्रमाणेच हाँ, हीं अशा निरर्थक शब्दांचेही असेच फळ, वाट्टेल ते झाले तरी – सीझरीनसारख्या अनैसर्गिक उपायांनी प्रसूती करू नका. गायीचे शेण अमुक इतके आणि हरिनाम घ्या प्रसूती सुरळीत. मासिकपाळीतल्या स्त्रीने पुत्र-पति आणि भाऊ यांना स्पर्श करू नये, पतीशी संग करू नये केला तर पितृलोकातील त्याच्या पितरांचे पतन होते अशा काय काय कथा आमच्या शास्त्रांनी रचल्या आहेत. आमचे गुरु-महाराज त्या हजारो-लाखो श्रोत्यांना सांगून त्यांचा अहर्निश बुद्धिभेद करीत आहेत. हा प्रतिगामीपणा आहे. स्त्रियांची पातळी पुरुषाच्या खालची हा यांचा आवडता विषय. राजाचे मन कंजुषाचे धन, स्त्रीचे चरित्र आणि पुरुषाचे भाग्य देवालाही अनाकलनीय आहे मग मनुष्याचा काय पाड? (नृपस्य चित्तं, कृपणस्य वित्तं, स्त्रियश्चरित्रं, पुरुषस्य भाग्यम् । देवो न जानाति कुतो मनुष्यः?।।) ही आमच्या शास्त्रांची शिकवण, ती धर्मभोळ्या लोकांच्या मनावर ठसविली जाते. हा पुरोगामी विचारांना मोठा अडथळा आहे. विचार करा, डोके शाबूत ठेवा, डोळे उघडून पाहाआंधळेपणाने रूढीच्या मागे जाऊ नका हा विवेकवाद आहे. ह्या दिशेने चला. पुरोगामी व्हा हे आ. सु.चे सांगणे आहे.
* ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** *
आता थोडे व्यावहारिक हितगुज. वर्गणीदारांची संख्या नऊशेच्या वर गेली आहे. त्यात आजीव वर्गणीदार पावणेचारशे आले. आजीव वर्गणीदार होताना आ. सु.च्या आयुष्याबद्दल शंका बाळगू नये. दहा वर्षांची वर्गणी आजीव सदस्यता म्हणून आपण घेतो. समजा, अकस्मात् आ. सु.मध्येच बंद पडला तर आजीव सदस्याला दहातून उरलेल्या वर्षांची वर्गणी परत करू असे आश्वासन आम्ही देत आहोत. तरी या कारणाने मागे राहू नये. वर्गणी संपली की वेळच्या वेळी ती भरली न जाणे, लांबणीवर पडणे, विसरणे यांवर आजीव सदस्यता हाच उपाय आहे. मात्र सुधारक वाचला पाहिजे असे आपले मत असेल तरच.
आ. सु. ला आपल्याकडून प्रतिपोषणाची गरज आहे. अभिप्राय देत जावा. प्रतिकूल-अनुकूल कसाही असो. मार्मिक असेल तर इतर वाचकांसमोर यावा म्हणून प्रकाशित करू. आ. सु. शी ओळख झालेल्या लेखकांना विनंती की त्यांनी आम्ही सुचविलेल्या दिशेने केलेले आपले लेखन आम्हाला द्यावे. एक आणखी विनंती की, लेखाची छायांकित प्रत जवळ ठेवून लेखन धाडावे. अपेक्षेला न उतरणारे साहित्य परत पाठवण्याची व्यवस्था आमच्याकडे नाही. लेखासोबत स्वतःचा, प्रसिद्धीसाठी, संक्षिप्त परिचय धाडावा.
अकोल्याच्या वाचकमित्रांच्या बैठकीचा वृत्तान्त या अंकात आहे. मार्चमध्ये अमरावतीचे आमंत्रण आहे. एप्रिलमध्ये नासिकचे बोलावणे आहे. आम्ही आणखी अशा आमंत्रणांची वाट पाहत आहोत. आ. सु.चे दीर्घायुष्यच नाही तर विस्तार-प्रसार देखील तरुणांच्या सहभागावर अवलंबून आहे. गेली दहा वर्षे आजचा सुधारक वाचकांच्या वळावर चालला आहे. कोणतेही सरकारी दान-अनुदान न घेता, न मागता, जाहिरातींचा दरवाजा बंद ठेवून, लोकाश्रयावर सुधारक काम करीत आहे. या दशवर्षपूर्तिनिमित्त सर्व वाचकांचे, वर्गणीदारांचे, आजीव सदस्यांचे, लेखकांचे आणि हितचिंतकांचे आम्ही आभारी आहोत. कळावे,
आपला
प्र. ब. कुळकर्णी