प्राचीन आर्यसंस्कृति – २

पुराणांत व इतिहासग्रंथांतहि भाऊबहिणीच्या लग्नाचे उल्लेख आलेले आहेत. पुराणांत राजांच्या वंशावळी दिलेल्या आहेत. त्यांत राजाची राणी ही कोणत्या राजाची कन्या हे दिलेले असते. काही ठिकाणी पितृकन्या असा उल्लेख असतो, ती कन्या पितृलोकांतील असा अर्थ टीकाकार करतात, पण तो अर्थ बरोबर नाही. बापाची मुलगी हा खरा अर्थ आहे. म्हणजे लग्न सख्ख्या बहिणीबरोबर किंवा सावत्र बहिणीबरोबर झाले असेल.
पुराणांत अगदी जुना असा संबंध अंग व त्याच्या बापाची मुलगी सुनीथा यांचा आहे. यांचाच पुत्र वेनराजा. वेन हा पुराणांत तर प्रसिद्ध आहेच, परंतु वेदांतहि त्याचे नांव अनेकदा आलेले आहे. मत्स्यपुराणांत सुनीथेला पितृकन्या म्हटले आहे. पण पितृकन्या या शब्दाऐवजी मृत्युकन्या असा पाठ पद्मपुराणांत आढळतो. कांही टीकाकार पितरांच्या मानसकन्या असेहि म्हणतात. भाऊबहिणीचा संबंध समाजास नापसंत झाल्यावर या पूर्वीच्या इतिहासांत बदल करण्यासाठी पितृच्या ठिकाणीं मृत्यु व कांही काल्पनिक गोष्टी, जसे मानसकन्या, यांची योजना झाली आहे. पद्मपुराणावरून असे दिसते की या भावाशी संबंध करण्यास सुनीथाच उत्सुक होती. यमयमीच्या संवादांत यमीचा या कामी आग्रह होता, अच्छोदा व अमावसु, आणि नर्मदा व पुरुकुत्स, या जोड्यांचाहि संबंध बहीणभावांचाच होता व तेथेहि या संबंधांत पुढाकार बहिणींनीच घेतला होता. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. दनु व दिति या मूळच्या बहिणी कश्यपाच्या बायका होत्या. दनूचा मुलगा विप्रचित्ति व दितीची मुलगी सिंहिका. याप्रमाणे सिंहिका ही विप्रचित्तीची सावत्र व मावसबहीणही होती. पण या दोघांचे लग्न होऊन त्यांच्या वंशास दैत्यदानव किंवा सैहिकेय असे म्हणतात. दितीच्या वंशांत अनुल्हादाचा पुत्र वायु व कन्या सिनीवाली यांचा विवाहसंबंध वायु व ब्रह्मांडपुराणांवरून कळतो. ऋग्वेदांत ज्या यमयमीचा उल्लेख आहे, ती विवस्वताची मुलें होत. हा विवस्वत् विप्रचित्ति व सिंहिका याचा सावत्र भाऊ. विवस्वताचा दुसरा मुलगा मनु याची बायको श्रद्धा ही विवस्वताचीच मुलगी म्हणजे मनूची वहीण होय.
ऐल वंशातील नहुष राजा याची राणी बीरजा ही पितृकन्या म्हणजे बहीण होती व त्याचे पोटीं ययाति झाला. भृगुवंशांतील शुक्र उशना, हा ययातीचा सासरा झाला. त्या शुक्राची बायको गो किंवा गा नांवाची पितृकन्याच होती. त्यांची मुलगी देवयानी. गुरूची मुलगी म्हणजे बहीण अशी जी देवयानी, तिच्याशी लग्न करण्याला कचाने इनकार केला तेव्हा देवयानीने या लग्नासाठी गळ घातली. तिला यांत कांही गैर दिसलें नाहीं. कच, कबूल होईना तेव्हा तिने त्याला शाप दिला. कचाची सबब लंगडी अशी देवयानीची खात्री होती, कारण तिचे आईबापच सख्खे बहीणभाऊ होते.
कच अंगिरस गोताचा होता व या गोतांतील संयूचा दुसरा मुलगा भरत याने आपल्या तीन बहिणींबरोबर लग्न केले होते. यावरूनहि कचाचा इनकार बरोबर नसल्याने देवयानीस राग येणे साहजिक होते. गुरुबहिणीशीहि लग्ने केल्याची उदाहरणे आहेत. उद्दालकाचा शिष्य कहोड याने गुरूची कन्या सुजाता हिला बायको केली. तसेच शिष्याने गुरुपत्नीच्या ठायीं पुत्र उत्पन्न केल्याचेहि उदाहरण आहे. श्वेतकेतूचा जन्म अशाच रीतीने गुरुपत्नीच्या पोटीं शिष्यापासून झाला.
मांधाता हा एक प्रख्यात राजा होता. त्याचा आजा प्रसेनजित्. प्रसेनजिताची आई हैमवती दृषद्वती, तिचा बाप संहताश्व, त्याला मुलगे दोन, अक्षयाश्व व कृशाश्व. या उभयतांची पत्नी त्यांची बहीण हैमवती दृषद्वती. मांधात्याचा मुलगा पुरुकुत्स याने नर्मदा नांवाच्या बहिणीशी लग्न केले. सगराचा नातू अंशुमत् याने यशोदा नामक पितृकन्येशी म्हणजे बहिणीशी लग्न केले. त्यापासूनच दिलीप झाला आणि त्याचा मुलगा भगीरथ.
विश्वमहत् किंवा विश्वसह यानेहि यशोदा नांवाच्या आपल्या बहिणीशी लग्न केले. त्यापासून चौथ्या का पांचव्या पिढीस प्रख्यात दशरथ जन्मला. दशरथाची बायको कौसल्या, म्हणजे कोसलदेशराजपुत्री. दशरथाचा बापहि कोसलदेशचा राजा. तेव्हां कौसल्या दशरथाची सख्खी किंवा चुलत बहीण असेल. वहुतेक सख्खी वहीणच असावी.
रामायणांतील भरतासंबंधाची हकीकत बरीच विकृत आहे. राम हा बाप व आई या दोन्ही बाजूंनी इक्ष्वाकु वंशांतील म्हणून शुद्ध रक्ताचा असल्याने त्याचा वारसा अखेर कबूल झाला असावा व त्यास राज्याभिषेक होऊन राज्याधिकार मिळाला. भरत हा कैकेयीचा म्हणजे भिन्नवंशांतील स्त्रीचा पुत्र. बाकीचे दोघे सुमित्रेचे होते व ती वैश्य वर्णाची होती. (लक्ष्मण-शत्रुघ्न या?) दोघांनी दोन पूर्ण राजपुत्रांची सेवा स्वीकारली. कैकेयीने वर मागितल्यामुळे राम व सीता यांस वनवासास जावे लागले, हे रामायणांतील कारण विश्वसनीय दिसत नाहीं. भरत वयाने वडील असावा असे दिसते, पण त्याची आई दुस-या देशची राजकन्या. कौसल्येचा राम हा दोन्ही बाजूंनी शुद्ध रक्ताचा. दरबारांत कांही भरताचा व कांही रामाचा हक्क मानणारे होते. पण पहिल्यांचा जोर ज़ास्त झाल्याने राम व सीता या दोहोंसहि दूर जाणें सुरक्षितपणाचे वाटले असावे. रामाला यौवराज्याभिषेक करण्याचा विचार जाहीर करण्यापूर्वी भरताला त्याच्या मामाकडे केकय देशास पाठविले होते यावरूनहि वरील संशयास बळकटी येते.
बुद्धजातकांत कोसलदेशाविषयी पुष्कळ माहिती मिळते. त्यांत राम व सीता सहोदर भावंडे असून ती दंपतीहि होती, असे स्पष्ट वर्णिले आहे. बुद्ध हा स्वतः कोसल वंशांतील राजपुत्र असल्याने त्या वंशाला कमीपणा आणण्यासाठी बहीणभावांच्या संबंधाचा उल्लेख मागाहून घुसडला अशीहि कल्पना करण्यास जागा नाही. याशिवाय या बुद्धांच्या कथांत यापूर्वीच्या कालांतहि बहीण बायको असल्याचे अनेक दाखले आहेत.
सध्याचें रामायण हे काव्य आहे व यांत कवीने मूळच्या इतिहासांत पुष्कळच फिरवाफिरव केली आहे असे उघड होते. सीतेला रामायणांत जनकदुहिता म्हटले
आहे. पितृकन्या शब्दाचा हा पर्याय आहे. हा मूळचा संबंध, पण जनकाचा जनकवैदेह बनवून त्याला सापडलेली मुलगी असे कवीने लिहिले. परंतु अशा फिरवाफिरवीचा मागमूस अगदी नाहीसा होत नाहीं. रामायणाप्रमाणे सीता ही जनकाला सापडलेली मुलगी. जनकाला औरस मुलगी होती व त्याच्या भावाला दोन मुली होत्या. रामायणाप्रमाणे राम हा थोरला मुलगा राज्याचा अधिकारी, बाकीचे पोटगीचे मालक. औरस मुली धाकट्या भावांस देणे व पाळलेली मुलगी थोरल्या व राज्याधिकारी राजपुत्रास देणें हें व्यवहारास धरून नाहीं. कोणताहि बाप अशा प्रकारचे वर्तन करणार नाहीं. वास्तविक रामसीता ही दंपति व बहिणभाऊ होतीं, व दुसरा संबंध लपवण्याकरता तिला कवीने जनकाकडे घालविली, पण दंपति हा संबंध कायम ठेवला. येथे व्यवहार विसंगत झाला त्याला कवीचा नाइलाज.
बंगाली भाषेत ब-याच शतकांपूर्वी होऊन गेलेल्या एका कवीचे कवन प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. त्यांत प्रत्येक कडव्यांत रामाची स्तुति व निंदा श्लेषयुक्त भाषेने केलेली आहे. प्रस्तुत विषयापुरता त्यांतील भाग देत आहे.
जनम तोमार अतिविपुले । भुबनविदित अजेर कुले ।।
जनकदुहिता विबाह करी। ताहाते भाषाले यशेर तरी ।।
यांत अजेर=अजाच्या (रामाचा आजा अज, त्याच्या); पक्षीं बोकडाच्या.
जनक=जनक राजा; पक्षीं बाप दशरथ. भाषाले=हाकारली; पक्षीं दूर घालवली.
तरी=नौका,
एक अर्थ, तुझा जन्म विस्तृत अशा भुवनांत प्रख्यात असलेल्या अज राजाच्या कुलांत झाला, जनक राजाच्या मुलीबरोबर विवाह करून तू आपली कीर्ति पसरविलीस.
२ रा अर्थ, तुझा जन्म विस्तृत व जगास माहीत अशा बोकडाच्या कुलांत झाला, म्हणूनच तू बापाच्या मुलीबरोबर विवाह करून आपली कीर्ति घालविलीस.
अज हा रामाचा प्रसिद्ध पूर्वज नव्हे. त्यापेक्षा रघु फार प्रसिद्ध, म्हणून त्या वंशास पुवंश म्हणतात. पण रामाचा विवाह प्रचलित समजुतीच्या विरुद्ध असल्याने रामाला बोकडाची उपमा देता यावी म्हणून कवीने अज शब्दाचा प्रयोग श्लेषाने केला आहे. कवीला रामाची सीता बहीण होती ही माहिती असली पाहिजे.
कृष्णद्वैपायन व्यासाचा पुत्र शुक याचे लग्न पितृकन्या पीवरी इच्याशी म्हणजे बहिणीशी झाल्याचे पूर्वीच सांगितले आहे. याप्रमाणे ब्राह्मणवर्णीत असले विवाह होत असत याची दोन उदाहरणे आढळतात. आणखीहि अनेक असली पाहिजेत. ज्या ज्या ब्राह्मणांचा क्षत्रियांशी निकटचा व महत्त्वाचा संबंध आला त्यांचाच उल्लेख पुराणांत व इतिहासांत येणे साहजिक, बाकीच्यांची नोंद कोण करणार?
पुढील महत्त्वाचे उदाहरण द्रुपदाचे आहे. त्याची महिषी पृषती किंवा पार्षती नांवाची होती. द्रुपद हा पृषताचा पुत्र असल्याने त्यास पार्षत असेहि म्हणत. खुद्द द्रौपदीलाही पार्षती, पार्षतस्य स्वसा, म्हणजे पार्षत धृष्टद्युम्न याची बहीण असे कांही ठिकाणी म्हटले आहे. यावरून द्रुपद हा पार्षत व त्याची पत्नी पार्षती हीं वहीणभावंडे असून ती त्याची महिपीहि होती. यदुवंशांतहि सत्राजित् भजमान सुंजया वगैरे बहीणभावांच्या विवाहाची उदाहरणे आहेत.
भारती युद्धाचा काल ख्रिस्तपूर्व १००० वर्षांचा धरल्यास त्यानंतरच्या काळांत पुराणांतील वंशावळींत बहिणीशी लग्न केल्याचा दाखला आढळत नाही. याचे कारण यापुढे पुराणे रचण्याचे काम सूतमागधांकडून ब्राह्मण पुराणिकांनी आपणाकडे घेतलें व संस्कृतांत त्रोटक हकीकत म्हणजे राजांची नांवे व वंश इतकेच देण्याचे केलें. त्यामुळे त्यांच्या राण्यांचा उल्लेख क्वचितच येतो. पण असे संबंध होत असले पाहिजेत. कारण ख्रिस्तपूर्व ६ व्या व ७ व्या शतकांतील इतिहास बौद्धग्रंथांत आहे, त्यांत बहिणीशीं व इतर जवळच्या नात्याच्या स्त्रियांशी झालेल्या संबंधाची माहिती मिळते. या जातकांत बुद्धपूर्वकालीन राजांचाहि सुसंगत इतिहास आलेला आहे. बुद्धजातकांत पुढील कथा आहे.
कोसलराजाची राणी गर्भवती असतां काशीराजाने त्याचा पराभव केला व राणीला आपल्या जनानखान्यांत नेले. तेथे तिला जुळी मुले, कृष्णा व धृष्टद्युम्न अशी झाली. राजकन्या म्हणून कृष्णेला वाढविले. मुलगा धृष्टद्युम्न याला आईने गुप्त रीतीने दूर पाठविले. पुढे तिला काशीराजापासून एक मुलगी झाली. धृष्टद्युम्न व ही त्याची सावत्र बहीण यांचे प्रेम जमले व त्याची ओळख पटल्यावर त्यांचे लग्न लागले.
गौतमबुद्धाच्या वेळचीच एक गोष्ट जातकांत वर्णिली आहे. गौतमबुद्ध हा शाक्य वंशाचा. शाक्य ही इक्ष्वाकु वंशाची एक शाखा. कोलिय म्हणून दुसरा वंश होता, त्यांचे व शाक्यांचे भांडण झाले, त्यांत त्यांनी शाक्य हे बहिणीशीं समागम करतात म्हणून ते हलके, अशी निंदा केली. शाक्यांनी उत्तर दिले, आम्ही बहिणीपासून संतति उत्पन्न करतों खरे आहे, म्हणूनच आम्ही कोलियांपेक्षा पराक्रमी आहों.
ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापासून पार्स देशांतील आर्य जास्त जास्त आर्यावर्तीत येऊ लागले व तिकडील राजदरबारच्या चालीरीति इकडील दरबारी मंडळी उचलू लागली. इराणांत बहिणीबरोबर लग्न करण्याची चाल होतीच, तशी ती मिसर देशांतहि होती.
बुद्धकालांत पुष्कळ शतकेंपर्यंत बहिणीवरोबर लग्न करण्याची चाल चालू असली पाहिजे. कारण श्याम (सयाम) देशचे राजे हिंदीसंस्कृतीचेच, बौद्धधर्मी सूर्य कुलांतील आहेत. त्या घराण्यांत अगदी अलीकडेपर्यंत राजघराण्यांत बहिणीला पट्टराणी करण्याची चाल होती. ब्रह्मदेशच्या राजघराण्यांतहि अशीच चाल होती, अशी साक्ष इतिहास देतो.
पुराणे, वेद व बौद्धग्रंथ यांवरून फार पूर्वीपासून अगदी अलीकडच्या कालापर्यंत भगिनीशी संबंध मान्य होते व आचारांत होते. या संबंधापासून झालेली संतति पराक्रमी होते असे शाक्यवंशीय पुरुष प्रतिपादीत. मि. लुडोविची हीच गोष्ट आज इंग्लंदात प्रतिपादीत आहेत.
ज्या समाजांत बहिणीशी लग्न करण्याचा रिवाज होता, त्यांत सगोत्र विवाहाचा निषेध शक्य नाहीं. सगोत्राचे बंड अगदी अलीकडचे दिसते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.