१. ६ जानेवारीला पुण्याला झालेल्या सुधारक-मित्रमेळाव्याचा वृत्तान्त या अंकात आहे. तो सविस्तर आहे असा आमचा दावा नाही. मुख्य पाहुणे आणि अध्यक्ष यांच्या भाषणातला आणि दुस-याही वक्त्यांच्या बोलण्यातला प्रशंसेचा भाग गाळला आहे. सूचना, टीका-टिप्पणी यांना प्राधान्य दिले आहे. साधनाचे संपादक श्री नरेन्द्र दाभोलकर आणि सुधारकचे चाहते-वाचक श्री. प्रकाश व मंजिरी घाटपांडे यांच्या भरीव सहकार्यामुळे हा मेळा शक्य झाला. तसेच ज्यांचा नामोल्लेख आम्ही केला नाही अशाही अनेकांच्या मदतीचा जेवढा उपयोग झाला तेवढाच त्यांच्या उपस्थितीचाही झाला. या सर्वांचे आभार.
यावेळी काही गोष्टी करायच्या राहून गेल्या. उदा. उपस्थित वाचकांचे फोन नंबर, इ-मेल-पत्ते घ्यायचे राहून गेले. मेळाव्या आधी पुण्याच्या वृत्तपत्रात आ. सु. संबंधी परिचयलेख आले असते तर थोडी प्रसिद्धी मिळाली असती. असे परिचयपर साहित्य एकदोन मित्रांकडे धाडले होते पण ते पुरेसे आधी त्यांच्या हाती पडले नाहीत म्हणून तसे लिखाण होऊ शकले नाही. पुढच्या वेळी अधिक पूर्वतयारीने असला मेळावा घडवू. आ. सु.ची प्रसिद्धी नातेवाईकांमध्ये आणि मित्रांमध्ये व्हावी म्हणून आनंदाच्या प्रसंगी त्यांनी भेटीदाखल वर्षा-दोनवर्षांची वर्गणी भरून आ. सु. त्यांच्या नजरेस आणावा – ही डॉ. मधुकरराव देशपांडे यांची सूचना हितचिंतकांनी अमलात आणून पाहण्यासारखी आहे.
आ. सु. कोणासाठी आहे? जे वाचतील त्यांच्यासाठी, हे उत्तर पुरेसे नाही. कोणी वाचावे असे आम्हाला वाटते याबद्दल थोडासा खुलासा केला पाहिजे. जे बनचुके आहेत त्यांच्यासाठी की जे काठावर आहेत त्यांच्यासाठी? म्हाता-यांसाठी हे मासिक आहे हे म्हणणे बरोवर नाही. तसे असते तर कच्च्या आहाराचा प्रयोग ह्या लेखा भरपूर प्रतिसाद आला असता. म्हाता-यांनी ते चालवले आहे हे म्हणणे दूषण ठरू नये. आमच्याजवळ वयःस्तंभिनी विद्या नाही. वय वाढले तरी समाजाच्या सुखाचा जो विचार आपल्याला सुचतो तो लोकांना सांगावा, युक्तीच्या चार गोष्टी सांगाव्या यात वयाचा अडथळा का यावा? सर्वेऽपि सुखिनः सन्तु। हा विचार नाही तरी प्रौढ वयातच सुचणारा असतो. शिवाय वार्धक्य हा मनाचा गुण आहे. तरुणपणीच जीर्णमताला कवटाळून बसतात ते खरे वृद्ध.
मासिक म्हातारे आहे हे म्हणणे तर निखालस चूक. येत्या मार्च मध्ये आम्ही १० वर्षे पूर्ण करू. सुखाचा अधिकार सर्वांना सारखा आहे. स्त्रिया-दबलेले वर्ग, शिकलेले, न शिकलेले असे सर्व सुखाला सारखेच पात्र आहेत. हे म्हणणे ज्यांना विचार करण्यासारखे वाटत असेल ते सर्व, लहानथोर आमचे संभाव्य वाचक आहेत. सुखाच्या अधिकाराइतकेच, ते संपादन करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. हेच व्यक्ति स्वातंत्र्य. आपल्या इतकीच दुस-याच्या हक्काची जाणीव ठेवणे हाच एक सामाजिक निबंध आणि सुख म्हणजे इहलोकीचे सुख–या विचारसरणीत ज्याला स्वारस्य वाटेल तो आमचा वाचक मग तो बुद्धिवादी असो नसो.
२. वेद-स्मृति-धर्मशास्त्राच्या नावावर साध्या साध्या सुधारणांना विरोध झाला आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी, १९ मार्च १८९१ रोजी संमतिवयाचा कायदा पास झाला. पत्नी बारा वर्षांपेक्षा लहान असू नये. नव-याला (अशा) बालवधूश। समागमाची बंदी या कायद्याने करण्यात आली. हे बिल ९ जाने. १८९१ रोजी कलकत्त्याच्या कायदेमंडळात मांडले गेले तेव्हा १५ सभासद हजर होते. त्यांतले १५ गोरे होते. चार भारतीयांत २ मुसलमान आणि २ हिंदू. हिंदूंपैकी रावबहादूर नूलकर हे या कायद्याचे समर्थक होते. दुसरे हिंदुसदस्य सर रोमेशचंद्र मित्र हे विरोधक होते. बंगालमधील धर्मपरायण हिंदुलोक पाराशरस्मृती मानत. रोमेशचंद्रांचे म्हणणे असे की रघुनंदनाचार्यांची टीका आम्ही प्रमाण मानतो. त्या टीकेप्रमाणे स्त्रीस ऋतु प्राप्त झाला की पतीने तिला पाचव्या दिवशी संभोग दिलाच पाहिजे. भारतासारख्या उष्ण प्रदेशात १२ वर्षांपेक्षा लहान मुलीलाही नहाण आल्याची उदाहरणे आहेत. म्हणून १२ वर्षांची अट घालणे आमच्या धर्माचरणात लुडबूड करणे होईल. धर्मशास्त्राप्रमाणे नव-याने आपले कर्तव्य पार पाडले नाही तर ते पातक ठरते.
सर रोमेशचंद्रांची हरकत बाजूला सारून कायदा पास झाला खरा, पण त्या आधी १८९० साली १० वर्षांच्या फुलमणीला आपले प्राण गमावावे लागले होते. तिचा नवरा हरिमोहन तीस वर्षांचा होता. त्याने आपल्या सासरी फुलमणीवर केलेल्या अत्याचारामुळे रक्तस्राव होऊन ती त्यात मरण पावली. कोर्टात खटला गेल्यावर त्याचे वागणे धर्मशास्त्राला धरून आहे असा बचाव करण्यात आला होता, तो मान्य होऊन मनुष्यहत्येच्या गुन्ह्याऐवजी निष्काळजीपणाने केलेली इजा एवढ्या किरकोळ गुन्ह्यासाठी असणारी शिक्षा होऊन तो सुटला. तोवर अशा बालिकावधूवर अत्याचार झाल्याचे ४० गुन्हे सिद्ध झाले होते.
या प्रकरणी सर रोमेशचंद्रांनी घेतलेल्या भूमिकेला पुराणांचा आधार आहे. मार्कण्डेय पुराणात विपश्चित् नावाच्या राजाची कथा आहे. हा विद्वान् आणि राजधर्माचा पालन करणारा राजा नरकात कसा आला असे त्याला विचारले गेले तेव्हा असे उघड झाले की प्रथम रजोदर्शन झालेल्या आपल्या एका पत्नीला संभोग देण्याचे कर्तव्य पार पाडण्यात तो चुकला होता. म्हणून त्याला नरकवास घडला. (मार्कण्डेय पु. १५-४५-८०)
अस्पृश्यांना मंदिरप्रवेश करू द्यावा याला धर्मशास्त्रात काही आधार मिळतो काय ते पाहावे म्हणून महात्मा गांधींनी येरवड्याच्या तुरुंगात असताना शास्त्रार्थ करण्यासाठी विद्वान ब्राह्मणांना बोलावले. सुधारणावादी पक्षाचे नेते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. सनातनी पक्षाचे धुरीण काशीचे राजेश्वरशास्त्री द्रविड हे महापंडित होते. भरपूर शास्त्रार्थ झाला. शेवटी सनातनी मताचा जय होऊन अस्पृश्यांना मंदिराची कवाडे बंदच राहिली. (१९३२)
हिंदु कोडबिलाने आमच्या धर्मात हस्तक्षेप होतो असे म्हणणारे सनातनी पंडित स्त्रीला, कन्येला वारसा हक्क नसावा या मताचे होते कारण काय तर (पिंड दत्वा धनं हरेत् ।) पिंडदान करणारेच पित्याच्या धनाचे अधिकारी होत हे शास्त्रमत सांगत. कन्येला पिंडदानाचा अधिकार द्यावा असे या धर्माभिमानी विद्वानांना काही वाटले नाही. ही १९५६ ची स्थिती. ।
आजही पत्रिका जुळल्याशिवाय लग्न न ठरविणारे काय कमी आहेत? पत्रिका पाहून केलेली लग्ने आणि न पाहता केलेली लग्ने आणि त्यांची परिणती ही सर्वेक्षण करण्यासारखी गोष्ट आहे. यावरून सध्या वेद, मनुस्मृती यांना कोणीही विचारत नाही ही प्रा. के. रा. जोशी यांची समजूत किती लटकी आहे हे दिसून यावे.
३. पुण्याच्या मित्रमेळाव्यात एक सूचना अशी आली की आ. सु. चा टाईप मोठा करावा. तसे केल्यास पानांची संख्या बरीच वाढेल. परिणामी उत्पादनखर्च वाढेल आणि किंमतही. ही सुधारणा अकराव्या वर्षापासून म्हणजे एप्रिल २००० पासून करता येईल. तसे झाल्यास वाचक सहकार्य देतील अशी अपेक्षा आहे.