१९९९ च्या निवडणुका झाल्या, आणि आता त्याबाबत चर्चा चालू आहे. या निवडणुका वारंवार घ्याव्या लागतात आणि त्यामुळे राष्ट्राच्या जनतेवर खर्चाचा बोजा टाकला जातो असे म्हटले जाते.
परंतु भारताचे एकूण उत्पन्न दीड लाख कोट रुपये आहे व त्यापैकी फक्त एकहजार कोट निवडणुकीवर खर्च होतो. यापेक्षा कितीतरी अधिक खर्च मंत्र्यांच्या राहणीसाठी, मोटारीसाठी, विमानासाठी आणि अनेक पुढा-यांच्या सुरक्षा-व्यवस्थेसाठी खर्च होतो. तसेच, अणुबॉम्बसाठी पंधराहजार कोट खर्च केले आणि पाकिस्तान घाबरले नाहीच!
या निवडणुकीच्या काळात पंधरा दिवस अनेक तरुण बेकारांना रोजीरोटी मिळते आणि त्यांचे हे दिवस आनंदात जातात.
दुसरा असा प्रश्न आज समाजापुढे आला आहे की, तरुण वर्ग जसा शिवसेना भाजपकडे आकर्षित होतो, तसा तो काँग्रेस किंवा साम्यवादी पक्षांकडे आकर्षित का होत नाही?
त्याचे मुख्य कारण असे आहे की, आजचा तरुण वर्ग बहुतांशी वैद्यक, अभियांत्रिकी, व्यापार आणि तंत्रज्ञान शिक्षणाकडे वळतो, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र याकडे जाणारे विद्यार्थी टक्केवारीने फारच कमी आहेत. त्या विचारांचे वाचन आणि मनन पुढारीहि करताना दिसत नाहीत.
आरक्षणाबाबत आंदोलन करणा-या पुढा-यांना हे माहीत आहे का, की, डॉ. आंबेडकरांना लंडन विद्यापीठाच्या अर्थशास्त्राच्या दोन पदव्या होत्या आणि डॉ. आंबेडकरांचे अर्थविषयक विचार अंमलात आणण्यासाठी आंदोलन केल्यानेच समाजाचा जास्त फायदा होणार आहे.
शेअर बाजाराचा निर्देशांक वाढला याचा अर्थ देशाचा विकास वा उन्नति झाली असा नसतोच; किंबहुना त्या त्या कंपनीलाहि लाभ होत नसून त्या त्या व्यक्तीचाच फक्त फायदा होतो. दरडोई उत्पन्न व त्याला मिळणारी सकस आहार यामध्ये वाढ झाली तरच राष्ट्र प्रगति-पथावर आहे असे म्हणता येईल.
पंतप्रधान श्री. वाजपेयी यांनी I. A. S. च्या संघटनेपुढे २९ मार्च १९९९ रोजी भाषण करताना पं. नेहरूंचे २९ मार्च १९५४ चे विचार मांडले होते. दुस-या कोणत्याहि अर्वाचीन विद्वानाचे विचार श्री. वाजपेयींना मांडावेसे वाटले नाहीत. पं. नेहरूंनी जनतेची मनोवृत्ती वैज्ञानिक करण्याचा उद्घोष केला होता. असे केल्यानेच समाज बदलेल.
पं. नेहरूंचे “सोसायटी अँड सायन्स” या त्रैमासिकातील विचार वाचले तरी त्यांच्या बुद्धिमत्तेची झेप ध्यानात येईल. डॉ. आंबेडकरांनी घटनेच्या कलम ५१ ए एच् – यामध्ये याचाच उल्लेख केला आहे. त्याच्या आधाराने समाजाला विचारी वनविले पाहिजे.
परंतु तसे न करता समाजाच्या भावना भडकवून तात्कालिक फायद्यासाठी त्यांना गणेशोत्सव, डिस्को दांडिया, मराठी अस्मिता, यात गुंगवून ठेवणे राजकीय पक्षांना सोपे जाते. व पुढारी तेच करत असतात. चंगळवादी वस्तूंच्या मुबलकतेने व्यक्ति आत्मकेंद्रित होते. तसेच सामान्य जनतेला वैचारिक वाङ्मय वाचण्याची गोडी नसतेच आणि चिंतन वा विचार करणे तर आवाक्याबाहेर असते. म्हणूनच चटकन् भावनेच्या आहारी जाऊन मतदान करतात. परंतु ज्यावेळी ग्रामीण जनतेला वीज, पाणी, रस्ते व रोजीरोटी याबाबत चिमटा जाणवेल तेव्हा ते बंड करून उठतील. आणि म्हणून जनतेला विचारांची योग्य दिशा दाखवणे हे पुढा-यांचे कर्तव्य आहे.