धर्मग्रंथांचा विज्ञानाशी मेळ घालताना सनातन लोक तारेवरची कसरत कशी करतात याचे उदाहरण. ईश्वराने ६ दिवसांत जग निर्माण केले आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली असे बायबलात सांगितले आहे. आणि अशा प्रकारे विश्व ३ हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आले असेही ते म्हणते. आता शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीचे वय कोट्यवधी वर्षांचे आहे. ते मानले पाहिजे. पण मग बायबल मधील विसंगती दिसेल आणि त्याचे माहात्म्य कमी होईल. म्हणून १९०९ साली एक ख्रिस्ती तज्ज्ञांची समिती बसवण्यात आली. त्यांनी निकाल दिला की ‘दिवस’ या शब्दाचा नेहमीचा अर्थ म्हणजे ‘२४ तास’ असा न घेता ‘दिवस’ म्हणजे ‘अनिश्चित काळ’ असा घ्यावा. मग ६ दिवसात कोट्यवधी वर्षे सहज बसवता येतील.
आता, ईश्वराने ६ अनिश्चित कालखंडात जग उत्पन्न केले आणि सातव्या अनिश्चित कालखंडात त्याने विश्रान्ती घेतली, याचा काही अर्थ होतो का?
शिवाय, दिवस म्हणजे अनिश्चित काळ म्हटले तर रविवार सातवा दिवस कसा?
बह्मदेवाचा दिवस’ ही कल्पनाही अशीच आहे. मनुष्याला भाषा वापरून ज्ञान द्यायचे-घ्यायचे तर शब्दांचे अर्थ आपल्या सोयीने बदलणे योग्य नाही.
यज्ञातली ‘हिंसा’ ‘अहिंसा’ असते हे अनुशासन असेच फोल आहे.
‘नावात काही नाही’ शेरखान शिकंदरखान
एका मुसलमानी कॉलेजात शेरखान शिकंदरखान नावाचा एक विद्यार्थी नियम मोडून नमाज पढायला जात नसे. तेव्हा प्राचार्यांनी त्याला विचारले की गैरहजर राहून उगीच तु दंड का भरतोस? तेव्हा तो म्हणाला, मी हिंदू आहे. नमाज पढायला कसा जाऊ? प्राचार्यांनी त्याचे नाव वाचून म्हटले, तुझे नावच सांगते की तू मुसलमान आहेस. त्यावर विद्यार्थी म्हणाला, आमच्या प्रांतात कोणत्याही सभ्य माणसाच्या नावाशेवटी खान’ हे उपपद लावतात. मग तो हिंदू असो की मुसलमान, माझे नाव शेर खान आहे हे कबूल पण शेर म्हणजे वाघ आणि वाघाला धर्म कुठला? वडिलांचे नाव ‘शिकंदरखान’, त्यातला शिकंदर हा महंमदापूर्वी होऊन गेलेला वीर पुरुष. तो मुसलमान असणे शक्य नाही. मग माझ्या नावावरून मी मुसलमान कसा?
अनेक देव फायद्याचे
हिंदुधर्माच्या बाजूने एक गोष्ट सांगतां येण्यासारखी आहे. ती अशी की एकच सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान ईश्वर मानण्यांत ज्या अडचणी उपस्थित होतात आणि ईश्वरावर क्रूरतेचे, अज्ञानाचे वगैरे आरोप येतात, तसे अनेक देव मानल्याने येत नाहीत. कारण अनेक देव असले म्हणजे त्यांचे आपआपसांत भांडण लावून दिल्याने बरयाच गोष्टींचा उलगडा करता येईल. अर्थात् तो उलगडा देवांच्या इतकाच काल्पनिक असणार, पण तर्कदृष्ट्या अनेक देवांची कल्पना अधिक सयुक्तिक दिसते.