परामर्शासाठी दिवाळी अंक आलेले आणि आणलेले विपुल आहेत. आलेल्या अंकांची पोच स्वतंत्रपणे दिली आहे. निवडक साहित्याचा परामर्श घ्यायचा म्हटले तरी एक लेख पुरणार नाही. परामर्शाचा एक अंश म्हणून या लेखाकडे पाहावे.
दर्जेदार दिवाळी अंक देण्याची परंपरा ‘मौज’ने कायम राखली आहे. मुखपृष्ठ गेल्या पिढीतले विख्यात चित्रकार त्रिन्दाद यांनी केलेले दुर्मिळ पोर्टेट आहे. जोडीला त्याचे सुधाकर यादव-कृत रसग्रहण वाचले की आस्वादनात भर पडते. समाजातल्या समस्यांचा गंभीरपणे ऊहापोह करणारे तिन्ही लेख लक्षणीय आहेत. त्यात स. ह. देशपांडे आहेत.
हे तीनही लेख खूप माहितीपूर्ण आणि तरीही रोचक आहेत. वास्तविक माहितीने भरलेले लेख किचकट अन् नीरस वाटण्याची शक्यता जास्त. परंतु या लेखांच्या बाबतीत तसे झालेले नाही. कारण अभ्यासाची सखोलता आणि शैलीची सहजता आणि दुसरे म्हणजे त्यांत नुसती अनावश्यक माहिती नाही तर एक विचारप्रवणता आहे. ब्रिटिशांनी घालून दिलेली जमीनमोजणी आणि महसुलीची काटेकोर पद्धत, काळानुरूप त्यात येत जाणा-या त्रुटी, अंमलबजावणीतील दोष व त्यातून बोकाळणारा भ्रष्टाचार याचे सुरेख चित्रण ‘जमाबंदीची शतकपूर्ती’ या लेखात आहे. सरकारी धोरण व त्याची अंमलबजावणी याबाबतीत ब्रिटिश आमदानीतील व आपल्या पद्धतीत येणारी तफावत यावर चांगला प्रकाश पडला आहे. त्याच प्रकारची दलितांच्या जमिनीच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने केलेली हेळसांड ‘सरकार नावाची भिंत’ या लेखात दिसते. ‘बालशिक्षण आणि मी’ या लेखात ३ ते ६ वयोगटातील बालकांचे शिक्षण कसे नैसर्गिक प्रक्रियेला धरून स्वयंशिक्षण प्रकारचे हसतखेळत झाले पाहिजे व त्यासाठी अत्यंत सोप्या पद्धती कशा अवलंबिता येतील याचे हृद्य चित्रण आहे. त्यामुळे तीनही लेख विचार करायला लावतात. लेखक वेगवेगळ्या पण विशिष्ट घडामोडीचा सूक्ष्म तपशिलांसह इतिहास तर सांगतातच, पण ते स्वतः त्या घडामोडीशी इतके जवळून संबंधित आहेत की त्यांच्या कथनात अनुभवाचा जिवंतपणा जाणवतो.
ललित लेख स्वभावतःच रंजक आणि खुमासदार असायला हवेत. तसे या अंकातील ललित लेख आहेत. सातांपैकी पाच लेख आत्मचरित्रात्मक आहेत आणि त्यातील तीन लेखकांच्या आई किंवा वहिनी या रूपातील जुन्या काळातील घरगुती स्त्रीच्या मानसिकतेचे पदर हळुवार उलगडून दाखविणारे आहेत. त्या स्त्रियांच्या अनाकलनीय निष्ठा, परिस्थितिशी जुळवून घेण्याची लवचीकता, मुलांवर सहज संस्कार करीत जाण्याची हातोटी आणि स्वतःबद्दल व स्वतःच्या दुःखांबद्दल चकार शब्दही न काढण्याची त्यांची वृत्ती लेखकांनी मार्मिकतेने उभी केली आहे. पण त्यात आपण आपल्या आईला वा वहिनीला पुरतेपणी ओळखलेच नाही, तिची थोरवी आपल्याला आकळता आली नाही ही लेखकाला वाटणारी चुटपूट विशेष भावते. ‘पुनरागमनाय च’ हा महेश एलकुंचवारांचा ललित लेख या प्रकारचा आहे. ते एक सिद्धहस्त लेखक आहेत याची प्रचीती हा लेख वाचून येतेच. परंतु त्यातील त्यांचे आत्मचिंतन मनाचा ठाव घेतल्यावाचून राहत नाही. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे घटनांतील अनुभवकंद कालातीत करून अकलंकित स्वरूपात मांडणे ही सिद्धी आहे. त्याला कलात्मक बल लागते. अशा कलात्मकतेचा आस्वाद त्यांच्या या लेखातून पुरेपूर मिळतो. पठार आणि खाणी’ या अनिल अवचटांच्या ललित लेखातून पर्यावरणप्रेमी मंडळींची निसर्गाविषयीची आस्था, पर्यावरणावर निश्चितपणे होणारे परंतु वरवर न जाणवू दिलले आक्रमण आणि पर्यावरणाबाबत आक्रमणकत्र्याची व सरकारची अनास्था याचे हुबेहूब दर्शन घडते. अवचटांची सहजसुंदर भाषा वाचकाला त्या परिसरातच घेऊन जाते अन् प्रत्यक्ष प्रत्ययाचा आनंद देते. ‘खेळ रेषावतारी’ हा त्याच्या विषयाप्रमाणेच हलका-फुलका अन् प्रसन्न लेख आहे. वसंत सरवटे यांनी आपल्या व्यंग्यचित्रांचे प्रदर्शन भरविले अन् ते अपेक्षेपेक्षा यशस्वी झाले याचा आनंददायक अनुभव ते वाटून देत आहेत. या प्रदर्शनांतून त्यांना प्रेक्षकांशी भेट संपर्क साधता आला. प्रेक्षकांशी चित्रे बोलली आणि चित्रकाराशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया बोलली.
प्रिया तेंडुलकरांची ‘मा’ ही कथा वगळली तर वाकी कथा आणि लघुकादंबरी-तिला दीर्घकथा म्हणायला हरकत नाही तितक्या कसदार नाहीत. ‘मा’ ही कथा वुवावाजीवर विलक्षण कोरडे ओढणारी आहे. मारून मुटकून माताजी बनलेली मंदा स्वार्थासाठी ते ढोंग तसेच चालवते. पण त्याची जेव्हा लक्तरे होऊ लागतात, तेव्हा सैरभैर होते व त्यातच तिचा करुण अंत होतो. बुवाबाजी अंधश्रद्धेला पोसते की अंधश्रद्धा वुवाबाजीला पोसते हा एक अनुत्तरित प्रश्न या कथेतून उद्भवतो आणि अंतर्मुख करतो. विजया राजाध्यक्षांची ‘आधी … नंतर’ ही कथा अमेरिकेतील शिक्षण या प्रतिष्ठेच्या नवीन कल्पनेला धक्का देणारी आहे. एक उच्चभ्रू आई हट्टाने आपल्या तरुण मुलीला अमेरिकेला शिकायला पाठवते अन् तिथे तिचा हृदयद्रावक आणि संशयास्पद मृत्यू होतो. त्यामुळे तिची आई वरवर कितीही प्रतिष्ठेचा आव आणीत असली तरी आतून पुरती खचून गेलेली असते. पण हा कथाभाग उगीच लांबवला आहे. लेखिका कसलेल्या म्हणून समर्पक वर्णने करतात. तरी कथा कंटाळवाणी होत जाते. अशीच कंटाळवाणी होणारी कथा ‘यंत्र’ ही आहे. रामदास भटकळांची ‘वा’ ही कथा महात्मा गांधी व कस्तुरबा यांच्या जीवनावर आधारलेली, पण त्यात नावीन्य काहीच नाही. ‘राहीच्या स्वप्नांचा उलगडा’ ही दीर्घकथा लांबलचक आहेच. पण तीत एक गूढरम्य वातावरण निर्माण करण्याचा लेखकाने प्रयत्न केल्यामुळे वाचकाचे कुतूहल चाळवून कथेची लांबी जाचत नाही. परंतु अशा गूढरम्य कथेचा शेवट तितकाच चटकदार असावा लागतो. नाहीतर सारा वार फुकट जातो. असेच काहीसे या कथेचे झाले आहे. स्वप्ने सत्यात उतरतात, पण ती उतरवावीही लागतात ही कथेतील मध्यवर्ती कल्पना, आणि आपल्याला पडणा-या स्वप्नाचा शोध घेत राही सत्यापर्यंत पोहोचते हा कथाभाग. कथा स्वप्नात घडल्याप्रमाणे तरल आहे आणि सर्व पात्रे धुक्यात वावरल्याप्रमाणे धूसर आहेत. त्यांचा नीट परिपोष झाला नाही, तरी कथा शेवटपर्यंत वाचत जावीशी वाटते.
‘अक्षर’ दिवाळी अंक ९९
‘अक्षर’ चांगला आहे. वैविध्यानं नटलेला आहे. अंकांचं मुखपृष्ठही सरत्या व येत्या दोन्ही शतकांची नाळ एकच असते असे दाशविणारे अर्थपूर्ण आहे. ते अर्थात् सुंदर म्हणता येणार नाही. विषयाचीही विविधता चटकन लक्षात येते. ‘नंबरदार का नीला’ हा उर्दू कादंबरीचा अनुवाद एका नीलगाईच्या बछड्याची खुसखुशीत कहाणी ऐकवितो, तर ‘डॉ. बंबाई नावाचं वादळ’ हा लक्ष्मण लोंढेनी दिलेला समुद्रसफरीचा सत्य वृत्तान्त एका वेगळ्याच थरारक वातावरणात नेतो. समुद्रावरील अपघातात माणूस भीतीने जास्त करून मरतो. वास्तविक माणसाला जगविण्यासाठी समुद्राजवळ अन्नपाणी भरपूर आहे हा आपला सिद्धांत खरा करून दाखविण्यास निघालेले डॉ. वंबार्ड कसकशा प्रसंगांतून जातात हे वाचण्यासारखे आहे. ‘वॉरन हेस्टिंग्जचा सांड’ हा मूळ हिंदी दीर्घकथेचा अनुवाद, त्यात इतिहास बेताचा असला तरी, ऐतिहासिक कहाणीचा आभास उत्पन्न होतो.
विजय तेंडुलकरांनी दिवाडकरांचे रेखलेले शब्दचित्र अप्रतिम आहे. ‘चौकटीबाहेरचे चेहरे’ ही देखील सुंदर शब्दचित्रेच आहेत. ती त्या त्या व्यक्तींच्या अपरिचित पैलूंना शब्दबद्ध करीत आहेत. त्यांत विशेष भावतात ते अण्णा हजारे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेलशा साध्यासरळ शब्दांत मांडलेले. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो दोन छोटेखानी छायाचित्रमालिकांचा. एक आहे प्रकाश विश्वासरावांनी कॅमेराबद्ध आणि सोबत शब्दबद्ध केलेली गोव्यातील नितांतरमणीय तेरेखोल परिसराची तितकीच सुंदर छायाचित्रे आणि दुसरी आहे ऑलिव्हिएटो टोस्कानींची वर्णभेदावर आधारित मोजकी पण बोलकी छायाचित्रे.
व्यंग्यचित्रे भरपूर आहेत-गुदगुल्या करणारी अन् पट्कन रेशमी चिमटे काढणारी. सारीच व्यंग्यचित्रे अंकाच्या प्रधान भूमिकेला साकार करताहेत. म्हणजे २० व्या आणि २१ व्या शतकातील विरोधाभास, वैगुण्य आणि गमती यावर नेमके बोट ठेवताहेत. अंकातील कथा ठीकठाक आहेत. बहुतेक नवकथेच्या वळणावर आहेत आणि विशेष पकड घेत नाहीत. वृंदा दिवाणांची कथा मात्र साधीसुधी पण छान आहे. कविता ब-याचे आहेत. त्या सा-या दुर्बोध प्रतिमाने वापरणा-या नवकाव्याच्या धर्तीवर आहे. नवकाव्यात गोडी असणा-यांना कदाचित् भावतील.
‘शब्दांचे वीर आणि सामाजिक क्रांती’ हा विश्वास पाटील यांचा लेख अत्यंत मननीय आहे. कुठल्याही सामाजिक वा राजकीय चळवळीची प्रेरणा बुद्धिमंतांच्या लिखाणातूनच मिळते. पण एकदा ही चालना मिळाली की हे बुद्धिमंत मागे फेकले जातात हे इतिहासातील शेलक्या उदाहरणांवरून त्यांनी उत्तम रीतीने विशद केले आहे. जनता चळवळीला फक्त बुद्धिजीवीच चालना देऊ शकतात, इतरांना म्हणजे कडव्या लोकांना किंवा कृतिवीरांना ते जमत नाही हे त्यांचे प्रमेय आहे. खास वाचावा असा सुनील दिघे यांचा प्रदीर्घ लेख ‘अमेरिकन टर्मिनेटर’ हा आहे. अंकाच्या मूळ भूमिकेशी इमान राखणारा हा लेख विसाव्या शतकाची भलीवुरी वैशिष्ट्ये सांगतो. २१ व्या शतकात प्रवेश करताना आपण धोक्याच्या वळणावर आलेले आहोत. बायोटेक्नॉलॉजीचे प्रभुत्व सुरू झाले आहे, असे त्यातील प्रतिपादन आहे. परंतु त्याचा विकास सृष्टीला उद्ध्वस्त करणाराही ठरू शकतो असा इशारा त्यातून मिळतो. २१ व्या शतकात येणा-या समस्यांचे निराकरण मानवी मूल्यांच्या आधारावर करावे लागेल, भौतिक प्रगतीच्या आधारावर नाही.
एकूण या अंकाचा पट मोठा आहे. त्यातील विविधता आकर्षक आहेच. परंतु येणा-या २१ व्या शतकाला डोळसपणे सामोरे जाण्याचे त्यात एक गर्भित
आवाहन आहे. ते अंतर्मुख करणारे आहे.