इंग्रजीविरुद्धचा गहजब तसा नवीन नाही. भाषाभिमान्यांनी अनेकदा विविध माध्यमांतून इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. मातृभाषेतूनच सर्व शिक्षण द्यावे-घ्यावे ही कल्पना तत्त्वतः मलाही मान्य आहेच. परंतु सद्यः परिस्थितीत हा आग्रह धरणे म्हणजे आपण होऊन स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कु-हाड मारण्यासारखे आहे. तिसरे सहस्रक उगवते आहे. कोणी कितीही नाही म्हटले तरी जागतिकीक र ण (ग्लोबलायझेशन) अटळ आहे . इंटरनेटमुळे तर संदेश दळणवळण-आर्थिक व वाणिज्य व्यवहार या क्षेत्रांतील सर्व पारंपारिक व्यवस्था मोडीत निघाल्या आहेत. अशा वेळी केवळ स्वदेश स्वभाषा ह्यांसारख्या उदात्त, भव्य परंतु अमूर्त आणि प्रसंगी अव्यावहारिक भावनांच्या भरवशावर पुढे जायला नकार देणे फारसे हितकर वाटत नाही. तुम्ही थांवलात तरी जग थांबणार तर नाहीच कदाचित तुम्हाला तुडवून जाणार आहे. कोणाच्यातरी पायदळी चिरडले जाण्यापेक्षा त्यांच्यासोबत आपणही समोर जावे, हे चांगले नाही का? अन्यथा, तुमच्यात एखाद्या भरभक्कम, अभेद्य पहाडाची शक्ती असायला हवी – अशी, की जिच्यासमोर वाकीचे शरण येतील. आमच्यात ही शक्ती आहे तरी का? आज इंग्रजी ही एकमेव जगात “लिंक लँग्वेज” म्हणून टिकून आहे व टिकू शकते. जोवर पर्याय सापडत नाही, तोवर ती शीर्षस्थानी राहणारच. उगाच तिला नावे ठेवण्यात काय अर्थ आहे? उद्या कदाचित एखादे स्वस्त, पोर्टेबल (चल) असे युनिव्हर्सल ट्रान्स्लेटिंग मशीन (वैश्विक भाषांतरण यंत्र) कोणी शोधून काढले तरच बात वेगळी होईल. म्हणजे मी मराठीत मागणी नोंदवायची आणि ती एखाद्या जपानी व्यापायाने जपानीत वाचून त्याप्रमाणे माल पुरवायचा, हे त्यामुळे शक्य होईल. तोवर, एकतर मला जपानी शिकावे लागेल किंवा त्या जपान्याला मराठी शिकावे लागेल. किंवा इंग्रजीचाच आधार घ्यावा लागेल. याच न्यायाने त्या जपान्याला चिनी, स्पॅनिश, फ्रेंच, स्वाहिली आणि डच भाषाही शिकाव्या लागतील किंवा तेवढी माणसे कामावर ठेवावी लागतील. हे खरेच व्यावहारिक आहे का? तो धंदा करेल की भाषा शिकेल? जपान्यांचेच उदाहरण यासाठी घेतले की जपान्यांनाही आपल्यापेक्षा काही कमी देशाभिमान नाही–परंतु ते इंग्रजी नको’ असे (निदान आता) म्हणत नाहीत. (पूर्वीचे सोडा.) माझ्या परिचयाचा लंडनमधला एक मराठी मुलगा (खरे तर तो लंडनला जन्मला म्हणून इंग्रजच), नुकताच दोन वर्षांसाठी जपानी लोकांना इंग्रजी शिकवायला टोकियोला गेलेला आहे, म्हणून हे आठवले. (तसेही, मल्टीलँग्वेज – बहुभाषी – भाषांतरणाची तात्काळ सोय असणारी यंत्रे आजही मौजूद आहेत. यु. एन. ओ. किंवा अगदी आपल्या संसदेतही ती वापरली जातात. पण ही सोय सार्वत्रिक व जगातल्या सर्व भाषांसाठी लागू झाली – तीही स्वस्त पोर्टेबल यंत्रांद्वारे, तरच ख-या अर्थाने इंग्रजीचा पर्याय सापडला असे म्हणता येईल.)
जेव्हा या समुदायाला आपल्या क्षेत्राबाहेरच्या अन्य समुदायांशी व्यवहार करण्याची वेळ येते, तेव्हा मग आपल्या मर्यादांची जाणीव होते. यावर वेळोवेळी अनेक उपायही योजले जातात. परके उच्चार शब्द किंवा पूर्ण भाषाच दत्तक घेतली जाते. मराठी भाषेने “अँ” “ऑ” (बॅट / बॉल) हे उच्चार इंग्रजीतून उधार घेतलेच आहेत की नाही? (या संकेतखुणाही तयार झाल्या आहेत.) “अहह” ला वेडावून दाखविण्याचा शब्द (जो पूर्णपणे मराठी आहे) – इंग्रजी रुजण्यापूर्वी मराठीत कसा लिहायचे? आजही बरेच लोक बॅटला ‘ब्याट’ म्हणतात. (पण “फोनेटिक्स” अनुसार हे वेगवेगळे उच्चार आहेत.) गुजराथीत ‘ऑ’ म्हणतही नाहीत, व लिहीतही नाहीत. ते “ओ” च म्हणतात, लिहितात. तेथे हॉलचा होल होतो. हिंदीत बँक लिहिताना “बैंक” असे लिहितात. हे सारे चूक आहे. जे उच्चार आपल्याजवळ नाहीत ते दत्तक घेणे यात काहीच गैर नाही. जे शब्द आपल्यापाशी नाहीत, तेही दत्तक घेणे चूक नाही. कितीतरी शब्द मराठीने कानडी व उर्दू-फारसीतून घेतले आहेत. इंग्रजी शब्दांचा जोवर सरल, सुगम व सर्वमान्य प्रतिशब्द शोधला जात नाही व जोवर तो चलनात येत नाही, तोवर तो मूळ शब्द जसाच्या तसा वापरला, तर बिघडले कोठे? फक्त सरकारी कार्यालयांमधूनच “शासकीय” मराठीत वा हिंदीत जे इंग्रजी शब्दांचे प्रतिशब्द वापरले जातात, ते कितपत सरल आणि सोपे आहेत? आज इतक्या वर्षांनंतरही लोक त्यांचा चलनासारख्या वापर करीत नाहीत, यातच त्यांचे अपयश स्पष्ट आहे. सरकारी नोकराला “जी आर” म्हटले की सगळे कळते. आजकाल तर अगदी अडाणी खेडूतही हे इंग्रजी शब्द (वा त्यांची लघुरूपे) जाणतो. शासकीय निर्णय, अधिसूचना, परिपत्रक, अधिनियम, शास्ती हे शब्द बोलीभाषेत रुजू होऊच शकत नाहीत. इंग्रजीत एक तर लघुरूपांची चांगली सोय आहे (जरी तिचा दुरुपयोग होत असला तरीही.) कोणताच माणूस बोलताना, दैनंदिन व्यवहारात ग्रांथिक भाषेचा वापर करीत नाही. त्यामुळे जर इंग्रजी शब्दांचे मराठी पर्याय शोधायचे असतील तर अर्थवाही असण्यासोबतच ते सोपेही असायला हवेत. जे “ST” किंवा “यस्टी’ किंवा ‘बस’ यातून एखाद्या निरक्षरालाही क्षणात कळते ते “राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे स्वयंचलित प्रवासी यान” यातून कळणार नाही. म्हणून, या रूढ शब्दांना हुसकावून लावण्याचा हट्टही गैरच आहे. बरे, नव्या शब्दांना प्रतिशब्द शोधायचा कोणी? सरकार काही कामाचे नाही. मग हे काम साहित्य महामंडळांनी करावे का? की एखाद्या विद्वानाने खासगीरीत्या? आणि देशपांड्यांनी शोधून काढलेला पर्याय कुळकर्णी किंवा मेश्रामांना मान्य होईलच, याची तरी काय गॅरंटी? (माझ्या माहितीत, फक्त फ्रान्समध्ये परभाषी शब्दांचे भाषांतर करणारी अशी अधिकृत यंत्रणा आहे आणि त्या संस्थेचा निर्णय सर्वांना पाळावाच लागतोच पण तेथे निदान एकच भाषा बोलतात. भारतात तर शंभर भाषांचे कडबोळे आहे. मराठीभाषी म्हणतील एखादे वेळी कॉम्प्युटरला संगणक. पण बंगाली लोकांना हे मान्य आहे का?) हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे हेही काही फारसे खरे नाही. तामिळ माणूस हिंदी नाही बोलत म्हणजे नाही बोलत. मग मी त्याच्याशी मराठीत बोलू की हिंदीत की तामिळमध्ये? की दोघांनाही समजते अशा इंग्रजीत? महत्त्व कशाला आहे – कोरड्या भाषाप्रेमाला की माझे काम व्हायला? नागपूरहून मद्रासच्या “अपोलो” हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण हृदयरोग-चिकित्सेसाठी वा शल्यक्रियेसाठी गेला तर त्याला वा त्याच्या नातलगांना डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, बाजूचे हॉटेलवाले, चहावाले, रिक्षावाले यांच्याशी सतत संबंध ठेवावा लागतो. त्याने काय करावे? मी मराठीप्रेमी आहे हो, माझ्याशी इंग्रजीत बोलू नका, असा डांगोरा पिटावा? हिंदीत बोलून तर पाहा तिथे. कळत असूनही तुमच्याकडे दुर्लक्ष करतील ते लोक.
एखादी भाषा चोरांची आहे, हे विधानच मुळात भोंगळ आहे. इंग्रज होते चोर-म्हणून काय त्यांची भाषाही वाईट ठरते? इंग्रजीएवढी लवचीक, समृद्ध आणि संपन्न भाषा आज जगात कोणतीच नाही. जिथे जातील तिथून इंग्रजांनी नेटिव्हांच्या शब्दांचीही चोरी केली, एवढे मात्र खरे. म्हणून तर हजार-दोन हजार हिंदुस्थानी शब्दही तिच्यात आहेत. इंग्रजांनी कधी असा विचार नाही केला की फक्त “किंग्ज्” किंवा “क्वीन्स” इंग्लिशच चांगली. आज इंग्रजीच्या अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, कॅनडियन, साऊथ अफ्रिकन अशा कितीतरी पोटजाती आहेत. भारतात तयार झालेली “इंडिश” (इंडियन इंग्लिश) यातलीच आहे. आणि त्यातही काही वाईट नाही. जशा आपल्या मूळच्या बारा-तेरा मुख्य भाषा आहेत, तशीच ही देखील आहे असे समजायचे. अगदी पक्क्या ऑक्स्फर्ड अॅक्सेंटमध्येच बोलले पाहिजे असा कोणाचाही आग्रह नाही. तुम्हाला हवा तसा उच्चार करा. फक्त एकमेकांना कळेल असे सोपे बोला. एलेवेटर किंवा लिफ्टच म्हणा, उद्वहन म्हणू नका. वंगाल्यांचे उच्चार मराठ्यांपेक्षा भिन्न असले तरी शेवटी ती इंडिशच राहील. मला ते चालते. पण अन्य अनेक शब्दांना मुद्दाम प्रतिशब्द शोधूनही जेव्हा शासकीय हिंदीत वा मराठीत “अपील” या शब्दाला “अपील” असेच म्हणतात, ते मात्र आपल्याला चालत नाही. (याला प्रतिशब्द शोधता आला नाही, म्हणजेच तुमची बुद्धी थकली. अॅडव्होकेटला प्रतिशब्द शोधला होता “भाडू” आणि अॅडव्होकेट जनरलला “महाभाडू” जेव्हा खुप गदारोळ झाला तेव्हा मग “अधिवक्ता” किंवा आपला जुना “वकील” त्यांना आठक्ला.) इंग्रजीत दोष नाहीत, असे नाहीत. खूप आहेत. आपल्या देशात ती दत्तक घेताना या दोषांचे निराकरण कसे होईल हे खरे तर शोधायला हवे, तिचे उच्चाटन करण्याऐवजी.
मातृभाषेतून शिक्षण घ्यायला माझा मुळीच विरोध नाही. पण माझ्या भाषेच्या मर्यादा मला माहीत असल्याने तिच्या सोबतच मी इंग्रजीही शिकायला हवी. नाहीतर पुढच्या शतकात माझे काही खरे नाही. राहिला प्रश्न, इंग्रजीच्या प्रभावामुळे मराठी नामशेष होईल का याचा. त्याला उत्तर एकच-जर माझ्या भाषेत खरेच दम असेल तर ती टिकेल – जर ती लवचीक राहिली, इंग्रजीसारखी “जिवंत” वा प्रवाही राहिली तर टिकेल – स्वबळावर टिकेल. अन्यथा तिचीही लॅटिन वा संस्कृतप्रमाणे गती होईल. शेवटी एकच प्रश्न – गेल्या पन्नास वर्षांत इंग्रजीत किती नवीन शब्दांची भर पडली आहे याची तुलना कोणी मराठीशी केली आहे का? प्रतिशब्द म्हणून नव्हे, तर अगदी मूळ मराठीत असलेले अस्सल मराठी शब्द गेल्या पन्नास वर्षांत किती उत्पन्न झाले आहेत? सहज, कुतूहल म्हणून विचारतो. माझ्या मते, हे प्रमाण दहा हजाराला एक एवढे (च) असावे — आणि यातच इंग्रजी का अस्सल (real) “जिवंत” भाषा आहे, याचे उत्तर मिळते.