प्राचीन काळच्या भारतीय समाजात मांसाहाराला मान्यता होती, हे डॉ. लोखंडे यांच्या लेखात (१०.९) वयाच पुराव्यांच्या मदतीने दाखवले आहे. पण पूर्वी काय होते आणि ते का बंद झाले, हा एक दृष्टिकोन झाला. मांसाहाराला विरोध करण्यामागची एक सरळसरळ उपयुक्ततावादी भूमिका अशी –
सूर्यप्रकाशाची ऊर्जा वापरून वनस्पतींची वाढ होते. वनस्पती खाऊन शाकाहारी जीव जगतात. अशा जीवांना खाऊन मांसाहारी जीव जगतात. या तीन्ही ऊर्जा-रूपांतरांची कार्यक्षमता सुमारे पंधरा टक्क्यांएवढी (एक-सप्तमांश म्हणा) आहे. म्हणजे वनस्पती खाऊन एक कॅलरी ऊर्जा घेण्यात सात कॅलरी सूर्यप्रकाश परहस्ते ‘खाल्ला जात असतो. आणि मांस खाऊन एक कॅलरी ऊर्जा घेण्यात सात कॅलरी वनस्पती-किंवा एकूणपन्नास कॅलरी सूर्यप्रकाश खाल्ला जात असतो.
जर कोणी वाघासारख्या ‘शुद्ध मांसाहारी जीवाचे मांस खाल्ले तर अशा अन्नातून एक कॅलरी ऊर्जा मिळण्यासाठी तीनशे त्रेचाळीस (७ x ७ x ७) कॅलरी सूर्यप्रकाश खाल्ला जात असतो!
भारतीय हवामानात एका माणसास दोनेक हजार कॅलरी ऊर्जेचा आहार रोज घ्यावा लागतो, असे ढोबळ मानाने मानता येते. जर हा माणूस शाकाहारी असला तर तो परिणामी चौदा हजार कॅलरी सूर्यप्रकाश खात असतो. जर तो शुद्ध मांसाहारी असला तर तो अट्याण्णव हजार कॅलरी सूर्यप्रकाश खात असतो आणि जर तो शुद्ध ‘व्याघ्राहारी’ असला तर तो जवळपास सात लक्ष कॅलरी सूर्यप्रकाश खात असतो.
माणसांची पचनसंस्था व एकूणच खाद्यव्यवस्था वरकरणी सर्वाहारी असल्या तरी मुळात शाकाहारीच आहेत. माणसांना दाढा असतात पण वाघकुत्र्यांसारखे ‘सुळे नसतात. दाढांचा उपयोग भरपूर सेल्युलेज असलेल्या पाने-गवत अशा अन्नाच्या, ‘दळणासाठी’ होतो. सुळे मांसाचे लचके तोडण्यास आवश्यक असतात. माणसांना सुळे नाहीत पण दाढा आहेत, याचा अर्थ असा की आदिमानव मांसाहारी नव्हते, शाकाहारी होते.
आजही माणसे ‘मांसाहारी’ नसतात, तर शिजवलेले मांसच पचवू शकतात. हा अन्नाचा प्रकार काही काळच्या वनस्पतींच्या तुटवड्यातून उद्भवला असावा, व रुचिवैचित्र्य (आणि जिव्हालौल्य) यामुळे यज्ञयागाच्या नावाखाली या आहाराला धर्ममान्यता व समाजमान्यता मिळाली असावी – पण!
पण सरळ सरळ ‘ऊर्जा प्रश्न’ जर स्वतःला विचारला व माणूस कसल्या जीवनक्रमाला अनुरूप आहे असा प्रश्न स्वतःला विचारला, तर निःसंदिग्ध उत्तर असेच आहे, की माणूस शाकाहारी आहे आणि ऊर्जेच्या दृष्टीने त्याने तसेच असणे काटकसरीच्या दृष्टीने योग्य आहे. माणूस निसर्गतः मांसाहाराला अनुरूप नाही. आणि जर त्याने मांसाहाराचे प्रमाण वाढवले तर तो ऊर्जेचा अपव्ययच करील!
आज अमेरिकन व यूरोपीय माणसांच्या आहारात मांसाचे प्रमाण सर्वांत जास्त आहे, तर भारतात सर्वांत कमी. अमेरिकन-युरोपीय माणसांची मांसाहाराची ‘गरज भागविण्यासाठी जंगला-वनांसारख्या सु-उत्क्रांत व्यवस्था मोडून कृत्रिम, नाजुक, हळव्या अशा कुरणांवर गाईगुरे पोसली जातात. कुरणांमध्ये चरणारे गाईबैल, ही पूर्ण रचनाच टिकाऊ नाही. यात जमिनीतील सेंद्रिय ‘सत्त्वांचा’ -हास होतो.
पण आपल्या मालकीचे जंगल तोडून तेथे गवत ‘पेरून’ गुरे पाळणा-या व्यक्ती श्रीमंत होतात-भलेही त्यांनी जंगलांमधून हुसकलेले समाज नष्ट होवोत. असे सांगतात की अमेरिकन ‘हॉट डॉग्ज’ घडवण्यात व त्यांची किंमत भारतीय वडापावासारखी राखण्यात अॅमेझॉन खो-यातील जंगलाचा बळी जातो – आणि डझनावारी आर्जेंटिनियन अब्जाधीश घडतात!
(लेखक मांसाहार निषिद्ध नसलेला, पण मुख्यतः शाकाहारी आहे.)