ईश्वराला अक्कल शिकवणारे लोकच प्रार्थना करीत असतात. पावसाकरतां प्रार्थना करणा-या लोकांची चेष्टा करण्याकरतां विन्स्टन चर्चिल यांनी एकदां वर्तमानपत्रांत एक पत्र प्रसिद्ध केले होते. त्यांत त्यांनी अशी शिफारस केली होती की, पावसाला व पिकांना सर्वांत सोयीचा वेळ कोणता हे ठरवण्याकरतां एक कमिटी नेमावी आणि त्यांनी निर्णय दिल्यानंतर त्याला धरून अमुक दिवशीं अमुक इतका पाऊस पाडण्याविषयी ईश्वराला सार्वजनिक प्रार्थना करावी, कारण प्रत्येकाने वेगवेगळ्या दिवशी प्रार्थना केल्याने ईश्वर विनाकारण घोटाळ्यांत पडण्याचा संभव आहे. अर्थात् युद्धांत दोन्ही बाजूच्या लोकांनी आपणास विजय मिळावा अशी प्रार्थना केल्यामुळे ईश्वर नेहमीच घोटाळ्यांत पडतो, पण पिकांचे बाबतीत कदाचित् एका देशांतल्या लोकांचे तरी कमिटीचे द्वारें एकमत होण्याचा संभव आहे, तेव्हा वेगवेगळ्या देशांत तसतसा पाऊस पाडून त्यांचे समाधान करणे शक्य आहे. गरजूंनी या सुचनेचा विचार करावा. काळ्यांचे म्हणणे असे की जेथे कै. रा. ब. वैद्यांसारख्या विद्वानाला लोकांनी बोलू दिले नाही, तेथे त्यांना बोलू दिले हा ईश्वरी चमत्कार आहे. एकतर हा काळ्यांचा विनय असेल, किंवा यावरून पंढरपूरच्या श्रोत्यांची अक्कल किती आहे ते समजेल! नास्तिकांनी खुलासा करावा असे त्यांनी आव्हान दिलें आहे म्हणून मी इतके लिहिले. पण त्याने आस्तिकांचे समाधान होणार नाही. त्यांच्या डोक्यांतला ईश्वर निघणार कसा?