नोव्हेंबर ‘९९ चा आजचा सुधारकचा अंक वेगळा व लक्षणीय वाटला. लेखांचे विषय अधिक वैविध्यपूर्ण व समाजापुढील वेगवेगळ्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारे वाटले. अभिनंदन!
डॉ. सुभाष आठले
२५,नागाळा पार्क,
कोल्हापूर – ४१६००३
संपादक, आजचा सुधारक, यांस,
नोव्हेंबरचा अंक खूप माहितीपूर्ण वाटला. समान्यपणे १ ल्या पानांवर थोर व्यक्तींच्या लेखनातील एखादा महत्त्वाचा मुद्दा उद्धृत केलेला असतोच. यावेळच्या अंकातील हमीद दलवाईंचे मुस्लिम समाजाच्या सामाजिक सुधारणाबाबतचे विचार दिलेले आहेत. त्यातील शेवटचे वाक्य तर फारच महत्त्वाचे आहे.
पूर्वीच्या एका अंकातील ‘संपादकीया’ वर मी टीकाटिप्पणी कळवली होती व आपण ती छापलीही होती. यावेळच्या “संपादकीय” पानावर श्री. प्र. व. कुलकर्णी यांचा लेख आहे. त्यातील मुद्दे महत्त्वाचे व मार्गदर्शक आहेत.
मुस्लिम समाजसुधारकांची पुण्यात होणारी परिषद खूप काही काम करेल अशी सर्वाचीच अपेक्षा आहे. त्यांच्या आवाहनांत इतर अन्यांना उपस्थित राहाता येईल का याविषयी निश्चित माहिती दिलेली नाही.
यशवंत ब्रह्म यांचा लेख मात्र खूपच, कायदेविषयक माहितीच्या आधारे, “धर्मांतर’ याविषयाबाबत मूलभूत माहिती देतो. धर्मप्रसार व धर्मांतर यांबाबत, मुद्दाम किंवा अनवधानाने म्हणा, संदिग्धता बाळगून आज सगळीकडे लेखन होत आहे. अशा वेळी पक्षीय, जातीय किंवा असा कोणताच उद्देश डोळ्यापुढे न ठेवता कायद्याची तरतूद काय आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कसा स्पष्ट निर्णय दिलेला आहे व दोन राज्यांनी केलेला, यांबाबत सत्यता टाळून उगाच धुरळा उडवीत वर्तमानपत्रे व मासिके लेखन करीत आहेत. अशा वेळी या लेखातील बराचसा भाग अन्य वाचकांच्या नजरेस येणे आवश्यक आहे. तरी या लेखाच्या पुनर्मुद्रणाची परवानगी (आपली व लेखकाची) आपण मजला द्यावी अशी विनंती करीत आहे.
गजानन केळकर