१. उत्तर अमेरिकेत कॅनडामधून ‘एकता’ नावाचे एक मराठी त्रैमासिक प्रसिद्ध होते. त्याच्या जुलै ‘९९ च्या अंकात आमची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. श्रीराम गोवंडे या न्यूजर्सीमधील आमच्या मित्राने ती घेतली होती. (आजचा सुधारकच्या ऑक्टोबरच्या अंकात नंतर ती पुनर्मुद्रित केली आहे) ‘विवेकवादी विचारसरणी व जीवनपद्धती’ या नावाने. एकताच्या ऑक्टोबर ‘९९ च्या अंकात आम्ही मांडलेल्या काही मुद्द्यांवरून दोन प्रतिक्रिया आल्या आहेत. त्या कनेक्टिकट येथील आमचे मित्र श्री. सुनील देशमुख आणि मॅसॅच्युझेट्सच्या डॉ. ललिता गंडभीर यांनी आमच्याकडे पाठवल्या. त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. त्यांपैकी एक ‘धर्म का हवा?’ या नावाचा लेख आहे तो श्री. विजय सबनीस लक्रॉस WI यांनी लिहिलेला आहे. दुसरे दीर्घ पत्र आहे श्री. माधव शंकर वैद्य मिसिसागा ON यांचे. वैद्यांनी निमित्ताला आजचा सुधारकचे नाव घेऊन स्वैरचिंतन केले आहे. कोठेही एखदा मुद्दा घेऊन खंडन केले असे नाही.
सवनीसांच्या लेखाचे सार
१. धार्मिकश्रद्धा सामान्य माणसाची एक भावनिक गरज आहे.
२. मानवी मन विचार व भावना यांची एक विचित्र, अगम्य वीण आहे.
३. धार्मिक श्रद्धा असलेली माणसे जास्त सुखी व समाधानी जीवन जगतात.
४. स्वार्थ साधणा-या व ऐहिक सुखाला प्राधान्य देणा-या इहवादी माणसाकडून ‘साधेल तेवढ्या परोपकाराची अपेक्षा करणे व्यर्थच आहे,
५. धार्मिक ढोंगीपणावर उपाय धर्म नाहीसा करणे हा नसून तो सामान्य माणसाच्या
जीवनात जास्तीत जास्त जवळ आणणे हा आहे.
६. हे सर्व धर्म आपले आहेत. मानवांचा हा समान ऐतिहासिक वारसा आहे.
आमचे उत्तर असे –
१. माणसांचे आपण विचार करणारे आणि विचार करणे टाळणारे असे दोन वर्ग करू. त्यातल्या दुस-या गटातल्यांना सामान्य माणसे म्हणू – ‘आजचा सुधारक’चे आवाहन त्यांना नाही. जे विचार करू इच्छितात त्यांच्यापुढे आम्ही आपले विचारमंथन ठेवतो.
२. विवेकवादास भावनेचे वावडे नाही. भावनेने बुद्धीवर मात करू नये इतकेच. श्रद्धा एक प्रकारचा भावनातिरेक असतो. सत्य-असत्य ठरविण्याचे काम बुद्धीचे ते श्रद्धेने बळकावणे योग्य नाही. तो अविवेक आहे.
३. ‘सुखी व समाधानी असणे,’ पुरेसे नाही. सुख कोणाचे? समाधान कशाचे? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. Dissatisfied Socrates is better than…….a satisfied pig. संतुष्ट श्वान-सुकर होण्यापेक्षा असंतुष्ट का होईना मनुष्य होणे आपण का पत्करतो? स्वस्थ, समाधानी मूर्खापेक्षा अस्वस्थ सॉक्रेटीस होणे बरवे असे आपल्याला का वाटते?
अज्ञानातल्या निश्चितीपेक्षा जिज्ञासेतली बेचैनी श्रेयस्कर नाही का? मुद्दा आहे तो हा की नुसते सुखी-समाधानी होण्यास किंमत नाही.
४. ऐहिक सुख सर्वांना हवे असते. मात्र ते दुय्यम आणि आत्मिक-पारलौकिककल्याण श्रेष्ठ अशी भाषा करणे लोकांना आवडते. त्यातून धार्मिक ढोंगबाजीला फावते.
ऐहिक सुखाला प्राधान्य दिले म्हणूनच महा-भारतीय युद्ध झाले ना?
प्रपंच नेटका करून मग परमार्थाकडे वळा असे सांगणारे संतच असतात ना?
दृष्टी इहलौकिक असण्यात निंद्य काय आहे?
ऐहिक दृष्टी आणि स्वार्थीपणा एकच नाही. तसेच सुखवाद म्हणजे स्वार्थीपणा नाही. परोपकार दुस-याच्या ऐहिक सुखासाठी असू शकतो. सुखवादी मनुष्य आपल्या एकट्याच्या सुखापेक्षा समाजाचे सुख जास्त-मोठे मानू शकतो. त्यात त्याचा इहवाद आडवा येत नाही की सुखवाद. परोपकारी वृत्ती वेगळी आणि धर्मनिष्ठा किंवा श्रद्धा वेगळी. कितीतरी धार्मिक व्यक्ती कमालीच्या स्वार्थी असतात आणि अश्रद्ध लोक परोपकारी.
५. धार्मिकता म्हणजे श्रद्धावान् असणे असेल तर जेवढ्या लौकर मनुष्य धार्मिकतेच्या
बाहेर पडेल तेवढे बरे असे म्हणावे लागते. त्याशिवाय धर्माची चिकित्सा तुम्ही करू शकत नाही. श्रद्धेची कुबडी फेकल्याशिवाय सत्यासत्याची तटस्थ मीमांसा शक्य नाही. धर्मगुरू, धर्मग्रंथ, माणसाला पांगळाच करतात असे नसून आंधळाही करतात. केवढे धडधडीत अन्याय हजारो वर्षे आपण पाहत आलो, करत आलो तेव्हा धर्मश्रद्धा शाबूत होत्या. विवेकाची कवाडे बंद होती.
६. हे सर्व धर्म आपले आहेत. आम्हा मानवांचा हा समान ऐतिहासिक वारसा आहे, हे स्वप्न पाहणारे विजय सबनीस, दोनच ओळी पुढे गेल्यावर ते काळजीत पडले आहेत की, “आपला धर्म पुढच्या पिढीकडे कसा पोहोचवायचा हा यक्षप्रश्न आपल्यासमोर उभा आहे.’
हिंदू धर्माला एका सांस्कृतिक क्रान्तीची जरूरी आहे आणि एकविसाव्या शतकात ती होणार आहे याची मला खात्री आहे असे सबनीस म्हणतात. परंतु श्रद्धेची बेडी तोडल्याशिवाय ते शक्य नाही. विवेकाच्या आधारानेच धर्माची चिकित्सा आणि सबनीस म्हणतात ती सांस्कृतिक क्रांती शक्य आहे. श्रद्धा आहे त्याचेच’ समर्थन करते, सुधारणेचा विरोध करते मग क्रांतीची गोष्टच नको.
वर्तमान काळात राष्ट्रवाद आवश्यक असला तरी दूरच्या भविष्यकाळात मानवतावाद । हा विवेकी माणसाचा आदर्श आहे. हा माझा धर्म, तो तुझा’ असे म्हणायच्या ऐवजी ‘जो धर्म आम्हा मानवांचा समान ऐतिहासिक वारसा व्हावा असे स्वप्न’ सबनीस पाहतात, तो मानवधर्म आहे. सनातनी, कर्मठ ज्यू लोकांनी टिकविलेला धर्म आणि भाषा हा त्यांचा आदर्श आहे की मानवधर्म याची निवड सबनिसांनी करावी. २. श्री. माधव शंकर वैद्य यांची खंत की, निरीश्वरवादी मंडळींनी परमेश्वरद्वेषाचे पोटी भगवद्गीता, उपनिषदे तर सोडाच पण कालिदास, भवभूतीही कधी वाचलेले नसतात. यावर उत्तर इतकेच की आम्ही न्यूजर्सीमध्ये एका जिज्ञासू आणि विचारी समुदायासमोर उपनिषदांवर आठ व्याख्याने दिली, त्याला अजून ६ महिनेही झाले नाहीत.
पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी इत्यादी तीर्थक्षेत्रांचे स्तोम वैद्यांना वाटते. ज्ञानेश्वर, मीराबाई, कबीर यांच्या रचनांतून उतू जाणा-या आनंदाची महती ते सांगतात. “जत्रामें फतरा बिठाया, तीरथ बनाया पानी। दुनिया बडी दिवानी, पैसे की धुलधानी।।” हे कबिराचे वचन वैद्यांनी आठवावे. ‘तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी’ हा त्याचा भावानुवाद वैद्यांनी वाचला आहे का? मारवाडी भाषेत आणि व्यवहारात कोणत्याही गोष्टीचा पडता (track record) पाहणे आपल्या जागी ठीक आहे. परंतु तेच समग्र जीवन नाही. जीवन-चिंतन मारवाडी भाषेने होत नाही. तेथे पाहिजे जातीचे येरा गबाळाचे काम नव्हे’ हे मी म्हणत नाही, तुकाराम म्हणतात. ‘जना आणि सज्जना एकचि करतां नये।’ या समर्थांच्या वचनाची मला आठवण येते.
वैद्य समजतात तसे विवेकवाद आणि साम्यवाद एकच नाहीत. व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य हे विवेकवादाचे आधार आहेत, साम्यवादाचे नाहीत. इहवादी विचार मात्र दोघांना समान आहे. मंदिराचे जीर्णोद्धार, सोन्याचे कळस चढविणे इत्यादींसाठी विदेशस्थ भारतीय घटकाभरात लाखो डॉलर्स उभे करतात. मात्र स्वदेशातील अस्पृश्यता-निवारण, एक गाव – एक पाणवठा, किमान आरोग्य सेवा अशा ऐहिक सुखाच्या सोयींसाठी तितक्या उत्साहाने पुढे येत नाहीत, असा अनुभव अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे मित्र श्री सुनील देशमुख हे सांगत असतात. वैद्यांनाही अस्पृश्यता आणि जनसामान्यांच्यासाठी सेवाभावाचा अभाव या गोष्टी आपल्या समाजाला मान खाली घालायला लावणा-या वाटतात. म्हणूनच आपली अधोगती झाली हे त्यांना पटते. ज्या काळात या गोष्टी आमच्या समाजात रुजल्या आणि वज्रलेप झाल्या त्या काळात तर गीता, उपनिषदे यांचा अभिमान आणि कुलदेवतांचे कुलधर्म, आणि कुळाचार कर्मठपणे उदंड चालत असत. उपवास आणि व्रतवैकल्ये आचरीत आमच्या धर्मनिष्ठ पूर्वजांनी धर्म स्वयंपाकघरात कोंडून ठेवला होता, हे विवेकानंदांचे वचन वैद्यांनी आठवावे. वैद्यांनी निरीश्वरवाद्यांवर खूप तोंडसुख घेतले आहे. त्यांच्या लिखाणावरून त्याना संस्कृतची ओळख आणि अभिमान तर दिसतो. पण तत्त्वज्ञान-दर्शनशास्त्रे यांची माहिती नसावी असे दिसते. योगाचे जोडीदार सांख्यदर्शन नास्तिक आहे. मीमांसा व वेदान्त नास्तिक दर्शने आहेत. चार्वाक, जैन, बौद्ध नास्तिक आहेत. नऊ मुख्य दर्शनांपैकी ७ दर्शने निरीश्वरवादी आहेत.
योगासनांचा प्रसार वेगाने पाचही खंडांत वाढत आहे याबद्दल वैद्यांना अभिमान वाटतो. आम्हालाही वाटतो. पण योगासने म्हणजे योग नव्हे. तो एक व्यायाम-प्रकार आहे. योगाच्या यम-नियम-आसन-प्राणायामादी अष्टांगमार्गातील एका अंगाचा-आसनाचा-एक लहानसा भाग. वैद्यांच्या पत्राचा शेवट ‘वसुधैव कुटुंबकम्’ या घोषणेने होतो. परंतु हरेकृष्ण हरे राम, चिन्मय मिशन, शिर्डीचे साईबाबा, पुट्टपर्तीचे सत्यसाईबाबा यांचे पंथ आणि अनुयायी विदेशात वाढत आहेत याचे त्यांना भूषण वाटते. त्यांची घोषणा आणि अभिमान यांत काही सुसंगती आहे काय? ‘हें विश्वचि माझे घर’ असे तोंडाने म्हणायचे आणि ज्याने त्याने आपल्या चुली वेगळ्या मांडायच्या याला काही अर्थ आहे काय? भारतातल्या अस्पृश्य आणि इतर दलित-समाजावरील अन्याय आरक्षणाने धुऊन निघत आहे असे समाधान वैद्यांना वाटते. परंतु त्याविरुद्ध सवर्ण समाज किती आरडाओरड करीत आहे हे भारतातच काय पण न्यूजर्सीत माझ्या वास्तव्यात (बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा शैला विद्वांस यांच्या घरी झालेल्या माझ्या सभेत) माझ्या प्रत्ययाला आले. ईश्वरी कार्याला काल व अंतर (Time and Space) याच्या मर्यादा नसतात, याची नोंद आम्ही घ्यावी असे वैद्य म्हणतात. ती घेतली म्हणूनच आम्ही तथाकथित ईश्वरी कार्याकडे पाठ फिरविली आहे. आम्हाला इथे आणि आता (Here and Now) या भूतलावर आणि इहलोकीच्या सुखाची मातब्बरी आहे.