१. वैचारिक लिखाणाची दाद घेऊन प्रतिक्रिया देणे हे काम कठीण आहे. म्हणून कोणी केले की आनंद होतो. मग तो प्रतिवाद पुरेसा तर्कशुद्ध का नसेना. या दृष्टीने अमेरिकेतील दोन वाचकांचा मी आभारी आहे. विवेकवादी विचारसरणी व जीवनपद्धती – ही आमची मुलाखत कॅनडातून प्रसिद्ध होणा-या ‘एकता’या त्रैमासिकाच्या जुलैच्या अंकात आली. तिची दखल ऑक्टोबर ‘९९ च्या ‘एकता’त दोन लेखकांनी घेतली. त्या आक्षेपांना थोडक्यात उत्तरे या अंकात दिली आहेत. ‘एकता’तील आक्षेपकांचे लेख विस्तारभयास्तव देता आले नाहीत.
२. कच्च्या आहाराचा प्रयोग हा र. धों. कर्वे यांचा लेख पुनर्मुद्रित करीत आहोत. विवेकवादी दृष्टी विहाराबरोबर आहारालाही लावून पाहता येईल. पाहू या का?
३. संपूर्ण आशियाखंडात धर्मविस्तार करा असा संदेश देऊन पोप पॉल द्वितीय, यांनी भारतातल्या मिशनयांचा निरोप घेतला. ख्रिस्ताचा प्रीतीचा संदेश ज्यांना पोचला ते सर्व बन्धुभावाने वागतात, हिंसेचा त्याग करतात का? ख्रिश्चन-युरपकडे पाहून तसे वाटत नाही. शस्त्रास्त्र-कारखाने चालू राहावेत म्हणून जगातील विकासमान राष्ट्रांमध्ये कलागती लावून त्यांना लढते ठेवण्याचे काम ख्रिस्ती अमेरिकेने सोडलेले नाही. हा वर्तमानातील धडा आहे तो आणि भूतकाळात पोप आणि त्यांचे चेले यांनी किती शांततामय मार्गांनी धर्म-प्रसार केला हाही इतिहास लक्षात ठेवण्यासारखा आहे. प्रा. वाबगावकरांचा लेख या दृष्टीने वाचनीय व्हावा. पहिल्या सहस्रकात युरप, दुस-यात आफ्रिका अन् अमेरिका झाला. आता तिस-यात आशिया ख्रिस्तमय करा ही घोषणा धार्मिक साम्राजवादच नाही का? तथाकथित धर्माच्या माध्यमातून माणुसकीचा प्रसार कोणत्या थराला जातो याचा ऐतिहासिक आलेख वाबगावकरांच्या लेखात दिसतो.
४. विदेशात बीफ-गोमांस-भक्षण हा नित्याचा आहार आहे. भारतातून स्थलांतरित पहिली पिढी – त्यातलेही पन्नाशीचे लोक तो टाळतात. पण नवी पिढी, तिथल्या शाळाकॉलेजात शिकणारे, तिथल्या जीवनपद्धतीशी समरस होणारे त्यापासून दूर राहू शकत नाहीत. तुम्हाला थोडेफार संस्कृत समजते, तुमचा प्राचीन भारताच्या इतिहासाशी परिचय आहे, हे पाहिले की हा प्रश्न पुढे करतात. त्यांना आपले वंशज धर्मभ्रष्ट तर होत नाहीत याची भीती पडते.
धर्म स्थल-कालाप्रमाणे किती बदलतो याची साक्ष पटवणारा डॉ. भाऊ लोखंडे यांचा लेख, अभ्यासपूर्ण-अनाग्रही सत्यशोधक वाटावा.
५. धार्मिक अंधश्रद्धा कमी होत आहे हा भ्रम आहे. उलट ती वाढत आहे. नव-नवी मंदिरे उभी राहात आहेत. नवी देवस्थाने उदयाला येत आहेत. अकोल्याजवळ ढगे या खेड्यात आतापर्यंत सुप्त असलेली देवी एवढ्यात जागृत झाली. नवरात्रात सहस्रावधी भाविक तेथे प्रचंड गर्दी करतात. आमच्या विद्यार्थिदशेत-नागपूरचा टेकडीवरचा गणपती आणि नागपूरजवळची कोराडीची देवीही असेच निद्रिस्त होते. गेल्या पाचपंचवीस वर्षांत कल्पनातीत वेगाने ती तीर्थक्षेत्रे लक्षावधींना पावन करीत आहेत. व-हाडातल्या शेगावचे गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा यांच्या माहात्म्याबद्दल तर बोलायलाच नको, महाराष्ट्रात सर्वदूर हा अनुभव असेल. हे कशाचे द्योतक आहे?
व-हाडात गौरींच्या सणाला महालक्ष्म्या म्हणतात. वाडवडिलांची सुबत्ता कितीही झडली असो, ती पुन्हा लाभावी म्हणून आणि ज्यांना भल्याबु-या मार्गांनी नवश्रीमंती येत आहे त्यांना ती कायम राहावी म्हणून, महालक्ष्म्या मांडणे, थाटात पक्वान्नांच्या पंक्ती उठवणे आवश्यक वाटते. अशांची संख्या वाढती आहे. महालक्ष्म्या मांडण्याचा आणि समृद्धी येण्याजाण्याचा काही संबंध नाही. हा कार्यकारणसंबंध नाही, ती एक अंधश्रद्धा आहे. नागपूरला, दसरा जवळ आला म्हणजे गावभर पसरलेल्या देवीच्या देवळातली गर्दी-आसमंतातील वाहतूक तुमचा खोळंबा करते. प्रतापनगरमधील अशा एका रस्त्यावरील देवळासमोर, अंगावरली उंची वस्त्रे-आभूषणे सावरत ‘देवदर्शना निघालेल्या ललनां’च्या गर्दीतून वाट काढत अंबाझरीकडून, दीक्षाभूमीकडे जाणा-या रस्त्याला लागलो. अनवाणी पायांनी रस्ता तुडवणाच्या मळक्या कपड्यांनी काटकुळे देह झाकलेला ‘जनांचा प्रवाहो’ ऋद्धि-सिद्धींनी पूर्ण वंचित, पुढे जात होता. संचितांच्या जागृत देवतांचे या वंचिताच्याकडे लक्ष नाही!
धर्माच्या माध्यमातून आपलेपणा खरंच वाढतो का?