नोव्हेंबरच्या २० आणि २१ या तारखांना पुणे येथे एस. एन. डी. टी. कॉलेज, कर्वे रोड, पौड फाटा या ठिकाणी एक मुस्लिम महिला परिषद होणार आहे. देशभरातून महिलांना या परिषदेत सहभागी होण्याचे आमंत्रण आहे. पुण्याबाहेरच्या व्यक्तींची राहण्याखाण्याची व्यवस्था परिषदेच्या जागी होईल. ज्यांना प्रवासाचा खर्चही झेपणे अवघड आहे त्यांना दुस-या वर्गाचे रेल्वेचे भाडे मिळेल. ही परिषद ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्स’ या संस्थेच्या वतीने होत आहे. तिचे जनरल सेक्रेटरी श्री. सय्यदभाई, पुणे ह्यांनी आगामी परिषदेचे माहितीपत्रक आमच्याकडे धाडले आहे. या परिषदेत मुस्लिम महिलांच्यासाठी पुढील मागण्या केल्या आहेत.
१. नवऱ्याकडून एकतर्फी तोंडी तलाक पद्धती तात्काळ बंद व्हावी. व तलाकाचा निर्णय कोर्टात व्हावा. तलाका
२. पुरुषांना एकाच वेळी चार बायका करण्याचा जो अधिकार आहे त्यावर तात्काळ बंदी यावी.
३. घटस्फोटित स्त्रीला इंडियन क्रिमिनल प्रोसीजर कोड, कलम १२५ अन्वये पोटगी मिळावी.
४. स्त्रियांना सामाजिक न्यायाची मागणी करण्याचा कायदेशीर हक्क मिळाला पाहिजे. त्यासाठी ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्स’ने मुस्लिम कायद्याच्या कक्षेत बसेल असा एक ‘इन्साफपसंद निकाहनामा’ (विवाहाचा न्याय्य करार) तयार केला आहे. त्याच्याद्वारे स्त्रियांना कायद्याचे योग्य संरक्षण मिळेल. हा निकाहनामा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा अशी कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे.