प्रिय वाचक,
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी दसरा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दिवशी नागपूरला समारंभपूर्वक बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. पारंपरिक बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचा असा विधी नसतो. भिक्षु होण्याचा मात्र विधी असतो. तरी डॉ. बाबासाहेबांनी विधिपूर्वक बौद्धधर्म स्वीकारला. इतकेच नव्हे तर आपल्या उपस्थित असलेल्या लक्षावधी अनुयायांना धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेबांनी भगवान वुद्धाच्या चालत आलेल्या अशा धर्मप्रथांपासूनच फारकत घेतली असे नाही. काही तत्त्वविचारांनाही त्यांनी कलाटणी दिली. त्यांनी धर्माच्या सामाजिक आशयावर भर दिला आहे. त्याला ते धम्म म्हणतात. धम्माशिवाय समाज राहू शकत नाही. धम्म म्हणजे माणसामाणसांमधील उचित व्यवहारांचे नियमन, सदाचरणाचा आग्रह. म्हणून ‘धम्मं शरणं गच्छामि’ ही प्रतिज्ञा ‘संघं शरणं गच्छामि’ ह्या घोषणेच्या मागोमाग अपरिहार्यपणे येते. चार आर्यसत्यांचा बुद्धाचा सिद्धान्तही त्यांना जसाच्या तसा स्वीकार्य वाटत नाही. त्यात त्यांना हताशपणाची झाक दिसत असावी. बौद्ध दर्शन आत्मा मानत नाही तर मग पुनर्जन्म कसा? कोणाचा? देव मानत नाही तर मग कर्मसिद्धान्ताचे निर्वहन कोण करते असे प्रश्न पडतात. डॉ. बाबासाहेबांनी ‘द बुद्ध आणि हिज धम्म’ या आपल्या ग्रंथात या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आमचे टेक्सास (U.S.A.) मधील मित्र श्री मधुकरराव कांबळे यांनी या उत्तरांचा आपल्या परीने अनुवाद केला आहे तो वाचकांना प्रस्तुत अंकात पाहायला मिळेल.
५ ऑक्टोबरच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये, (पुणे आवृत्ती) ए. जे. फिलिप यांनी Splendours of diversity नावाचा लेख लिहिला आहे. पोपच्या आगमनाची दखल यावेळी भारतीय प्रसारमाध्यमे तेवढ्या हिरीरीने का घेत नाहीत असा प्रश्न त्यांना पडला आहे. सर्व धर्म श्रेष्ठ आहेत आणि ईश्वराकडे जाणारे विभिन्न मार्ग आहेत’ एवढे तरी पोपसाहेबांनी म्हणावे ही मागणी कारणारांना उद्देशून लेखकमहाशय विचारतात की उद्या सर्व राजकीय पक्ष एकच भाषा करू लागले तर तो लोकशाहीचा विनाश होणार नाही का? कारण लोकशाहीत तर बहुमुखीपणाची मांदियाळी असते.
फिलिपसाहेब हे विसरतात की लोकशाहीवर विश्वास असणारे पक्ष कल्याणाची भाषा करतात ती इहलोकीच्या कल्याणाची! ती लोकांना समजणारी असते. तिचा पडताळा पाहता येतो. खोटेपणा दिसला तर तिचा धिक्कार करता येतो. तथाकथित सद्धर्माची भाषा मरणोत्तर तारणाची असते. त्या तारणाचे म्हणा की कल्याणाचे स्वरूप ना कोणी पाहिले ना देखले! सगळी बोलाचीच कढी नि बोलाचाच भात. तिचे खरे खोटेपण तपासणार तरी कसे? ती वहुविध आहे की एकविध आहे याचे काय कौतुक?
शिवाय लोकशाही ही काही निर्दोष राज्यव्यवस्था नाही. त्यातल्या त्यात ती वरी, कमीत कमी हानिकारक मानली जाते. धर्माला या पातळीवर आणायची त्यांची तयारी आहे का?
रोमन कॅथॉलिक चर्च ह्या ख्रिस्तीधर्मपंथाचे पोप हे जगद्गुरु . त्या धर्मावाहेरच्यांना मुक्ती नाही. (Extra ecclesium nulla salus : outside the church there is no salvation) हा त्यांचा सिद्धान्त आता सैल करण्यात आला आहे असे हे फिलिपसाहेव सांगतात. विद्यमान पोपांच्याच कारकिर्दीत १९६२-६५ मध्ये जे द्वितीय व्हॅटिकन कौन्सिल झाले त्यात म्हणे ख्रिस्त्यांना सल्ला देण्यात आला की, इतर धर्मसंप्रदायांचीही काही मूल्ये असू शकतात ह्या गोष्टीला त्यांनी मान्यता द्यावी, ती राखावीत आणि त्यांचा परिपोष करावा (acknowledge, preserve and promote the values of other faiths.) याचा अर्थ काय होतो? १९६२-६५ च्या या दुस-या व्हॅटिकन कौन्सिलपूर्वी-इतर धर्मसंप्रदायांच्या निष्ठांचा-परिपोष तर सोडाच पण त्यांच्या अस्तित्वाचे भान नि त्यांचा मान कॅथॉलिक ख़िस्त्यांनी ठेवण्याची गरज नव्हती? प्रस्तुत पोपमहाशयांची फिलिपसाहेबांनी आणखी एक महती सांगितली आहे. ती अशी की इ. स. १६४२ साली वारलेल्या गॅलिलिओला देण्यात आलेल्या वागणुकीतील अनुचितपणा त्यांनी विसाव्या शतकात दुरुस्त केला. आणि हो! एकाच वेळी देव पुल्लिंगी तसाच स्त्रीलिंगी-(अर्धनारीनटेश्वर?) असू शकतो ह्या गोष्टीलाही मान्यता दिली, हे त्यांचे महत्कार्य. मदर टेरेसा यांनी केलेल्या चमत्कारांची संख्या पुरेशी झाली याची खातरजमा करून ते मदर टेरेसाला संतत्व बहाल करण्याचे काम या भारतभेटीत करणार आहेत म्हणे!
९ तारखेला पुण्याला ‘हमीद दलवाई-इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या श्री अन्वर राजन् यांना भेटायला गेलो. एका महाकाय चाळवजा इमारतीतील एका गाळ्यातून त्यांची ही संस्था निद्रिस्त मुस्लिम समाजाला जागे करण्याचे काम करते आहे. कार्यालयात एक छोटेखानी लिहिण्याचे टेबल नि एक खुर्ची होती. म्हणून श्री राजन्नी मला आपल्याबरोबर खाली सतरं जीवर बसविले. मुसलमान समाजात एकएकट्याने किंवा गटाने काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कामाबद्दल आजचा सुधारक मधून तुम्ही लिहा. त्यांच्या कामाची आम्हाला फार जुजबी माहिती आहे असे मी म्हटले तेव्हा ते म्हणाले, उद्या तुम्ही साता-यालाच का नाही येत? तेथे अशा कार्यकर्त्यांचे एक चर्चासत्र आहे. विषय आहे ‘शिक्षण, न्याय आणि अल्पसंख्य’. मी तयार झालो. दुस-या दिवशी म्हणजे रविवारी १० ऑक्टोबरला सभास्थळी पोहोचलो तर हॉल भरलेला होता. वक्त्या बाईंचे कळीचे भाषण रंगात आले होते. दर्जेदार ग्रांथिक प्रमाण मराठीत त्या बोलत होत्या. श्रोते तन्मयतेने ऐकत होते. श्रोते मुस्लिम, वक्ते-त्यातून महिला-मुस्लीम आणि भाषण मराठीतून हा प्रसंग माझ्या नागपुरी कानांना अनोखा होता. भाषणा-अखेरी शेजारच्या श्रोत्याला विचारले तेव्हा नाव कळले, ‘रझिया पटेल’. नाव ऐकून होतो. नंतरही चर्चेत काय किंवा व्याख्यानात काय मराठीच आपल्या देशी छटांसह ऐकू येत होती. कोण म्हणते महाराष्ट्रातल्या मुस्लमानांची उर्दूच भाषा आहे म्हणून? हां, पुढच्या चर्चेत मात्र काही चर्चक म्हणाले खरे की, आमची तहजीब आणि आदव उर्दूतूनच आम्हाला मिळाली आहे. पण हे तरी खरे का? मला त्यांना सांगायचा मोह झाला होता की, खुद्द पाकिस्तानात फक्त १० टक्के लोकांना उर्दू येते. ती राजभाषा आहे हे खरे पण भारतातून फाळणीनंतर गेलेल्या मुसलमानी नेत्यांनी ती लादली आहे. खुद्द पंजाबी मुस्लिम मग तो अधिकारी असो की नेता, घरी, खाजगीत पंजाबी बोलणे पसंत करतो. त्यांना त्यांची तहजीब आणि आदव कुठून मिळाली?
श्रीरामपूरच्या प्राचार्य नजमा मणियार, डॉक्टर अन्वर शेख पूना कॉलेज, पुणे यांची भाषणे श्रोत्यांना भिडणारी होती. सर्वांत कळस झाला सातारच्याच प्राचार्य शेख यांच्या भाषणाने. त्यांनी कोल्हापूरला आपण १९७४ ते ८१ अशी सात वर्षे Medo च्या माध्यमातून केलेल्या कामाची तोंडओळख दिली. Muslim Educational Development Organisation (Medo) च्या वतीने मुस्लिम विद्यार्थ्यांचा एक सहें करण्यात आला. प्राथमिक शाळेत भरती झालेल्या १०० मुलांपैकी दीड टक्का मुले कॉलेजपर्यंत पोचतात. आणि त्यांच्यातूनही पदवी गाठण्यापूर्वीच ६५ टक्के गळतीत हरवतात. मुस्लिम विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे, ज्ञान मिळवले पाहिजे, वाचन करून आपले विचाराचे विश्व विस्तारले पाहिजे, याचे महत्त्व प्राचार्यसाहेबांनी स्वतःच्या उदाहरणाने श्रोत्यांच्या मनावर ठसविले. आपल्या यशाचे श्रेय ते कर्मवीर भाऊराव पाटील यांना देतात. श्रीमती रझिया पटेल यांच्या वीजभाषणातला मुख्य मुद्दा, शिक्षण हे धार्मिक नि सामाजिक सुधारणांपासून वेगळे काढता येणार नाही हा, प्राचार्य शेखांनी अधोरेखित केला.
हे चर्चासत्र किती अस्खलित मराठीत झाले याचे कौतुक मला किती वाटले ते वर मी सांगितलेच आहे. आता त्या मेळाव्याच्या संयोजक संस्थांची नावे पाहा. (१) इंडियन सेक्यूलर सोसायटी (२) हमीद दलवाई – इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट (३) प्रोजेक्ट फॉर इकॉनॉमिक एज्युकेशन (४) आंबेडकर अकादमी (५) प्रोग्रेसिव्ह मुस्लिम फोरम सातारा.
नाव बहुधा इंग्रजीत असल्यावाचून भारदस्त वाटत नसावे.
ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची जावो! कळावे,