या महिन्यापासून एक लहानसा खांदेपालट होत आहे. श्री. दिवाकर मोहनींनी गेले दीड वर्ष आजचा सुधारकचा मार्ग पुष्कळच प्रशस्त केला आहे. त्यांना थोडी मोकळीक मिळावी ह्यासाठी संपादकीय कामापुरता हा बदल आहे.
आ. सु. बद्दल अनेकांच्या अपेक्षा अनेक प्रकारांनी वाढत आहेत, हे त्याच्या प्रगतीचेच लक्षण आम्ही समजतो. उदाहरणार्थ आ. सु. ने नुसते वैचारिक लिखाण प्रसिद्ध करून न थांबता काहीतरी ठोस करून दाखवावे म्हणजे – शाळांमधून प्रवेश देताना देणग्या उकळणाच्या संस्थामध्ये जाऊन निषेध, घोषणा, धरणे असे उपाय योजावेत. लग्नाकार्यात हुंडा घेणारे, प्रचंड उधळपट्टी आणि श्रीमंती प्रदर्शन करणारे पक्ष असतील त्यांनाही वरील मार्गांनी विरोध करावा इत्यादी. हे कार्य स्तुत्य आहे पण .. ..! त्यासाठी संघटना-लहानशी का होईना-पाहिजे. मनुष्यबळ आणि तेही प्रायः तरुण उत्साही कार्यकर्त्यांचे पाहिजे. आमची तेवढी शक्ती नाही. म्हणून अश्या सूचनांचा स्वीकार करता येत नाही.
आ. सु. ने सुधारणेसाठी उठविलेला आवाज अत्यंत क्षीण असेल. आहेच, पण आम्हाला तेवढेच करता येते. ही आमची मर्यादा आहे. मुळात मासिक सुरू कस्तानाही संस्थापक-चालक-उत्पादक मंडळींना आपण, प्रत्यक्ष मैदानी चळवळी करू असा कधी भ्रम नव्हता तो यामुळेच. विचार करू शकणा-या आणि करू इच्छिणा-या वाचकांपर्यत पोचावे, त्यांना अंतर्मुख करावे, पटतील ते विचार अमलात आणायास उद्युक्त करावे, सुधारणावादी ऐहिक विचार वाढवावा, एवढीच माफक अपेक्षा आम्ही ठेवली होती. व्यक्तविली होती. त्यासाठी जननिंदेची पर्वा करू नये एवढीच माफक तयारी आम्ही ठेवली होती.
वरं जनहितं ध्येयं
केवला न जनस्तुतिः।
हे ध्येयही आमच्या मते काही लहान नाही. त्यातले आम्हास काय साधते हा प्रश्न वेगळा.
मासिकात चर्चिल्या जाणा-या विषयांचा एकसुरीपणा कमी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. यापेक्षा संपादकीय नीतीत आमूलाग्र परिवर्तन शक्य दिसत नाही. वाचक-हितचिंतकांनी केलेल्या सूचनांचे स्वागत आहे, स्वीकार मात्र सापेक्ष आहे.