आजचा सुधारक च्या जुलै १९९९ च्या अंकात “दि. य. देशपांडे ह्यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ’ या शीर्षकाखाली श्री. अनिलकुमार भाटे यांचे विचार वाचण्यात आले. श्री. देशपांडे यांचा “वैचारिक गोंधळ” आणि त्यांचे “अज्ञान” श्री. भाटे यांनी उघड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री. देशपांडे यांच्या “अज्ञानातून” वाचकाला ज्ञानाच्या वाटेवर आणण्याचा श्री. भाटे यांचा स्तुत्य प्रयत्न आहे. त्यांच्या ह्या प्रयत्नाने श्री. देशपांडे यांचे “अज्ञान” स्पष्ट झाले की नाही याबरोबरच वाचकांना कितपत “ज्ञानवोध” झाला हेसुद्धा लक्षात घेणे उपयुक्त ठरेल. श्री. भाटे यांच्या मतानुसार श्री. देशपांडे यांनी अनेक चुकीची विधाने केलेली आहेत. त्यांपैकी काही” विधानांचा परामर्श श्री. भाटे यांनी घेतलेला दिसतो. यासंबंधात निर्माण झालेले काही प्रश्न व्यक्त करीत आहे.
(१) श्री. भाटे यांच्या मते श्री. देशपांडे यांचा “आपली आत्म्याविषयीची कल्पना शरीरी मनाची किंवा मनोयुक्त शरीराची आहे” हा निष्कर्ष चुकीचा आहे. कारण श्री. भाटे यांच्या मते “आत्मा हा ज्ञानचक्षुनी पाहावयाचा अंसतो असे अध्यात्मात सांगितले आहे.” (पृ. ११८) माझी तर्कशास्त्रात काही गती नाही. त्यामुळे अध्यात्मात काय सांगितले आहे किंवा आत्मा ज्ञानचक्षूनी पहावयाचा असतो या विधानांच्या आधारावर श्री. देशपांडे यांचा वरील निष्कर्ष चुकीचा कसा ठरतो ते मला कळले नाही. कदाचित श्री. भाटे यांचे “ज्ञानचक्षु” सार्विक झाले तर ते शक्य होईल. तोपर्यंत सामान्य अनुभव व वैध तार्किक प्रक्रियांवर आधारित युक्तिवादाने एखाद्या निष्कर्षाची सिद्धता वा असिद्धता स्पष्ट करणे हा निर्दोष ज्ञानाचा वुद्धिगम्य मार्ग ठरतो. श्री. भाटे या बाबतीत असफल ठरले आहेत.
(२) (अ) श्री. देशपांडे यांच्या आत्मा “… हा सामान्य दैनंदिन व्यवहारातला शब्द नाही. तो तत्त्वज्ञानातील शब्द आहे” आणि “सामान्यपणे जेव्हा आपण ‘मी’ संबंधी बोलतो तेव्हा शरीर व आत्मा असा भेद करीत नाही” या विधानांबावत श्री. भाटे यांचा असा आक्षेप आहे की श्री. देशपांडे यांनी आत्मा हा तत्त्वज्ञानातील शब्द आहे हे एकदा मान्य केल्यानंतर त्याविषयी ते दैनंदिन व्यवहारातले उदाहरण देतात. त्यामुळे particularity व generality यांची गल्लत होते. (११८). याबाबत सांगावयाचे म्हणजे particularity व generality ह्या संकल्पना केवळ विवेकवादाशी किंवा अध्यात्माशी संबंधित नाहीत. त्या स्वतंत्रपणे तत्त्वज्ञानात तसेच सामान्य भाषेत राहू शकतात. उदा. मानव ही सामान्य कल्पना विशिष्ट मानवाच्या उदाहरणातून अभिव्यक्त होते. त्यात कोणताही विरोध वा “गल्लत” तर्कतः किंवा व्यवहारतः नाही. श्री. भाटे यांच्या “अध्यात्मातील” ज्ञानेश्वर तुकारामादींनी त्यांचे तत्त्वविवेचन करताना सामान्य भापेतील किंवा जीवनातील अनेक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे तात्त्विक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी सामान्य व्यवहारातील उदाहरणांचा उपयोग “गल्लत” वा काठिन्य दूर करण्यासाठी असतो. त्यांत आक्षेपार्ह काय आहे ते श्री. भाटे यांनी स्पष्ट केले नाही. शिवाय त्यामुळे श्री. देशपांडे यांच्या आत्माविपयक संकल्पनेत कोणता विरोध वा दोष निर्माण होतो ते श्री. भाटे ह्यांनी विशद केलेले नाही.
(२) (ब) श्री. भाटे हे मान्य करतात की “जेव्हा आपण स्वतःवद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या शरीर+मन (mind-body complex) वद्दल बोलत असतो” (११८) त्यामुळे जर श्री. देशपांडे यांनी “मनोयुक्त शरीराची – शरीरी मनाची” – आत्म्यासंबंधी कल्पना केली असेल तर त्यात कोणती “चूक” आहे ते कळले नाही. “जर आत्मा शरीरापेक्षा भिन्न आहे” असे किंवा “देहबुद्धीचा लोप झाल्यावरच आत्मज्ञान होते व विदेही अवस्थेचा अनुभव येतो असे अध्यात्म म्हणते” (११८) अशी श्री. भाटे यांची खात्री असेल किंवा ते अपरीक्षणीय सत्य आहे असा त्यांचा आग्रह असेल तर ते ज्ञान ज्यांना झालेले नाही त्यांनी श्री. भाटे यांच्या विधानांची सत्यता आंधळेपणाने स्वीकारून त्यानुसार अपरीक्षित निष्कर्ष स्वीकारावेत अशी श्री. भाटे यांची अपेक्षा ज्ञानविरोधी आहे कारण ते त्यांचे “ज्ञानचक्षु” इतरांना उपलब्ध करून न देता इतरेजनांनी सुद्धा “ज्ञानचक्षुनी” (जे चर्मचक्षूनी दिसत नाही ते) पाहावे असा अवास्तव आग्रह धरतात. परंतु त्यामुळे ते श्री. देशपांडे यांचा दृष्टिकोन निरस्त करण्यात अपयशी ठरतात.
(३) श्री. भाटे असे गृहीत धरतात की त्यांनी श्री. देशपांडे यांच्या शरीरीमन वा मनोयुक्त शरीर अशी आत्म्यावद्दलची कल्पना चूक असल्याचे सिद्ध केले आहे. परंतु त्यांचा गैरसमज दिसतो. कारण केवळ “अध्यात्मात” सांगितले आहे यावरून आत्म्याचे शरीरभिन्न अस्तित्व सिद्ध होत नाही. आणि श्री. देशपांडे यांचे विधान “चूक ठरत नाही. वस्तुतः “दैनंदिन अनुभव जर सामान्य असेल तर दैनंदिन अनुभवापेक्षा वेगळा असा एखादा असामान्य’ अनुभवही असू शकतो हे देशपांड्यांना मान्य करणे भाग आहे” (११९) यावावत कोणतीही तार्किक वा आनुभविक अपरिहार्यता न दाखविता श्री. भाटे वुद्धिविरोधी आग्रह धरतात हे खेदजनक आहे.
(४) श्री. भाटे यांना श्री देशपांडे यांचे आत्माविषयक मत (अर्थात् “आपली स्वतःविषयी अतीव प्रीती”) “भयंकर” च वाटते. (११९) कारण? पुन्हा तेच म्हणजे अध्यात्मात” आत्म्याला स्वतःविपयीच्या प्रीतीचा “antithesis” (११९) सांगितलेले आहे. परंतु त्यामुळे श्री. देशपांडे यांचे वरील विधान “तर्कदुष्टतेचा कळस” (११९) कसे ठरते ते मात्र अस्पष्टच आहे. जे स्वयंप्रेरणेने सत्योन्मुख होतात ते “तर्कदुष्ट” की जे आप्तवाक्यालाच अंतिम सत्य समजतात ते “तर्कदुष्ट”? शिवाय जर श्री. भाटे त्यांच्या “अध्यात्मात” भारतीय उपनिषदांचा समावेश करीत असतील तर त्यानुसार आत्मा प्रीतीचा antithesis तर नाहीच उलट तो प्रीतिमय किंवा आनंदमय आहे. या दृष्टीने श्री. भाटे यांचे विधान “अध्यात्मविरोधी” ठरते. श्री. देशपांडे यांच्या “आपण कोणत्या तरी स्वरूपात मरणानंतर उरतो या कल्पनेला आपण घट्ट विलगतो” या विधानाचा प्रतिवाद करण्याऐवजी त्याला “भयंकर” (११९) म्हटल्याने त्याची अवास्तविकता सिद्ध होत नाही हे ते लक्षात घेत नाहीत.
(५) श्री. भाटे यांच्या विचारानुसार श्री. देशपांडे यांना “कर्मसिद्धान्त कळलेलाच दिसत नाहीं.” (११९) परंतु त्यांना तो का कळला नाही व त्याचे खरे स्वरूप काय आहे याचा त्यांनी थोडा जरी उलगडा केला असता तर आमच्यासारख्या सामान्य वाचकांना यथार्थ परिचय झाला असता. जर कार्यकारणसिद्धान्त आणि कर्मसिद्धान्त श्री. देशपांडे यांच्या मते भिन्न आहेत तर ते “भिन्न मुळीच नाहीत” (११९) असे केवळ विरुद्ध विधान करून श्री. देशपांडे यांच्या विधानाची व्यर्थता स्पष्ट होत नाही. श्री. देशपांडे यांचे विधान साधार खोडून काढण्याचा प्रयत्नसुद्धा न करता केवळ आपले विधान त्याविरुद्ध आहे म्हणून ते इतरांनी मान्य करावे हा श्री. भाटे यांचा हट्ट बालिश आहे. श्री. भाटे यांचे “अध्यात्म” काय सांगते ते माहीत नाही. पण भगवद्गीता मात्र श्री. देशपांडे यांच्या भूमिकेच्या विरोधी नाही. कारण ती कर्माचे शुभाशुभ परिणाम मानते.
(६) श्री. देशपांडे यांच्या “कर्मसिद्धान्त सृष्टिनियम आहे असे मानल्यास एखाद्या चेतन शक्तीद्वारे जगताचे शासन चालते असे मानावे लागेल. परंतु असे मानण्यास कोणताही आधार नाही” या विधानाचा प्रतिवाद श्री. भाटे यांनी “माझ्या मते कर्मसिद्धान्त हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे तसेच जगताचे शासन एखाद्या चेतन शक्तीकडून चालते असे मानण्यात काहीही गैर नाही” (१२०) या विधानाद्वारे केलेला आहे. परंतु त्याद्वारे श्री. देशपांड्यांचे विधान असिद्ध कसे ठरणार? कर्मसिद्धान्त खरा की खोटा हा भिन्न प्रश्न असून, मुख्य प्रश्न त्याच्या आधारावर चेतन शासक निष्कर्षित होतो काय हा आहे. काय गैर आहे किंवा त्यांचे निराधार मत काय आहे हे मुद्दे तात्त्विक विवेचनांच्या दृष्टीने असंबद्ध आहेत. परंतु त्यांवर श्री. भाटे यांचा भर दिसतो. हिंदू व बौद्ध दोन्ही धर्म कर्मसिद्धान्त मानतात. परंतु त्यांची संबंधित कार्मिक फलांची दृष्टी सारखीच आहे. कर्मसिद्धान्त स्वीकारूनही वौद्ध चेतन ईश्वर स्वीकारीत नाहीत कारण त्याच्याशिवाय जगताचे संचालन ते स्पष्ट करतात. चेतन प्रवाहच ते कार्य करीत असतो. पण श्री. देशपांडे यांचा मुद्दा भिन्न आहे. तो म्हणजे कर्मसिद्धान्तानुसार जर कर्मफलदाता कोणी चेतन घटक वा तत्त्व आहे असा दृष्टिकोन स्वीकारला तर तसा दृष्टिकोन निष्कर्षित होण्याला कोणताच ज्ञात आधार नाही. आणि हा त्यांचा विचार असिद्ध करण्यात श्री. भाटे अयशस्वी ठरले आहेत.
(७) जर श्री. भाटे यांच्या मते, “…. व्रह्म हा शुद्ध ज्ञानमय, आनंदमय असा पदार्थ आहे” (१२१) हे श्री. देशपांडे यांचे विधान चुकीचे असेल व ब्रह्म ‘पदार्थ’ नसेल तर ते काय आहे ते श्री. भाटे ह्यांनी सांगितले असते तर ते उपयोगी ठरले असते. परंतु त्यांनी तसे केले नाही. जर श्री. भाटे यांचे “ब्रह्म ही पदार्थ नसल्यामुळे त्याचे formal representation करता येत नाही” (१२१), जर त्यात formal logic चे कोणतेही नियम लागू करता येत नाहीत” (१२१) तर व्रह्म ह्या संकल्पनेचा निर्देश करण्यासाठी ते कोणती संज्ञा सुचवितात ते स्पष्ट केले असते तर त्यांच्या वेदान्तातील व्रह्माचे ज्ञान इतरांनाही थोडे तरी झाले असते. या संदर्भात त्यांनी श्री. देशपांड्यांवर, “ते आपले खुशाल formal logic वर आधारित असलेले युक्तिवाद करून चुकीचे निष्कर्ष काढताहेत” असा केलेला आरोप अवास्तव आहे. कारण असा कोणताच युक्तिवाद व्रह्मावावत श्री. देशपांडे यांनी केलेला नाही. शिवाय formal logic वर आधारित युक्तिवाद चुकीचे असतात असा श्री. भाटे यांचा समज दिसतो. तो वरोवर नाही. कारण formal logic चे निष्कर्ष ज्या आधारभूत विधानातून निष्पन्न होतात, ती विधाने सत्य असल्यास आणि संबंधित तर्कप्रक्रिया वैध असल्यास निष्कर्ष सत्य व वैधही असतात. शिवाय वैधता व सत्यता ह्या भिन्न संकल्पना आहेत. जर श्री. भाटे यांच्या मते व्रह्म पदार्थ नसल्याने त्याचे formal representation करता येत नसेल (१२१) तर त्याचा निर्देश करावयाचा असल्यास तो कोणत्या ‘अपदार्थाने करता येईल हे त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यांनी जर तसा प्रयत्न केला असता तर त्यांच्या लक्षात आले असते की केवळ ‘पदार्थ’ च नव्हे तर कोणतीही संज्ञा अवाङ्मनसागोचर समजण्यात येणा-या व्रह्माला मर्यादित करीत असल्याने असा कोणताही प्रयत्न वेदान्ताच्या मते व्यर्थ ठरतो. म्हणूनच ब्रह्मनिर्देश ‘नेति नेति’ असा करतात. परंतु ते निर्देशित करण्यास संज्ञेचा उपयोग आवश्यक वाटल्यास ती संज्ञा ‘पदार्थ नसावी इतर कोणती तरी असावी असे त्यांना वाटल्यास त्यांनी ती सुचवावी. त्यामुळे व्रह्मस्वरूपाला वाधा पोचणार नाही.
नंतर ते लिहितात की श्री. देशपांडे यांचे “लॉजिकचे ज्ञान फारच कच्चे आहे” (१२१), त्यांचे वाचन “लॉजिकच्या टेक्स्टबुकापलिकडे गेलेले नाही” (१२१), त्यांचे तत्त्वज्ञानांचे “ज्ञानही १९५०-५५ सालापर्यंतच्या तत्त्वज्ञानापलिकडे गेलेले नाही” (१२१). त्यांची ही विधाने वास्तवतेचे भान नसल्यामुळे व अहंकारातून निर्माण झालेली दिसतात. श्री. देशपांडे ह्यांच्या “ज्ञाना” विषयी पुरेसा परिचय करून न घेता श्री भाटे यांनी केलेली निंदाव्यंजक विधाने दुर्दैवी आहेत.
श्री. भाटे “formalization” चा प्रश्न निर्माण करतात. पण त्यांना त्याच्या अभिप्रेत असलेल्या अर्थावावत मौन धारण करतात. “लॉजिक बदलले की युक्तिवादाचे स्वरूप बदलते व युक्तिवादातून काढलेले निष्कर्षही वदलू शकतात” (१२१) हे त्यांचे विधान तार्किक प्रणालीच्या अस्पष्ट किंवा अपु-या समजुतीवर आधारित दिसते. कारण भिन्न तार्किक प्रणालींचे आकार भिन्न असू शकले तरी त्यावर आधारित असतील निष्कर्ष – जर ते स्वीकृत आधारभूत सत्यावर आधारित असतील तर – – सत्य व वैध असतात हे त्यांनी लक्षात घेतलेले दिसत नाही. म्हणूनच formalization ची प्रक्रिया जितकी आकारिक तितकीच सत्यान्वेषणाच्या दृष्टीने फसवी राहू शकते हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
श्री. भाटे यांनी हे लक्षात घेतलेले दिसत नाही की propositional logic जितके प्राथमिक आहे तितकेच आकारिक दृष्ट्या प्रणालीरूप आहे, निप्कर्षसुद्धा विधान रूपातच व्यक्त होतो. logical models चे स्वरूप मूलतः propositional logic च्या विरोधी नाही. त्यामुळे व्रह्म, जीवात्मा इत्यादि श्री. भाटे यांना “अत्यंत गहन” वाटणाच्या संकल्पनांचे विवेचन श्री अरविंदांनी सूचित केल्याप्रमाणे ज्या अनन्ताच्या तर्काद्वारे (logic of the Infinite) होते त्याचे पायाभूत आधार सामान्य तार्किक नियमांपेक्षा प्रथमदर्शनी भिन्न वाटले तरी त्यावरून निष्कर्षित होणारी विधाने आगमन (inductive) वा निगमन (deductive) तर्कप्रक्रियांच्या विरोधी नसतात. त्याचप्रमाणे propositional logic च्या माध्यमातून व्यक्त करता येतात. अशी व्यक्तता कदाचित काही प्रसंगी संपूर्ण सत्याची व्यक्तता नसेल. परंतु जे शाब्दिक रीत्या सार्थ व्यक्त होऊ शकते ते विधानरूप असते हे लक्षात घेतल्यास श्री. भाटे म्हणतात त्याप्रमाणे “formalization” च्या त्यांच्या ज्ञानाच्या आधारावर श्री. देशपांडे यांना “अज्ञानी” ठरवून त्यांनी असमंजसपणाची वृत्ती स्वीकारली आहे. Logical Positivism ला त्यांनी व ते समजतात त्याप्रमाणे आजमितीस निदान पाश्चात्त्य जगताने” (१२२) “सोडून देण्यात आलेले आहे हे गृहीत धरले तरी त्याने श्री. देशपांडे यांचा मुद्दा असिद्ध कसा ठरतो? अमेरिकेतला “कुठलाही तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक” (१२२) स्वतःला logical positivist म्हणून घ्यायला तयार नसतो (१२२) हा श्री. देशपांडे यांचा दृष्टिकोन अमान्य करण्याचे तात्त्विक कारण म्हणून श्री. भाटे यांना आधारभूत वाटतो ही त्यांच्यासारख्या स्वतःला अत्याधुनिक म्हणजे अमेरिकाविचारनिष्ठ तत्त्वचिंतक समजणारयांची शोकान्तिका आहे. श्री. भाटे यांनी श्री. देशपांडे ह्यांचा दृष्टिकोन तर्कतः खोडून काढण्याऐवजी असंवद्ध बाबींमध्ये व्यर्थ वेळ व शक्ति खर्च केली आहे असे वाटते.
(८) श्री. भाटे, श्री. देशपांडे यांच्या वेदान्तातील “मिथ्या” या संकल्पनेवर आक्षेप घेतात (१२३). श्री. देशपांडे यांची “मिथ्या” विषयक धारणा का व कशी चूक आहे हे दाखविण्याऐवजी, त्यांची तद्विषयक धारणा जो “फारसा मानला जात नाही” (१२३) अशा logical positivism वर आधारित आहे म्हणून ती “चूक” (१२३) आहे असे ते प्रतिपादन करतात. हा वादविवाद नव्हे तर शुद्ध पलायनवाद आहे. श्री. देशपांडे यांच्या धारणेवावत आक्षेप घेऊन ती निरस्त करता येणे शक्य आहे, परंतु ते करण्याच्या तयारीच्या अभावी केवळ स्ववृत्तिप्रदर्शनच त्यांनी पुरेसे मानलेले दिसते.
(९) जर श्री. देशपांडे यांच्या मते “अध्यात्म हा एक प्रचंड गोंधळ आहे, ती एक परीकथा आहे” (१२३) तर श्री. भाटे यांनी श्री. देशपांडे यांचे हे विधान ते त्यांच्या (श्री. भाटे यांच्या) “formalization” किंवा इतर त्यांना उचित वाटणाच्या logical model च्या किंवा इतर कोणत्याही मान्य तार्किक प्रणालीच्या किंवा अनुभवनिष्ठ विश्वासाच्या वा ज्ञानाच्या आधारावर निरस्त केले पाहिजे. त्याऐवजी त्यांनी “Alice in Wonderland” ला तर्कशास्त्राचे सर्वोत्कृष्ट पुस्तक आणि “इसापनीतीला” नीतिशास्त्राचे सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून स्वमान्यता प्रदान केली आहे. परंतु त्याद्वारे श्री. देशपांडे यांच्या विधानाची वास्तवता ते असिद्ध करू शकले नाहीत, त्याचे खंडन करू शकले नाहीत. कदाचित श्री. भाटे ज्या Alice in Wonderland ला तर्कशास्त्राचे सर्वोत्कृष्ट पुस्तक समजतात त्यातील wonderful तर्कशास्त्राचा आतापर्यंत तरी इतर अभ्यासकांना अगम्य असणा-या – त्यांनी प्रयोग केला असावा. जर हीच “पाश्चात्त्य जगात” तार्किक प्रक्रियेची किंवा प्रतिपक्षाचा दृष्टिकोन निरस्त करण्याची पद्धत असेत तर तिची “आयात भारतात न झालेली वरी. कारण “गोंध” आणखी वाढेल. शिवाय . गोंधळात गोंधळ सुरू झाला की मूळ प्रश्न वाजूलाच राहतो हे आपण श्री. भाटे यांच्या पद्धतीवरून पाहतच आहोत.
(१०) श्री. भाटे यांच्या मते श्री. देशपांडे यांचे “विवेकवादावरचे लेख अगदीच निकृष्ट दर्जाचे वाटतात” (१२४), “त्यांची मजल ह्यूम, कांट, मिल इत्यादिकांच्या (१२४) तत्त्वज्ञानापलिकडे गेलेली नाही, किंवा त्यांना पॉल रिकटर, डेरिडा वगैरेच्या तत्त्वज्ञानाचा पत्तासुद्धा नाही.” (१२४) किंवा त्यांना “तत्त्वज्ञानातले काय कळते?”, त्यांना gestalt psychology ठाऊक आहे काय?” (१२४). अशी श्री. भाटे यांची विधाने वाचून श्री. देशपांडे यांच्या श्री. भाटेप्रणीत “अज्ञाना” पेक्षा श्री. भाटे यांच्या असभ्य अहंगडाचीच तीव्र जाणीव झाली. श्री. भाटे यांच्या माहितीसाठी हे सूचित करणे आवश्यक आहे की येथे त्यांनी निर्देश केलेल्या तत्त्वज्ञांव्यतिरिक्त इतरांचाही सतत अभ्यास होत असतो. तो अनेकदा तौलनिक असतो. इतक्यातच आधुनिक पाश्चात्त्य सांकेतिक तर्कशास्त्र आणि भारतीय न्यायदर्शनातील तर्कप्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आयोजित करण्यात आला होता. परंतु श्री. भाटे यांना आधुनिक भारतातील तत्त्वप्रवाहाची किती माहिती आहे हे कळले नाही. परंतु सशक्त तत्त्वचिंतन परावलंबी नसते. ते सत्यान्वेपक बुद्धीचे साधार प्रकटीकरण असते. त्यासाठी आप्तवाक्याचा आधार अनावश्यकच नव्हे तर वाधारूप ठरू शकतो. हे श्री. भाटे यांच्या जितक्या लवकर लक्षात येईल तितक्या लवकर ते त्यांच्या परःप्रत्ययरूप वुद्धीच्या पाशातून मुक्त होऊ शकतील असे वाटते. तसे झाले तरच ते श्री. देशपांडे यांच्या विचारांचे मूल्यमापन स्वतंत्र व वास्तववादी भूमिकेतून – American mania च्या भूमिकेवरून नव्हे – करू शकतील.
(११) श्री. भाटे यांच्या मते “भारतातील समाजापुढे उभे असलेले खरे प्रश्न अध्यात्माचे नसून आर्थिक आहेत” (१२५). परंतु त्यामुळे श्री. देशपांड्यांची भूमिका अग्राह्य वा असमर्थनीय कशी ठरते? सर्व समाजात, सर्व काळी आर्थिक प्रश्न असतात. परंतु त्यामुळे तत्त्वचिंतन व्यर्थ ठरत नाही. इतिहासानुसार अनेक तत्त्वचिंतक दरिद्री होते आणि अनेकांनी स्वेच्छेने दारिद्र्य स्वीकारले. परंतु त्यांचे तत्त्वचिंतन वा सत्यान्वेपण थांवल्याचे इतिहास सांगत नाही. समजा श्री. भाटे म्हणतात त्याप्रमाणे भारतातील समाजापुढे खरे प्रश्न “आर्थिक” आहेत. परंतु त्यामुळे श्री. देशपांडे यांच्या विचारांचे खण्डन होते काय? दुर्दैवाने असंबद्धता हा श्री. भाटे यांच्या आक्षेपांचा सामान्य व प्रभावी गुणधर्म दिसतो. सत्यजिज्ञासा ही मानवी मनाची मूलप्रेरणा आहे. ती कायम आहे तोपर्यंत, व जोपर्यंत संपूर्ण सत्य सार्विक रीतीने अनुभाव्य होत नाही तोपर्यंत मानवाचे तत्संबंधी विवेकनिष्ठ प्रयत्न सुरू राहतील व ते तसे राहावे. त्याबावत निष्पन्न होणा-या प्रणालींमध्ये भिन्नता स्वाभाविक असली तरी कोणत्याही प्रणालीच्या निरस्तीकरणाचा आधार अनुभवनिष्ठ विवेक राहणे यात मानवहित समाविष्ट आहे.
दुर्दैवाने श्री. भाटे यांची श्री. देशपांडे ह्यांच्या दृष्टिकोनाविरुद्धची विधाने तर्कविसंगत व निंदाव्यंजक आहेत. अशी अपेक्षा कमीतकमी त्यांच्यासारख्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकाकडून नव्हती. श्री. देशपांडे यांचा समावेश विद्यमान प्रमुख भारतीय तत्त्वचिंतकांमध्ये होतो. श्री. भाटे यांच्या लिखाणामुळे श्री. देशपांडे यांची “उंची कमी झाली नाही. परंतु श्री. भाटे यांचे व्यक्तिमत्त्व जास्त सवृहणीय राहिले असते तर वरे झाले असते असे मनात येते.