मागच्या महिन्याच्या अंकामध्ये तीन मोठमोठे लेख आम्ही प्रसिद्ध केले. त्यांतील शेवटचा जो लेख होता-अनिलकुमार भाटे ह्यांचा तो आम्ही प्रकाशित करावयाला नको होता असे सांगणारी अनेक पत्रे आली तसेच दूरभाषदेखील आमच्याकडे आले. तो लेख का छापला त्याची कारणे आधी आणि नंतर त्या लेखासंबंधी.
श्री. भाट्यांच्या पत्रांत सतत आरोप होत होता की त्यांची वाजू आम्ही दडवून ठेवतो. प्रतिपक्षाला आम्ही आपले मत मांडू देत नाही; आम्ही एकाच पक्षाचा प्रचार करतो. त्यांची एकामागून एक अशी तीन पत्रे आली. आम्ही त्यांचे तिसरे पत्र प्रसिद्ध केले नाही. तेही असेच ‘खमंग भाषेत लिहिलेले आहे. भाट्यांची वाजू आम्हाला झाकावयाची नव्हतीच. त्यांची लेखनशैली सदभिरुचिसंपन्न नसल्यामुळे ती झाकावयाची गरज होती. पण तसे आम्ही जर केले असते, त्यांच्या शब्दांमधून प्रकट होणारा उग्र दर्प जर आम्ही त्याला संपादकीय कात्री लावून सौम्य केला असता तर त्यांचा ‘सात्विक संताप’ आम्ही व्यक्त होऊ दिला नाही असा वोल पुन्हा आमच्यावर आला असता ही एक बाब आणि भाट्यांचे वास्तव’ रूप आमच्या वाचकांसमोर कधीच आले नसते, ते एक संभावित व्यक्ती म्हणूनच आमच्या सर्व वाचकांसमोर वावरले असते ही दुसरी बाब. त्यांचे लेखन सभ्यपणाच्या सर्व मर्यादा सोडून केलेले असते हे आमच्या वाचकांना एकदा माहीत झालेच पाहिजे असा निर्णय आम्ही घेतला. त्यांनी त्यांच्या ‘peers’ नी दिलेला सल्ला झिडकारून टाकला हे त्यांच्याच तोंडून आमच्या वाचकांना समजू द्यावे असे आम्ही ठरविले. (Peer = समपदस्थ, समानपदस्थ, तुल्यपदस्थ, [fellow, associate] वयस्य, सचिव, मंत्री, सहाय, ह्याशिवाय कुलीनजन, शिष्टजन इत्यादि-M. Monier Williams). जे आपल्या सभ्य हितचिंतकांचा सल्ला डावलून आमच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करीत सुटले आहेत त्यांच्यावर आम्हीच सभ्यपणाचे पांघरूण का घालावे असा आम्हास प्रश्न पडला.
श्री. भाट्यांच्या व्यक्तिगत टीकेमुळे आमच्या संपादकांचे काहीच नुकसान झाले नाही, होणार नाही. श्री. देशपांडे ह्यांचा स्वभाव आणि त्यांची विद्वता गेल्या नऊ वर्षांमध्ये आमच्या वाचकांच्या पूर्ण परिचयाची झालेली आहे, वाचकांचे सौहार्द (good will) त्यांनी विपुल प्रमाणात मिळविलेले आहे हे ह्या अंकामध्ये अन्यत्र प्रकाशित झालेल्या लेखांवरून सर्वांच्या लक्षात येईल. आमच्या मनात तशी खात्री वसत असल्यामुळेच आम्ही हा निर्णय केला. आमच्या संपादकांवर कोणी कशीही टीका केली तरी आम्ही विचलित होत नाही–होणार नाही, आमचे कार्य ह्यापुढे पूर्ववत् चालू राहील असे आश्वासन ह्या प्रसंगी आम्ही आमच्या वाचकांस देतो. आमच्या मासिकाच्या स्तंभांतून एकमेकांवर चिखलफेक करण्याचे स्वातंत्र्य मात्र आम्ही आमच्या वाचकांना देणार नाही, आणि टीका म्हणजे शिवीगाळ नव्हे.
श्री. भाट्यांना जो आत्मा जाणवला आहे किंवा त्यांच्या ज्ञानचक्षुना जो काही दिसला आहे तो साक्षात्कारामुळे नव्हे. तसे असते तर त्यांनी त्याचा उल्लेख नक्की केला असता. अनेक प्राच्य आणि प्रतीच्य दार्शनिकांची पुस्तके वाचून त्यांची आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल खात्री झालेली आहे. थोडक्यात काय तर ते शब्दप्रामाण्यवादी आहेत. आणि श्री. देशपांडे तसे नाहीत ह्याचा त्यांना फार त्रास होत आहे. व्यासोच्छिप्ट जगताच्या बाहेर काही आहे हे त्यांचे मन मान्य करीत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की श्री. दियदे ह्यांचेच जगत् व्यासोच्छिप्ट नसते, – ते एकटेच स्वयंप्रज्ञ असते तर भाट्यांची फारशी हरकत राहिली नसती, पण देशपांडे इतरांनाही स्वयंप्रज्ञ होण्यास प्रवृत्त करतात हे पाहून त्यांचा तिळपापड होतो. काही करून दि. य. देशपांड्यांना आपल्या अंगीकृत कार्यापासून परावृत्त केलेच पाहिजे; अश्रद्ध माणसाच्या हाती मासिकाचे प्रकाशन म्हणजे भुताच्या हाती कोलीत असे त्यांना वाटत असावे. शब्दप्रामाण्य, ग्रन्थप्रामाण्य, आप्तवाक्यप्रामाण्य ह्यांच्या वाहेर पडावयाची भाट्यांच्या मनाची तयारी नाही आणि दियदे ह्यांच्या युक्तिवादाचा तर्कशुद्ध प्रतिवाद ते करू शकत नाहीत. अनेक युरोपीय विचारवंतसुद्धा व्यासोच्छिष्टाच्या बाहेर विचार करीत नाहीत. ते गोरे लोक! ते कसे चुकतील! निदान त्यांचे विचार समजून घेऊन आपले मत सुधारून घ्या’ असे श्री. भाट्यांना आम्हा मंडळींना सांगावयाचे आहे. पण जोपर्यंत शब्दाशिवायचे दुसरे एखादे तर्कशुद्ध प्रमाण ते देत नाहीत तोपर्यंत आमचे मत बदलणार नाही.
आमच्या मते श्री. भाट्यांनी एकही नवीन मुद्दा मांडलेला नाही. त्यांच्या मताला अनुकूल असलेल्या काही युरोपीय ग्रन्थकारांची नावे तेवढी आमच्या काही वाचकांना नवीन असतील. आम्ही परमेश्वराचे अस्तित्व (आज तरी) सपशेल नाकारतो कारण त्याच्या अस्तित्वाविषयी पुरेसा पुरावा आजवर आम्हाला मिळालेला नाही. अमक्याने म्हटले म्हणून देव मानला पाहिजे असे आम्हाला वाटत नाही. आम्ही देव आणि आत्मा ह्यांचे अस्तित्व नाकारतो ह्याचे एकमेव कारण आम्हाला शब्दप्रामाण्य मान्य नाही हे आहे.
इतरं महत्त्वाच्या विपयांसंबंधी आता पुढच्या अंकात.