संस्कृत तथा प्राकृत भाषेमध्ये श्रद्धा ह्या शब्दाचा सर्वत्र उपयोग केला जातो. परंतु ह्याचा निश्चित अर्थ दिसत नाही. जो काही मिळतो त्याचा हा असा प्रकार आहेः ‘श्रद्धा = गुरुपु शास्त्रेषु निरतिशयः विश्वासः शास्त्राचार्योपदिष्टऽथै अननुभूतेऽपि एवमेव एतदितिविश्वासः, एवं विश्वासः- वंचकत्वाभावसंभावना.’ हे विवरण समाधानकारक नाही. वचन विश्वासानुयायी आहे. …..
“विश्वास हा अनुभव व अनुमान या दोहोंचा परिणाम आहे. अनुभवाला परीक्षण (बुद्धि व शक्ति) अनुमानाला विवेक (बुद्धि) लागते. अनुभवाचे निरीक्षणपूर्वक परीक्षण पाहिजे व अनुमानाला पूर्वानुभव मदतीला घ्यावा लागतो. या दोन गोष्टींशी व्यस्त प्रमाणात विश्वास उत्पन्न होतो. अगदी लहान मुलाच्या या दोनही शक्ती अत्यल्प प्रमाणात असतात म्हणून आईवर अत्यन्त विश्वास वा श्रद्धा असते. परन्तु वयाबरोबर परीक्षणशक्ती व विवेकशक्ती वाढतात व त्यांशी व्यस्त प्रमाणात श्रद्धा कमी होत जाते. ज्या मानाने विवेकशक्ती व अनुभवशक्ती कमी त्या मानाने विश्वास व श्रद्धा अधिक. असा विचार केल्यावर असे वाटते की, “निरतिशयः विश्वासः’ ही श्रद्धेची व्याख्या विवेकाला वाधक रूपाने उभी करते. ‘विश्वास ठेवा, ‘श्रद्धा’ ठेवा म्हणणारे एक मूर्ख तरी असले पाहिजेत किंवा धूर्त तरी असले पाहिजेत. विश्वास उत्पन्न होतो; ही ठेवण्याची वस्तू नाही. “अन्ध श्रद्धा’ ‘डोळस श्रद्धा’ हे शब्दप्रयोगच अयोग्य व अस्थानी होत.”