संपादकीय

अन्यायकर्त्याला सर्व समाजाचे संमोदन वा मूक अनुमोदन असते
ह्या अंकामध्ये अन्यत्र श्री. नाना ढाकुलकरांची दोन पत्रे प्रकाशित होत आहेत. त्यांच्या पूर्वीच्या पत्राला आम्ही जे उत्तर दिले त्याने त्यांचे समाधान झाले नाही हे उघड आहे. आजचा सुधारकचे धोरण व्यक्तीवर किंवा व्यक्तिसमूहावर (एखाद्या जातिविशेपावर) केलेली टीका शक्यतोवर न छापण्याचे आहे. त्या धोरणाला अपवाद करून ही पत्रे छापत आहोत. आमच्याकडे आलेल्या आणखीही काही लेखांत व्यक्तीवर टीका करणारा मजकूर आलेला आहे. तेवढा प्रसिद्ध करून ह्यानंतर असा मजकूर वगळला जाईल. आम्हाला विचारांशी भांडावयाचे आहे, व्यक्तींशी नाही, कारण व्यक्तीचे विचार बदलू शकतात ह्यावर आमचा ठाम विश्वास आहे. व्यक्तींवर टीका केल्याने चर्चेमधले मुद्दे वाजूला राहतात. चर्चेला निष्कारण फाटे फुटतात. ती भलत्याच दिशेला भरकटत जाते म्हणून आम्ही कठोरपणे हा निर्णय घेत आहोत. व्यक्तिविशिष्ट लेखन हे विचारापासून दूर गेलेले लेखन आहे, लेखकाजवळचे मुद्दे सबळ नसल्याचे ते लक्षण पुष्कळदा असते असे आमचे मत आहे. आजचा सुधारकात प्रसिद्ध झालेल्या लेखामधील ‘अमका विचार लेखकाला अशोभनीय आहे’, ‘हेतुपूर्ण टीका करणे हे कुजक्या आणि पूर्वग्रहदूपित विचारांचे लक्षण म्हटले पाहिजे. …. अमक्याला अमके कसे समजले नाही. …’ ही आणि अशासारखी भाषा आमच्या लेखकांनी टाळावी अशी त्यांना विनम्र आणि आग्रहाची विनंती आहे.
आमच्या संपादकांचे अथवा काही विशिष्ट लेखकांचे विचारदोष दाखविणारे लेखन आम्ही दडपून टाकतो अशी टीका आमच्यावर होऊ नये एवढ्याचसाठी आम्ही हे लिखाण आजवर प्रसिद्ध केले, परंतु ह्यापुढे आम्हाला तसे करता येणार नाही – आमच्या मासिकाच्या प्रकृतीशी ते विसंगत आहे असे आम्हाला वाटते. अशा लेखनातील मजकुराशी आम्ही बहुतेक वेळा सहमत नसतो. ती असहमति आम्ही व्यक्त केली की आम्हीच प्रसिद्ध केलेल्या मजकुराची आलोचना आम्ही करीत बसतो असे होते. ते वरे नाही. तरी आमच्या लेखकांनी विचार कोणी मांडला आहे ह्याकडे मुळीच लक्ष देऊ नये आणि लेखकांवर निर्बुद्धपणाचे, अज्ञतेचे अथवा हेतूचे आरोप करू नयेत अशी त्यांना मनापासून प्रार्थना आहे.
आमच्या मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखांवरची उत्तरे-प्रत्युत्तरे प्रकाशित करण्यास आम्ही बांधलेले आहोत. पण उत्तरे म्हणजे व्यक्तिगत किंवा जातिगत टीका नव्हे. एका व्यक्तीच्या चुकीसाठी सर्व कुटुंबाला जबाबदार धरणे जसे योग्य नाही तसेच काही व्यक्तींच्या चुकीच्या वर्तनासाठी त्या वंशविशेषाला म्हणजेच जातीला जबावदार धरणेही योग्य नाही. काही लोक अन्याय करीत असताना बाकीचे स्तब्ध किंवा मूक राहतात, ते अन्यायकत्र्याला आवर घालत नाहीत, त्याचप्रमाणे अन्याय सोसणान्याच्या पाठीशी समान परिस्थितीत असलेले लोक उभे राहत नाहीत. सगळेच नवरे आपापल्या बायकांना मारत नसतात. पण जो मारतो त्याचा हात ते धरीत नाहीत म्हणून सगळेच नवरे दोषी असतील तर मार खाणा-या स्त्रियांना बाकीच्या मार न खाणा-या महिला मदत करीत नाहीत म्हणून त्याही दोषी आहेत. ह्याचा अर्थ असा की केवळ पुरुष दोषी नसून सगळा स्त्रीपुरुपसमाज दोषी आहे किंवा मारकुटे नवरे तेवढे व्यक्तिशः दोषी आहेत, सगळी पुरुषजात दोषी नाही. गेली हजारो वर्षे दलितांवर आणि महिलांवर सातत्याने अन्याय होत आलेला आहे. तो काही एकाच जातिविशेषाने किंवा वंशविशेषाने केला नाही. प्रत्येक जातीने आपल्यापेक्षा कनिष्ठ समजल्या जाणा-या जनसमूहावर केला आहे. असो. हा कोळसा उगाळावा तेवढा काळाच आहे. तरी आता आपण भविष्याकडे नजर देऊ या –
येथे हे नोंदवावयाला हरकत नाही की आम्ही हिंदुत्ववादी नाही, आम्ही परंपरावादी नाही. आम्ही सावरकरवादी नाही, आम्ही गांधीवादी नाही, आम्ही फुले – आंबेडकरवादी नाही, आम्ही मार्क्सवादी नाही. आम्ही स्वतःला विवेकवादी मानतो. इतिहासाकडे म्हणजे पूर्वसंस्कारांकडे, पूर्वग्रहांकडे दुर्लक्ष करणे, ज्यांची जात, ज्यांचा धर्म त्यांच्या मनांतून गळून पडला आहे, हे पूर्वग्रह ज्यांनी जीर्ण वस्त्राप्रमाणे टाकून दिले आहेत अशांचा समाज निर्माण करणे हे आमच्या मासिकाचे उद्दिष्ट आहे. अन्यायकर्त्या व्यक्तींचा वचपा काढणे हे नाही. आम्हाला अन्याय दूर करावयाचा आहे. मग तो कोणीही केला असो. त्याचा वंश आमच्या लेखी गैरमहत्त्वाचा आहे.
श्री. ढाकुलकरांच्या पत्रात आणि वाचक-मेळाव्यात व्यक्त झालेला आशय आम्हाला असा जाणवतो की आम्ही ब्राह्मण-ब्राह्मणेतर-वादामध्ये स्पष्ट आणि निर्भीडपणाने अन्यायविरोधकाची, त्यासाठी संघर्ष करू इच्छिणा-याची बाजू घेत नाही. आमच्या भिडस्त स्वभावामुळे वा ज्या वंशात आमचा (अपघाताने) जन्म झाला त्याच्या विरोधात जाण्याचे धैर्य आम्हाला होत नाही. म्हणून आम्ही असे गुळमुळीत धोरण स्वीकारले आहे. त्यांचा आमच्यावर व्यक्तिशः रोप नसला तरी त्यांना स्पष्ट दिसत असलेल्या गोष्टी त्यांच्याइतकाच निःसंदिग्धपणे मांडण्याचे धाडस आम्हाला होत नाही हा त्यांचा आरोप कायमच आहे.
येथे आम्ही सांगू इच्छितो की ह्या समस्येच्या त्यांच्या आणि आमच्या आकलनात मौलिक फरक आहे असे आम्हाला जाणवते. तो आम्ही वर मांडला आहे आणि काही अधिक खुलासा पुढे करीत आहोत. येथे एक दोन उदाहरणे देतो. कठपुतलीच्या खेळात पडद्याच्या मागे एक सूत्रधार असतो. तो त्याच्या हातातल्या सूत्रांच्या आधारे रंगमंचावरच्या वाहुल्याची हालचाल घडवून आणतो. त्या वाहुल्या कधी एकमेकींशी भांडतात, युद्ध करतात तर कधी एकमेकांच्या गळ्यांत गळे घालतात. त्यांचा बोलविता धनी वेगळाच असतो. ह्या जगाच्या रंगमंचावर वावरणाच्या आम्हा सर्वांच्या मागेसुद्धा एक सूत्रधार आहे. काहींना तो ईश्वर आहे असे वाटते, फक्त ब्राह्मण समजून उमजून अन्याय करीत होते असे वाटते, तर आम्हाला आमचे पूर्वसंस्कार व आमच्या श्रद्धा आमचे वर्तन ठरवितात असे वाटते. लोकांच्या विवेकपूर्ण वर्तनाविपयी आम्हाला शंकाच वाटत असते. शतकानुशतके काही वंशाचे लोक अन्य वंशांच्या
लोकांवर जुलूमजवरदस्ती करीत राहतात तेव्हा ते विवेकाने वागत नाहीत हे स्पष्टच आहे. येथे एक उदाहरण घेऊ. आपल्या संस्कृतीमध्ये मुख्यतः स्त्रीशूद्रांवर असा अन्याय सातत्याने झालेला आहे. तात्पुरत्या अस्पृश्यतेचा, दुय्यम दर्जाच्या नागरिकत्वाचा शाप सगळ्या वर्णाच्या स्त्रियांना भोगावा लागला आहे. अत्यन्त अपमानास्पद असे जिणे स्त्रीशूद्रांना जगावे लागले आहे. नवल असे की आपल्याच देशात आणि अधिक सुसंस्कृत म्हणविणा-यांनी हा जुलूम आपल्याच आई-वहिणींवर आणि मुलींवर मोठ्या प्रमाणावर केला आहे. सगळ्या पुरुषांनी आणि सधवा स्त्रियांनी सुद्धा विधवांना अत्यंत तुच्छतेने वागवले आहे. त्यांची परोपरीने विटंबना केली आहे. अशा आमच्या पुरुपांच्या ह्या कृतीमध्ये आम्हाला विवेकाचा अभाव दिसतो. तर इतरांना हेतू दिसतो. केवळ स्त्रीशूद्रांनाच नव्हे तर ब्राह्मणांनी एकमेकांना अपंक्त मानलेले आहे. आमच्या लहानपणापर्यंत आमच्या रेल्वेस्टेशनांवर ‘हिंदु पानी’ आणि ‘मुसलमान पानी’ पाट्या लावून पिण्याचे पाणी वेगळे ठेवले जात होते. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका संताच्या वंशजांकडे जाण्याचा आम्हाला एकदा प्रसंग आला. त्यावेळी बैठकीवर वसलेल्यांसाठी घरातून चहा येताच यजमानांनी हळूच एका सज्जनाला ‘पाटील’ अशी हाक दिली. पाटील विचारे मुकाट्याने उठून बाहेर गेले. तेथे त्यांना वेगळ्या पात्रात चहा दिला गेला. त्यांनी आपली ‘याति हीन’ आहे असे सहजपणे मान्य केले. ही घटना आमच्या मनाला जितकी लागली तितकी दुस-या कोणालाच लागली नाही. पाटलांसकट सारेच अशा प्रसंगांना निढवलेले! दुःख ह्याचे आहे की प्रत्येकजण आपल्याच वंशाच्या म्हणजे जातिधर्मातील लोकांच्या दुःखांशी आजवर समरस होत आला आहे. खिश्चन जोगिणींवर बलात्कार झाल्यावर नागपुरात फक्त ख्रिश्चनधर्मीयांचा मोर्चा निघाला. ख्रिश्चन-धर्मीयांनाच त्या घटनेचे दुःख झाल्याचे दिसले. आज हे वास्तव असले तरी आम्हाला विवेकवादाच्या साह्याने हे वास्तव बदलावयाचे आहे.
पूर्वी काहींना भूतवाधा होत असे. आज भूतबाधेचे प्रमाण कमी झालेले आहे. पण जातिवाधा, धर्मवाधा, देवबाधा, संपत्तिवाधा ह्यांमधून माणूस सुटलेला नाही. ह्या वाधेचे प्रमाण कमी जास्त असेल पण ज्यांचा ज्यांचा म्हणून मानवी मनाला अभिमान वाटू शकतो त्या सर्व वाधाच होत. (योनिशुचितेचा अभिमान, भाषेचा, राष्ट्रांचा आभिमान ही अन्य काही उदाहरणे.) ज्यांना ह्या बाधा झालेल्या असतात त्यांना स्वतःला त्यांचे भान नसते. त्यांच्याकडे बाहेरून तटस्थपणे पाहणा-या इतरांनाच ती बाधा आहे हे समजू शकते.
एखाद्याला झालेली भूतवाधा काढण्यासाठी त्याला वेदम झोडपण्यात येत असे. पण असे केल्याने त्याचा मनोरोग दूर होत नसे. ती बाधा घालविण्यासाठी मारझोड करण्याऐवजी मानसोपचार करण्याची गरज आता आता समजू लागली आहे. एखाद्या वंशाला झालेली जातिबाधा काढण्यासाठी प्रतिपक्षावर शाब्दिक आसूड मारीत राहून उपयोग नाही, तर निराळ्या मानसोपचारांची गरज आहे असे आमचे मत आहे.
ह्या जगात भूत नाही, तो मनाचा खेळ आहे. त्याचप्रमाणे देव नाही, धर्म नाही, जात वा वंशमूलक उच्चनीचभाव नाही, इतकेच नाही तर पैसाही नाही. हे सारे मानवी मनाचे खेळ आहेत; मनाखेरीज इतरत्र जगात त्यांना खरे अस्तित्वच नाही. ते मानवी मनावरचे संस्कार आहेत. ते, आम्ही म्हणजे आमच्या मानवी मनांनी, त्या त्या भावभावनांवर व वस्तूंवर केलेले आरोप आहेत. संपूर्ण मानवजात कमी अधिक प्रमाणात त्यांवर विश्वास, निष्ठा, श्रद्धा वगैरे ठेवीत असल्यामुळे आम्हा नगण्य विवेकवाद्यांशिवाय त्यांचे अस्तित्व दुसरे कोणी नाकारीतच नाहीत.
देव, धर्म आणि जात ह्यांच्याकडे बाहेरून पाहण्याची इच्छा काहींना तुरळकपणे होऊ लागली आहे. पण पैशाकडे असे तटस्थपणे पाहण्याचे सामर्थ्य आजवर फारच थोड्यांनी दाखविले आहे. ते भान आमच्या मासिकातून आमच्या वाचकांना देण्याचा आमचा मानस आहे. ह्या जगातली विषमता ही देवाच्या, धर्माच्या, जातीच्या, वंशाच्या आणि पैशाच्या आश्रयाने व मनाच्या साह्याने नांदते. आपल्याला आपल्या व्यवहारातून विषमता घालवावयाची असेल तर उपर्युक्त चार-पाच गोष्टींचे वास्तव स्वरूप आम्हाला समजून घ्यावे लागेल. जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या अभिमानामुळे अमक्या जातीचा, अमक्या वंशाचा माणूस माझ्या जवळचा, बाकीचे दूरचे अशी शिकवण आमच्या मनाला लागते, ती समतेला बाधक असते.
आम्हाला पुरोहितवर्गाचे-वर्णाचे-वर्चस्व नको. मुळीच नको. पण त्याबरोबरच कोणत्याच वर्णाचे वर्चस्व नको. समता हवी. पण आजवर असे कधीही घडून आले नसल्यामुळे आमचे प्रश्न फार अवघड होऊन बसले आहेत.
एकदा आपल्या डोक्यातला देव बाहेर पडला की आपल्याला या जगातले व्यवहार वेगळे दिसावयाला लागतात. या ऐहिक जगाच्या पलीकडे आपल्या मनांवर सत्ता चालविणारी कोणतीही शक्ती नाही ह्याची मनाला खात्री पटली की गुंतागुंतीच्या मानवी व्यवहारांच्या मागचा कार्यकारणभाव स्पष्ट होऊ लागतो आणि देव, धर्म, जात, पैसा ह्या सगळ्या मानवांनी एकमेकांना शिकविलेल्या संकल्पना आहेत हे उमजू लागते. ह्या अर्जित संकल्पना आहेत हे स्पष्ट होते. देवाची सत्ता ह्या जगावर चालते कारण सगळ्या माणसांनी आपापल्या मनात त्याचे अधिराज्य स्वीकारले आहे. देवाचे राज्य मानवी मनाच्या वाहेर नाही तसेच धर्माचे, जातीचे, पैशाचेही अधिराज्य मानवी मनाच्या बाहेर नाही. रांजाची, देवाची, धर्माची सत्ता, (शासन, आधिपत्य, नियंत्रण, अधिकार, स्वामित्व इ.) जातीची, पैशाची सत्ता – त्याला आनुषंगिक असलेल्या आपपरभावासह त्याचप्रमाणे उच्चनीच भावासह – आपणा सर्वांचे त्या संकल्पनांना संमोदन (sanction) असल्यामुळेच चालते. ह्या जगात भविष्यकाळी समता नांदावयाची असेल तर ह्या संकल्पनांच्या पाठीशी उभे असलेले मानवी मनांचे संमोदन (वा अनुमोदन) आम्हाला काढून घ्यावे लागेल. परमेश्वराचा अधिकार मानावयाचा नाही, पण धर्माचा, जातीचा अधिकार मानावयाचा असे करून समता कधीही यावयाची नाही. एका जातीची जागा दुसन्या जातीने घेणे म्हणजे समता येणे नव्हे. ब्राह्मणांची जागा मराठ्यांनी घेतल्यामुळे किंवा महारांच्या जागी ब्राह्मण आल्यामुळे, किंवा हिंदुधर्माच्या जागी वौद्धधम्माची स्थापना करून आम्ही समतेच्या दिशेने आमची प्रगति होते असे समजतो, पण हा भ्रम आहे. राम, कृष्ण किंवा सुब्रह्मण्यम् ह्यांच्या ठिकाणी निर्मिकाची प्रतिष्ठापना (घटकाभरासाठीसुद्धा) करून समता येत नाही. आपल्या मनांमधले द्वैतभाव आणि उच्चनीचभाव जोवर नष्ट होणार नाहीत तोवर आपण समतेपासून चार कोस दूरच राहू. समता आणण्याच्या दृष्टीने आणि पूर्वी कधीही ह्या पृथ्वीतलावर नांदली नाही अशी समता आणण्याच्या दृष्टीने एका देवाच्या जागी दुसन्या देवाची, एका धर्माच्या जातीच्या-जागी दुसन्या धर्माची किंवा जातीची प्रतिष्ठापना करून आपले प्रश्न सुटावयाचे नाहीत. तसेच पैशाच्या जागी वस्तुविनिमयाची प्रतिष्ठापना करूनही भागणार नाही. त्यासाठी सार्वजनिक संपत्तीची संकल्पना आपणास समजून घ्यावी लागेल.
आमचे महाराष्ट्र राज्य हे प्रागतिक विचारांचे राज्य आहे. सनातनी कर्मठपणा महाराष्ट्राने इतर राज्यांच्या तुलनेने निदान एक पिढी अगोदर टाकून दिला आहे. परंतु अशा महाराष्ट्रातसुद्धा आमच्या आजवरच्या नेत्यांनी, आमच्या समाजधुरीणांनी एकाच्या जागी दुस-याचाच विचार केला की काय अशी शंका येते. ह्या उच्चनीचतेच्या संकल्पनांना मनातून हद्दपार करण्याचा प्रयत्न ज्यांनी कोणी आजवर केला असेल तो तोकडा पडला आहे. जात्यभिमानाच्या गुंत्यात अडकून न पडता आम्हा सायांना त्याच्या बाहेर कसे पडता येईल हे पाहावयाचे आहे. आपण देवसंकल्पनेच्या बाहेर जसे पडू पाहत आहोत – त्यात अत्यल्प प्रमाणात सफल होत आहोत, तसेच जातिधर्माच्या संकल्पनेतून बाहेर पडण्यातही आम्ही सफल होऊ.
आपल्या आजच्या मानवी व्यवहारात पैशाला फार जास्त महत्त्व आलेले आहे. त्याचा विचार करता आम्हाला असे जाणवते की देवसंकल्पना आणि धनद्रव्यसंकल्पना ह्यांमध्ये विलक्षण साम्य आहे. एका कागदाच्या तुकड्यावरच्या कोण्या एका व्यक्तीच्या छापलेल्या सहीवर विश्वास ठेवून तिच्या साह्याने आपले देवाणघेवाणीचे व्यवहार करताना आम्ही त्या कागदाच्या ठिकाणी काही एक सामर्थ्य आहे असे मानून चालतो. हे सामर्थ्य आणि देवाच्या मूर्तीच्या ठिकाणचे देवत्व प्रस्तुत लेखकाला वेगळे जाणवत नाही. हे तर पैशाचे बाह्य, लौकिक रूप आहे. पण बँकेमधल्या खतावण्यांमध्ये नोंदलेल्या आकड्यांवर जेव्हा आम्ही क्रयशक्तीचा आरोप करतो तेव्हा आमचे मन थक्क होते! आम्हाला त्या आकड्यांच्यामध्ये आणि परमेश्वराच्या निर्गुण आणि निराकार रूपात विलक्षण साम्य जाणवते. केवळ त्या आकड्यांची देवाणघेवाण करून आम्ही एकमेकांना जेवूखाऊ घालतो, कपडेलत्ते दोतो इतकेच नाही तर मोठमोठी घरे सुद्धा बांधून देतो. त्या आकड्यांसाठी आम्ही जीव टाकतो आणि एकमेकांचे जीव घेतो सुद्धा. वास्तवात आम्हीच एकमेकांना जेवूखाऊ घालत असतो पण आम्ही समजतो की आम्ही देवाच्या कृपेने जेवतो. त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा एकमेकांना घरे बांधून देतो तेव्हा आमच्या खात्यातल्या आकड्याचा अनुग्रह आमच्यावर झाला आहे असे आम्ही मानतो. हा सारा मानवी मनांच्या संमोदनाचा खेळ आहे. देवाचे, धर्माचे, जातीचे, पैशाचे हे मानवनिर्मित रूप आमच्या वाचकांच्या मनात ह्या लेखाच्या योगाने थोडेफार स्पष्ट झाले असेल अशी आशा आहे. ते जितके जास्त स्पष्ट करता येईल तितके करण्याचा यत्न चालू ठेवण्यात येईल. त्यात अधिकाधिक स्पष्टता आणण्यासाठी आम्हाला आमच्या वाचकांच्या सहकार्याची गरज लागणार आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.