राजाच्या खांद्यावरून वेताळ बोलू लागला. त्याचा स्वर नेहमीपेक्षा खिन्न होता. “राजा, आज अकरा में एकोणीसशे नव्याण्णऊ”. आपण गेल्या वर्षी याच दिवशी पोखरण – २ अणुचाचण्या केल्या, हे तुला आठवतच असेल.” राजाने मान डोलावून होकार भरला.
“काही लोकांना ह्या चाचण्यांमुळे बुद्ध हसला असे वाटले, आणि एकूणच या घटनेमुळे जगातील इतर देशांमध्ये आपली पत वाढली असे वाटले”. हा हर्षोन्मादाचा काळ तुला आठवत असेल, होय ना?” राजाच्याने राहवेना, तो भडाभडा बोलू लागला. “लोक फार विघ्नसंतोषी असतात, वेताळा. आपण आपल्या तंत्रशक्तीचे प्रदर्शन केले रे केले, आणि त्या बाकी लोकांनीही दोनचार बाँवस्फोट करून सारा मजा किरकिरा केला. खरे तर त्यांच्याकडे फारसे बाँब नाहीतच – एकाने तर विनोदाने त्यांच्या चाचण्यांना एकतर्फी निःशस्त्रीकरण म्हटले!” राजा खुदुखुदु हसला. पण लगेच खिन्नही झाला. “मग ते अमेरिकन मध्ये पडले. आर्थिक निर्वध काय आणि इतर काय काय करून दुधात मिठाचे पोतेच ओतले!”
वेताळ राजाचे डोके गोंजारत म्हणाला, “शांत हो! उगी, उगी! अरे, तू शड्डू ठोकलेस आणि दंडातल्या बेटकुळ्या दाखवल्यास, तर तुझा प्रतिस्पर्धी पैलवानही तेच करणार ना? आणि अमेरिकेचे म्हणशील तर त्यांना इतर सारे देश त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे वागून हवे आहेत. त्यांची वृत्ती अशी की त्यांनी तुला आणि पाकीना। शस्त्रास्त्रे विकायची आणि तुम्ही त्या हत्यारांनीच लुटुपुटीच्या लढाया खेळायच्या. तुम्ही उगीच स्वतःचीच मोठी शस्त्रास्त्रे बनवायचा उद्धटपणा केला तर ते रागावणारच!”
“ते कोण आम्ही कसे लढावे ते ठरवणारे”? राजा संतापाने म्हणाला, वेताळ हसला. म्हणाला, “अरे, बळी तो कान पिळी हा जुनाच फॉर्म्युला नाही का? कुठे ग्रेनाडा नामक लहान खुया बेटावर काही अमेरिकन विद्यार्थ्यांना छेडले, तरी अमेरिकेने तेथे सैन्य पाठवले! कोसोव्होचे युद्ध तर आता या क्षणीही सुरू आहे.”
“ही तर दंडेली झाली”! राजा वेताळाचे बोलणे तोडत म्हणाला.
जरा वेळ शांततेत गेला. मग वेताळ म्हणाला, “बरे, आता विषय बदलू या. क्रिकेट विश्वचषकावर बोलू या!” राजा गप्पच राहिला. वेताळाचे ओझे खांद्यावर वाहून राजाला आगरकरचा दुखरा पाय आणि तेंडुलकरची दुखरी पाठ या दोन्हींबद्दल खूप सहानुभूती वाटू लागली होती. गेल्या विश्वचषक स्पर्धेतला भारतीय संघाचा शेवट आठवतो का?” वेताळाने विचारले. राजाला स्पष्ट आठवत होती, ती घटना. श्रीलंकेशी उपांत्य सामना खेळताना भारतीय संघ हरू लागताच कलकत्त्यात दंगल उसळून सामना बंद पडला. अर्थातच तो सामना श्रीलंकेला बहाल केला गेला – त्यावेळी विनोद कांबळीसोबत राजाही ढसढसा रडला होता.
“बरे तर, राजा. आता आपण आपल्या नेहेमीच्या प्रश्न विचारण्याच्या खेळाकडे येऊ. बुद्धाचे हसणे आणि विनोद कांवळीचे रडणे – समान धागा कोणता, या दोन घटनांमध्ये?”
राजा भावनाप्रधान होता, पण मूर्ख नव्हता. कधी सहानभूतीची लाट, कधी कांद्याच्या किमती, कधी रामजन्मभूमी — राजा निवडणुकांच्या वेळी जरा जास्तच भावनाप्रधान होत असे. पण तरीही तो मूर्ख नव्हता, असे मानले जात असे. आताही राजाने पाक-अमेरिकेवरचा राग, पाय-पाठीची दुखणी, या सा-यांवर मात केली. राजा बोलू लागला,
“वेताळा, आपला समाज भौतिक – ऐहिक बाबींमध्ये गरीब आहे”. इतर देशांशी कोणत्याही बाबतीत तुलना करण्याचा प्रसंग आला, तर बहुतेक वेळी आपण इतर देशांच्या तुलनेत खूप मागे पडतो. आपण जगातील सर्वांत मोठे गोधन सांभाळतो, पण दररोज दर माणशी देधाचा हिशोब एका चहाच्या चमच्याहूनही कमी आहे!”
“कोणत्याही क्रीडा – स्पर्धेतही आपली कामगिरी नगण्य असते”. एका आशिया स्पर्धेत आपण केवळ चारसहा देशच जो खेळ खेळतात अशा कबड्डीतच फक्त अव्वल ठरलो होतो. पण यातच एक विदारक सत्यही आहे – साक्षरतेत खूप मागे असलेल्या आपल्या समाजातील साक्षरांचीच नव्हे तर सुशिक्षितांची संख्याही अनेक लहान व मध्यम देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे! बरे, या सुशिक्षितांना ही जाणही आहे, की जगातल्या सर्वांत प्राचीन सुसंस्कृत समाजांमध्ये आपली गणना होते आणि या सुशिक्षितपणातून सध्याचे दरिद्री चित्र आणखीच भीषण, आणखीच हृदयद्रावक वाटू लागते.”
“मग गरज वाटायला लागते कर्तबगार व्यक्तींची, ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर या समाजाचा ठसा उमटवतील. गरज वाटायला लागते काही खास कर्तबांची, उपलब्धींची, अचीव्हमेंट्सची. यातूनच कधी पोखरण घडते – पहिले की दुसरे हे विसर, तू. कधी मात्र कर्तृत्व दाखवायला जाताना अनपेक्षित अपयश पुढ्यात येते. एखादा नगण्य आकाराचा समाज या एका अब्जाच्या समाजाला धूळ चारतो. मग हे वैफल्धही अब्जाने गुणले जाऊन महाकाय दंगली घडवते!”
राजाचे आख्यान सुरू असताना वेताळ कौतुकाने मान डोलावत होता. राजा थांबला, आणि वेताळाने बोलायला सुरुवात केली.
“राजा, तू चांगले विश्लेषण केलेस, या समाजाच्या भावनिक – मानसिक तहानेचे. एखादी पी.टी. उपा, एखादा कपिल देव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव .का होतो, ते तू सुचवलेस. एकीकडे भारतीय नागरिक नसलेले हरगोविंद खुराना आणि एस. चंद्रशेखरही आपले का वाटतात – आणि वंशाने भारतीय नसलेली मदर तेरेसाही आपली का वाटते, हेही तुझ्या बोलण्यातून समजू शकते. अगदी सौंदर्यस्पर्धांना मटन – मार्केट म्हणणारेही सुस्मिता मुखर्जी आणि ऐश्वर्या रायवर का भाळतात, हेही समजले.
“पण काय रे, तुमच्या आत्मसन्मानाला स्पर्धात्मक क्षेत्रच का आवश्यक वाटते? तुमच्या गर्वाच्या भावनेला टांगून ठेवायला तुलनेच्या खुट्या का लागतात?”
“एकोणीसशे चौरयाहत्तर नंतर तुम्ही अत्रधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालात, याचा गर्व का नाही वाटत? अमेरिकेने महासंगणक द्यायचे नाकारल्यावर तुम्ही त्याच्या खूप कमी खर्चात परम – १०००० घडवला, याचा गर्व का नाही वाटत? कोणीही भारताला क्रायोजेनिक एंजिन विकू नये या अमेरिकेच्या फतव्याला गतार्थ ठरवून तुम्ही स्वतःच तसले एंजिन घडवले. आज त्या जोरावर कुणाहीपेक्षा स्वस्तात तुम्ही उपग्रह अवकाशात सोडू शकता, याचा गर्व का नाही वाटत? तुम्ही देवीचा रोग उपटून फेकून दिला. कुप्ठरोगाला त्याच वाटेवर नेत आहात. मलेरिया – – फायलेरिया यांच्या निदानात व औपधयोजनेत नवी तंत्रे घडवता आहात – याचा गर्व का नाही वाटत? ।
“अरे, शेजा-याशी मैत्री करायला तुमचा पंतप्रधान सामान्य माणसासारखा यष्टी ने गेला, याचा गर्व का नाही वाटत? ।
“एकतर स्पर्धांमध्ये सठीसहामासीच जिंकता, म्हणून रडारड करायची. दुसरी मागे नजर वळवून इतिहासातली खरीखोटी उदाहरणे शोधून चौदा इंची छाती फुगवायची. कधी चिडचिड करून ईडन गार्डन्जला दंगल करायची, तर कधी शेजा-यांवर डोळे वटारून दमवाजी करायची – तेही तसलेच म्हणा!”
राजा गप्पच होता. वेताळ म्हणाला, “हूं! उत्तर दे, लवकर.”
“सॉरी, तुझ्या भाषणाचा शेवट प्रश्नार्थक नव्हता – आणि आधीचे प्रश्न केवळ व्हेटरिकल होते, उत्तरांची अपेक्षा न ठेवणारे. पुन्हा विषय बदल आणि नीट प्रश्न विचार!” राजा म्हणाला. तांत्रिक मुद्द्यांवरून महत्त्वाचे प्रश्न टाळायचा आनंद काही औरच!