इंग्लिश भाषेचा आम्ही द्वेष करीत नाहीं. हे तर काय पण आपल्या मराठीच्या उत्कर्षास ती मोठेच साधन होईल अशी आमची खात्री आहे. सर्व जगांतील ज्ञानभांडार तींत साठवले असल्यामुळे तिचे साहाय्य मराठीसारख्या परिपक्व होऊ पहाणा-या भाषेस जितकें होईल तितकें थोडे आहे! इतकेच मात्र कीं, ते ज्ञानभांडार खुद्द आपलेसे करून घेण्यास आपल्या भाषेचें सत्त्व म्हणजे निराळेपण कायम राखलें पाहिजे. ज्याप्रमाणे तेच रस शरीरास हितावह होत, की जे शरीर प्रकृतीस मानवून जीवतत्त्वास ढका लावणार नाहींत; त्याचप्रमाणे जे भाषांतरादि ग्रंथ भाषेच्या सरणीस अगदी बरोबर उतरून तिच्या रचनेस यत्किंचितही अपाय न करतील तेच मात्र तीस वर्धक होतील. एरवींच्यानीं जी तिची वृद्धि होईल ती केवळ वातमूलक स्थौल्याप्रमाणे होय. तिच्या योगानें तीस दुरून दिसण्यापुरती बळकटी आलीशी वाटेल खरी, पण वस्तुतः पहाणारांपुढे तिच्या अंगी असलेली क्षीणता क्षणमात्रही झांकली जाणार नाहीं. तर मराठी भाषेच्या हितकर्या विद्वानांनी हे पक्कें लक्षांत वागवावें कीं, इंग्रजीतील केवळ अर्थमात्र घेऊन त्यास शुद्ध मराठीच्या सांच्यांत त्यांनी ओतले पाहिजे. अशा त-हेचे ग्रंथ बनले असतां ते भाषेस फारच हितावह होऊन भूषणप्रद होतील