संपादक आजचा सुधारक यांस
गेली चार वर्षे मी आपल्या मासिकाची वर्गणीदार आहे. पुणे मुंबई प्रवासात विद्या बाळ यांच्याकडे हे मासिक मी पाहिले अन् लगेच वर्गणीदार झाले.
आपल्या मासिकात सद्य:परिस्थितीवरील लेख वाचायला मिळतात, विचारमंथन होते आणि मतांना बहुधा योग्य दिशा मिळते असा माझा अनुभव आहे.
ओरिसातल्या एका मिशन-याची दोन मुलांसमवेत केलेली निघृण हत्या ह्या विषयाच्या अनुषंगाने मार्चच्या अंकातील ‘धर्मान्तर व राष्ट्रनिष्ठा’ हे स्फुट–स्पष्ट आणि परखडपणे लिहिलेले असून मनाला अंतर्मुख करणारे ठरले. या हत्येच्या बातमीने संपूर्ण जग हादरून गेले. त्यानंतर काही आठवड्यांनीच इंडोनेशिया येथे धार्मिक प्रश्नावरून निर्माण झालेले दंगे आणि अत्याचार याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.
धर्म मानवाची श्रेष्ठ कर्तव्ये शिकवतो, त्यांना नीतिमान होण्याची शिकवण देतो. परंतु धर्मांधतेचा अतिरेक मानवी जीवन उद्ध्वस्त करतो याचे प्रत्यंतर जगाच्या इतिहासात अनेक वेळा आलेले आहे. आणि नमूद केले आहे.
धर्मान्तर केल्याने राष्ट्रनिष्ठा धोक्यात येते, कमी होते, नाहीशी होतेच असे म्हणता येणार नाही. स्फुटात वर्णन केलेल्या दोन कुटुंबांसारखीच काही कुटुंबे माझ्या परिचयाची आहेत. परदेशात सर्व हिंदु सण पाळणे, रोज पूजा करणे, मुलांना गीतापठण शिकवणे यार त्यांचा कटाक्ष आहे. परंतु त्या मुलांनी आपल्या देशात येऊन स्थायिक व्हावे असे त्यांना अजिबात वाटत नाही. पाश्चात्त्य राहणीचा व संस्कृतीचा मुलांनी स्वीकार करण्यास त्यांचे
हरकत नसते. परदेशात मिळणारी आर्थिक आवक व त्यामुळे प्राप्त होणान्या ऐहिक सुखसोयींचा मोह त्यांना सोडता येत नाही. आपल्या देशात मुले वाढत असताना परदेशगमनाची त्यांची तयारी करण्यासाठी त्यांच्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच प्रवेश घेतला जातो. शिक्षण देऊन त्यांना “परदेशी’ बनवणे हे उच्च मध्यमवर्गीयांचे जणू ध्येयच झाले आहे.
पृष्ठ ३७४ वरील पाचवा परिच्छेद या स्फुटाचे सार आहे असे मला वाटते. आमचा अशा मंडळीच्या परदेशगमनाला विरोध नाही. धर्मान्तराला विरोध करण्यासाठी अशी कारणे जे सांगतात त्या कारणांचा फोलपणा आम्हाला त्यांच्या पदरात घालावयाचा आहे – धर्माचा आणि देशप्रेमाचा, देशभक्तीचा संबंध असलाच तर अत्यंत क्षीण आहे एवढाच मुद्दा आम्हाला मांडायचा आहे.
व्यक्तिगत उदाहरण देताना दिलगिरी प्रदर्शित करते. परंतु आपण मांडलेल्या मुद्द्याला ते पूरक आहे असे मला वाटते. माझे आजोबा शंभर वर्षांपूर्वी खिस्ती झाले. परंतु गेल्या तीन पिढ्यांत आमची राहणी, आमची संस्कृती, महाराष्ट्रीय/भारतीयच राहिली. नावे सुद्धा इथलीच. पेहराव धोतर, कोट, टोपी, साडी, भोजनाचे पदार्थ इथलेच. सणाला, करंजी, चकली लाडू असे पदार्थ बनवले जातात. प्रत्येक घरात केक आणि मद्य आणलेच जाते असे नाही. (त्या उलट पुण्यांतील उचभ्रू हिंदू कुटुंबांतून जन्मदिवसाला केक आणि पार्टीला मद्य ही बाब आवश्यक झाली आहे. त्यासाठी परदेशगमन करावेच लागते असे नाही.) ख्रिस्ती धर्मीयांतील प्रॉटेस्टंट पंथीय अनेक कुटुंबांतून भारतीय आचारविचारांचे पालन केले जाते असे आढळून येते. रोमन कॅथलिक पंथीयांत नावापासून बदल झालेला आढळतो. पोर्तुगीज संस्कृतीचा पगडा पश्चिम भारतातल्या किना-यावर राहणा-या रोमन कॅथलिक ख्रिस्ती समाजावर अधिक झालेला आहे.
आमच्या कुटुंबातील बहुतेक सर्वांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. पदवी परीक्षेला विल्सन कॉलेज, मुंबई या ठिकाणी मी मराठी भाषा प्रा. वा. ल. कुलकर्णीच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासली. मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या स्थापनेत मी पुढाकार घेतला. ज्ञानोदय या १५७ वर्षे अविरतपणे चाललेल्या मासिकाची मी सहसंपादिका आहे. परदेशांत तीन वेळा जाण्याचा अनुभव घेतला परंतु तेथे स्थायिक होण्याचा विचार मनाला शिवला नाही. माझ्यासारखीच अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आपल्याला आढळतील. नारायण वामन टिळक आणि पंडिता रमाबाई यांनी (ही महान् उदाहरणे आहेत.) आपल्या देशाची सेवा साहित्य आणि कृतीद्वारे चालू ठेवली.
धर्म पाळून ‘परदेश’ प्रिय वाटणारे आणि धर्मान्तर करूनही आपला देशच ज्यांना प्रिय वाटतो अशी अनेक उदाहरणे आपल्याला आढळतील.
या स्फुटातील शेवटल्या मुद्दयाशी मात्र मी सहमत नाही. कोणत्याही धर्माविषयीचा गर्व पुढे मागे धर्मज्वराला आमंत्रण देत असल्यामुळे तो त्याज्यच आहे – किंबहुना धर्मच नको.” धर्मच नको हे मला पटत नाही. धर्मान्ध होऊन अत्याचार करणा-यांचे प्रमाण अल्प आहे परंतु धर्म पाळून इतर धर्मीयांशी सलोख्याने राहणा-या लोकांचे प्रमाण कितीतरी पटीने जास्त आहे. आजच्या अशान्त आणि अस्वस्थ जगात धर्मच मानवाला आधार देतो.” परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ बनवतो, असा माझा विश्वास आहे.