वाचक मेळाव्याचा वृत्तान्त

आजचा सुधारक या मासिकाच्या वाचकांचा मेळावा रविवारी दिनांक २४ एप्रिलला भरला. निमित्त होते, मासिकाचे दहाव्या वर्षात पाऊल टाकण्याचे. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेने आपले दालन या मेळाव्यासाठी उपलब्ध करून दिले, ज्याबद्दल आजचा सुधारक परिवार त्यांचा अपार आभारी आहे.
हा या मासिकाच्या वाचकांचा तिसरा मेळावा. आधीच्या दोन मेळाव्यांपेक्षा हा काही बाबतींत वेगळा होता. मुख्य म्हणजे मासिकाचे संस्थापक संपादक श्री. दि. य. देशपांडे प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे हजर राहू शकले नाहीत त्यांच्या अनुपस्थितीतले हे मासिकाचे पहिलेच ‘कार्य’! दुसरे म्हणजे हा वाचक-मेळावा पूर्णपणे अनौपचारिक होता – ना अध्यक्ष, ना प्रमुख पाहुणे. तरी ‘यू.सी.एन्. या नागपूरच्या दूरचित्रवाहिनीने आवर्जून (व आपणहून) येथे छायाचित्रण केले व ते वाहिनीवर प्रदर्शितही केले. हा आजच्या सुधारकांना सुखद धक्काच
होता.
सुरुवात सध्याचे कार्यकारी संपादक दिवाकर मोहनी यांनी केली. संपादक मंडळी मासिकातून आपली मते नेहमीच मांडतात, आणि हा मेळावा मुख्यतः वाचकांची मते जाणण्यासाठी आहे, हे मोहनींनी स्पष्ट केले.
यानंतर विद्यागौरी खरे यांनी मासिकाच्या पहिल्या नऊ वर्षांत घडलेल्या स्वभावाची काही अंगे मांडली. पत्रव्यवहारातून आ.सु.चे वाचक किती मनमोकळेपणाने मतप्रदर्शन करतात, याची त्यांनी काही उदाहरणे दिली, या पत्रांमधून, मतमतांतरांमधून, चर्चेमधून सुधारकी विचारांच्या अनेक छटा कशा पुढे येतात, याचाही उल्लेख झाला. विवाह कसे करावे यावर झालेल्या विस्तृत चर्चेचाही ओझरता आढावा घेतला गेला. मुख्य म्हणजे, मासिक विरोधी मतांना, संपादकांवर टीका करणा-या लेखनाला का व कसे प्राधान्य देते याचीही चर्चा झाली. आपली मते बदलायला व अशा ‘हृदय परिवर्तनाची कबुली द्यायला संपादक कसे लाजत नाहीत, व खुन्या विवेकी वागण्याशी हे कसे सुसंगत आहे, हेही तेथे सांगितले गेले.
एक मोठा मुद्दा होता प्रा. मे. पुं. रेगे यांचे इतरत्र प्रसिद्ध झालेले लेख व त्यावर दि. य. देशपांड्यांनी केलेली लेखात्मक टिप्पणी, या संबंधातला. प्रा. रेगे कांटचा दाखला देत अतीत, श्रद्धा वगैरेंचा पुरस्कार करतात. देशपांडे कांटचेच “मी श्रद्धेसाठी जागा करायला ज्ञानाचा त्याग केला आहे, हे वचन उद्धृत करून आपल्या ज्ञानावरील, विवेकावरील ‘भरवशाचा’ ठाम पुनरुच्चार करतात. दोन विद्वानांच्या सुघड, सुबक विचार मांडण्याच्या पद्धतीचा हा मजेदार ‘सीन’ होता.
यानंतर मेळावा सर्व वाचकांसाठी खुला झाला. श्री. श्री. गो. काशीकर यांनी बराच वेळ ते व दि. य. देशपांडे यांचे लेख पाळीपाळीने कसे येत असत, व त्यांमधून चर्चा कशी घडत असे, हे सांगितले. त्यांनी असेही मत मांडले की ‘ज्ञान’ माणसाच्या आतून येते, व विवेक – विज्ञान ही फक्त हे ज्ञान तपासून घेतात. मुळात ज्ञान विवेकातून ‘जन्मत’ नाही. यावर नंदा खरे
यांनी ‘तपासले न गेलेले ते ज्ञान या पदवीला कसे पोचते?’ असा प्रश्न केला.
प्रा. र. वि. रानडे यांनी ऐतिहासिक उदाहरणे देत असे जोरकस प्रतिपादन केले, की व्यवहासत सारेच विवेकानेच वागतात. श्रद्धेकडे पाहून हात जोडले जातात, पण वर्तणूक मात्र श्रद्धेने घडताना दिसतच नाही. संतांच्या वारीचे कौतुक होते, पण प्रत्यक्ष वागण्याबाबत मात्र सावता माळ्याचाच आदर्श पाळला जातो!
यानंतर प्रा. कवठाळकर, डॉ. कल्याणी देशमुख, श्री अमदाबादकर वगैरे वाचकांनीही मासिकाच्या रूपाबद्दल, अपेक्षित विविधतेबद्दल सूचना केल्या. श्री. अनंत महाजनांनी विचारले की अमेरिकेत आजचा सुधारकच्या वाचकांचा एक मेळावा प्रा. प्र. ब. कुळकर्णीनी आयोजित केला होता. त्यातही श्रद्धा या विषयावर चर्चा झाली, जिच्या ध्वनिफिती उपलब्ध आहेत. त्यांचे लिखित रूप एका अंकात येणार होते, त्याचे काय झाले. मोहनींनी यावर स्पष्टीकरण दिले की तो एक पूर्ण अंक प्र. ब. कुळकर्णी अमेरिकेत घडवीत आहेत, व बहुधा सप्टेंबरपर्यंत तो अंक निघेल.
विविधता व नवनव्या लेखकांचा अभाव, हे दोन मुद्दे पुनःपुन्हा चर्चेस येतात. नंदा खरे यांनी सांगितले की आज मासिक आर्थिक दृष्ट्या सबळ आहे. संगणक, इंटरनेट-संधान वगैरे सोई आता मासिकासाठी उपलब्ध होत आहेत. प्र. ब. कुळकर्णीना अमेरिकेला जावे लागणे ही इष्टापत्ती मानून ‘अनिवासी संपादकाचा’ प्रयोगही घडत आहे.
पण प्रस्थापित विचारवंत व लेखक आधीच वेगवेगळ्या इतर संस्थांशी संलग्न मुखपत्रांशी जोडलेले असतात. एखाद्या लेखकाने मानधनाची अपेक्षा व्यक्त केल्यास तेही देता येईल. पण मुळात मासिकाला मर्यादा आहेत त्या लेखनाच्या, आणि ही जबाबदारी प्रामुख्याने वाचकांमधूनच घेतली जायला हवी. कोणत्याही लेखांचे मासिकाला वावडे नाही – पण मुळात लेखन डोळसपणे जगाकडे पाहणारे व गांभीर्याने त्याचा विचार करणारे हवे.
एका निखळ वैचारिक मासिकाच्या नवव्या वाढदिवसाला’, चव्वेचाळीस अंश तापमानातही चाळीसेक वाचक जमतात व मोकळी चर्चा करतात याचा आनंद वाटतोच. व्याप्ती, असल्या मेळाव्यांचीही आणि मासिकाचीही मात्र जास्त वाढावी असे वाटते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.