बारा सप्टेंबरच्या त्या वाचकमेळ्यात सुधारक कसा वाढवता येईल याच्या अनेक सूचना पुढे आल्या. त्यांतली एक अशी की येथून आपण भारतातले वर्गणीदार प्रायोजित (स्पॉन्सर) करावे. फडणिसांच्या या सूचनेला डॉ. नरेन् तांबे (नॉर्थ कॅरोलिना) यांनी पुस्ती जोडली की व्यक्तीपेक्षा वाचनालयांना आजचा सुधारक प्रायोजित करा. सुनील देशमुखांनी कॉलेजची ग्रंथालये घ्या म्हटले – एक वर्षभर अंक प्रायोजित करून तेथे जावा. त्यातून संस्था, महाविद्यालये, व्यक्तिगत वाचक-ग्राहक मिळतील. मुळात प्रायोजित करण्याची योजना आजीव सदस्यतेची वर्गणी भरून करायची पण लाभार्थी संस्था दरवर्षी बदलत जायच्या अशी कल्पना.
ही कल्पना इतकी अफलातून ठरली की एकूण मिळालेल्या एक्याऐंशीपैकी तीस अमेरिकेतले आणि एक्कावन्न भारतातले प्रायोजित अशी विभागणी आज झाली आहे. या योजनेत ताबडतोब चेक फाडून फडणिसांनी स्वतः सुरुवात केली. तांब्यांनी ‘लवकरच भारतात जात आहे’, तेथून संस्थांची नावे कळविण्याचे ठरविले. साधना साप्ताहिकाला (पुणे) आपल्या
या योजनेचा लाभ कसा झाला ते सांगितले. नंतर डॉ. ललिता गंडभीर, सरिता करंदीकर, अशोक व शैला विद्वांस, पुष्पा गावंडे (वैदेही-श्रीराम), मीना देवधर ही मंडळी या योजनेत सामील झाली.
अशोकने या योजनेला वेगळीच कलाटणी दिली. ते म्हणाले, येथे तुम्ही जे सांगितले ते आमच्या गुर्जर मित्रमंडळीसमोर इंग्लिशमध्ये सांगाल का? माझा होकार घेऊन स्वतःच्या घरी सभा ठेवली. तारीख ठरली नोव्हेंबर ६. अशोक-शैला हे दाम्पत्य मूळ बडोद्याचे. गुजराती सहज बोलतात. लेखन करतात. नाटके मराठी-गुजरातीत बसवतात. शैला ‘मराठी विश्वात’ (म.वि.) तितक्याच रमतात. गेल्या वर्षीपर्यंत त्या म.वि. च्या अध्यक्ष होत्या. उभयतांच्या लोकप्रियतेची कल्पना त्यांच्या घरच्या सभेवरून आली. दिवाणखाना प्रशस्त असूनही शिगोशीग भरला होता. बैठक पेशवाई. पस्तीस चाळीस श्रोते.
श्रद्धेऐवजी विवेक का, असा प्रश्न मांडून मी विवेचन, सुमारे अर्धा तास केले. धार्मिक माध्यमातून केलेले सुधारणेचे प्रयत्न झाले ते कसे फसले ह्याचा आढावा घेतला. १८७० चा विष्णुशास्त्री पंडित, लोकहितवादी ह्यांचा पहिला शास्त्रार्थ व १९३३ चा महात्मा गांधींनी येरवड्याच्या तुरुंगात तर्कतीर्थांच्या मदतीने केलेला दुसरा शास्त्रार्थ याची कहाणी ऐकवली. आजही महाराष्ट्रात एक गाव एक पाणवठा झालेला नाही हे सत्य सांगून कायद्याच्या हस्तक्षेपाचे समर्थन केले. त्यावरून चर्चा आरक्षणाकडे वळली. स्त्रियांचे आरक्षण असमर्थनीय वाटणारी मंडळी येथेही भेटली. अमेरिकेत आल्याने देशांतर झाले. पण स्थलांतराने मतांतर आपोआप होत नाही हेच खरे. चर्चा खूप रंगली. येथल्या चर्चांनी सभा जिवंत होतात. प्रश्न विचारा म्हणण्याची गरज पडत नाही. समारोप करताना अशोकने ‘पुराणमित्येव न साधु सर्वं या कालिदासाच्या शब्दांची आठवण दिली. भारतात वर्गणीदार आयोजित करण्याची योजना सांगितली. एका-एवढ्या आवाहनाने बारा आजीव सदस्य-वर्गणीदार प्रायोजित केले गेले. शिवाय कोणाला लाभ द्यायचा हे अधिकार आ.सु. संपादकांवर सोपवले गेले. गुर्जरबांधवांनी अडचणीतून मार्ग असा काढला. अशोकने व्यक्तिशः दहा सदस्य प्रायोजित केले.
शैलाने वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मराठी गीता ग्रुपच्या बैठकी महिन्यातल्या शेवटच्या रविवारी आळीपाळीने सदस्यांच्या घरी होतात. बारा सप्टेंबरच्या वाचकमेळाव्यानंतरची अशी सभा होती २७ सप्टेंबरला. डॉ. मोहन गवांदे यांच्या घरी, कॅनबरीला. गीतेचा १ अध्याय पठण, नंतर तासभर गीतारहस्याचे वाचन, मनसोक्त प्रश्नोत्तरे, असा हा कार्यक्रम असतो. त्यातली १५-२० मिनिटे मला आपले विचार मांडण्यासाठी दिली. गीतेत संन्यास की कर्मयोग याची चर्चा चाललेली होती तो धागा घेऊन, शब्दप्रामाण्यआप्तवचन ह्यांना आमचा विरोध का हा मुद्दा घेतला. शास्त्रप्रामाण्यामुळे आपली समाजव्यवस्था जन्मजात उच्चनीचता मानणारी, विषमतामूलक झाली हे सांगून व्यक्तिस्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय, इहवाद यांच्या आधारानेच नवा समाज घडविता येईल हे प्रमेय मांडले. चर्चा वादळी झाली. वेळेचे भान न राहावे इतकी अशी रोचक. नंतर स्वादिष्ट भोजनाने समारोप असतो तसा झाला. या बैठकीत वर्गणीदार अपेक्षित नव्हते. तसेच झाले. कुतूहल जागृत झाले हेही पुष्कळ झाले.
आता फडणिसांची दुसरी क्लृप्ती आठवली. आजच्या सुधारकातील निवडक लेख झेरॉक्स करणे सुरू केले. डॉ. कौस्तुभ लेले हे गीताग्रूपचे नेते. त्यांच्या सौजन्याने सदस्यांची नामदर्शिका मिळाली. हे निवडक लेख पोस्टाने पाठवत राहिलो. सुधारकाचे सर्व अंक जवळ नव्हते. डॉ. ललिता गंडभीर (न्यूटन सेंटर, मॅसॅच्युझेट्स) आणि पद्मजा फाटक (ऑरेगॉन) यांच्याकडचे अतिरिक्त अंक मागवले. त्यांतून लेख निवडले.
(१)खरं, पुनर्जन्म आहे? मूळ शोधनिबंध आणि त्यावरचे आलोचनात्मक दोन लेख, (२) ‘विवेकवादाची साधना हा सुधारकाच्या पहिल्या अंकातील पहिला लेख, (३) भीमराव गस्तींच्या, ‘बेरड’ आणि ‘आक्रोश’ या आत्मनिवेदन अन् कार्यविवेचनपर ग्रंथांचा परिचय करून देणारा ‘मुक्यांचा आक्रोश’ हा लेख, (४) भारतीय मुसलमान शोध आणि बोध’ ह्या सेतुमाधवराव पगडींच्या पुस्तकाचा परिचय, (५) मी आस्तिक का नाही?’ हा प्रा. दि.य. देशपांडे यांचा लेख असे हे साहित्य होते. ‘मी आस्तिक का आहे?’ हा प्रा. मे.पु. रेग्यांचा पूर्वपक्ष करणारा लेख मला झेरॉक्स करायची गरज पडली नाही. कारण ‘कालनिर्णय कॅलेंडरच्या पानावर तो येथे घरोघरी भिंतीवर विद्यमान होता. याशिवाय आणखी एक लेख मी मोठ्या प्रमाणावर झेरॉक्स करून घेतला तो पद्मजा फाटकांच्या सांगण्यावरून. त्या म्हणाल्या, सुधारकाची सात वर्षे हा साधना (पुणे) साप्ताहिकातील तुमचा लेख तुमच्या मासिकाचा उत्तम परिचय करून देणारा आहे. तो वाटा! तो लेख त्यांच्या संग्रही होता तो त्यांनी धाडला. त्याचाही मी उपयोग केला. ही कल्पनाही चांगली फलद्रूप झाली. उदा. गीता ग्रुपच्या मला मिळालेल्या २० जणांच्या यादीतले नऊ जण स्वतः वर्गणीदार झाले. ग्रुपचे नेते खुद्द डॉ. लेले आजीव वर्गणीदार झाले. म्हणाले, “मी आजचा सुधारकच्या विचारधारेशी सहमत नाही; मात्र मासिक मला वाचनीय वाटते. दहावे सदस्य स्वतः वर्गणीदार झाले नाहीत. पण त्यांनी भारतातील दोन आजीव वर्गणीदार प्रायोजित केले.
स्वतः वर्गणीदार न होता, (तात्त्विक कारणांमुळे, भाषिक नाही) भारतात दोन आजीव सदस्य प्रायोजित करणारी आणखी एक व्यक्ती भेटली. त्या स्वतः लेखिका आहेत. भारतात चालणा-या सार्वजनिक उपयोगाच्या उपक्रमांना येथून मदत गोळा करून पाठवतात. त्या १२ सप्टेंबरच्या पहिल्या वाचकमेळाव्याला उपस्थित होत्या. पारंपरिक भक्तिमार्गाचा समर्थक युक्तिवाद त्यांनी मांडला होता. त्यांचे नाव सविता गोखले. या विदेशातही अनुरूप वरवधूच्या संशोधनाचे बिकट वाटणारे काम सोपे करतात.
चार मराठी माणसे भेटतील अशा ठिकाणी शक्यतोवर जायचेच असा उपक्रम ठेवला होता. प्रोग्रेसिव्ह फोरम फॉर इंडिया (PFI) या नावाचे एक वर्तुळ आहे. केंद्रस्थानी अर्थात् सुनील देशमुख ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. शरद पवार यांच्या आगमनानिमित्त PFI ने त्यांचा स्वागतसमारंभ केला. स्थळ होते न्यूयॉर्क येथील आलिशान रॉकफेलर प्लाझा या परिसरातील हॉटेल ‘शान’, अमेरिकेत विनामूल्य काहीच नसते या न्यायाने या समारंभाचे प्रवेशमूल्य होते फक्त ४५ डॉलर्स. सुनीलच्या आमंत्रणाचा मान राखून गेलो. कार्यक्रम काहीसा राजकीय काहीसा सामाजिक, टेक्सास येथील श्री. मधुकर कांबळे यांनी भारतातील बौद्धांची व दलितांची दुर्दशा’ (Concerns about the plight of Dalits and Budhists of India) a facutar आपले निवेदन वाचून दाखविले. पवार मुरब्बी राजकारणी, त्यांनी वेचक आकडेवारी – त्यांना मुखोद्गत होती ती – सांगून भारत सरकारचा बचाव केला. पण गोड शब्दांत. नंतर कांबळ्यांची भेट झाली तेव्हा त्यांना आ. सुधारकचा अंक दिला. त्यांनी त्यांच्या निवेदनाची प्रत दिली होतीच. तिच्यावर पत्ता होता. त्यावर काही निवडक लेख पाठवले. नानवटीखिल्लारे यांचा.
सुधारकाचे लेखक कोण? ब्राह्मणेतर समाजवर्ग व आजचा सुधारक’ या विषयावरील आलोचनात्मक लिखाण (ऑगस्ट ९८) आ.सु. प्रसिद्ध करतो हे पाहून श्री. कांबळे स्वतः तर वर्गणीदार झालेच, पण नागपूर येथील आपले बंधू अॅड. कांबळे यांचे आजीवन सदस्यत्वही त्यांनी प्रायोजित केले.
बारा सप्टेंबरच्या वाचक-मेळाव्यातील कितीतरी सूचना अद्याप अमलात यायच्याआणायच्या आहेत. जाहिरात करा, तुम्ही नसाल करत तर आम्ही करतो हे एकमत ह्या बाबतीत अनेक वक्त्यांचे, सुनील देशमुखांशी सहमत. डॉ. ललिता गंडभीरांनी ते मनावर घेतले. जानेवारी १९९९ च्या ‘एकता’ या उत्तर-अमेरिकेतील मराठी भाषकांच्या अंकात त्यांनी आटोपशीर पण ठसठशीत जाहिरात स्वखर्चाने केली आहे. ‘सुधारकाची सात वर्षे’ हा माझा लेख (मूळ प्रकाशन ‘साधना’ सप्टेंबर २०, १९९७) पुनर्मुद्रित केला आहे. बृहन्महाराष्ट्र वृत्त हे अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे मासिक मुखपत्र. त्याच्या डिसेंबर १९९८ च्या अंकात ‘आजचा सुधारक-चर्चासत्रा’चा बोलका वृत्तान्त ललितांनी लिहिला आहे. सुनील देशमुखांचे वारंवार सांगणे : प्रसिद्धी करा, प्रसिद्धीचे युग आहे. तुम्हाला आम्ही प्रश्न विचारतो तुम्ही उत्तरे तर द्याल. आम्हाला तुमची मुलाखत द्या. तुम्हाला काय म्हणायचे ते आम्हाला सांगा. आमच्याजवळ प्रसिद्धिमाध्यमे आहेत आम्ही ते तुमचे म्हणणे – जगभर करू. त्यांनी भारतात, पुण्यातील युनिक फीचर्सचा उल्लेख केला. येथील पत्रांसाठी श्री. श्रीराम गोवंडे यांची मुलाखत शब्दबद्ध केली ती प्रसिद्धीच्या मार्गावर आहे.
मासिकाची हिंदी आवृत्ती, इंग्लिश आवृत्ती काढा, इंटरनेटवर आणा यासाठी अनेकांच्या आग्रहाच्या सूचना आहेत. त्या हळूहळू प्रत्यक्षात येतील. आ.सु. च्या चालक मंडळीचा या दिशेने प्रयत्न सुरू आहे एवढे आम्ही अमेरिकेतल्या जिज्ञासू वाचकांना सांगू , इच्छितो.
फडणिसांच्या सूचनांपैकी आणखी दोहोंचा निर्देश करण्यासारखा आहे. फडणीस विक्रीव्यवसायातले तज्ज्ञ आहेत. याचा उल्लेख मागे आला आहेच. त्यांचा ग्राहकवर्ग देशोदेशी विखुरलेला आहे. त्यांचे म्हणणे मासिकाचे मूल्य वाढवा. It’s a world-class publication. त्याचे मूल्य विदेशी वाचकांसाठी आहे त्याच्या अडीच-तीनपट जास्त हवे.
त्यांची दुसरी सूचना अशी की, सध्याच्या विदेशी वर्गणीदारांना एक पत्र धाडा आणि त्यांना त्यांच्या इष्टमित्रांना एक-एक पत्र लिहायचे विनवा. ह्या दोन्ही पत्रांचे मसुदे स्वतः फडणीस आपल्याला पुरवतील.
या वृत्तान्ताला पूर्णविराम देण्यापूर्वी मला आलेला एक उद्बोधक अनुभव सांगितला
पाहिजे. मी जून ‘९८ मध्ये न्यूजर्सीत (USA) आल्या आल्या येथील साहित्यविश्वाशी संबंध साधण्याचा प्रयत्न म्हणून काही पत्रे लिहिली. आ.सु. चे वाचक-वर्गणीदार असणाच्या दोघा तिघांनाही लिहिले होतेच. नीलिमा कुलकर्णी या सध्याच्या ‘बृहन्महाराष्ट्र वृत्ताच्या संपादक, तेव्हा ‘मराठी विश्व-वृत्त’ या द्वैमासिकाच्या संपादक होत्या. त्यांचेकडून महिना उलटला तरी उत्तर नाही, असे येथे होत नाही. लोक लिहिण्याचा कंटाळा करतात. पण फोन करतात असा माझा अनुभव होता. मला वाईट वाटले. शेवटी एकदा, शेवटचा प्रयत्न म्हणून मीच फोन केला. ओळख दिली. तेव्हा कळले की त्या उन्हाळ्याची सुटी घालवायला युरोपच्या सफरीवर गेल्या होत्या. मी काम सांगितले–म्हटले, आ.सु. च्या वाचकांची बैठक-चर्चासत्र घ्यायचे आहे. कुठे मध्यवर्ती जागा मिळवून देऊ शकाल? जागा मराठी विश्व जेव्हा भाड्याने घेते तेव्हा केवढे प्रचंड भाडे पडते ते सांगून त्या म्हणाल्या तुम्ही काही काळजी करू नका. पंधरावीसच लोक असतील म्हणता तर ती बैठक माझ्या घरी घ्या. मी मनात म्हटले आपण यांच्याबद्दल काय समजून बसलो होतो आणि यांनी केवढी आपुलकी दाखवावी? ना ओळख ना देख. दुसरा अनुभव तसाच. श्रीराम गोवंडे यांना पत्र लिहून असेच उत्तर नाही. मग प्रत्यक्ष भेटच झाली. ती १२ सप्टेंबरच्या वाचकमेळ्यात. गोवंड्यांनी घर बदलले असेल असे वाटले होते. तसे काहीच नव्हते. ते आजारी होते म्हणून प्रतिसाद देत नव्हते. वाचक-मेळ्यात सर्वोत्तम वाचक ठरवायचा प्रसंग आला असता तर मी श्रीराम गोवंडे हे नाव घेतले असते. मार्मिक विचारग्रहण, शब्दांची आणि आशयाची जाण अन् प्रभावी अभिव्यक्ती. ते नंतर मित्रच बनले. त्यांनी व त्यांच्या सुविद्य पत्नींनी आ.सु. ला भारतातील आपापल्या परिवारात नेऊन बसवले. इत्यलम्!