देशनिष्ठा म्हणजे शेजारधर्म
आमचे आजचा सुधारक हे मासिक विवेकवादाचा प्रसार करण्यासाठी जन्माला आलेले आहे हे आपण जाणताच. ते कोणत्याही विषयाचा किंवा मताचा प्रचार करीत नाही. प्रचारक मोठमोठ्याने ओरडतो आणि दुसरी बाजू, विरुद्ध मताचा आवाज, श्रोत्यांपर्यंत पोहचणार नाही असा यत्न करीत असतो आणि प्रसारक शांतपणे आपली बाजू मांडतो, दुसरी बाजू ऐकून घेतो, लोकांना ऐकू देतो. असो.
विवेकवाद म्हणजे काय हे स्पष्ट करण्याची प्रत्येक संधी घेण्याचे आणि त्या निमित्ताने आमच्या प्रतिपादनात पुनरुक्तीचा दोष आला तरी तो स्वीकारण्याचे आम्ही ठरविले आहे. ते करण्यासाठी काही टोकाची अतिरेकी मते मांडून लोकांना डिचवण्याचाही क्रम आम्ही चालविला आहे. ह्या मासिकाचे अस्तित्वच मुळी विवेकवादाची चर्चा करण्यासाठी आहे आणि ती पुरेशी होत नाही अशी आमची खंत आहे. शिवाय विवेकाला जोवर कृतीची जोड मिळत नाही तोवर तो लंगडाच राहणार. परंतु ही कृती प्रत्येकाच्या मनातून स्वतंत्रपणे उदित झाली पाहिजे. लोकांची मने भडकावून, त्यांच्या भावनांना आवाहन करून ती व्हावयाला नको. ह्याच उद्देशाने मागच्या महिन्यात आम्ही वाचकांचा मेळावा आयोजित केला होता. त्याविषयीचा वृत्तान्त ह्या अंकात. इतरत्र देत आहोत.
येथे मागच्या अंकातल्या एका वाचकांच्या पत्राच्या निमित्ताने पुन्हा विवेकवादाच्या काही पैलूंवर प्रकाश टाकण्याचा इरादा आहे. ‘एक वाचक’ म्हणतात, ‘व्यक्तीच्या दृष्टीने धर्म हा अपघात असतो. असा धर्म एखाद्या धर्मातील कुटुंबामध्ये झालेल्या त्याच्या जन्मामुळे त्याला चिकटतो, तो जाणीवपूर्वक स्वीकारलेला नसतो. असा जन्मामुळे चिकटलेला धर्म जाणीवपूर्वक स्वीकारलेला नसल्यामुळेच त्याज्य आहे. आईबापांचा धर्म त्यांच्या पोटी जन्म घेतल्यामुळे आयुष्यभर पुढे चालविणे ही परिस्थितिशरणतेची परिसीमा आहे. ही विवेकशून्यता आहे, त्यात समर्थनीय असे काहीच नाही. प्रत्येक विवेकी व्यक्तीने पूर्वसंस्कारांतून पूर्णपणे बाहेर पडून आपले वर्तन ठरविण्याची गरज आहे. विवेकाची गरज सर्वांना मान्य असली तरी त्याचे स्थान श्रद्धेच्या खालीच ठेवण्याचा श्रद्धावानांचा यत्न असतो.
धर्मातून बाहेर पडण्याची गरज मान्य केल्यानंतर दुसरा कोणता धर्म स्वीकारायचा तर तोही विचार करूनच स्वीकारावा लागतो आणि अशा वेळी विवेकी माणसाच्या लक्षात येते की सगळेच धर्म सारखे असल्यामुळे त्याला कोणत्याही नवीन धर्माचा स्वीकार करता येत नाही.
त्या एका वाचकाचा दुसरा मुद्दा, राष्ट्रनिष्ठा किंवा देशनिष्ठा त्या त्या देशातील वास्तव्याने घडत असतात, जेथे आपले बालपण गेले तो प्रदेश आपला वाटू लागतो असा आहे. देशाविषयीची किंवा राष्ट्राविषयीची निष्ठा ही केवळ तेथल्या आठवणी आपल्या मनात मोठेपणीही नांदतात म्हणून असत नाही, असू नये. तो nostalgia (sentimental longing for things that are past) असू नये असे आमचे मत आहे कारण त्यात शेजारधर्माचा भाग आहे. शेजारधर्म म्हणजे शेजा-यांनी एकमेकांच्या उपयोगी पडणे. माणूस हा परस्परावलंबी प्राणी आहे आणि त्याची देवाण घेवाण सतत चालू असते. घ्यायचे एकाकडून, द्यायचे दुस-याला असे होऊ नये म्हणून देशांतरावर बंधने असतात. परदेशात गेल्यानंतर ज्यांना स्वदेशहितचिंतनाविण दुजी कथा आवडत नाही आणि परदेशातील वास्तव्याचा लाभ स्वदेशातील लोकांनासुद्धा व्हावा हा विचार ज्यांच्या मनात निरंतर वागतो त्यांच्याबद्दल आमची काहीच तक्रार नाही; इतकेच नव्हे तर आपल्या शेजा-यांपेक्षा जे अधिक वंचित आहेत, वनवासी आहेत, त्यांच्या सहाय्याला जे धावून जातात त्यांच्याविषयीही आमच्या मनात परमादरच आहे. परंतु जे केवळ आपला लाभ पाहतात, ते स्वदेशात असोत की परदेशात आमच्या मनातून उतरतात एवढेच आम्हाला सांगायचे आहे.
‘अमेरिकेत गेलेले सर्वच जण अमेरिकानिष्ठ होतातच असे नाही असे त्यांचे म्हणणे आहे’. हे त्यांचे विधान विवाद्य आहे. ते अमेरिकानिष्ठ नसतील तर त्यांनी व्हावे असेच आमचे मत आहे. जे भारतवासी असतील त्यांनी भारतनिष्ठ रहावे इतकेच नव्हे तर एकदा अमेरिकेचे नागरिकत्व पत्करल्यानंतर अमेरिकानिष्ठ व्हावे हे योग्य आहे. परंतु ह्याविषयीचा विचार आणखी खोलात जाऊन करण्याची गरज आहे. सध्यातरी ह्यावर उपाय One World होणे हाच आहे असे आम्ही मानतो.
‘धर्म बदलल्याने देशनिष्ठा बदलत नाही’ ह्याविषयी त्यांचे आमचे एकमत आहे. पण आमच्या मनात ज्याने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारले असा भारतीय त्यानंतर आपल्याला हिंदू म्हणून घेऊ शकतो काय, (तो फक्त जन्माने भारतीय राहतो पण नागरिकत्वाने नाही.) हा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हिंदु म्हणून घेण्याचा अधिकार त्याला नाही. हिंदुत्वाचे एक मुख्य लक्षण ह्या भूमीवरची निष्ठा हे आहे. हिंदूच्या उपासनापद्धतींत, आचारधर्मात जी विविधता आहे तिच्यावर मात करण्यासाठी आणि हिंदुत्वाचा महत्तम साधारण विभाजक काढण्यासाठी देशनिष्ठा हा हिंदत्वातला साधारण अवयव आहे असे आमचे मत आहे. पण ते असो. आपण धर्माभिमानाच्या वर उठलेच पाहिजे.
आमच्या देशात गेल्या शतकात जे सुशिक्षितांचे धर्मांतरण होत होते ते आता होईनासे झाले आहे आणि धर्मांतरणाचे सध्याचे प्रयत्न हे आदिवासींमध्येच होत आहेत, हे आम्ही पाहतो. खिस्ती आणि इस्लाम हे धर्म जरी आक्रमक आहेत तरी त्यांचे आक्रमण येथून परदेशात जाऊन राहणा-या लोकांवर का होत नाही, तेथे जाणान्या चीनी, कोरियन, भारतीय किंवा पाकिस्तानी लोकांचे धर्मपरिवर्तन करण्याची गरज तत्तद्देशीयांना त्यांना का वाटत नाहीं हे कोडे आम्हाला सुटलेले नाही. धर्मातराचा बाऊ फक्त आमच्याच देशात आम्हाला ऐकू येतो. याच ठिकाणी आणखी एक मुद्दा घेणे आवश्यक आहे. एका वाचकांच्या मते धर्मांतरणाने life style बदलत नाही. आणि दुसरीकडे ते म्हणतात की हिंदु धर्म ही एक life style आहे, तर मग हिंदुधर्मीयांना धर्मांतरणाची इतकी भीती का वाटते? आज ख्रिस्ती धर्मीय देशांमध्ये लक्षावधी परधर्मीय लोक जात आहेत. त्यांचे तेथल्या खिश्चनांना भय का वाटत नाही हा एक अभ्यसनीय विषय आहे. थोडक्यात धर्मातराची भीती अन्य धर्मीयांपेक्षा भारतीय हिंदूना अधिक वाटताना दिसते म्हणून ती का वाटते याची कारणे शोधणे आवश्यक आहे. धर्मांतरणाची भीती बाळगण्यामध्ये काहींचा राजकीय स्वार्थ आहे की काय हे एकदा निश्चित झाले म्हणजे बरे होईल.
त्यांच्या बाकीच्या मुद्द्यांपैकी आता एकदोन मुद्दे थोडक्यात घेऊ. ज्याला ज्याला संधी मिळते, तो परदेशी जातो. त्यामागे त्या देशाचे सांस्कृतिक श्रेष्ठत्व नसते’ असे ते म्हणतात परंतु त्यांचे हे विधान अत्यंत विवाद्य आहे. मिशनरी म्हणून कोणी परदेशात जात असेल तर तो त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक श्रेष्ठत्वामुळे जात नाही असे आम्हाला वाटते. परंतु स्वतःचे आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून किंवा दुस-या कुठल्याही ऐहिक लाभासाठी जे लोक कायमचे परदेशी जातात ते मनोमन त्या देशाचे सांस्कृतिक श्रेष्ठत्व मान्य करीत असतात असे आमचे मत आहे.
धर्मातरण आणि राष्ट्रनिष्ठा ह्या ऐवजी देशांतर आणि राष्ट्रनिष्ठा हे शीर्षक अधिक समर्पक वाटले असते असा त्यांचा शेवटचा मुझे आहे त्याविषयी आमचे मत दोनतीन वाक्यांत सांगून हा विषय येथे संपवू या. देशांतरामुळे राष्ट्रनिष्ठा बदलत नसेल तर ते चूक आहे. ती बदलत नसेल तर ती बदलावयाला पाहिजे असे आमचे म्हणणे आहे आणि ती बदलते असा आमचा अनुभव आहे. ह्याउलट धर्मातरणामुळे राष्ट्रनिष्ठा बदलत नाही असेच आम्हाला सांगायचे आहे.