….कोणाच्या अमेरिकेस जाण्याला आक्षेप घ्यायचे काहीच कारण नाही. योगक्षेमासाठी माणसे कोठेही जातात. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीत सगळीकडे कोकण झाले आहे, ते आपल्याला अभिमान वाटावा असेच आहे. देशांच्या सीमा निरर्थक होत जाण्याच्या ह्या काळात आपल्या बौद्धिक बळाच्या जोरावर ही मराठी माणसे तेथे पराक्रमच गाजवत आहेत. पण मग विदेशी लोकांच्या सुरांत सूर मिसळून हिंदुस्थानाविषयी गैर बोलणे समजावून घेणे अवघड आहे. आपल्या सगळ्या भांडणा-तंटणासकट, वादविवादासकट, भ्रष्टाचार, झुंडीसकट आपला देश मला सुंदर वाटतो. पृथ्वीतलावर माणसाने वस्ती करण्यासाठी सगळ्यांत आदर्श असाच तो आहे. विदेशांत गेलेली आपली माणसे ह्या ना त्या प्रकारे ह्या देशाविषयी, लोकांविषयी प्रेमभावनाच प्रकट करीत असतात. पण स्वतःच्या पाल्यांना आंग्ल माध्यमाच्या शाळांत घालून इतरांना आपली भाषा, आपली संस्कृती ह्यांच्या प्रेमाची महती सांगणाच्या लोकांचा दुटप्पीपणा आपण जाणून घेतला पाहिजे. काहीसे भयभीत होऊन त्यांनी आपल्या पुढच्या पिढ्या ह्या भौतिक समृद्धी असलेल्या देशांत पाठविल्या आहेत. आणि नक्राश्रू ढाळावयाला ते मोकळे झाले आहेत. त्यांना हवे ते, त्या दिशेने घडत नाही हे त्यांचे दुःख आहे व ते खरे आहे. ह्या ना त्या पद्धतीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांनी आशा सोडलेली नाही.